“चालोरे डायसाणें होळीर…खेला !”
नाच गाण्यात मदमस्त जीवन जगणारी जमात म्हणजे बंजारा समाज होय. आणि बंजारा समाजाची होळी ही जगावेगळी आहे.
“धरती तोपर अंबर नहीरे कोये धरती तोपर…..अंबर व्हेगेरे एक सेवान- जेता….. अंबर व्हेगेरे एक वसंतांन- सुधा…धरती तोपर अंबर नहीरे कोये धरती तोपर!”
भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हौस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी. म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डफाच्या आवाजांनी होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.
डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो…वजारं.
डफडारो घोर सामणीं पाणीं भरतु, वुतो फेक दिनी बेडलो…तारी जाणीं…ढळजा..रं …डफ धीरो वजारं..
भावार्थ: हे मित्रा डफ हळू वाजव तुझ्या डफडयाचा आवाज तिच्यापंर्यत जर गेला तर ति रंगात येईल. ती बैचेन होईल .म्हणून तु डफ जरा हळु वाजव ती आता पाणी भरण्यासाठी आलेली नव तरुणी आहे. तुझ्या डफाचा आवाज ऐकू येताच .ती पाण्याला आलेली तरुणी (छोरी) पाण्याचे हंडे फेकून नाचू लागेल. एवढी ताकद तुझ्या डफ वाजवण्यामध्ये आहे. म्हणून तु डफ जरा हळु वाजव. होळीला हिंगळा मातेचे प्रतिरूप असल्याचे गोरबंजारा समाजात मानले जाते. पौराणिक कथेनुसार धुंड्या नावाची राक्षसीण तांड्यातील लहान मुले खात असे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी फाल्गुन महिन्यातील पुनवेच्या रात्री पूर्ण तांडा काठ्या, लाट्या ,शस्त्रे भाले ,बरची घेऊन तांड्याला पहारा देत उभा होता. झोप येऊ नये म्हणून नाच गाणे दारू पिऊन करत असताना राक्षसीण नायकांच्या घरात घुसली. सर्व तांडा नायकाच्या घरासमोर जमा झाला. शेवटी राक्षसिणीला घरातून बाहेर काढून लोकांनी राक्षसिणीला ठार मारले. त्या आनंदात रात्रभर नाचले. व सकाळी सकाळी तिला तांडया बाहेर नेऊन सार्वजनिक दहन करून आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून आजही तमाम बंजारा तांडयात होळी सकाळी सकाळी पेटविल्या जाते. या राक्षसीनीला नायकांनी घरात ठेवल्याबद्दल नायकाला एक रुपया दंड केला. आजही होळीच्या वेळी दंडाच्या रूपाने नायका कडून एक रुपया घेण्याची प्रथा तांडयात आहे. (ही कथा खरी आहे की,खोटी याबाबत संशोधन होणे महत्त्वाचे आहे.) याच दिवशी तांड्यातील मुले जिवंत राहिली म्हणून होळीच्या दिवशी मुलांचा धुंड (वाढदिवस) आजही गोरवंशीय करतात .या पौराणिक कथेनुसार आजही तांड्यात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रथम दिवशी संध्याकाळी तांड्यातील हौसी गेरिया( तरुण) डायसांणे ( वडीलधारी मंडळी) लोकांना सोबत घेऊन होळी खेळण्यासाठी नायकाकडे परवानगी मागतात. त्याला वांजणा ( विनंती) म्हणतात .
अन ..भाईरे, हारे थाके गेरीया उतरे।
अन ..भाईरे , आयेन उभे रक नायकेरो..दरबार
अन भाईरे नायकन दिनी एक रपीया पायजो..।
पाचणं माणो एक पचीस तम जाणजो।
ओरी गोरीन दिनी छाळहाल बोकडो पडी तुकारी…बो…..बो…बो।
भावार्थ: थकले भागलेले तरुण व वृद्ध मंडळी नायकांच्या दरबारात हजर झाली असून नायकांनी दिलेल्या एक रुपयाला आपण पन्नास रुपये समजून स्वीकार करूया? व नायकाच्या गोरणींनी (पत्नीनी) सुद्धा एक तरुण बोकड भेट दिला आहे. चला नायकाच्या नावाने आरोळी मारूया! जय जय कार करुया !
