Tuesday, February 17, 2026
Homeपर्यटन"बदामी" भारतीय वारसा : समारोप

“बदामी” भारतीय वारसा : समारोप

दुसऱ्या दिवशी आरामात उठली मंडळी. सकाळची आन्हिके उरकून नाश्त्याला पोटभर हादडून “महाकूट” कडे प्रयाण केले. ही देखील “शिवाचीच” रूपं. तीच मंदिरं. राज्यकर्तेच शैव.त्या काळात तिकडे शैव लोक अधिक. मला सतत महाकूट मुळे उज्जैन चे महांकाळेश्वर आठवत होते. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात महाकूट याच नावाचे गाव. तेथे ही “वर्ल्ड हेरिटेज” मध्ये नोंद झालेली मंदिरं. ऐहोले सारखीच ही मंदिरं असल्याने यांचा काळ ही त्याच सुमाराचा गृहीत धरला जातो. तेथे दगडी खांबावर संस्कृत आणि कन्नड दोन्हीही भाषेत ५९६ ते ६०२ असे लिहिलेले आढळते. पुलकेशीन प्रथम ची राणी दुर्लभादेवी ने सढळ हातांनी यांना मदत केली होती. सातव्या शतकातील त्या कलाकारांना तेथील दक्षिणेकडील द्रविड शैलीसहच उत्तर भारतीय नागर शैलीचा चा ही प्रभाव होता, जाणवते. मंदिरांचा आकार चौकोनी असून वर तीन किंवा चार खणी निमुळती होत जाणारी शिखरं दिसतात. येथे एक विष्णू पुष्करणी आहे, तसेच पापक्षालन करणारे, पापविनाश तीर्थ नावाचे कुंडही आहे. त्या कुंडात लहान मुलांना घेऊन त्यांच्या आया डुबकी मारत होत्या. देवकरो आणि त्या सगळ्यांच्याच पापाचा नाश होवो अशी प्रार्थना मनाला शिवून गेली. असे झाले तर जग किती निर्मल, सुंदर होईल ना ?

त्याच परिसरात, बाहेरून ग्रील त्याला कुलूप अशा एका मोठ्या बंद खोलीत शोभिवंत रथ, चक्र, त्रिशूळ वगैरे सामान दिसले. पृच्छा करता कळले शिवरात्री ला खूप मोठी, भव्य अशी शोभायात्रा निघते .. तेव्हा हे सर्व बाहेर काढतात.

परिसर स्वच्छ आहे पण तिकडेच पुजारी वगैरे राहत असल्याने अधून मधून धोबीघाट सारखे चित्रही दिसते. मोठमोठ्या शिळा, त्यावर वाळत असलेले कपडे, आंघोळी ..जरा विरस होतो. जर जागतिक पातळीवर या जागेला मान्यता आहे तर विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे हे आमचे आद्य कर्तव्यच आहे. त्यासाठी ही जागा अधिकाधिक सुशोभित करणे, भारताचा हा अमूल्य “ठेवा” नीट प्रदर्शित करणे आपल्याला शक्य नाही का ? असो.. तो मुद्दाच वेगळा.

येथील मूर्त्या बघण्यासारख्या आहेत. शंकराचीच विभिन्न रूपं. नटराज, पिंडी, मोठे शिवलिंग, नंदी, अर्धनर नारीश्वर प्रत्येक ठिकाणी दिसतात. मोठे शिवालय आहे त्यातील गर्भगृहात अनवरत शिवमहिम्न, स्तोत्रं वगैरे मंद सुरात ऐकू येतात. धीर गंभीर वातावरण निर्माण होते कारण या सर्व देवालयांची उंची भरपूर आहे ..आवाज निनादत राहतो. बाहेरच्या भिंतींवर देखील लहानलहान कोनाडे आहेत त्यात अर्धनरनारीश्वर च्या मूर्त्या कोरलेल्या आहेत.

परिसरातच परतीच्या वाटेवर रांगेने मूर्त्या, पूजेचे साहित्य, स्थानिक खेळणी, ऊसाचा रस इतर मिळण्याची दुकानं सजलेली आहेत .दगड मुबलक प्रमाणात मिळत असल्याने दगडी साहित्य भरपूर .. किंचित पाय वळतातच बघायला…गाई बांधलेल्या असतात. झाडे पुष्कळ असल्याने माकडांची वस्ती ही आहे. गायीला उगाच त्रास देणाऱ्या माकडाची चेष्टा ही बघितली. तेथून पुढे आम्ही पट्टदकल ला निघालो.

