अम्मी
सा.न.वि.वि.
पत्रास कारण की,
आज तुझी पुन्हा एकदा नव्याने आठवण झाली. आज तुला पत्र लिहावेसे वाटले. आज तू जाऊन बरोबर सहा महिने झाले. या सहा महिन्यांत एकही दिवस असा गेला नाही की तुझी आठवण आली नाही. पण हे ऐकून घेण्यासाठी तू आता इथे नाही.
पण आज तुला पत्र लिहीण्याचे कारणही तसे खास आहे. आज तुझा वाढदिवस. आम्हाला आमच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून शुभेच्छा देणारी अम्मी, आज तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्या ? आमच्या शुभेच्छा ऐकायला तू आमच्या बरोबर नाहीस. तुझे उपकार फेडण्यासाठी पुन्हा एकदा तुझ्याच पोटी जन्म घ्यावा लागेल.
जेव्हा माझे लग्न झाले तेंव्हा आपली खुशाली पत्राद्वारे कळायची. पण आता पत्र लोप पावली. पण त्याची जागा घेतली फोनने. तेव्हापासून आपण रोज फोनवर बोलत होतो. एकेका दिवशी तर तू दिवसांतून दोन तीन वेळा मला फोन करायची. मला फोन रिसीव्ह करायला वेळ झाला तर तुझा जीव कासावीस व्हायचा की आज ही फोन का उचलत नाही ? तब्येत तर बरी असेल न ?
पण हे काळजी करणारे हृदय असे एकदम अचानक बंद पडेल असे वाटले नव्हते ग मला. तू अशी कशी आम्हाला पोरके करून गेली अम्मी ?
किती गाऊ गोडवे तुझे ?
कशी करावी उतराई ?
काळाची पावले मागे वळून पाहताना दिसते तुझी ती पुसटसी सावली. तुझ्या आठवणीत अजुनही डोळे आपोआप पाणावले जातात. तुझ्या नावाची हाक अजूनही अंतर्मनाच्या कोपऱ्यात स्पंदन निर्माण करतात. तुझे असे निघून जाणे ही न भरणारी पोकळीच आमच्या आयुष्यात निर्माण झाली आहे.
जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे असले तरी तुझे जाणे आम्हाला खूपच एकटे करुन गेले. कितीही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत पण सावरता येत नाही. त्या दिवशी तू आमच्यातून अचानक निघून गेलीस. तुझे जाणे आम्हाला चटका लावून गेले. पण हे मात्र खरे की तू तुझ्या आठवणीत अजुनही आमच्या बरोबर होतीस, आहेस आणि रहाणारच.
अजून खूप काही बोलायचे होते. अजून खूप गप्पा करायच्या होत्या. पण ते अर्ध्यावर सोडून तू गुपचूप निघून गेली. तू माझे चालते बोलते विद्यापीठ होतीस. तू माझी खरी शिल्पकार होतीस. तुझ्या मुळेच तर आम्ही घडलो. आजोबांच्या कडक शिस्तीचे पालन करत तू जपलेल्या संस्कृती आणि संस्कारातून आमच्यावर तू केलेल्या संस्कारांचा अनमोल ठेवा आम्ही कायम जतन करून ठेवणार आहोत.
आज फक्त एकच म्हणेन,
आई तू होतीस माऊली
प्रेमाचीच सावली.
वेडी तुझी माया
होती तिच आभाळमाया

– परवीन कौसर. (तुझीच लेक)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.