या वेळी तांडा नायक यांच्या घरासमोर जमा होऊन खालील लेंगी (गीत) गात होळीची जागा निश्चित केली जाते.
चालोरे डायसाणें होळीर खेला।
चालोरे डायसाणें होळीर कुथा।।
भावार्थ: चला मित्रांनो आपण होळी खेळूया आणि होळीची जागा निश्चित करूया ? आणि नायकाकडून दंड आलेला एक रुपया तांडयांच्या पुर्व दिशेला जेथे खेळण्यासाठी भरपूर जागा आहे तेथे एक खड्डा खोदून त्यात पुरले जाते .व त्यानंतर तेथे एक लेंगी गातात .
पेना रेतेते डुंगर खोळा अब आये तांडो तांडेम बे।
नागा पुरेरो नागा स्वामी स्वामीछं. आब धुत बे ।
भावार्थ :आपण अगोदर डोंगरदऱ्यात होतो.आता तांडयात राहतो आहे. नागापूर (राजस्थान मधील उदयपूर जवळी डोंगर) त्या डोंगरातील नागा स्वामी संत सुद्धा आपल्या तांडयात होळी खेळण्यासाठी मस्त धुंदीत आला आहे . त्यामुळे आता होळी खेळण्यात मजा आहे. असे नाचत गात असताना मध्येच तांड्याचा नायक त्यांना इशारा करतो. वर्षभरात ज्या कुटुंबात दुःखद घटना घडली असेल त्याच्या घरासमोर गेरीया (तरुण) जातात. दुखी घरातल्या माणसाला आत्मीयता दाखवितात. आणि त्यांना सोबत घेऊन सांत्वनपर लेंगी गित गातात.
धरती तोपर अबंर नही रे कोये धरती तोपर..।
अबंर हेगे एक चांदान सुर्या…ओरे नव लाख तारा…वोरे सोबत रिये..।धरती तोपर…..।
अबंर हेगे एक सेवान -जेता नव लाख गोर वोरे साथ रिये..वोरे सोबत रिये धरती तोपर!
अबंर हेगे एक वसंतान- सुधा…ओरे नव लाख गोर वोरे सोबत रिये..वोरे साथ रिये… धरती तोपर….।।

भावार्थ: पृथ्वीवर कोणीही अमर नाही. मृत्यु हा अटळ आहे. हे चंद्रसूर्य तारे अमर आहेत. हे या लेंगी गीतातून पटवुन देतात, व सत्य समजावुन सांगतात. मित्रा तुझे दुःख विसरून जा.चल आपण होळी खेळूया! असे म्हणून बेधुंद होळी खेळतात. असाच क्रम प्रत्येक दुखी कुटुंबाच्या घरासमोर होळीच्या आदल्या दिवशी जाऊन त्यांचे सांत्वन करुन होळी साजरी करण्याबाबत त्यांना आग्रह करतात. यावरून बंजारा समाजातील एकात्मता, भाईचारा, आत्मीयता आणि माणसा माणसा विषय असलेला प्रेम व जिव्हाळा दिसून येतो. तांडयात जर होळीच्या आसपास कोणी व्यक्ती मरण पावली. तर संपूर्ण तांड्यात होळीचा सण साजरा केल्या जात नाही. तसेच धुंड (वाढदिवस) असेल तरच होळी सण साजरा होतो. त्यासाठी नायकाच्या घरासमोर किंवा मारुतीच्या पारावर होळीच्या आदल्या रात्री एका सभेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये ज्या घरी दिवाळीच्या नंतर मुलगा झाला आहे. अशा लोकांना धुंड (वाढदिवस) करावे अशी विनंती करण्यात येते. जर जास्तच गरीब कुटुंब असेल तर इतर मंडळी हातभार लावतात. धुंड करायचे पक्के झाल्यानंतर दांडो काढेवाळ दोन तरुण मुलाची निवड केली जाते. यामध्ये ज्या तरुणाचे होळीच्या नंतर लग्न असेल त्या तरुणाची निवड प्रामुख्याने केल्या जाते. यांना गेरीया म्हणतात. व हे गेरीया ( तरुण) तांड्यातील इतर तरुण मंडळींना घेऊन रात्रभर होळी पेटवण्यासाठी लाकडे गोळा करतात .व इकडे डायसाणें मंडळी बेधुंद होऊन डफाच्या तालावर नाचत असते. त्यामध्ये भांड (अशील) लेंगी, धार्मिक लेंगी, विरह लेंगी असे अनेक लेंगी गातात .