पट्टदकल चा मोठा परिसर वर रणरणते ऊन बघून ज्येष्ठांना किंचित काळजी वाटली पण तेथील रक्षकांनी सांगितले…येथे ज्येष्ठांसाठी “सर्व्हिस कार” मिळते. तुम्ही त्या खिडकी पाशी जाऊन विचारपूस करा आम्हाला ती विशिष्ट रचनेची मोटार मिळाली पण त्या दिवशी त्यांचा सारथी नेमका आजारी होता ..सिक्युरिटी गार्ड स्वतः आमच्यासाठी कार चालविण्यास तयार झाला . असे लोक भेटले की आनंद द्विगुणित होतो. पण त्याचे म्हणणे “मी पूर्ण परिसर फिरवू शकणार नाही. सर्वात मोठ्या मंदिरात जाऊन परत या . चालेल?” . अर्थात मी आणि ऋतू सर्वच मंदिरं बघणार होतो .बाकी तिघे एक मुख्य मंदिर बघून परततील ठरले. तिकीट खिडकी च्या जवळ असलेली गार जागा बघून ते थांबतील .

त्या बाजूची इतकी मंदिरं बघितली पण असे म्हटल्यास वावगे ठरू नये की पट्टदकल हे स्वतःचे वैशिष्ट्य राखून आहे. नदी काठावर ओळीने नऊ देवालये आहेत. बच्चन गुड्डा नावाच्या एका लहानशा टेकाडावर विसावलेले हे गाव . मातीचा डोंगराळ भाग म्हटले तरी चालेल. काही मंदिरं बंगल्याप्रमाणे एक खणी बसकी तर काही दोन माळ्यांची वर मोठी आयताकार, त्यावर घुमट बसवलेला.जरा गुलाबी रंगाच्या छटा असलेले हे दगड एकमेकांवर, कुठलेही घट्ट पकडून ठेवण्याचे मिश्रण न वापरता असे काही उभेच्या उभे ठेवले आहेत की बघणारा चक्क आ वासून उभा राहतो. दगडावर दगड उभे आडवे रचून अद्भुत शिल्प जणू.

प्राचीन काळातील हे दगडी काम प्रेक्षणीय नक्कीच आहे. काही वर्षांपूर्वी नवीन झालेल्या उत्खननात जैन तीर्थंकर यांच्या मूर्ती, शिलान्यास करताना लागणारे धार्मिक साहित्य ही सापडले आहेत.साधारणपणे मंदिरांची रचना मुख मंडप, सभा मंडप, अर्ध मंडप आणि गर्भ गृह अशीच आहे.शिरताना महा द्वार आहे. विरुपाक्ष , मल्लिकार्जुन, संगमेश्वर ,पापनाथ मुक्तेश्वर यांची मंदिरं आणि अशीच अनेक शिव मंदिरं आहेत. काही मंदिरात मुख मंडपाच्या आणखी थोड्या पुढे नंदी मंडप ही दिसतात.तेथे मोठ्या आकाराचे नंदी आहेत. मंदिरातील खांब वेगवेगळ्या आकार, प्रकार ,शैलीत दिसतात.त्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. काडसिद्धेश्वर मंदिरातील नंदीसंहिता अर्धनारीश्वर ची मूर्ती अजून ही तेवढीच देखणी आहे .सहस्त्र वर्ष लोटली तरी बघत राहावे तिचे रूप.जांबुलिंग, गालगनाथ, चंद्रशेखर, संगमेश्वर,काशीविश्वेश्वर, गजसुरारी …अबब! किती रूपं शंकराची ..?
माझी नुसतीच विचारशृंखला , कडीत कडी फसणारी, मनातील भावभावनांचा कल्लोळ माजवणारी…कलाकारांच्या अफाट कार्याची , त्यांच्या अभ्यासाची ..कल्पनाही करवत नाही. इतकी नावं , हे अप्रतिम कोरीव काम, गजेंद्र मोक्षाची ती अनुपमेय मूर्ती, तो नाट्य शिव ,ते गंगावतरण, ते समुद्र मंथन…

