गेले काही दिवस निवडणुका, ऐतिहासिक सत्ता बदल यामुळे बंगाल चांगलेच गाजले. माझे देखील या राज्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मी या राज्यात दहा वर्षे अधिक वास्तव्य केले आहे. माझे उच्च शिक्षण, करियर इथुनच घडले आहे. या अर्थाने मीही इथल्या भाषेत भद्र लोक पैकी एक आहे !
पश्चिम बंगाल मधील खरगपूर आय आय टी मध्ये १९७० -७२ एम टेक साठी अन् ७४ ते ८३ प्राध्यापक म्हणून माझे वास्तव्य होते. कलकत्ता पासून ११५ की मी दूर असलेले खरगपूर जंक्शन तेव्हा चक्क खेडेगावच होते. जिथे आय आय टी चे कॅम्पस आहे त्या गावाचे नाव हिजली आहे. ते मिदनापूर जिल्ह्यात येते. इथे पूर्वी हिजली जेल होती. जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ठेवण्यात आले होते. त्याच जेलच्या इमारतीत तेव्हा आय आय टी चे प्रशासन कार्यालय होते !

खरगपूर हे रेल्वेचे फार मोठे, प्रसिद्ध जंक्शन आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म इथे आहे ! एकाच वेळी एका पाठोपाठ तीन गाड्या इथल्या प्लॅटफॉर्मवर राहू शकतात. खरगपूर मध्ये एकीकडे आय आय टी चे विद्यार्थी अन् स्टाफ तर दुसरीकडे गावात फार मोठी रेल्वेची वस्ती.. हीच या गावची ओळख !
आय आय टी चे कॅम्पस रेसिडेनशिआल होते. इथे त्यावेळी शनिवारी बंगाली सिनेमा बघायला मिळे. बंगालचे फार मोठे योगदान आहे सिने जगात. अशोक कुमार, किशोर कुमार, मन्ना डे, शर्मिला टागोर, एस डी, आर डी, सलील चौधरी, सत्यजित रे, हेमंत कुमार, उत्पल दत्त, बसूदा, ऋषिकेश मुखर्जी, बिमल दा, गुरुदत अशी कितीतरी नावे सांगता येईल. दोन नोबेल विजेते कलकत्ताचे साहित्य क्षेत्रात देखील एकापेक्षा एक धुरंधर. साहित्य, संगीत, लोकनाट्य, राजकारण, संशोधन..सर्वच क्षेत्रात बंगाल अग्रेसर. बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध जगदीशचंद्र बोस यांचा. कलकत्ता येथे लावलेला ! (फार कमी जणांना हे माहीत आहे दुर्दैवाने !).
इथल्या वास्तव्यात मला बंगाली चांगल्या पैकी बोलायला यायला लागले होते. सगळे गुरू बंगाली ! त्यांनी फक्त शिकवले नाही तर सर्वार्थाने घडवले ! त्यांच्या इतकेच मोठे केले. हॉस्टेल मधील कर्मचारी तसेच गावातील सायकल रिक्षा चालक बहुतांशी तेलगू होते ! म्हणजे हे स्थलांतर प्रकरण फार पूर्वीपासून चे आहे !
त्यावेळी कॅम्पस मध्ये फक्त दोघांकडे कार होती.एक आमच्या गुरूचे (अन् माझेही) गुरू, अन् दुसरे आय आय टी चे डायरेक्टर ! बाकी सगळे प्रोफेसर, कर्मचारी सायकल वापरायचे. इथे सुर्योदय लवकर होतो. अंधार लवकर पडतो. त्यामुळे कॉलेज आठ वाजता सुरू व्हायचे. साडेतीनला सुटी. उन्हाळ्यात तर चक्क सकाळी साडे सहा ते दीड अशा वेळा असायच्या !
हॉस्टेल मध्ये होणारे वार्षिक संमेलन, तसेच आय आय टी चा आठवडाभर चालणारा स्प्रिंग फेस्टिवल म्हणजे विविध मनोरंजनाची मेजवानी असे. एकापेक्षा एक धुरंधर कलावंत येत. रोमा गुहा ठाकूर (किशोर कुमार ची पहिली पत्नी) हिचा एक कोरस वाद्य वृंद होता. अतिशय सुंदर श्रवणीय. भूपेन हजारिका यांना इथेच ऐकले जवळून. काय गाणी, काय आवाज ! जगातील सर्व ताल वाद्ये देखील एकत्र इथेच ऐकली. उत्तम वादयसमूह. विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा, त्यातील एकापेक्षा एक दर्जेदार प्रस्तुती डोळे दिपवणारी, कान तृप्त करणारी असे.
