Thursday, December 26, 2024
Homeलेख'फूल खिले हैं गुलशन गुलशन..'

‘फूल खिले हैं गुलशन गुलशन..’

जराशा पहाटे पहाटेच ती व्यायामासाठी फिरायला म्हणून बाहेर पडे. तिची स्वतःची एक सुंदर बाग होती. सुंदर सुंदर फुलांचे ताटवे होते. त्यात आलटून पालटून एकेका झाडाच्या फुलांचा बहर बागेत येई. तिला सवय होती, फिरायला जाताना हाताच्या ओंजळीत चार फुले वासाची घ्यायची, आणि मग अधुन मधुन त्या फुलांचा गंध घेत घेत ती फिरून यायची.

ती अत्यंत फुलवेडी होती. ती फुलांवर इतके प्रेम करी, इतके प्रेम करी, की तिला फुलांशी आणि फुलांनाही तिच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नसे. सुट्टीच्या दिवशी तर काय त्यांच्या गप्पा अधिकच रंगत असत.

त्यादिवशी रविवार होता. जाईचे फूल तिला सांगत होते, आमचा मैत्रिणी मैत्रिणींचा खूप मोठा ग्रुप आहे..आणि काही बॉय फ्रेंड्स ही आहेत आमचे.

जाईचा तो धुंद वास, जणु गौराई याव्यात तशी ती येते आणि आरक्त होते त्या दिवसात. लाजून लाजून गुलाबी होते तिन्ही सांजेला आणि मग हळूच थोड्या वेळाने तिची कळी खुलते.

जाई म्हणली, “माझी एक खास, जिवलग मैत्रिण म्हणजे जुई. पण जुई म्हणजे अगदी नाजूकनार! ठेंगणी.. लहान चणीची..पण येते मात्र अगदी perfume लावून नेहमी..

याउलट ग्लाडिओली. लहान चणीच्या बांध्याच्या जुईच्या एकदम विरोधी व्यक्तिमत्व. एकदम टंगाळी. अंगाने एकदम किडकिडीत.सडपातळ, पण कमनीय शेलाटा बांधा. हिला खरं म्हणजे फार नटायला, मुरडायला आवडत नाही. तिच्या नैसर्गिक रूपातच ती खरं तर छान शोभून दिसते. पण तिला विनाकारण मेक अप करतात भडक आणि मग ती फारच उग्र दिसू लागते. डाय लावतात गं उगाचच. पण लोकांना काय माहिती ? एखादे मूल आणि एखादे फूल उमलू द्यावे त्याच्या कलाकलाने.. त्याच्यावर कोणतीही सक्ती करू नये..कोणती जबरदस्ती करू नये..

आमच्यातील रातराणी म्हणजे अगदी नाजूक हो. पण काहीशी अहंकारीच. ड्रायफ्रूटसच्या डिशमध्ये पिस्ते असावेत ना, तशा रंगाची. पण काहीशी उग्रच म्हण ना. काहीशी घमेंड, काहीसा दर्प आहे तिच्या अंगात. पण म्हणतात ना, जशी समान आवडीच्या लोकांमधे मैत्री होते, तशीच कधी कधी परस्पर विरुद्ध स्वभावाच्या लोकातही दाट मैत्री होऊ शकते. तसाच काहीसा प्रकार. आता ग्रुप म्हणलं की वेगवेगळे स्वभाव असणारच की प्रत्येकाचे.

आमच्यातील शेवंती छान गोऱ्या रंगाची. पिवळ्या कांतीची. पण हिची तब्येत इतकी नाजूक आहे की जराशा धक्क्यानेही,
आघातानेही हिचे हात पाय एकदम गळून जातात. काहीशी अशक्तच आहे ती पहिल्यापासून.

आमची अजून एक मैत्रिण आहे बकुळी नावाची. ती आहे जरा लहानशीचीच, पण जरा काळी सावळीच. उन्हाने रापून रापून काळसर तपकिरी व्हावे ना एखादीने, तशी झालेली.
पण काळी सावळी असली तरी एकदम स्मार्ट हो. ती एकदा का येऊन 4 दिवस भेटून गेली, तरी तिच्या आठवणींनी माणसाचा जीव अगदी कासावीस होऊन जातो. लोकं मग किती तरी दिवस involve होऊन जातात तिच्या आठवणीत.

