अबोली बकुळीने धरलाय फेर
प्राजक्ता राणीच्या बघ चौफेर
सांग सांग कोण आहे मनी सखे तो
गाली तुझ्या हसू देऊन लपलाय जो
सोडा सोडा वाट माझी जाऊ द्या मला
असं कुणी कोंडतं का नाजूकशा फुला
कुणी नाही कुणी नाही माझया गो मना
अलवार फुलले मी सहजी पुन्हा
आज कशी वेगळीच वागलीस तू
फुलताना गालामध्ये लाजलीस तू
शुभ्र तुझ्या पाकळ्याही थरथरल्या
लाज गाली येऊनिया का बिथरल्या
नाही गं सख्यांनो, बकुळफुलांनो
अबोलीच्या राण्यांनो, समजून घ्या
वारा थोडा गारगार ,झोम्बला ग फारफार
म्हणून ही थरथर उमजून घ्या
कुणीतरी आहे तुझ्या मनात बसलं
आतून कुणीतरी लाडिक हसलं
लपवू नको ,आम्ही सख्या तुझ्या
सांगणार नाही कुणा गोड गुपिता
कसं सांगू आला तो गं भुलला म्हणे
गंध माझा घेऊनिया डुलला म्हणे
सोन्या माझा सोनचाफा जपेन मला
कोशी त्याच्या अलगद ठेवेन मला
खरं सांगू मीही रंगरूपावर भाळले
मोहूनिया गंधावर मागे मागे चालले
आता बाई अर्पियले माझे मीच त्याला
सोनचाफा प्राजक्ताचा नुकताच झाला
कित्ती छान गोडी गं, अनुरूप जोडी गं
प्रीतीची भेट मोठी आगळी गं
एकमेका गंध द्या जीवनी सुगंध घ्या
प्रेमाची शिदोरी वेगळी गं
प्राजक्ता गालात लाजली गं

– रचना : डॉ. मंजूषा कुलकर्णी