शालेय शिक्षणमंत्री, प्रा. वर्षा गायकवाड…
यांचा आज, ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मिशन आयएएस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांचा विशेष लेख…
मागच्या महिन्यात माझा मोबाईल खणखणला. एक नवीन नंबर दिसला. मी फोन उचलला, तिकडून आवाज आला, मी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या कार्यालयातून बोलतोय. तुमचा “मी आय ए एस अधिकारी होणारच” हा कार्यक्रम धारावी भागात घ्यायचा आहे. आमच्या धारावी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी म्हणून शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. मी लगेच होकार भरला. 17 आणि 18 तारखेला कार्यक्रम ठरला.
खरं म्हणजे वर्षाताईंचा माझा परिचय नव्हता. पण माझे मित्र व डी वाय पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, श्री पाटील व प्रा.वर्षा गायकवाड मॅडमचे
ओ एस डी श्री कांबळे साहेब यांची एका कार्यक्रमात भेट झाली आणि आमच्या धारावीतील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करावयाचे आहे असा वर्षाताईंचा संकल्प असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पाटीलसाहेबांनी त्यांना माझं नाव आणि नंबर दिला. कार्यक्रम ठरला.
मी मुंबईला रेल्वेने पोहोचलो. मला न्यायला गाडी आली होती. एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये माझी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मला असे वाटले धारावीमधला कार्यक्रम आहे तर साधारणपणे लहानशा सभागृहामध्ये असेल. पण मी जसा वर्षाताईंच्या बरोबर धारावीकडे जायला लागलो तसतशी कार्यक्रमाची भव्यता माझ्या लक्षात यायला लागली. धारावीच्या प्रवेशद्वारापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत प्रत्येक पोलवर माझे पोस्टर लागलेले होते. ठिकठिकाणी कमानी उभारलेल्या होत्या.
धारावीच्या शाहू नगरातील प्रचंड मोठ्या मैदानावर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. पूर्ण मैदान खच्चून भरले होते. आम्हाला गाडीतून उतरून स्टेजच्या समोर जायला पंधरा-वीस मिनिटे लागली. उतरल्याबरोबर सगळे कार्यकर्ते धावून आले आणि आम्हाला वाजत गाजत स्टेजपर्यंत घेऊन गेले. भव्य असे स्टेज होते. 💐किमान तीनशे हॅलोजन दिवे स्टेजवर असतील. आणि स्टेजवर किमान ५० लोक बसतील एवढा मोठा स्टेज होता. वर्षाताईवर धारावीच्या लोकांचे किती प्रेम आहे व वर्षाताई धारावीसाठी जे काय करीत आहे ते किती महत्त्वाचे आहे, हे कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून दिसत होते.
कार्यक्रम सुरू झाला. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आमदार श्री भाई जगताप हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “मी आयएएस अधिकारी होणार” हा कार्यक्रम संपला. तेव्हा वर्षाताई यांनी आणि भाई जगताप यांनी माझे मनापासून अभिनंदन केले. भाई जगताप म्हणाले, आम्हाला मुंबई आय ए एस मय करायची आहे. माझ्या 16 ही विधानसभा मतदारसंघात मी तुमचे कार्यक्रम लावतो.
कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर एवढी गर्दी केली की एवढी मोठी गर्दी मी प्रथमच पाहत होतो. मी चार दिवस वर्षाताईंचा पाहुणा होतो. माझे कार्यक्रम त्यांनी धारावीमध्ये आयोजित केले होते. या चार दिवसांमध्ये वर्षाताई गायकवाड व त्यांच्या धारावीच्या प्रेमाबद्दल बरेच काही चांगले ऐकायला मिळाले. माझा धारावीचा मुलगा आयएएस झाला पाहिजे या त्यांच्या विचारांबद्दल बरेच काही या चार दिवसात जाणून घेता आले.
कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या दिवशी आम्ही वर्षाताईंना त्यांच्या बंगल्यावर भेटलो. वर्षा ताईंनी पूर्ण वेळ देऊन मिशन आय.ए.एस. जूनियर आयएएस , स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा शिबिर हे मिशन आय ए एस चे सर्व उपक्रम त्यांनी समजावून घेतले आणि त्यावर लगेच अंमलबजावणी करण्याची सूचना देखील त्यांच्या ओएसडीना केली.
कार्यक्रम होतो काय, वर्षाताई निर्णय घेतात काय आणि मिशन आय.ए.एस.च्या कामाला धारावीला सुरुवात होते काय ! हे सगळे स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. पण ते खरं होतं. वर्षाताई साहेबांनी ताबडतोब यंत्रणा फिरवली. आज मिशन आयएएस धारावीच्या परिसरामध्ये उभे राहत आहे. त्यामध्ये वर्षाताईसाहेबांनी व त्यांच्या यजमानांनी जो पुढाकार घेतला तो निश्चितच महत्त्वाचा आहे. मोठ्या अकादमीचा आराखडा देखील तयार झालेला आहे. ग्रंथालय, अभ्यासिका याशिवाय मार्गदर्शन वर्ग या सर्वांचे नियोजन करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे.
मला खूप नवल वाटत होते. एक कॅबिनेट मंत्री मला अमरावतीला वरून मुंबईला बोलवतात काय, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये माझे प्रचंड मोठे कार्यक्रम घडवून आणतात काय, नुसत्या कार्यक्रमावर थांबत नाही तर मिशन आयएएस माझ्या धारावी विभागामध्ये कसे राबवता येईल ? यासाठी बैठका घेतात आणि तेही ताबडतोब, हे निश्चितच अतिशय चांगले आहे व धारावीला आयएएसचा मार्ग दाखवणारे आहे.
…आज वर्षाताई गायकवाड मॅडमचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालक. मिशन आय ए एस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
आपण बऱ्याच दिवसापासून पहात आहोत की सर्व झोपडपट्ट्या जुगार अड्डे आणि दारूचे दुकान आणि आणि भयानक दारिद्र्याने व्यापलेल्या असतात. अशा या अंधारमय जीवनाला प्रकाश देण्यासाठी आणि त्यांचा शिक्षणातून उद्धार करण्यासाठी या.वर्षाताईंनी केलेले हे प्रयत्न अनमोल आहेत. अशी विचारधारा असणारे लोक मंत्रिमंडळात किंवा सत्तेत कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मग ती सत्ता कोणाचीही व कोणत्याही पक्षाचे असो. त्यामुळे वर्षा ताईच्या या कार्यक्रमाला मानाचा मुजरा आणि सलाम…
…..
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या सुंदर साध्या सोप्या लेखनातून शिक्षणमंत्री प्रा.सौ. वर्षाताई गायकवाड यांचे तळमळीने भारावलेले व्यक्तिमत्व वाचण्यास मिळाले.
त्यांच्या हया धारावी मधील उपक्रमास खूप खूप शुभेच्छा !
सामान्य जनतेचा जाणता, सौ. वर्षाताई गायकवाड यांस, वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा !
सौ. वर्षा महेंद्र भाबल.