मराठवाडा विभागाचे माजी शिक्षक आमदार कै. पी. जी. दस्तूरकर यांची ७९ वी जयंती १२ मार्च २०२२ रोजी होती. त्यांना १९९२ ते २००८ असा आमदारकीचा प्रदीर्घ काळ लाभला होता. अतिशय अभ्यासपूर्ण, नवी दिशा देणारी त्यांची विधान परिषदेतील भाषणं खूप गाजायची आणि सरकारला त्यांच्या भाषणांची, विचारांची दखल घ्यावी लागायची. खरं म्हणजे त्यांच्या भाषणांचे पुस्तक निघायची नितांत गरज आहे. अत्यन्त साधेपणा हा त्यांचा मोठा गुण होता.
मी मंत्रालयात माहिती विभागात १९९३ ते १९९८ आणि पुन्हा २००३ ते २००८ या काळावधीत कार्यरत असताना ते नेहमी भेटण्यासाठी येत असत. त्यांच्याशी बोलणं ही एक बौद्धिक मेजवानी असे. दस्तुरकर सरांचे २७ एप्रिल २०१० रोजी निधन झालं. पण त्यांचे चिरंजीव प्रा प्रमोद यांनी करिअर म्हणून शिक्षण क्षेत्र निवडलं आणि आपल्या वडिलांच्या शैक्षणिक कार्याची परंपरा कायम ठेवली, असे मला वाटते.
खरं म्हणजे प्रा प्रमोद यांना खुप मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेली होती. परंतु स्वतःच्या हिमतीवर पुण्यासारख्या नवख्या शहरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि तो तडीसही नेऊन दाखविला.
प्रमोदजी मूळचे नांदेडचे. शिक्षकांचे नेते, कट्टर कम्युनिस्ट ज्यांनी आपलं पुर्ण आयुष्य समाजाला दिले, शरद पवार साहेब पण त्यांचा रिस्पेक्ट करत होते असे दिवंगत मराठवाडा शिक्षक आमदार श्री पी जी दस्तुरकर यांचे प्रमोदजी सुपुत्र होत.
प्रमोदजींनी बी ई (मेकॅनिकल) आणि एम ई (डिझाइन) या पदव्या धारण केल्या असून, ते सध्या पुण्यात एम आय टी (MiT) सारख्या प्रतिष्ठित कॉलेज मध्ये रिक्रूटमेंट विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. कॉलेज मधून जे विद्यार्थी पास आऊट होतात त्यांच्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जॉब द्यायचं महत्वाचे काम ते करतात. ह्या क्षेत्रात त्यांचे खूप चांगले नाव आहे. ह्या आधी बऱ्याच कॉलेज मध्ये त्यांनी काम केले आहे, आणि हो साम टीव्ही चे ते हक्काचे मार्गदर्शक आहेत. एखादा नौकरी विषयक काहीं कार्यक्रम असेल तर प्रमुख अतिथी म्हणून त्यांना आमंत्रण असते.
प्रमोदजींनी आता पर्यंत हजारो जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकरीला लावले आहे. ते नोकरी लावतातच पण मुलाखत कशी द्यावी, काय बोलावे, पोशाख कुठला परिधान केला पाहिजे अशी इत्यंभुत माहिती ते विद्यार्थ्याना देतात. त्यांचं मार्गदर्शन घेतलं की विद्यार्थी १००% मुलाखतीत यशस्वी होतोच, हे विशेष !
प्रमोदजी लहानपणापासून शिस्तीत राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांना अजिबात आवडत नसे की मुलाने आपले नाव घेऊन स्वतःचा फायदा करून घेणे. त्यामुळे लहानपणापासूनच असे संस्कार असल्याने त्यांनी वडिलांच्या नावाचा कूठे ही फायदा घेतला नाही. जे काही कमावले, ते स्वतःच्या कर्तृत्वावर आणि हिमतीवर.
प्रमोदजी पुण्यात आई, पत्नी आणि मुलांसोबत राहतात. त्यांची आई कडक स्वभावाची आहे. ते आईं आणि पत्नी अशा दोघांची जबाबदारी अतिशय चांगली सांभाळतात.
प्रमोदजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कट्टर समर्थक आहेत. परंतु घरी पत्नी आणि आई साठी, देवदेव करतात कारण त्यांचं समाधान हेचं त्यांचं सुख आहे.
प्रमोदजींचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि प्रत्येकाला मदती साठी तत्पर असा आहे. ते सदैव हसतमुख राहून काम करीत असतात, हा त्यांचा गुण खरंच आपण घेण्यासारखा आहे.
एवढा सगळा व्याप असून सामाजिक कामात पण ते सतत अग्रेसर असतात. सोसायटीचे काम असो अथवा अजून कुठले, ते नेहमीच पुढे असतात. इतकेच नाही तर वडिलांच्या नावे ते एक प्रबोधिनी सुध्धा चालवतात.
प्रमोदजींना त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800