प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांशी वागणे घरगुती जिव्हाळ्याचे असे. मी तर माझ्या गुरूचा तिसरा मुलगा होतो ! (त्यांना दोन मुले होती). आमच्या गुरूचे गुरु आमचे बॉस होते. तरुण प्राध्यापक झाल्यावर मी त्यांचा उजवा हात होतो. नोकरी लागल्यानंतर म्हणजे शिकवायला लागल्यानंतर देखील आम्ही या महागुरूंच्या वर्गात बसत असू. खूप शिकायला मिळे रोज नवे नवे.
हॉस्टेल चे जेवण चांगले नसे. अनेक जण घरून लोणचे आणायचे. बटाट्याचा खूप वापर जिथे तिथे. विद्यार्थी चार वर्षात किती किलो बटाटे खाल्ले असतील याचा हिशेब ठेवीत.
कॅम्पस मध्ये एक छोटेसे मार्केट होते. शिवाय एक नायर कॅन्टीन. इथे इडली डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ मिळायचे. संध्याकाळी इथे स्टाफ, विद्यार्थी सर्वाची गर्दी असे. लाकडी बेंच चे साधारण फर्निचर असे बसायला.
इथे सत्तर च्या दशकात नक्षलवादाचा प्रभाव होता. स्टेट्समन या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आठ दहा खुनाच्या बातम्या असत रोज. त्यावेळी कम्युनिस्ट प्रभाव होता तिकडे सर्वीकडे. कॅम्पस मध्ये कुणी चौबे नावाचे नेते मेसवरकर चा संप घडवून आणायचे. हा संप नेमका परीक्षेच्या काळातच व्हायचा. पण आश्चर्य म्हणजे संपामुळे कधीही परीक्षा रद्द झाल्या नाहीत. मुले आळीपाळीने स्वयंपाक करायचे अन् परीक्षा लिहायचे. संप करणाऱ्यांना धडा शिकवायचे.
आय आय टी ला जेव्हा २५ वर्ष झाली तेव्हा एक गोष्ट गर्वाने सांगितली जायची. एकही दिवस आय आय टी विद्यार्थ्याच्या संपामुळे बंद पडली नाही ! आता काळ किती बदलला आहे बघा !
इथली माणसे साधी आहेत. खूप हुशार पण तेव्हढीच क्रांतिकारी, चळवळ करणारी. पटकन व्यक्त होणारी.
नव्या शिक्षण पद्धतीचे बीज एका अर्थाने अनेक दशकापूर्वी शांती निकेतन मध्ये रोवले रविंद्रनाथ टागोर यांनी. या परिसराचा मोह पू ल यांना देखील पडला होता. ते अनेक महिने शांती निकेतन मध्ये राहिले. त्यावर आधारित व्यंगचित्रे, लेख त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मधून लिहिले. तेव्हा मी खरगपूर इथेच होतो. म टा वाचायचो. दोन दिवस उशिरा येत असे डाकेने. पण शिळा पेपर देखील वाचायला मजा येत असे !
नोकरी लागल्यानंतर आमचा संसार इथेच सुरू झाला. आमार सोनार बांगला त.. मुलगा इथल्याच शाळेत गेला सुरुवातीचे धडे घ्यायला. मुलीचा जन्म इथल्याच हॉस्पिटल मध्ये झाला. तेव्हा फारशा मेडिकल सोयी नव्हत्या. डॉक्टर, ट्रीटमेंट जेमतेम.. पण सगळे छान पार पडले. सहकारी बरोबर होते मदतीला.
माझी शैक्षणिक कारकीर्द इथेच घडली. करियर ची पायरी पायरीने उंची गाठली तीही याच वंगभूमीत. मला कधीही प्रमोशनसाठी वाट बघावी लागली नाही. उलट सारे काही वेळे आधीच मिळाले. आऊट साइडर असूनही ! इथे बंगाली, नॉन बंगाली असे काही अनुभवले नाही.
बंगाली संगीत आपल्या नाट्य संगीत, भाव संगीत यांच्याशी सहज नाते जोडणारे आहे. येथील जत्रा हा नाट्य प्रयोग आपल्या कडील खुल्या रंगमंचावर होणाऱ्या लोकनाट्या सारखा.
कलकत्याचे महाराष्ट्र मंडळ ही देखणी उत्तम वास्तू. इथले जेवण उत्तम. आग्रह करून वाढतात अगत्याने. स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी. मला अजूनही या वास्तूचा पत्ता आठवतो..१५ हाझरा रोड कलकत्ता !
एकूण माझे वंग भूमीतले वास्तव्य मंतरलेले दिवस होते. इथल्या संदेश रसगुल्यासारखेच गोड. त्यामुळे मीही बांगलाचा भद्रलोक म्हणवून घेण्यात मला धन्यता वाटते. तिथले त्यावेळचे कुणी दगावल्याचे समजले की त्या आठवणींनी दाटून येते. ती वंग भूमी ची नाळ तुटता तुटत नाही.
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800