वाचक ॲड हरीश काळे, कराड यांनी ‘मी पोलीस अधिकारी’ या पुस्तकाच्या लेखिका, निवृत्त पोलिस उप अधीक्षक सुनिता नाशिककर यांना पाठविलेले पत्र म्हणजे जणू पुस्तक परिक्षणच होय. ते पुढे देत आहे.श्री काळे यांचे मनःपुर्वक आभार.
– संपादक
आदरणीय मॅडम जी,
सस्नेह नमस्कार!आमच्या कराडच्या न्यायदेवतेकडून आपल्या पोलीस दलातील ‘अवर्णनीय अनुभूती’ चा आभास करून देणाऱ्या ‘मी, पोलीस अधिकारी’ हा जिवंत कथासंग्रह प्राप्त झाला.
‘आपलं पोलीस दल’ यापासून सुरू झालेला प्रवास ‘मागे वळून पाहताना’ कधी संपला हे कळालेच नाही. प्रत्येक कथा हृदयाला भिडणारी…. काहींचा शेवट गोड तर काही हृदय हेलावणारी…. मानवी रूपातील देव आणि दानव दर्शविणाऱ्या… मनाला रुंजी घालणाऱ्या… अन् एक महिला पोलीस अधिकारी नोकरीस रुजू होताना मनाने जेवढ्या हळव्या वाटत होत्या त्यापेक्षा कर्तव्य प्रसंगी किती कठोर आणि निडर असतात याची अनुभूती देणाऱ्या अनुभवास मिळाल्या.
मॅडम जी खरोखरच ग्रेट ! चांदी नगरीत आपला जन्म झाला, मात्र तुमची कर्मभूमी ठरली ती मायानगरी मुंबई !
अमरावतीतील लाचलुचपत प्रतिबंध खात्यातील वर्ष सव्वा वर्षाचा कार्यकाल आणि निवृत्तीच्या वेळी स्वतःच्या मातीत सेवा करण्याची संधी वगळता तुमची संपूर्ण सेवा कॉस्मोपॉलिटीन सिटी मुंबई या ठिकाणीच झाली. संपूर्ण पुस्तकात तुम्ही व्यक्तिगत आयुष्यातील विवाह, पुत्र प्राप्ति यासारखे गोड प्रसंग कटाक्षाने टाळून केवळ आणि केवळ पोलीस दलातील कार्याची ओळख करून देताना नवीन महिला अधिकाऱ्यांसाठी अनुभवाची शिदोरीच उपलब्ध करून दिली आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्ही ग्रामीण भागातील शौचालयाची अनास्था मोजक्या शब्दात व्यक्त केली आहे. त्या काळातील आया, बहिणींचे हाल मी देखील जवळून अनुभवले आहे. पावसाळ्यातील दिवस तर खरोखरच नरक यातनेपेक्षा कमी नव्हते.
महाराष्ट्राच्या किरण बेदी म्हणून ओळखले जाणाऱ्या मीरा बोरवणकर मॅडम यांच्या प्रेरणेने तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाला, त्यावेळी आपण कथन केल्याप्रमाणे दुर्दैवाने पोलीस उप अधीक्षक पदाकरिता महिला उमेदवारांनी अर्ज करू नये, असे स्पष्ट नमूद होते, अन्यथा आम्हास आज एका तीन-चार जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक पद आणि सरते शेवटी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून निवृत्त होणाऱ्या आयपीएस केडर प्राप्त सुनिता कुलकर्णी- नाशिककर मॅडम यांचा पोलीस अधिकारी प्रवास अनुभवास मिळाला असता.

आपण ट्रेनिंगला असतानाच नियतीचा घाला किती अघटीत असतो याची प्रचिती आली. आदर्श विद्यार्थी म्हणून पन्नास रुपये बक्षीस मिळाल्यानंतर त्यामध्ये स्वतः जवळचे 50 रुपये देऊन शंभर रुपयांची देणगी कॉलेजला देण्यासाठी लावणाऱ्या परमपूज्य पिताश्रींना आपल्या लेकीच्या अंगावरील खाकी वर्दी आणि कडक सॅल्यूट अनुभवता आला नाही याचे शल्य वाटले. मात्र आईला दुबईवारी घडवून तुम्ही कृतकृत्य झालात.
हुपरी या चांदी नगरीतून थेट चमकणाऱ्या चंदेरी दुनिया म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई नगरीत विमान सेवा या सर्वात पंचतारांकित ठिकाणी तुमची पोलीस सेवा सुरू झाली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी नावे आपण केवळ पुस्तकात किंवा पडद्यावर पाहिली आहेत अशा स्टार, सुपरस्टार यांना अत्यंत जवळून पाहण्याचा, चेकिंग करण्याचा दुर्मिळ योग आपणास प्राप्त झाला. अवघे आयुष्य दुःखी जणांच्या आयुष्यात फुंकर घालण्यासाठी व्यतीत करणाऱ्या सेवेची देवता नोबेल पारितोषिक प्राप्त आदरणीय मदर तेरेसा यांच्या चरणाला स्पर्श करण्याचा आणि त्यांच्यासोबत तासभर राहण्याचा अमृततुल्य अनुभव आपण अनुभवला. सुपरस्टार अमिताभ बच्चन, जयाप्रदा, श्रीदेवी यांच्यासह सर्वच सुपरस्टार तुम्ही जवळून पाहिले. त्याकाळी अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नव्हते नाहीतर या प्रत्येक स्टार सोबतचा सेल्फी आम्हास पाहावयास मिळाला असता.