आमच्यातीलच ती एक अबोली. आहे सुंदर दिसायला, पण एकदम नाजूक आणि अबोल. एखाद्या कवयित्रीने आपल्या मूडमधेच रमावे ना तशी रमणारी..
आणि हो, अबोली आणि तिची एक खास मैत्रिण, कोरांटी..

एका मोठ्या घोळक्यात काहीसे grouping व्हावे ना तशा या दोघींच्या एका कोपऱ्यात छान गप्पा होतात. स्वभाव एकमेकींशी जुळणारा. म्हणूनच त्यांचे एकमेकींशी खूप पटते. पण कोरांटी मोठी बहीण शोभेल अशी, तर अबोली धाकटी बहीण शोभेल अशी. पण दोघींकडे अगदी मोजके कपडे आहेत. कोरांटी कडे जरा तरी जास्त आहेत, पण अबोलीकडे मात्र एक कपडा अंगावर, तर एक कपडा दांडीवर तसाच काहीसा प्रकार.

आमची अजुन एक मैत्रीण म्हणजे मधुमालती. थोडीशी उंच. ही रसिक..एखाद्या बक्षिस समारंभात दोन पारितोषिके एकाच विद्यार्थ्याला मिळावी, तशीच विधात्याने हिला दिलेली…तिचे 2 रंग..हिच्यात 2 व्यक्तिमत्वे असतात. एकाच माणसात कधी कधी 2 व्यक्तिंमत्वे असतात ना तशी. परस्पर विरोधी. पण हिची दोन्ही अंगे अगदी सुखाने एकत्र नांदतात. तिला आतबाहेर असे काही नाही. जे आहे ते फक्त रसिकत्व आणि अगदी अस्सल हरहुन्नरीपणा. हिच्याबद्दल आदर वाटतो त्यामुळे सगळ्यांना.

आणि आमची अजून एक मैत्रिण म्हणजे जास्वंद. हीच डौल तो काय वर्णावा..एखाद्या लग्नसमारंभात किंवा लग्नमंडपात जावे, आणि एखाद्या उंच, धिप्पाड, मजबूत शरीरयष्टीच्या, पण अगदी दिमाखदार व्यक्तिमत्वाच्या खानदानी स्त्रीने आपल्या दिसण्याने, वागण्याने इतरांची मने जिंकून घ्यावीत, आकर्षून घ्यावीत अशी. हिच्याजवळ कित्येक रंगाच्या साड्यांचा स्टॉक. गुलाबी, पांढरा, लाल, पिवळा, केशरी, पिस्ता, अबोली..कधी plain साडी, तर कधी काठपदर आणि मधोमध बुट्टा. ही एकदा का लग्नमंडपात, देव्हाऱ्यात जाऊन बसली की मग इतर मैत्रिणींकडे कोण लक्ष देणार ? मग आम्ही इतर साऱ्या जणी झाकल्या जातो, दबून जातो हिच्या व्यक्तिमत्वापुढे.

Version 1.0.0

या आमच्या ग्रुप मधे काही बॉय फ्रेंड्स ही आहेत बरं का !
तो सोनटक्का… दिसायला अगदी गोरागोमटा. मस्त शाइनिंग करतो आणि अगदी इंपोर्टेड मंद वासाचा perfume लावून बागेत येतो.

आमच्यातील मधुमालती आणि तो शंखासूर यांची अगदी खास म्हणावी अशी मैत्री आहे बरं का..! दोघांचे स्वभाव अगदी एकमेकांशी परफेक्ट जुळणारे. दोघांची अंगकाठीही तशीच. पण एक बॉय फ्रेंड तर एक गर्लफ्रेंड ..

आमच्यातील अनंत. त्याने आपल्या अंगाला कायम छोटीशी मुरड घातलेली. पण तो कधी काहीसुद्धा कुरकुर करीत नाही. त्याबद्दल स्वतःच्या तोंडाने कधी काही सांगत नाही. पण एखाद्याने केलेल्या सत्कर्माचा सुगंध दरवळतोच ना कितीही प्रसिद्धी परांगमुख रहायचे ठरविले तरी !