“धार्मिक लेंगी”
गोपीचंदरो राजा जोगलियां..गोपीचंदरो राजा जोगलियां।
गोपीचंद राजारी माडी हवेली गोपीचंद राजा
तारांवती राणी
ओरी माडीन छोडण जोगलीया
ओरी राणींन छोडणं जोगलिया
गोपीचंदरो राजा जोगलिया।
भावार्थ: गोपीचंद राजाने सुद्धा माडी हवेलीचा त्याग करून जोगी संन्यासीचे रूप धारण केले आहे. अरे मित्रा या पृथ्वीवर या सर्व गोष्टी माणसाच्या काहीच कामी नाही.मोह टाळून हे सर्व त्याग करून माणसाने त्यागी वृत्ती बाळगायला पाहिजे. कशाचाच मोह माणसाला नको? एवढेच नव्हे तर गोपीचंद राजाने स्वतः राणीचा सुद्धा त्याग केला. या गोर गणातील नवयुग तरुणा त्यागी बन. अशा एक ना अनेक धार्मिक लेंगी गातात. व त्यानंतर प्रेमीयुगल लेंगी गाईल्या जाते.
प्रेमीयुगल लेगीं…!
उठ परभातीन केकडा ये छोडी,…कादळया मारोये कान. मान मनावतु लागी घळी वेळा,केकडा गे बगदान!
माथेपर झारीन ,हाते मायी फुलीया,वलटो परती चाल। दन उंधाळो तावडो तपच छाया देखन बेस।
तेडी मेडी पगडी मत बांधो शोभिया भरमा भरचरे लोक, तारो मारो मतरो एकछं ये शोभनी कायी करीय लोक।
पाच सात भायीर भेन छुरे शोभीया, मातो लिय रे तोड।
पाच सात भायी मारी काई करीय घेरी दियु ये छोडं।
आठसे कराडी नवसे विजळी शोभीया आन पडे समनक!
भावार्थ :तांड्यातील प्रेमीयुगल दररोज गुरेढोरे चारण्याच्या निमित्ताने एक दुसऱ्यांना भेटत असत. परंतु एका दिवशी कांदळया नावाच्या कुत्र्याने कान फडफडले ते अशुभ समजून प्रेमिका (शोभनी) जंगलात येण्यास तयार होईना.तिला समजावण्यास बराच वेळ जातो. त्यात जनावरे जंगलात गेलेली असतात जनावरे चारा खाऊन पाणी पिऊन कडक ऊन्हात विश्रांतीसाठी बसलेले असतात. (शोभणी )प्रेयसी डोक्यावर पाण्याची झारी, हातात चांदीचा दागिना (फुलिया) चमकवत चमकवत ती येत आहे. तिचा घागरा एवढा घेरदार आहे. की मागे जाते की पुढे येते अशी गज (हत्ती )चाल. ही चाल पाहून प्रेमी सोभीया आनंदित होतो. उन्हाळ्यात थंडगार सावली असलेल्या खेचडीच्या झाडाखाली ते दोघे बसलेले आहेत. त्या दोघांमध्ये संवाद चालू असतो. प्रेमिका (सोभणी) म्हणते (सोभीया ) प्रेमी तुझी डोक्यावरील पगडी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने वाकडीतिकडी बांधतो. त्याकडे तांड्याचे लक्ष आहे. की ती तुझ्यात अचानक अनेक बदल कसा झालेला दिसतो. त्यामुळे तांड्यातील लोकांच्या मनामध्ये शंका आहे. त्यावर प्रियकर ( सोभीया) म्हणतो. ये (शोभणी) प्रेयसी तू घाबरू नकोस. तुझे माझे एक मत, एक मन झाले आहे. तर लोक काय करणार? त्यावर प्रेमिका सोभणी म्हणते प्रिया माझे पाच सात भाऊ आहेत. त्यांना कळले. तर तुला जीवाने मारतील. मला भीती वाटते. त्यावर तो बंजारा शुरविर प्रेमी (लैला मजनु सारखा दगड खाणारा नाही.) प्रेयसीला (शोभणीला) म्हणतो हे प्रिये तू घाबरू नकोस. तुझ्या चार-पाच भावाला मी एकटा पुरे आहे. कारण माझ्यात घेरी युद्ध करण्याचे कौशल्य आहे. त्यातून अभिमन्यू सारखी सुटका मी करून घेईल. असे म्हणत असताना त्यांच्यातील तिचे पाच सात भाऊ कुराडी, लाठ्याकाठ्या घेऊन समोर उभे राहतात. त्यांच्यात घनघोर युद्ध होऊन तो प्रियकर सर्वांना पराजीत करतो. तेवढ्यात प्रेयसी बेशुद्ध होते. व झारीतील पाणी त्याच्या चेहऱ्यावर टाकून प्रियकर तिला जागवतो. दोघे जंगलात पळून जाऊन आत्महत्या करतात .अशी ही अमर प्रेमाची कहाणी आहे. नुसते पुरुषच प्रेमीयुगल लेंगी गात नाही. तर स्त्रिया सुद्धा बसून प्रेमीयुगल लेंगी गातात.

