Thursday, February 6, 2025
Homeलेखफुंकर

फुंकर

फुंकर म्हणजे ओठांच्या चंबू तून अगदी अलवारपणे बाहेर पडणारी हवा. ही फुंकर किती वेगवेगळ्या प्रकारची असते.  किती वेगवेगळी रूपे घेते. आईच्या ओठातून बाहेर पडली तर वात्सल्य जाणवतं. ‘त्याच्या’ मुखातून बाहेर पडली तर गुलाबी गारवा. आईच्या फुंकरीत असते काळजी आणि ‘त्याच्या’ फुंकरीत असतो लाडीक लाडीक खोडकरपणा.  मैत्रिणीच्या फुंकरित जाणवतं ते ओलं मैत्र.

आपल्या आयुष्याची गाडी सुंदर सुंदर स्टेशने घेत पुढे चाललेली असते. अर्थात ती शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार असते. पण मधेच दिसतो तो सुंदर भूतकाळ, ते अनुभवलेले  सुंदर सोनेरी क्षण. आणि मग आनंदाच्या भरात त्यावर अगदी नकळत, सहजपणे घातली जाते आठवणींची अलगद फुंकर.

शस्त्रांच्या घावा पेक्षा शब्दांचा घाव चांगलाच वर्णी लागतो. जखम खोलवर होते. घाव जायला वेळ लागतो. पण नंतर ते घाव सुसह्य होतात. काही काळाने ते बरेही होतात. पण त्यासाठी औषध म्हणजे मलम पट्टी करणारी गोड शब्दांची फुंकर.

ठेचांना काय तोटा ? वाण फुंकर घालणाऱ्यांची.

वास्तवाच्या चटक्यावर स्नेहाची फुंकर घातली तर त्या चटक्यांनाही हवाहवासा गारवा मिळतो. आणि  ते चटके आपण सहज सहन करू शकतो. मग नव्या आशेची किरणे मन उजळून टाकतात. त्यानंतर उगवते ती सोनेरी पहाट.

कधीकधी हृदयात वणवा पेटलेला असतो. तो काही केल्या विझायला तयार नसतो. अशावेळी एक प्रेमाची फुंकर खूप काहीसं करून जाते. त्या वणव्यात सगळ्या कटुतेचा होतो कोळसा. तनामनाला मग भिजायचं असतं प्रेमाच्या एका थेंबात.

एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे असे आपण म्हणतो. अन् शंभर दुःखाच्या धाग्यांनाच आयुष्य मानतो.  वेदनेच्या निखा-याला आयुष्य मानतो.
आलेल्या आव्हानांना तोंड देत, आपणच आपल्या आयुष्यावर अगदी नाजूकपणे फुंकर घालत जातो. त्यातून असाध्या ला साध्याची हमी देत जातो.

गावाकडचं नेहमीचं दृश्य. नवरा कामावर निघालेला असतो. त्याच्याबरोबर डबा द्यायचा असतो. नेहमीच उशीर हा झालेला असतो. भाजी भाकरी करायची असते.  पटापट चुलीत लाकडे सारून निखार्‍यावर भाकरी भाजली जाते. निखारे फुलवताना अर्धोन्मीलित नेत्रांनी घाईघाईत घातलेली कर्तव्यानिष्ठ अशी फुंकर.

आईच्या पोटचं मूल असतं. लेकरू खेळून खेळून दमलेले असतं. त्याला हलकेच अंघोळ घालून झोपायचं असतं. त्याला भूक हि लागलेली असते. दूधही पाजायचं असतं. दोन्ही हातात बशी धरुन आईने गरम दुधावर घातलेली असते ती मायेची फुंकर.

हेच तान्हं लेकरू खेळू लागतं. इकडे तिकडे बागडू लागतं. रांगून रांगून जीव नकोसा करतं. तरीही आई लाडाने तोंडावर पदर ठेवत हसत हसत त्याच्या चेहऱ्यावर हळूच घालते ती कौतुकाची फुंकर.

फुंकर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती श्रीकृष्णा ची हातात पावा घेतलेली मूर्ती. सगळ्या गोपिकांना तो रास खेळायला बोलवत असतो. रानात गेलेल्या गाई वासरांना तो साद घालत असतो. कृष्ण त्यांना बोलावतो, हसून वेणू तून मधुर स्वर काढत, त्यात हलकेच मारतो मिश्किल फुंकर.

माझी एक मैत्रीण होती. माझ्या पेक्षा खूपच उंचीने कमी. अंगणात खेळताना माझ्या डोळ्यात नेमका धुळीचा कण जायचा. डोळा चोळून चोळून लाल व्हायचा. सतत पाणी येत असायचं. अशा वेळी हीच माझी सखी उड्या मारत मला बरे वाटावे म्हणून  हळूच नाजूकपणे घालायाची मैत्री ची फुंकर.

एका प्रियेचा नवरा खूप दिवस झाले गेला आहे बाहेरगावी. वियोग नकोसा झाला आहे. ती लटकेच त्याच्यावर रुसली आहे. रागावली आहे. मधूनच गोड आठवणींना उजळा देत स्वतःशीच ती लाजत आहे. तेवढ्यात तो पाय न वाजवता येतो आणि ती लाजत असताना तिच्या बटांवर घालतो गुलाबी फुंकर.

