पुणे येथील प्रख्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील ७ विद्यार्थी यंदाच्या यूपीएससीच्या मुख्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आणि महाविद्यालयात एकदम जल्लोष निर्माण झाला. एकाच वेळी ७ जण या कठीण स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर बहुधा देशातील पहिलीच वेळ असावी.
या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी प्राचार्य डॉ रवींद्रसिंह परदेशी सरांशी संवाद साधला असता, त्यांनी सर्व यशस्वितांचे अभिनंदन करून महाविद्यालयासाठी ही अत्यन्त अभिमानाची बाब आहे असे सांगितले.
भारतीय विदेश सेवेतील, परराष्ट्र सचिव राहिलेले श्री रंजन मथाय, श्री गौतम बंबवाले यांची गौरवशाली परंपरा या विद्यार्थ्यांनी पुढे चालवली असून महाविद्यालयातील अभ्यासाचा, ग्रंथालयाचा या विद्यार्थ्यांनी यथार्थपणे उपयोग करून घेतला या बद्दल समाधान व्यक्त करून बाकीच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राज्य शास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार सरांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सर्वात प्रथम याचे श्रेय जाते ते म्हणजे या विद्यार्थ्यांना, ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रामाणिक कष्ट केले. चिकाटीने व जिद्दीने स्वतःचे ध्येय साधले. आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो. कॉलेज मधील सकारात्मक वातावरण ही खूप सहाय्यभूत ठरले आहे.

विशेषतः २०१६ साली आमच्या महाविद्यालयाने स्वायत्तता घेतली. त्यामध्ये आम्हाला अभ्यासक्रम बनवण्याचे स्वातंत्र्य मिळाले. ७ पैकी ६ विद्यार्थी हे राज्य शास्त्राचे आहेत. तर एक मुलगी मानस शास्त्राची आहे.
शिक्षक म्हणून आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद व सार्थ अभिमान वाटतो. एकाच वेळी एवढे विद्यार्थी पास होणे हा सुद्धा एक मोठा उच्चांक आहे व महाराष्ट्रातील यशाचे शिखर गाठणारे हे बहुदा पहिलेच कॉलेज असेल.

या विद्यार्थ्यांच्या यशाचे रहस्य काय ? असे सांगताना पवार सर म्हणाले की, सगळेच उमेदवार यूपीएससी साठी खूप मेहनत घेतात यात शंकाच नाही. पण या मुलांना त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अवती भवती जो अवकाश लागतो तो फर्ग्युसन महाविद्यालयात मिळाला आहे.
फर्ग्युसन मध्ये चर्चा, वाद विवाद सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आम्ही भारतीय राज्य घटना शिकवत असताना कॉन्स्टिट्युशन असेंम्बली डिबेट्स तसेच राज्य सभेचे व्हिडिओज बनवले. ते भाग आम्ही मुलांना दाखवतो. विविध ठिकाणी भेटी आयोजित करतो. आम्ही महाराष्ट्राच्या विधान मंडळाला भेट देतो. जेव्हा राज्यपाल ऑगस्ट महिन्यात पुण्यात येतात तेव्हा आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो.
आमचा कोरम नावाचा जो स्टुडेंट फेस्टिव्हल आहे, त्यामध्ये मुलं सहभागी होतात व कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यातून त्यांना मिळणारा अनुभव, त्यांची होणारी ग्रोथ सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या कॉलेजने एक प्रथा घालून दिलेली आहे की आमच्या कॉलेज मध्ये जो कोणी विद्यार्थी यशस्वी होईल, त्यास आणि मुलांसाठी एक विशेष व्याख्यान ठेवतो. त्यामध्ये फक्त तो आणि इतर विद्यार्थी असतात. आम्ही प्राध्यापक कोणीच नसतो. आम्ही फक्त त्यांची ओळख करून देतो आणि
या काळामध्ये मुलांमध्ये जे संभाषण होते आणि त्यातून त्यांचा जो आत्मविश्वास वाढतो तो फार मोठा आहे.
केवळ यूपीएससीच नाही तर तीन ते चार वर्षांपूर्वी आमच्या कॉलेज मधील एका विद्यार्थ्याला लंडन युनिव्हर्सिटीची एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळाली होती. दर वर्षी किमान दोन ते तीन विद्यार्थी हे नॅशनल युनिव्हर्सिटी, हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये जातात. चार/पाच लॉ मध्ये स्वतःचे चांगले करिअर करतात. काही विद्यार्थी एम एस डब्ल्यू मध्ये जातात. सोशल सायन्सला दर वर्षी दोन/तीन विद्यार्थी असतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ही काही विद्यार्थी असतात. या सगळ्या माहोलचा परिणाम होतो. येथे साधारण सेंट्रलाईझ ऍडमिशन व मेरीटवर ऍडमिशन असल्यामुळे देशाच्या ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण सर्व विद्यार्थी येत असतात.
ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्यांना येथे वाव मिळतो. हे खूप चांगलं घडतंय. या यशामुळे शिक्षक म्हणून आम्हाला आनंद वाटणे हे स्वाभाविक आहे. यामुळे विद्यार्थ्यांची जी डेव्हलपमेंट झालेली असते ती त्यांना आयुष्यभर पुरणारी ठरते.
बाकीच्या ठिकाणी आर्टस् ला विद्यार्थी मिळत नाही. पण आम्हाला सांगावे लागते की इथे ९२% ला कट ऑफ आहे.
मला असे वाटते की जर काही कल्पकता दाखवून काळाबरोबर काही अभ्यासक्रम तयार केला तर मुलांना निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो.
मुलांना डाऊन टू अर्थ बनवणं, त्यांना वास्तवाचं भान करून देणे हीच आजच्या काळाची गरज आहे.ज्याला काही अर्थ नाही असा अभ्यासक्रम ठेवण्यात काही अर्थ नाही. मुलांना ज्या मध्ये रुची आहे हे ओळखून त्यांनी काळाबरोबर गेले पाहिजे. त्यांना सक्षम बनवणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज आहे.
खरोखरच फर्ग्युसन महाविद्यालयाने केलेले व करीत असलेले प्रयोग, उपक्रम राज्यातील महाविद्यालयानी अभ्यासून ते अंगिकारण्याची गरज आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आपल्या पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

– लेखन :देवेंद्र भुजबळ, 9869484800