म तो मारे दोसतान दसती दराई ये!
ओड ओड दस्ती करच मस्ती..म…तो..हसती.ये।
मैं तो हसती कवाड खोलती मैं तो हसती ये।
भावार्थ : मी माझ्या प्रियकराला सुंदर नक्षीकाम केलेला हात रुमाल घेऊन दिला. तो रुमाल घेऊन तो मस्ती करत करत नाचतो आहे. त्याचे उत्साही आनंदी चेहरा पाहण्यासाठी मी माझ्या घराची खिडकी खोलून चोरीने त्याचा चेहरा पाहते. आणि मन भरून येते. नाच गाण्यात दंग असलेली बेधुंद तरुण युवा मंडळीला चिडवण्यासाठी स्त्रियांचा कल भांड (अशील्ल) लेंगी कडे जातो.
“भांड (अशिल्ल) लेंगी”
ई गेरीया मारो कामेरो छेणीं. कामेरो छेणीं. येन काई मालम..छेणीं! गेरणी ती भुंडो दिसावचं ये.. धाटो धाटो हिंडच।
भावार्थ : हा गेरीया (तरूण) आमच्या काही कामाचा नाही. त्याच्या जवळ काहीच नाही? गेरणीं बाईसारखा तोंड करून विनाकारण इकडे तिकडे पाहत आहे. अशा अनेक भांड अशील लिंगी आहेत. पण ते देणे इष्ट वाटत नाही. अशा प्रकारे रात्र कशी गेली. त्याचा मागमूसही लागत नाही. सकाळी होळी दहन करण्याचे आदेश तांड्याचा नायक देतो त्यानुसार होळीचे दहन होते. होळीचे दहन ज्या ठिकाणी केल्या जाते त्या ठिकाणी तांड्यातील बुजुर्ग महिला आणि पुरुष मंडळी होळी माताचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध वांजणा गीत गातात. हे वांजळा गीत म्हणजे गोर वंशातील महान राजा भोज यांची शौर्यगाथा आहे.
“राजा भोजेर वांजणा”
अन भाईरे काळीमावस रक भोजीया जलमो वजी एक!
अन भाई रे भोजीया जलमो रक निलडी निपजी वजी एक!
अन भाई रे लोकुर लडको रं दादु सेवे लीयं वजी एक!
अन भाई रे सीता न बरडी रक भुरीया पठार जो!
अन भाई रे सीता न बरडी रक जागा वोतं कुतीयो!
अन भाई रे रतनीरो भोजीया रे घडीय सेव लिय वजी एक!
अन भाई रे लाली लाली आंबराई रक भोजीयारी बेसका वजी एक!
अन भाई रे ओरे न हेटेरे एक बावनेरी बेसका!
अन भाई रे पेली लढाई रक भोजीया उतरो!
अन भाई रे कुदन कालवा रक लोट लोंडा चलियो!
अन भाई रे लक लक परवाना भोजीया भेजीयं वजी एक!
अन भाई रे जायेन दीनो रक बावनेरो हात जो!
