बंजारा समाज हा निसर्ग पूजक समाज म्हणून ओळखल्या जातो. कड्या-कपारी-डोंगरदऱ्यातून रानोमाळ भटकंती करणारा हा समाज, आपली पारंपारिक धार्मिक संस्कृती जपणारा, आपल्या गोधनाची जीवापाड काळजी घेणारा, शेतशिवारात पेरणी झाली की, शेतातील पिकपाणी चांगले वर आलेले पाहून आपल्या शिवारातील पीक वा-यावर डोलायला लागले की, हा समाज सुद्धा आपले पाळीव प्राणी – जीत्रपांना रोगराई मुक्त ठेव आणि शेतीशिवार भरभरून पिकू दे, गोधनाला चरण्यासाठी मुबलक चारा मिळू दे ,उगवू दे आणि आबालवृद्धांना आनंद, सुख, शांती, समृद्धी समाधान मिळू दे, अशी प्रार्थना – आराधना भगवान श्रीकृष्ण राधा यांची “गणगोरच्या रूपात आरदास करतात.
बंजारा समाजाचा हा तीजोत्सव, शक्यतो श्रावण शुद्ध पंचमी पासून सुरू करतानाच श्रावणी अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येपूर्वी आपली तीज विसर्जन करतात. हा तीजोत्सव श्रावण महिन्यातील एक संपूर्ण महिन्याच्या काळातच साजरा करण्यात येत असल्यामुळे तांड्या – तांडयात संपूर्ण महिनाभर या उत्सवाचा उत्साह, आनंद नायक – कारभारी, तांड्यातील सर्व नसाबी – हासाबी आणि सर्व तांडकरी – लहानथोरांच्या मनात विलसत असतो. या संपूर्ण समाजातील भगिनीं आणि अविवाहित मुलींचा हा तीजोत्सव असल्यामुळे या संपूर्ण महिनाभर तांड्या – तांड्यातील महिला भगिनी डफड्यांच्या तालावर नाच – गाणी बेधुंद होऊन गात असतात.
याप्रसंगी गाणी गाताना नायक – सेवा बापूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करताना गीदाच्या माध्यमातून बोलतात—–
तोनं कुणे पेरायो तीज, डोरी डोयेर फुल,
मारो बापू पेरायो तीज, घडीभर नाचलेदं
मन सेवा बापू पेरायो तीज, डोरी डोयेर फुल !!
मारी हुसे मनेरी तीज, घडीयेक नाचलेदं !!
हारो हारो जवाराये, घंऊला डेडरीया,
हारो हारो जवारा ये, घंऊला रळको पडं,
या आणि अशा अनेक गीतांची तालबद्ध नृत्याच्या ठेक्यात गात -बोलत असताना, त्या आपले भान विसरून जात असतात.
बंजारा संस्कृती मुळातच “मातृसत्ताक कुटुंबपद्धती” स्विकारलेला समाज आहे. हा समाज निसर्ग पूजक असल्यामुळे आपल्या “धरणी मातेला जननी मानून प्रत्येक धार्मिक विधी करतांना तिचे” चोखो पुरत असतात. शिवाय चंद्र – सुर्याची आराधना करतात.
बंजारा समाजाचा असा हा ऐतिहासिक तीजोत्सवाचा कार्यक्रम आता प्रत्येक तांड्या बरोबरच मुंबई – पुणे – नागपूर सारख्या महानगरात तसेच औरंगाबाद, यवतमाळ, नांदेड – अमरावती अशा व देशातील – महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात व इतरही शहरी भागात, नोकरी – धंद्यासाठी स्थायिक झालेले समाज बंधु – भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उत्सव मिरवणूक काढून वाजत गाजत मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
आपली ही सांस्कृतिक – धार्मिक परंपरा व धरोवराचा ठेवा आपल्याला सांभाळून ठेवण्यासाठी एकजुट ठेवणे किती आवश्यक आहे, याची जाणीव प्रत्येक बंजारा समाज बंधु भगिनच्या मनात तेवत राहिली पाहिजे.
या तीजोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने बंजारा समाज आणि आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा.
— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800