काय बघू ? काय वाखाणू ?, सारे कसे ? लक्षात ठेवू ? भराभर कागदावर टिपून घेत होते मी.. तेथे स्थापत्यकला विभागातर्फे लावलेल्या काही नवीन पाट्या, काही जुने शिलालेख कॅमेऱ्यात कैद करीत होते.
गम्मत म्हणजे एका मंदिराच्या पश्चिमेस सर्व रामायण देखील कोरलेले आहे. त्यात अप्रतिम असे ..पुत्र कामेष्टी यज्ञ, वालीच्या दिशेने धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेले श्री राम, सेतू बांधणारे वानर, (ओळीने डोक्यावर दगड घेऊन जाणारे ते वानर अतिशय गोजिरवाणे दिसतात) राम पट्टाभिषेक, वानर सेनेवर आक्रमण करणारे कुंभकर्ण व इंद्रजीत यांचे भित्तिशिल्प बघताना जाणवते ..त्या काळातील युद्ध सामग्री, त्या काळची विविध शस्त्रं या सर्वांचाच किती अभ्यास केला असेल या कलाकारांनी. वानर सैन्य रावणावर चाल करून जात आहे , विभीषणाचा राज्याभिषेक अशी अनेकानेक सुंदर भित्तिशिल्प बघून आपण मोहित होतो.

पाट्या इंग्रजीत किंवा कन्नड मध्ये ..त्यामुळे कधी कधी इंग्रजी येत असूनही कळत नव्हते काही शब्द ..उदा..lakkanan .. हे नाव कोणाचे कळायला उशीर लागला. ते लक्ष्मण आणि “Anaman” म्हणजे हनुमान असे नंतर नंतर लक्षात येऊ लागले.
पट्टदकल ची अविस्मरणीय स्मृती मनात राखून आम्ही ऐहोले कडे प्रयाण केले

मी आणि ऋतुराज सोडून इतर कार मधेच बसले होते. सर्वांनाच भूक लागलेली ..पण तेथे हॉटेल असे कुठेच दिसत नव्हते .सर्व टपरीवजा दुकानं.. त्यात पिठलं भाकरी, डोसे भाजी असे तत्सम पदार्थ तयार होत होते. तेथली प्रचंड गर्दी आणि रणरणते ऊन यामुळे ज्येष्ठांना कुठेतरी निवांत, गारव्यात बसावे अशी इच्छा …
झाले ऋतूचे गूगलिंग सुरू. सांगितले…के टी डी सी चे एक रेस्तराँ दिसतंय ..बरे असावे..जवळच आहे..तेथे आमची कार पोचतेय तोवर दुसऱ्या पर्यटकांची बस पोचलीच.गर्दी झाली..रेस्तराँ उघडे आहे की बंद हेच कळत नव्हते .. शेवटी आतबाहेर करता करता …कळले ..चालू आहे ..जेवण तयार आहे ..मिळेल ..हुश्श !

मोकळी जागा, वर पंखा हे पुरेसे होते..वाढपी वयस्कर न् प्रेमळ होता. नाही नाही म्हटले तरी वाढतच होता गरम फुलके बघूनच मूळचे मध्यप्रदेशी खुश झाले होते ..शेवटी स्वतः च ..” मिठाई साब कुछ.” ..म्हणून आग्रह करू लागला.” मूंग का हलवा तैयार है थोडासा ले लो..उसके पैसे नही..”.. मज्जाच वाटली त्या कर्मचाऱ्याची.
आपल्या प्रवासात किती विभिन्न प्रकृतीची माणसे भेटत असतात, कसे वेगवेगळे अनुभव येतात. प्रत्येकावर एक कथा होऊ शकते. बहुधा म्हणूनच मोरोपंत म्हणतात ..”, केल्याने देशाटन…”

ऐहोले नावाची गंमतच आहे. त्याचे हे नाव का व कसे पडले याच्या मजेशीर कथा आहेत.

आय होले त्याचे खरे नाव आर्यपूर आहे आर्य म्हणजे विद्वान आणि पूर म्हणजे शहर.. या शहराची एक कथा अशी ही सांगतात की परशुराम यांनी क्षत्रियांना संपवले आणि मग ते मलप्रभा या नदीत आपला परशु धुण्यास गेले त्यांच्या परशूमुळे येथील पाणी लाल भडक झाले. गावकऱ्यांनी जेव्हा लाल झालेले पाणी बघितले तेव्हा ते ओरडू लागले अयो अय्यो म्हणून ..अय्यो होले..होले म्हणजे नदी…आज त्याचे नाव अयो होले पडले .