अन भाई रे देक परवाना रक बावन वाचियो!”
अन भाई रे वाचन परवाना खंदणेम फेकीयं वजी एक!
अन भाई रे दुसरो परवाना बावनेन भेजीय वजी एक!
अन भाई रे वाचन परवाना खंदणेम फेकीयं वजी एक!
अन भाई रे तीसरो परवाना रक बावन भेजीयं वजी एक!
अन भाई रे नरज वीस तोरे मोळीया बांधणो वजी एक!
अन भाई रे नारज वीसतो काचळी पेरणो वजी एक!
अन भाई रे वाचतु परवाना रिस भली आयं वजी एक!”
अन भाई रे मावलीरो दरसण भोजीया लीयं वजी एक!
अन भाई रे नीलडी तो भीडन सलामी आयो वजी एक!
अन भाई रे गोफणेरो मारा रक मारीय वजी एक!
अन भाई रे गोफणेरो मारातीरे भोजीया नई डगो वजी एक!
अन भाई रे लकडीरो मारा रक मारीयं वजी एक!
अन भाई रे लकडीरो मारा तीरे भोजीया नई डगो वजी एक!
अन भाई रे पाणीरे धारे न ई निलगी कुदीयं वजी एक!”
अन भाई रे नीलडीरे कुदेती तंगा भलो तुटीया वजी एक!
अन भाई रे तंगा जर तुटो भोजीया पडीय वजी एक!
अन भाई रे आडोन कालवा निलडी कुदीया!
अन भाई रे शिरेरो मोळीया बाजुन पडीय वजी एक!
अन भाई रे सिरोईरो मारा रक मारीयं वजी एक!
अन भाई रे जायेन दीने रक भोजीयारी नारं जो!
अन भाई रे आदी न रात रक ठणको मोडीयो!
अन भाई रे पोरी न रात रक घरेरी नारेरं घुगरी चुडलो उतरीय वजी एक!
अन भाई रे रतनी तो देकतु छाती कुटीय वजी एक!
अन भाई रे आटी चुडलेनं टाकी रक चंपालारी डाळजो!
अन भाई रे वडलासु वदजो रक लिंबडासु फेलजो!
अन भाई रे झंडान जपजो रक होळीमाता पामणी!”

भावार्थ:- ही लढाई प्राचीन काळामध्ये झालेली आहे. ही गोर अस्तित्वाची लढाई होती त्यामुळे ती इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये गोफन आणि दगडाचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यात आला आहे. अमावस्याच्या दिवशी जन्मलेल्या भोजिया नायक हा लढाईमध्ये निपुण होता. लढाईमध्ये शत्रू पक्षाकडून दगडाचा प्रचंड वर्षा झाल्यानंतर युद्धामध्ये भोजिया नायकाने थोडे मागे हटून पुन्हा दुसरी वेळा भोजिया नायकांनी लढाई सुरू केलेली आहे. त्यांच्या अधिनिस्थ असलेल्या ५२ राजांना पत्र पाठवून ते त्यांना बोलवून घेतात. ही लढाई निश्चित रूपामध्ये नागपूर मधील सीताबर्डी येथे असलेल्या भुऱ्या पठारावर झाल्याचे या वाजणां मधून संकेत मिळतात. ही लढाई इतकी भयानक होती की चारी बाजूने पृथ्वीवर कंपन निर्माण झाले होते आणि चारी दिशांना हाहाकार माजला . ही घनघोर लढाई इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे .