Thursday, December 26, 2024
Homeलेखप्रिय आई…..

प्रिय आई…..

आज जी लेखणी हातात आहे ती तुझ्यामुळे व बाबांच्या प्रोत्साहनामूळेच. तू जाऊन वर्ष झाले पण युगासारख वाटतं आहे, मायेचं पांघरूण हरवण काय असतं हे आता फार जाणवतं. बोलू शकली तोवर फोनवर सगळ्यांची चौकशी करायची ठीक आहात ना तुम्ही, आम्हीही ठीक आहोत म्हणायचीस. नंतर तर प्रत्येकवेळी सुखी रहा असा शेवटी आशीर्वाद द्यायचीस.
खूप बळ यायचं त्यामुळे…..

तुझं व्यक्तीमत्व सगळ्यांनाच परिचयाचं… सुंदर, गोरी, हसरी, बोलकी.. शब्दांनी परक्यालाही जिंकून घेण्याची तुझी भाषाशैली ..
तू सुगृहिणी तशीच अन्नपूर्णाही होतीस. तुझ्या हातचा साधाही पदार्थ अत्यंत चविष्ट असायचा. आदरातिथ्य, सगळ्यांना मदत करणं स्वकष्टाने… तुला आवडायचं, सणवार करताना विज्ञान तू कधी विसरली नाही. निसर्गाशी कायम नातं जपलं. श्रावणमास तुझ्या खूप आवडीचा… नागपंचमी वटपौर्णिमेला रिमझिम पावसात निसर्ग किती सुंदर दिसायचा. तू शेतातल्या वारूळाला पूजेला आम्हाला घेऊन जायचीस… विशाल, मोठ्ठ्या वटवृक्षाच्या छायेखाली न सांगता वृक्ष महती पटायची. कलेची आवडही सांभाळली. रांगोळी, विणकाम, नाविन्याची गोडी, सुंदरशी ताज्या पानाफुलांची फुलदाणी, बैठक सजवणं.. दारं खिडक्यांना वेगवेगळे पडदे शिकवणं, आम्हा बहिणींना नवीन डिझाइनचे फ्राँक्स व तुझी साध्याच पण नवीन साड्यांची आवड कायमच… आमचे वाढदिवस मैत्रीणी बोलावून, औक्षण करून फराळाचं करून छान साजरा करायचीस. सणावारी नऊवारी तुला खूप शोभून दिसे, मानेवर सैल अंबाडा… तुझं सोज्वळ प्रसन्न गृहिणी रुप नेहमी आठवतं.

तीस वर्षांपूर्वी… आजी, आई ,मी, मुलगी, नात.

वडील मंडळी, दीर, जावा नणंद आम्ही मुली… सासर माहेर सारा गोतावळा जबाबदारीने, आपुलकी व प्रेमाने सांभाळायची. पैपाहुणे, गावातील ओळखी, महिला मंडळ, व्याख्यान, वाचन, प्रवचन किर्तन ते सिनेमा आर्केस्ट्रा सर्वांचा वेळात वेळ काढून तू आस्वाद घ्यायचीस. सगळ्यांवर लक्ष द्यायची. इतरांना मदत आणि कौतुक करण्याचा संस्कार नकळत तुझ्यामुळे आमच्यातही आला. बाबा डाँक्टर.. व्यस्त असायचे खूपच कामात.

पण तू दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळल्यास. संसार कसा आनंदी, सुखी करायचा ती गुरूकिल्ली तुला सापडली होती. तुझ्या या सकारात्मक वृत्तीमुळे जीवनातील सर्व सुखदुःखात तू सकारात्मकता ठेवली. आनंदाचे क्षण तू छान उपभोगले. शेवटपर्यंत तुम्ही प्रदीर्घ सहजीवन एकमेकांची सावली होऊन समाधानात घालवलं. तुझ्या गोड गळ्यासारखंच संपूर्ण आयुष्य सुरेल झालं तुझं…! सासर बघून मिळतं पण असं माहेर मात्र पूर्वजन्मीच्या पुण्याईनंच आम्हाला लाभलं हे खरंच !

घरी राहूनही समाजसेवा, इतरांना हवी ती मदत, सत्कार्य हेच ईशकार्य … कर्मकांड न करता सचोटी, निरपेक्षता, सद्भावना, व प्रांजळ अंतःकरणाने देवावर श्रध्दा ठेवावी… हे तू कृतीतून नकळत आम्हाला शिकवलं.
तू आज नाहीस… खूप शांतपणे देवाघरी गेलीस पण मनात कायम एक पोकळी ठेऊनच….
आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही …दोन वर्षापूर्वी बाबा आणि आता तूही ….
पण तुझे आशीर्वाद शुभेच्छा सदैव आम्हाला सकारात्मक जगायला बळ देत राहील.

आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस

प्रत्येक छोट्याशा गोष्टीतही तुझ्या मनातील मोठा विचार उमजत जायचा आणि तू आई म्हणून मुलांसाठी किती मोठी आहेस हे समजायचं. आम्ही अजूनही खूप लहान आहोत गं… तुझी प्रेमसावली … आशीर्वाद आमच्या व परिवाराच्या शिरी सदैव असू दे …. असणारच.. कारण प्रेमाचं मूर्तीमंत स्वरूप केवळ आईच…!
तुला लाडक्या अरुणाचा शीर साष्टांग दंडवत… आई !

अरुणा दुद्दलवार

— लेखन : अरुणा दुद्दलवार.
दिग्रस, जिल्हा यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. आईच्या आठवणी चा छान लेख लिहिला आहे अरुणा ताई तुम्ही 👌👌👌

  2. “स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी” आपल्या आईंच्या आठवणींच्या लेखणीतून मला आठवले ताई

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

  3. अरुणाताई, आईचे व्यक्तिचित्र किती सुंदर शब्दात डोळ्यासमोर साकार केले आहेत तुम्ही! तुमच्या आईचा प्रेमळ, लाघवी स्वभाव तुमच्याही व्यक्तिमत्त्वात पुरेपूर उतरला आहे. त्यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९