आमच्यातील चाफा..3 पेरा एव्हडी मध्यम उंची त्याची. पण काय तो त्याचा तोरा. एखाद्या लहान मुलाने सतत मोठ्या माणसाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावे ना तसा. त्याच्या अस्तित्वाची दखल सदोदित दुसऱ्याने घ्यायलाच हवी असा याचा हट्ट..!

आणि तो मोगरा..मे महिन्यात लहान मुलांनी आपल्या आजोळी रहायला यावे ना तसा येतो आजोळी. त्याच्या किलबिलाटाने घर अगदी कसे भरून जाते. पण मग नंतर मात्र ही मुले आपल्या शाळा, कॉलेजात वर्षभर इतकी बुडून जातात की मे शिवाय पुन्हा सवडच मिळत नाही पुन्हा आजोळी यायला.

आणि तो झेंडू.इतका राठ. पण कधी कधी अशी काटक वृत्तीची मुलंच खूप उपयोगी पडतात हो. श्रमाचे काहीच वाटत नाही यांना.तब्येत एकदम मजबूत. अगदी कमावलेले शरीर.

मे फ्लॉवर म्हणजे तर काय फार दूरच्या मित्राने वर्षातून एकदा सगळ्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटायला यावे ना तसे त्याचे येणे.. मग वर्षभर काही चान्सचं नाही..

आणि आमच्यातील सगळ्यात शिष्ठ कोण म्हणशील तर तो म्हणजे गुलाब ! लोकांनी अगदी डोक्यावर घेतलाय त्याला. पण यातील काही मात्र परदेशी मुलांनी आपली भारतीय संस्कृती पहायला यावे ना तसे आलेले.

आमचा अजुन एक परदेशी मित्र म्हणजे बोन्साय.याच्या मुळांवर अकालीच घाव घातला जातो, त्याच्या आशा आकांक्षा खुडल्या जातात, पण हे सारे तो मुकाट्याने सहन करतो. आपला चेहरा कायम हसरा ठेवून तो आपले दुःख अंतरात लपवून ठेवतो..

आणि हो, तो निवडुंग. त्याचा राकटपणा आमच्यातील एखादीलाच आवडतो फक्त. त्याचे वागणे बोलणे कायम दुसऱ्याला लागेल असे. त्याचा आपला कायम फणा काढलेला.कायम फणकारलेला.

आणि हो या निवडुंगाच्या फण्यावरून आठवली ती आमची नागफणी.किती सुंदर रूप तिचे. जणु पांढऱ्या मोरासारखी दिसायला सुरेख आणि मानेवरचा तुरा अगदी ऐटबाज..

मनिप्लॅन्ट मात्र अगदी एखाद्या राजकन्येसारखा. त्याला फार लाडात सांभाळायला लागतं. त्याला फार ऊन सोसत नाही, फार वारा सोसत नाही, फार सावली सोसत नाही.याच्यावरची नजर कोणी हलवू शकत नाही. कायम पहारा लागतो याला जपायला.

अग अशा किती तरी मैत्रिणी आणि मित्र आहेत गं आम्हाला.किती जणांबद्दल सांगू तुला ? पण आम्ही सारे एकाच कॉलेज मधले..नंतर मग आम्ही जॉब शोधू. तिथेही आम्हाला मित्र मैत्रिणी मिळतील पण आत्ताच्या आमच्या या ग्रुप ची सर नाही येणार त्याला.

एव्हडा मोठ्ठा ग्रुप पाहिल्यावर ‘ ते ‘ हळूहळू घुटमळू लागतात.ते गं, आपले भ्रमर..गोड गोड बोलतील आणि मग आम्हाला भुलवतील. एव्हडे दिवस जपलेले ते आमचे रूप, आमचे शैशव, आमचे यौवन ! अग बाई, पण मातृत्वाशिवाय अपुरं च राहील ना ! तेव्हा आता पाहू नका हं कोणी.
जाऊ दे मला.जायला हवं.
‘ तो ‘ येईल.. ‘ तो ‘ येईल !

अनुराधा जोगदेव

— लेखन : सौ. अनुराधा जोगदेव, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९