आता अवघे चारच महिने राहिले होते फायनल इयरचे. मग काय? अभ्यासाची तयारी जोरात चालू केली. कधी रात्री जागुन अथवा पहाटे उठून अभ्यास करायचे. कधी तरी मैत्रिणी मिळून अभ्यास करत. पण त्या वेळेस गप्पा जास्त व अभ्यास कमी होत असे. ते सहाजिकच होते ना? मग मी बऱ्याच वेळा कॉलेजच्या लायब्ररीत बसून अभ्यास करत असे. तेथे वातावरण अगदी शांत असायचे. त्यामुळे दोन तीन तास कसे जात, हेही कळत नसे. नेमके फायनलच्या वेळेला घरातील सगळे जण मामाच्या लग्नासाठी गावाला गेले. व्हा मी व भारती मिळून अभ्यास करायचो. भारती अगदी बिनधास्त होती. रात्री पण लवकर झोपायची. सकाळी उठवले तरी नंतर निवांत तास दोन तासाने उठायची. मात्र ती अतिशय प्रेमळ व धीर देणारी मैत्रीण होती. सुनिता लांब राहत असल्याने कधी तरी तिच्या घरी जात असू.
आज पहिला पेपर होता. सकाळी लवकर उठून आवरले. नंतर भारतीच्या घरी जाऊन जेवण केले. पुढे आम्ही कॉलेजला गेलो. संध्याकाळी आमच्या घरी जाऊन स्वयंपाक करायचा. मग अभ्यास. असा परीक्षेच्या वेळातील दिनक्रम होता.अकाउंट्स सोडून सर्व पेपर मला खुप सोपे गेले.मगआम्ही निवांत झालो.आता फक्त निकालाची वाट आतुरतेने पाहत होतो. दिवस भराभर जात होते.
आणि तो दिवस उजाडला! त्या दिवशी ग्रॅजुएशनचा रिझल्ट घेण्यासाठी मी कॉलेजला गेले होते. मनात खूप धाकधूक होती. तशीच कॉलेजला गेले. सगळीकडे खूप गर्दी होती.काहींच्या चेहऱ्यावर हास्य तर काहींचे चेहरे पडलेले होते. रिझल्ट घ्यायला खूप मोठी रांग होती. माझा अकाउंट्सचा पेपर थोडा अवघड गेला होता. त्याचे थोडे टेन्शन होते. खरे सांगू का, हा विषय मला अजिबात आवडतच नव्हता!
खरे तर मी आर्टस् घ्यायला पाहिजे होते. ती माझी सर्वात मोठी चूक झाली. पण आता काय करणार ? आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचे हे मनापासून ठरवलेले होते. रांग पुढे सरकू लागली तसतसे माझे टेन्शन वाढू लागले.माझा नंबर आला. हातात रिझल्ट घेऊन तो न बघता तशीच मी बाहेर पडले. नंतर एका बाजूला जाऊन हळूच देवाचे नाव घेऊन रिझल्ट बघितला. आणि काय आश्चर्य,मला ६७% मार्क्स पडले होते.मी जाम खुश झाले.
मग मस्त मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी व चर्चा झाल्या. तास दोन तास निगुण गेले. घरी सगळे वाट पहात असतील म्हणून सगळ्यांना भेटून पुन्हा लवकर भेटू व कायम एकमेकांच्या संपर्कात राहू असे आम्ही ठरवले. कॉलेज मधून पाय निघत नव्हता. अनेक आठवणी जोडल्या होत्या. घरी आले. सगळे माझीच वाट पाहत बसले होते, मग मी निकाल दाखवला. सर्व जण खूप खुश होते. कारण मी घरी क्लासेस घेऊन अभ्यास करत होते. माझ्या कष्टाचे फळ मला मिळाले होते. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच होता. नंतर काही दिवसांनी मी व माझी मोठी बहीण अशा आम्ही दोघींनी मिळून पुणे युनिव्हर्सिटीत जाऊन एम कॉमचा फॉर्म भरला. दोघींनीही मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच वर्षात माझे लग्न ठरले!
क्रमशः 7
– लेखन : रश्मी हेडे. – संपादन: देवेंद्र भुजबळ.9869484800.