स्वतःच्या स्वार्थासाठी सर्कसच्या टपरीवर वर कारवाई करण्यास लावणाऱ्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख आपण कटाक्षाने टाळला. मात्र ज्यांनी ज्यांनी तुम्हास पोलीस दलात प्रेरणा दिली, सहकार्य केले, मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचा नावासह आपण उल्लेख करून मनाचा मोठेपणा अभिप्रेत केला आहे.
दंगलीचे दोन अनुभव आपण कथन केले आहेत.यापैकी एक अनुभव तर आपल्या जीवावर बेतणारा होता, दोन जहाल समुदायांच्या बरोबर मध्यभागी राहून मागे न हटणारी आमची कोल्हापूरची ताराराणी खरोखरच मला खूप भावली. त्यावेळी आपण दाखवलेले धाडस आणि हाताळलेली परिस्थिती खरोखरच अवर्णनीय आहे. त्यावेळी दंगलीत एखादा दुसरा बळी गेला असता तर मुंबईच काय महाराष्ट्र पेटायला देखील वेळ लागला नसता . सध्या सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस स्टेशन हद्दीत अशीच एक दुर्दैवी घटना घडल्यामुळे गेले तीन दिवस झाले इंटरनेट बंद होते ते आज मध्यरात्री सुरू झाले, त्यामुळेच एवढ्या सुंदर पुस्तकास प्रतिक्रिया देण्यास विलंब झाला असून आज भल्या पहाटे लिहिण्याचा योग आला.
दंगलीत काय साधते? फक्त आणि फक्त वेळ निघून गेल्यावर होणारा पश्चाताप! हे तुमचे वाक्य अंतर्मनाला भिडले. खरंच या दंगलीमुळे अनेकांच्या आयुष्याची ससेहोलपट होते, आई, बहिण, भाऊ या नात्यांचा चक्काचूर होतो.तुम्ही कथन केल्याप्रमाणे आजपर्यंत एकाही दंगलीत पुढाऱ्यांना अटक झाली नाही किंवा त्यांच्यातील कोणी बळी गेला नाही. सामान्य जनतेने खरंच यामधून बोध घेतला पाहिजे.
छेड काढणाऱ्या युवकाला तुम्ही दिलेली सणसणीत कानशील असो, गुप्तांगात ड्रग्ज लपवणाऱ्या नायजेरियन महिलेवरील कारवाई असो अथवा पत्र्यावर चढून आरोपीवर पिस्तूल रोखून अटक करण्याचा चित्रपटाप्रमाणे चित्तथरारक प्रसंग असो, आपण खरोखरच कोल्हापूरची लेडीसिंघम म्हणून मुंबईत कामगिरी बजावल्याची अनुभूती येते.
पोलीस हा केवळ कठोर नसतो तर तो सहृदयी देखील असतो, याचा धडा आपण कार्यातून दिला आहे. कोरोना काळात आपण केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तो काळ खरोखरच अत्यंत वेदनादायी होता. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती, त्यावेळी अनेक समाजसेवकांकडून सहकार्य प्राप्त करून आपण अन्नछत्र चालवले, तृतीयपंथीयांना मदत केली हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यामध्ये आमच्या कराडच्या न्यायदेवतेचाही सिंहाचा वाटा असल्याचे अभिप्रेत झाले. विषयांतर नको नाहीतर मॅडम (आमच्या कराडच्या न्यायदेवता यांना देखील आपण त्यांच्या कार्याचे पुस्तक रूपी व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करा अशी अपेक्षा आहे, 195 पानाचे जजमेंट देणाऱ्या व आयुष्यभर निरपेक्षपणे एक सर्वोत्कृष्ट न्यायदेवतेची भूमिका बजावणाऱ्या आमच्या न्यायदेवतेच्या त्यागाची, दातृत्वाची अनेक उदाहरणे मी इतरांकडून ऐकली आहेत, त्यामध्ये शाळेची देणगी असो, मंदिरास भरीव निधी असो, मोफत सेवादान असो अथवा तुम्ही नमूद केल्याप्रमाणे कोरोना काळातील मदत असो, असे अनेक सत्कार्य पुस्तक रुपी यावेत अशी अपेक्षा आहे, यासाठी तुमची मदत निश्चितच अद्वितीय राहील अशी खात्री आहे .)
असो.तुमच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्याच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देण्याचा योग प्राप्त झाला, मी अत्यंत लहान असून चुकून माझ्याकडून काही चुकले असेल तर मिच्छामी दुखडम !!
(मॅडम जी आपला पोलीस दलातील सेवाकार्याचा अमृततुल्य ठेवा नाम मात्र दीडशे रुपयात आहे. मात्र तो मला मोफत मिळाला याबाबत खजील वाटते. भविष्यात तुम्हास भेटण्याचा योग आल्यास नक्कीच मी उतराई होण्याचा प्रयत्न करीन. तसेच तुम्हास लवकरच मीरा बोरवणकर मॅडम यांना भेटण्याचा योग यावा हीच सदिच्छा आणि हो आता थांबू नका, आता तुम्हास भरपूर वेळ असून नवनवीन लिखाण करत रहा, हृदयापासून शुभेच्छांसह.)
आपला
- — ॲड हरीश काळे. कराड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800