ही लढाई इतकी मोठी होती की रक्तांची नदी वाहत होती. हे युद्ध म्हणजे आभाळ फाटल्यासारखे आणि वीज पडल्यासारखी ही लढाई सतत सुरू होती अशा परिस्थितीमध्ये भोजिया राजाची सर्वात प्रिय असलेली निलडी नामक घोडी वर बसून ते विजेच्या गतीने लढाई लढत होते आणि निलडी घोडी अशा शूरवीर योद्धयाला लढाईमध्ये साथ देत होती. अचानक निलडी घोडीचा पाय तुटला परंतु अद्वितीय वरदान असलेल्या राजा भोज नायकाने ही लढाई समर्थपणे लढली. परंतु निलडी घोडीचा पाय तुटल्यामुळे राजा भोज्याच्या डोक्यावर असलेली पगडी जमिनीवर पडली आणि भोजिया नायक सुद्धा जमिनीवर पडले आणि अचानक शत्रूपक्षाने भोज्या नायकावर प्रचंड हल्ला केला सर्वीकडे हाहाकार माजला.. एकच धावपळ सुरू झाली आणि भोजिया नायकाला या लढाईमध्ये वीरगती प्राप्त झाली आणि बंजारा समाज अनाथ झाला. आज भोजीया नायक आमच्या मध्ये जरी नसले तरी त्यांनी निर्माण केलेल्या झेंड्याचे आणि निशाणीचे महत्त्व आम्ही सांभाळून ठेवले आहे. त्यांची निशाणी व तो झेंडा निशाणी समजून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत. चला तर मग आम्ही सर्व मिळून एखाद्या वटवृक्षात समान एकजूट, एकसंघ होऊन आणि लिंबाच्या वृक्षासारखी गगन भरारी उंची समान आमची प्रगती करून भोजीया नायकाला आम्ही होळीच्या दिवशी आदराने आठवण करतो. शूरवीर योद्धा भोजीया नायकाची ही लढाई गोर बंजारा समाजात आजही ऐतिहासिक निशाणी आहे. भोजीया नायकाची आठवण बंजारा समाज दरवर्षी होळीच्या दिवशी वांजण्याच्या रूपामध्ये गाऊन त्यांची वीरगाथाची आठवण करत स्वतःला प्रगत करण्याचा मार्ग दाखवतात. त्यानंतर
दिवसभर तांडयात बेधुंद होळी खेळल्या जाते..आणि दुपारून ज्यांच्या घरी धुंड ( वाढदिवस) साजरा करतात. त्यांच्या घरी लाठ्या-काठ्या (ढोळी) घेऊन मुलाच्या घरासमोर तांडा जमा होतो. मुलगा (पिका) व तिची आई या दोघांना अंगणा समोरील पाल मध्ये बसवतात. त्यांच्या चारी बाजूला चार खंड (शिरा पुरी) ठेवतात. हे चार खंड म्हणजे जगाचे चार खंडाची मनोभावे पुजा होय. कारण गोरमाटी चार खंड फिरला आहे. म्हणूनच तो म्हणतो सात समुद्राच्या पलीकडे मळाण (काही ) नाही. म्हणून तो निसर्गपुजक आहे.एक लांब काठी मुलगा व आईच्या डोक्यावर म्हणजे पालेवर धरतात. त्या काठीवर हातातील काठीने (ढोळी) हळूहळू मारतात. व मुलाला आशीर्वाद देतात. लोकगीतातून……!..
‘होरे हो चरक चरीया होरे हो..
शिकच शिकावच शिकेजेरी सात पोळी..घियास पोळी,सात पोळी खावाच.. लाओ खलबत्ता ,खोदो खाड, व ओम बाई चंपाडाल।
जु जु चंपा लेरा लं,तु तु बेटा लेरा लं. *आतरा वोरे काका दादा,आतरा वोरे भाईबंध.
