Home बातम्या बदलापूर झाले कवितापुर !

बदलापूर झाले कवितापुर !

0

धो धो पाऊस कोसळत असताना बदलापूरच्या सोनीवली गावात मात्र नुकतीच कवितांची सुरेल बरसात झाली. निमित्त होते महाकवी कालिदासांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या ’आषाढस्य प्रथम दिवसे’ या कार्यक्रमाचे. कवितेच्या या सोहळ्यात पावसाच्या कवितांसह विविध ढंगातील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. अनेक नामवंत व नवोदीत कवी यावेळी उपस्थित होते. या चिंब मैफलीच्या निमित्ताने बदलापूर जणू ’कवितापूर’ झाले !

’कुटुंब रंगलय काव्यात’ फेम प्रा. विसुभाऊ बापट यांच्या संकल्पनेतुन आणि ठाण्याचे सिव्हिल सर्जन, काव्यप्रेमी डॉ. कैलास पवार, यांच्या सहकार्याने रात्र भर चालणाऱ्या मराठी कवितेच्या मैफलीचे आयोजन गेली ६ वर्षे करण्यात येते. पण कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला होता. त्यामुळे यंदाचा कार्यक्रम विशेष ठरला.

यावेळी लावणी, गझल, पोवाडा, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतापासून ते हायकू पर्यंत मराठी कवितेतील विविध प्रकार पेश केले. डॉ. कैलास पवार यांनी सपत्नीक गायलेल्या द्धंद्धगीताने मैफलीत रंगत आणली. विसुभाऊ बापट यांनी कवितांचे विविध प्रकार आपल्या ढंगात सादर करून प्रत्येक काव्यप्रकाराची सुरेख माहिती दिली.

रात्री सुरू झालेला हा काव्यजागर पहाटेपर्यंत अखंडपणे सुरू होता. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर, वर्षा जोशी, अनुपम बेहेरे, उमा बापट, अपर्णा पेठकर, निलिमा शिरोळकर, संतोष महाडेश्वर, ज्योती डोळे आदींच्या कवितांना चांगली दाद मिळाली. रामचंद्र वाघमारे व महेश सिंगतकर या बेंजोवादकांनी सुरेल साथ केली.

कविता सादरीकरणाच्या स्पर्धेत कवी माधव डोळे यांना प्रथम, डॉ मधुमंजिरी गटणे यांना दुसरा, तर मकरंद वायंगणकर यांना तिसरा क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर व निलिमा शिरोळकर यांनी काम पाहिले.

प्रारंभी निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ, विसुभाऊ बापट, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर, सिविल सर्जन डॉ कैलास पवार यांच्या हस्ते विनायक कुलकर्णी यांच्या ’मनांकुर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र हिंगे, अनिल पेठकर, मलबारी आदींनी मेहनत घेतली.

अनेक काव्यप्रेमी, रसिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

– टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version