फ्रेनेमी हा एक जेन झेड चा, म्हणजे नव्या पिढीचा , आधुनिक असा नवा शब्द आहे. म्हणजे फ्रेंड प्लस एनेमी ! मित्र +शत्रु किंवा मित्र असूनही शत्रू !
फ्रेनेमी हा एक इंग्रजी शब्द आहे .त्याचा अर्थ फ्रेंड आधी होता ,आता एनेमी ? की हे दोन्ही मिळून फ्रेनेमी शब्द तयार होतो ? काही मित्र शत्रुवत वागतात .काही शत्रू मित्र बनतात .म्हणून तो फ्रेंड चा ट्रेंड बदलतो.
फ्रेनेमी हा शब्द नवीन प्रकारे शोधला गेला.’दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है ,
उम्रभर का गम हमे इनाम दिया है!’ असं म्हटलं जातं.कधी काही मित्र मैत्रिणी अचानक गायब होतात .बोलेनासे होतात. त्यांच्या मैत्रीबद्दल शंका यायला लागते .मग आपण त्यांची चौकशी करतो “सगळ्या सख्या गारपटल्या? का पावसात भिजल्या? दूरियां क्यों? बरेच दिवस झाले काहीच पोस्ट नाही? आजारपणाचे सबब काढू नका. माझं तर रोज काहीतरी दुखतं आणि रोज सगळं काम काहीतरी डबल काम चालू असतं. दूध उतू जाणं अधिक स्वच्छता करावी लागण पाहुणे येणे हे पण सोसावं लागतं. पण मी आपली गाडी ढकलते.”
मैत्रिण लिहीते ,
“आता असेच आहे !
माझे पण पाय खूप दुखतात तरी पण शाळेत गेले की बरे वाटते. तेवढ्या काळ काही दुखत नाही. मी प्रत्यक्ष बोलते त्या शाळेतील मुलांशी!ही शाळेची मुले आणता येतील का तुझ्या घरासमोरच्या बागेत सहलीला याचा विचार करते.”
माझा स्वभाव तसा वाईट आहे. मला शत्रूची पण आठवण येईल आणि शत्रूची पण दया येईल. खंजीर खुपसलेल्या मित्राला पण मी महात्मा गांधी म्हणून माफ करेल.मग मी लिहीते.
“ताई तुझी खुप आठवण येते .ये ना एकदा ठाण्याला भेटायला! मी नेहमी यायचं ठरवते पण काही ना काही कारण निघून तब्येतीमुळे जमतच नाही.ताप आल्यापासून तर अजून भीती वाटते. असं वाटतं भाऊ किंवा आई, असते तर नक्की त्यांनी कुठल्यातरी डॉक्टरकडे नेलं असतं. हे औषध घे म्हणून सांगितलं असतं.भाऊंनी आणि आईने आमच्यासाठी खूप केलं आहे. मी कृतघ्न नाही. मला जाणीव आहे. शिवाय तुझं एकटेपण तुझे प्रश्न पण मला समजू शकतात .काळजी घे. फोन करत जा. पती पंधरा दिवस अब्रोड गेले होते. मी एकटीच होते तेव्हा पिशवी पण भरून ठेवली होती की तुझ्याकडे यायचं .पण खूप इन्फेक्शन चा त्रास होत होता म्हणून टाळलं.”
उत्तराची अपेक्षा ठेवून आपण वाट बघत बसतो पण सगळ्यात हाकांना प्रतिसाद येतोच असं नाही.
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, असं करून मित्रांची, नातेवाईकांची मुलांची अशी सगळी काळजीच आपण वाहत असतो .माझा लेक मला म्हणतो ना “डिफॉल्ट मोडवर काळजीच करत असते.” पण काय करायचं ? स्वभाव!आणि ह्यातले जे मित्र ज्यांची आपण अतिशय काळजी करतो ते पाठीमागे हिला काय पडले माझ्या तब्येतीशी? असं देखील म्हणतात. म्हणजे साधीसुधी तब्येतीची काळजी आणि चौकशी करणे देखील चूक आहे .
माझ्या एका दूरच्या भावाला मी ,”तब्येत कशी आहे ?”असा साधारण पहिल्या प्रश्न फोन केल्यावर विचारत असे. तेव्हा :,”आम्ही काय नेहमी आजारी असतो का ?नेहमी उठ सुट तुम्ही आमची तब्येत विचारता ? “असं म्हणाला तेव्हापासून मी हवा पाणी विचारायला लागले. पण तरी काय पूर्वापार पद्धतीने तब्येत काय म्हणते? हवा पाणी काय म्हणते? असंच आपण चौकशी करतो ना. !
नुकतेच केबीसी वर एका बाईने सांगितलं की ,”मला लोक सारखी टोचून बोलतात मला पुढे येऊ देत नाही .माझं मन आनंदी असलं तरी त्या क्षणाला माझा आनंदाचा फुगा फोडतात .जशी खेकडे असतात ना कुणालाच वर येऊ देत नाहीत टोपलीत ठेवलं की एक दुसऱ्याचा तिसऱ्याचा पाय ओढत राहतात. तशी माणसं दुसऱ्याच्या सुखाच्या क्षणी देखील, मनभेद करत बोलत राहतात आणि ही माणसं परकी नसतात परिचित असतात.
लग्न आणि मूल होणे आणि घर ,या तीन घटनांचे आरीवरती बहुतांश शुद्ध दुःख फिरत असतात. परकीय व्यक्ती लग्न झालंय का, मुलं किती आणि घर कुठे आहे हे तीन प्रश्न विचारते. त्याच्यावर आपण काही उत्तर दिले की गप्प बसते .पण जवळच्या व्यक्ती मात्र ह्या मुद्द्यावर कुरतडत राहतात .
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा! हे तर आता जुनं झालं आता दोस्तांचा मुखवटा घालून शत्रू येतात. बुद्धिबळाच्या खेळामधील सोंगट्या मध्ये काळे आणि पांढरे स्पष्ट ओळखू येतात. म्हणजे आपले कोण परके कोण, आपले प्यादे कोणते , शत्रूची प्यादी कोणती ,हे स्पष्ट लक्षात येतात .पण प्रत्यक्षात कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखू येत नाही. त्यामुळे जीवनातील बुद्धिबळाचा पट हा जिंकण्याच्या बाबत, जगण्याच्या बाबत , खेळण्याच्या बाबत दैववादी म्हणून अज्ञात असतो.
जास्ती भावनाप्रधान राहू नको ग लोक वेडे करून सोडतील असा सल्ला देणारे सुद्धा कधी आपल्याला झटकून फायदा काढून आपल्या डोक्यावर पाय पडून ठेवून पुढे जातात अगर दोस्त ऐसे है
तो पता नही दुश्मन कैसे होंगे? त्यामुळेच फ्रेनेमी मी ही संकल्पना उदयाला आली असावी !
तुम्हाला काय वाटते?

— लेखन : शुभांगी पासेबंद. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800