आतरा वोरो कुटुंब कवीस चरक चरीया….चंपा ले…
पेलो बेटा नायकी करीय , दुसरो बेटा कारभारी करीय,तिसरा बेटा खाडु चराव,चौवथो बेटा घोड चराव, पाचवो बेटा छेळी चरावे, सहावो बेटा माँ बाप समाळे, सातवो बेटा हुई सपुती नारं।…शिकच शिकावचं..शिके हाथ घडावछं.। होरे….हो… आवडा व्हेगोरे आवडा…….. बो..बो”
भावार्थ : सगळी कडे आनंदी आनंद आहे. लवकर चंपाची वेल घरासमोर लावं. चंपाची जशी जशी वेल वाढेल तसा तसा तुझा मुलगा वाढेल. बहुसंख्येने त्यांचे काका ,दादा, आहेत. आणि मोठ्या संख्येने येथे भाऊबंद आहेत .गुरेढोरे धनसंपत्ती भरपूर आहे .अशा संपन्न कुटुंबात मूल जन्माला आलाय. त्याला व तिच्या मातेस आपण आशीर्वाद देऊ या… पहिला मुलगा तांड्याचा नायक होईल, दुसरा मुलगा कारभार सांभाळेल ,तिसरा मुलगा गुरेढोरे चारील. चौथा मुलगा घोडेस्वार होईल. पाचवा मुलगा शेळ्या, बकऱ्या चारविलं. सहावा मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करेल। सातवा सपुत होईल. तो सर्वांना ज्ञान देईल आणि न्याय देईल. मग हातवारे करून आरोळी दिली जाते .मुलगा मोठा झाला रे झाला. कदाचित त्यावेळी कुटुंब नियोजनाचे महत्त्व माहित नसल्याने गोरगणात सात पुत्राचा आशीर्वाद दिला असेल? होळीच्या दिवशी तलवार, दांडपट्टा तसेच लाठया- काट्या फिरवण्याचे खेळ होतात. तांड्यात आनंद आणि उत्साह वाढत असतो. मग खुंटा उपटण्याचे कार्यक्रम घेण्यात येतो. ज्यांच्या घरी धुंड त्यांच्या घरासमोर दोन खुटे काढतात. आणि खुटे दोरीने एका दुसऱ्याला बांधतात .दुसऱ्या लाकडांनी दोन्ही खुंटे. तरूणांना उकडायचे असते. तर खुंटाच्या आजूबाजूला गेरणी (स्त्रिया) हातात काठ्या घेऊन उभ्या असतात. खुटांचे स्वरक्षण त्या करतात . हार जितचा हा खेळ तासभर चालतो. गेरीयांची टोळी खुटयावर हल्ला करते. त्याच वेळी स्त्रिया लाठ्या काठ्यांनी खुंटे उपडणाऱ्या पुरुषांना झोडपतात. शेवटी मार सहन करून खुंट गेरीया उखडतात. शक्तिप्रदर्शन आणि युक्ती डावपेच या खेळात दिसून येतो. पूर्ण तांडा हा खेळ पाहतो.
त्याच दिवशी सकाळी पितर पूजा पूर्वजांना पूजा केल्या जाते. साधारण यामध्ये लापशी हा पदार्थ आवडीने तांड्यात केला जातो ..हा खेळ बहुदा खालील घटना करता झाला असावा असा अंदाज आहे. काही राज्यांमध्ये रेल्वेला सुरुवात झाली.गुत्तीबेलारी येथे संत सेवाभायाचा तांडा होता. आणि रेल्वेच्या नवीन मार्गाचे काम चालू होते. लभाणाचा. धंदा लदेणीं. या मार्गामुळे लदेणी व्यवसाय संपुष्टात येणार होता. हा सतराशे ऐंशीच्या नंतरची घटना असावी असे म्हणतात. होळी खेळून घेऊ आणि पटरी रेल्वे उखडून फेकून देऊ असे ठरले त्यानुसार दिवसभर होळी खेळून झाल्यावर तांडयाचा नायक भुकिया यांनी दाहोद गोधरा जंक्शनचे रूळ उखडून फेकून दिले. होते. लमानी तांडा सोबत लोहमार्ग होऊ नये. म्हणून सत्याग्रह करण्याचे ठरविले होते. त्यानुसार जागोजागी रुळ उखडून फेकले होते. तेव्हा कंबरलेन कलेक्टर साहेबांनी रोंजनदारीची हमी देऊन रेल्वेच्या कामात व सैन्यात गोर गणातील लोंकाची भरती केली होती. या घटनेची आठवण म्हणून कदाचित आजही तांड्यात वर सांगितल्यानुसार खुंट उखडण्याचा खेळ खेळला जातो. होळीच्या दिवसात बाहेरचा माणूस तांड्यात आला तरी त्याला काठीचा मार खाऊन पैसे द्यावे लागतात. याला गोरगणात फांगळ (फगवा) म्हणतात. तांड्यातील गेरीया तरूण , गेरणी होळीच्या दर्शनाला जातात. एक दुसऱ्यांना होळीची राख लावतात. तांडयातील चव्हाण कुटुंबातील लोक सामत दादाचा झेंडा घेऊन होळीमातेचे दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी (फाग ) स्त्री-पुरुषांमध्ये सुरू होतो. याला फाग धुलीवंदन म्हणतात . गेरीया गेरणीची स्वतंत्र टोळी सर्वांना दारू पाजणे व गेरसाठी पैसे गोळा करणे करीता भाड लेंगी म्हणतात .अतिशय अश्लील चावट गीत स्पर्धा सुरू होते. प्रथम नायकाच्या घरासमोर गेरीयाची टोळी जाऊन खालील लेंगी गातात…
“तारी नायकेरी कमाई काढरे तु, बोल भाई बोलरा बोल रे तू, शाबास रे तू…”
भावार्थ: ये नायका तुझ्या नायकीची, मोठेपणाची कमाई काढ. कुलुपाला किल्ली लाव आणि पैसे दे नाहीतर तुला मार खावा लागेल. फागच्या महिन्यात गेरणी तरुणी मस्ती मध्ये येतात याच महिन्यात त्या गरोदर होतात. म्हणून खालील गीत गायल्या जाते.