अशाच एका साजणीचा साजण गेला आहे युद्ध करायला सीमेवर. बिचारी ती नवथर प्रेयसी. पुरेशी ओळख ही नाही त्याच्याशी. तरीही गुलाबी रात्रीची स्वप्ने ती रंगवीत असते. तेवढ्यात तो येतो. गप्पांना रंग चढतो. आणि अचानक तो दिवा मालविण्यासाठी त्यावर घालतो प्रेम व्याकुळ फुंकर.

संसारात अनेक उन्हाचे चटके बसत असतात. त्यामुळे अनेक जखमा होतात. जिणं खडतर करून टाकतात. हिरवळ जवळपास दिसत नसते. अशावेळी हे आयुष्य सुसह्य करण्यासाठी एकच उपाय असतो. तो म्हणजे त्यावर कोणीतरी हळूच घालावी सहानुभूतीची फुंकर.

ह्या जीवनात आपले भोग भोगणे हे अटळच आहे. त्याशिवाय इलाज नाही. काही वेळा आपले प्रिय जन आपल्याला सोडून जातात. कधी कुणाला दुर्धर आजार होतो. अशी अनेक दु:खे आपल्याशी जन्मभर पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. अशावेळी उभारी मिळते ती पाठीवर फिरणाऱ्या हाताने जो दुःखावर घालतो ममतेची फुंकर.

शाळा सोडल्यानंतर माझ्या जिवलग मैत्रिणीशी माझी भेटच नव्हती. तशी सोशल मिडिया द्वारे आमची गाठ भेट होत होती. पण ते काही खरे नव्हे. ती झाली virtual भेट. परवा ती मला अगदी अचानक रस्त्यात भेटली. आनंदाला धुमारे फुटले. मी क्षणात आठवणींची धूळ झटकली. मैत्री वरची धूळ झटकली आणि त्यावर घातली पुनर्भेटीची  रंगीत फुंकर.

आपल्या जीवनात अनेक ओल्या जखमा असतात. त्यांना शांतता नकोशी वाटते. कोणीतरी बोलावं, आंजारावं, गोंजारावं असं वाटतं. ती जखमेची ठुसठुस,  ती वेदना, अशी नाठाळ असते की ती पुन्हा पुन्हा आपलं लक्ष आपल्या आवडत्या गोष्टीतून काढून घेऊन स्वतःकडे खेचून घेते. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी ती वेदना आपल्या अस्तित्वाची आठवण सतत करून देत  असते. अशा वेळी कोणी तरी अगदी नाजूक अशी फुंकर आपल्या जखमेवर घालावी आणि त्या फुंकरीत क्षणभर ती वेदना, ती ठुसठुस, ते दुःख, एकदम नाहीसं व्हावं. त्या इवल्याश्या फुंकरीनं आपली सगळी वेदनाच शोषून घ्यावी. अगदी जादू झाल्या सारखं वाटवं. आता तर ते दुःख होतं आणि आता कुठे गेलं ? असा प्रश्न पडावा.

ही फुंकर नेमकं करते तरी काय ? ही फुंकर त्या माणसाचा अहंकार फुलवते. शारीरिक पीडे मुळे आपण त्रस्त असतो. एक फुंकर घातली जाते आणि सगळं पुन्हा हवंसं वाटू लागतं. आपल्या ‘मी’ वर आपण प्रेम करू लागतो. खरं तर ‘मी’ वर चं प्रेम प्रत्येकाच्या मनात उपजतच असतं.

साप, नाग जेव्हा दुसऱ्यावर फणा काढून चावण्यासाठी, जोरदार हवा तोंडातून बाहेर टाकतात. पण ती हवा म्हणजे ‘फुंकर’ नव्हे तर तो असतो नागाचा ‘फुत्कार’. या फुत्कारा मागची भावना असते क्रूर, कठोर !

फुंकर हा शब्दच किती सुंदर, अर्थवाही आहे. हा एक सहज सुंदर, स्वाभाविक, नाजूक, अगदी हळुवार असा भावनाविष्कार! फुंकर शब्द डोळ्यासमोर आला तर डोळ्यासमोर उभी राहते ती एखादी नाजूक-साजूक व्यक्ती. तो तिचा ओठांचा केलेला चंबू, तिचे अर्धोन्मीलित प्रेम व्याकुळ डोळे, त्या फुंकरीत काय नसतं? कधी माया, कधी ममता, कधी स्नेह, तर कधी सहवेदना. शेवटी असते ती एक संवेदनशीलता.

आणि मग कुण्या अनामिक कविने म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही म्हणावसं वाटतं,

एक मैत्रीण अशी असावी

आयुष्याच्या अनोळखी वळणावर

तुमच्या व्यथा वेदनांवर

तिने हळूच फुंकर घालावी….

शुभदा दिक्षित

– लेखन : शुभदा दीक्षित. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी