आम्हा बायकांना फुलं मुळातच आवडतात. पूर्वी केस कापायची फॅशन नव्हती. शाळेत असतांना लांब केसाची एक वेणी किंवा दोन वेण्या असायच्या. रिबीन लाऊन घातलेल्या ! बट वेणी, पाळणा वेणी, हेअर पिना लावून घातलेली सैल वेणी. हीच काय ती त्यावेळची फॅशन..

अशा वेणीवर घरच्या गुलाब, मोगरा, अनंत, शेवंती, सोनटक्का ह्या पैकी कुठलेही फूल घालणे, म्हणजे नट्टा पट्टा करायची वरची पातळी. दारात जाई, जुई, चमेली, बकुळ, मदनबाण ह्यांचे वेल असले तर त्यांचा सुवासिक गजरा करणे आणि केसांत माळणे हे आवडते काम असायचे.
मोठेपणी केसाचा सैलसर अंबाडा घालणे त्यावर नाजूक फुलांची वेणी, कलाबुतीसह करून समारंभाला घालणे, हे ठरलेले असायचे. दारावर विकायला येणारी काकडी, नेवाळी सारखी फुलं यायची.

आम्ही शेजारी, मैत्रिणी मिळून ते पुडे घेत असू. एकत्र बसून गप्पा मारत त्या फुलांच्या वेण्या, गजरे, हार बनविणे हा मोकळ्या वेळातला आमचा उद्योग असायचा.
लांब देठाची फुलं गुलबाक्षी, निशीगंध, बुचाची फुलं बागेत जाऊन वेचायची, त्यांच्या वेण्या करायच्या ह्यात अपार आनंद होता. जास्वंद, कृष्णकमळ, चाफा, तुळस, दुर्वा पूजेसाठी, फुलं झाडावरून तोडून परडीत आणायची. कधी कधी फुलदाणीत सजावटीत ठेवायची. कधीतरी रांगोळी म्हणून वापरायची ही आमची त्यावेळची कलाकुसर.. आणि एक काम ही !
मुबलक फुलं घराभोवती, मोकळ्या जागेत, कुंपणावर असायची. तोडायला कोणाची परवानगी नाही लागायची. किती प्रसन्न वाटायचं फुलांच्या संगतीत..
मोठेपणी तसे मोठे केस राहिले नाहीत. फुलं, गजरे माळायला, आजूबाजूच्या बागा गेल्या. घरातल्या कुंडीत शोभेची झाडे आली. झाडावरून फुलं तोडणे बंद झाले. फुलपुडीवाला पुडी दरवाज्यापर्यंत द्यायला लागला.
फुलं महाग, विकत मिळायला लागली. प्रसंगांला, हळदीकुंकूवाच्या वेळीच आणली जायला लागली. अनेक नविन प्रकारची फुलं बाजारात दिसायला लागली.

मग कधीतरी इकेबानासारख्या पुष्परचना करण्याचे वेड लागले आणि फुलांच्या संगतीचा आनंद थोडा मिळायला लागला.
जेव्हा मोबाईल हातात आला तेव्हा फुलांचे फोटो काढायचा छंद लागला. फुलांइतकी पानं ही आवडायला लागली. फुलांची माहिती जमवायचा छंद लागला. काढलेले फोटो फेसबूकवर शेअर करायला जमायला लागले. माझी फोटोग्राफी सुधारली.
ही फुलं कुठे होती, फोटो कुठे काढला.. हे सर्व ते फोटो पहातांना आठवते. त्याबरोबरच्या इतर अनेक आठवणी आठवतात.
आणि मन काही काळ भूतकाळात, त्या फुलांच्या भोवती रूंजी घालू लागते.
— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800