“छोरा काढ ये गेरणी धुंड करीया छोरा काढये..गेरणी धुंड करीया.. दाढी वाळे बकरारो गेर करीया…”
भावार्थ: ये तरुणी मुलाला जन्म दे आपण धुंड (वाढदिवस) करू मुलगा झाल्याच्या खुशीमध्ये आपण दाढी वाढवलेला बोकड कापून खाऊ व आनंद लुटू अशा भांड लेंगीचा राग येऊ नये म्हणून मध्येच खालील लेंगी गायल्या जाते.
“काकी ये दादी रिस मत करजो होळी बोलचंये…. भांड…हाव…हाव..होळी बोलचंये भांड…..!.”
भावार्थ: काकी आणि आजी राग मानु नका. हा होळीचा सण आहे. आणि होळी मध्ये असे गित गावेच लागते. माफ करा मी काही बोलत असेल तर ते केवळ होळी सणामुळे .राग करू नका .
आणि शेवटी होळीला निरोप देतात. आणि शेवटी म्हणतात..
“होळी आयी ये होळी डगर चाली , होळी … गेरीयान सुनो रकाड चाली,गेरळींन गेरीया दे चाली……!.”
भावार्थ: होळी आली आणि आता ती चालली आहे. नवतरुण गेरणींला गेरीया देऊन जात आहे. जाता जाता गेरीयाला मुलगा होईल. असा आशीर्वाद देऊन ती चालली आहे. दुसऱ्या दिवशी गोळा करून आणलेल्या फागवाच्या वर्गणीतिल पैशातून बकरे आणले जाते. बकरे कापून सर्वांना गेर केल्या जाते.मटनाचे समान वाटप करतात. आणि बोटी (मटन) खाऊन होळीची समाप्ती करतात. हे सुरू असताना म्हातारी माणसे मुद्दामच गाफिल झाल्यासारखे दारू पिऊन गीत गातात.
“बारा मीना होळी रेगी तो झिगला सिडातो ,बारा मीना होळी रेगी तो पटका सिडातो।।”
भावार्थ: होळी एवढ्या लवकर आली की कपडे व पटका खरेदीला करायला वेळ सुद्धा मिळाला नाही. जर होळी बारा महिने असती तर नक्कीच शर्ट ,फटका खरेदी केला असता. त्यावर तरुण मुलं म्हाताऱ्या माणसाला चिडवण्यासाठी म्हणतात. बारा महिण्यापासून काय झक मारायला गेला होता? आता सांगा होळी का एकदम आली असेल होळीची चाहूल लागूनही स्वतःला गाफील राहणारे अशा लेंगी गीतातून होळीलाच दोष देतात .अशी ही सर्वांची आवडती होळी. सर्वांना सुख देऊन जाते. या सणामुळे तांड्यात तारुण्य बहरते. व काळीसावळी तरुणी जरी असली तरी ती सौंदर्यवती दिसते. त्यामुळे होळीच्या नंतर बंजारा समाजात भरपूर लग्नकार्य जुळून येतात. अशी ही प्रेमळ,निखळ आनंद देणारी ,थोडी चावट ,पण तारुण्य बहाल करणारी तांडयात चैतन्य निर्माण करणारी होळी गोरगणात आजही प्रत्येक तांड्यात खेळल्या जाते. हीच बंजारा समाजाची फार मोठी सांस्कृतिक उपलब्धी आहे!
होळी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
— लेखन : पंजाबराव चव्हाण पुसद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