चौथ्या ते सहाव्या शतकातील ही मंदिरे बघून आपण अवाक ! येथे शंभराच्या वर कोरीव काम केलेली अशी मंदिरे आहेत.. पूर्ण गावभर पसरलेली आहे म्हणूनच याला क्रेडल ऑफ इंडियन आर्किटेक्चर असेही नाव दिले होते.आपल्याला सर्वच मंदिरे बघायची असल्यास बरीच पायपीट करावी लागते

येथे सर्वप्रथम समोरच दिसते ते संग्रहालय…लक्ष वेधून घेणारे. आम्ही आधी तेच बघायला गेलो. मलप्रभा नदीच्या काठावर वसलेले ऐहोले हे मंदिरांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे . संग्रहालयात याचे प्लास्टर कास्टचे मॉडेल खूप मोठे व सुंदर आहे. म्युझियम मध्येच खूप छान छान मूर्त्या आहेत.अर्थात शंकर, विष्णू, जैन, शेषशायी विष्णू तसेच बुद्ध यांच्या तर मूर्त्या आहेतच पण अनेक वेगवेगळ्या मूर्त्या ही बघायला मिळतात.

भारतीय दर्शनशास्त्राप्रमाणे जरी आकारहीन, अमूर्त “ब्रह्म” वर्णन असले तरी मानवाच्या कल्पनेला भरारी केवढी ?..ती अफाट झेप विस्मयचकित करते.हिंदू धर्मात देवी देवतांचे असंख्य आकार, प्रकार आपल्या समोर या शिल्पकारांनी भरभरून ठेवले आहेत. शिव आणि विष्णू तर आहेतच पण या विविधतेने नटलेल्या भारत देशात त्यांची असंख्य इतर रूपं ही निर्जीव कातळातून ते सजीव करतात.आपले लोक संगीत, लोक कला यातून ही ते उत्तम रित्या सादर करतात. असेच एक रूप आहे .लज्जा गौरी चे..पुरुष आणि प्रकृती. .यात” प्रकृती” चे अनन्यसाधारण महत्व. ती सृजनशील. सृष्टीचा उगम तिच्या मूलस्थानातून. ती आदिमाता , आदिशक्ती, तीच अदिती ,येल्लम्मा, रेणुका, नग्न कंबंधा, लज्जा गौरी ..तिची अनेक रूपं पण कार्य एक ..जगाची उत्पत्ती. प्रजोत्पादन.
कमळ देखील जीवनाची सुरुवात, प्रजजनाचे प्रतीक. लज्जा गौरी ची मूर्ती डोक्याच्या जागी कमळ असलेली जीवाला जन्म देणारी …अशी एक सर्वथा वेगळी मूर्ती संग्रहालयात बघायला मिळते

बाहेर एका बोर्डावर मी वाचत बसले, आधी कन्नड आणि तमिळ यांची लिपी एकच असल्याने काही शिलालेख त्या लिपीत आढळतात . काही वर्षांपूर्वी त्यांची लिपी वेगळी झाली.

दुर्गा मंदिर हे मुख्यतः आदित्य टेम्पल म्हणून प्रसिद्ध आहे आदित्य अर्थात सूर्य म्हणजेच सूर्य मंदिर.. सूर्याला समर्पित केलेलं .आतील कोरीव शिल्प प्रेक्षणीय आहे चामुंडी देवीच्या पायाखाली असलेला महिषासुर, नरसिंहाचे शिल्प, अर्धनारीश्वराचे शिल्प हे सगळे आपल्याला खांबावर बघायला मिळतात.

तेथेच एक लाडखान मंदिर आहे खरे तर लाड खान नावाचा संत येथे राहत असे म्हणून त्याचे नाव लाड खान मंदिर पडले पण ते शिवाचे मंदिर आहे येथे या काही मंदिरात विशेष मुद्दाम असे बनवलेले गर्भगृह दिसत नाही पूर्व, उत्तर आणि दक्षिण या भिंतीवर कोरीव काम केलेले दिसते वातायान म्हणजेच गवाक्ष. स्वस्तिक ने तयार केलेली दिसतात.काही गाभाऱ्याच्या भिंती ओबडधोबड आहेत. कोरीव काम ही काही दिसत नाही. बहुधा अर्धवट राहिली असावीत.

अशी अनेक मंदिरं बघत आम्ही पुढे जात होतो.तेथे बऱ्याच मंदिरांची नावे त्या जागेवर राहत असलेल्या माणसांवरून ही पडलेली दिसतात. जसे लाडखान, गौडा कुटुंब राहत होते तेथे म्हणून गौडारा गुडी असे ही नाव दिसले. गुडी चा अर्थ त्यांच्या भाषेत मंदिर. अशीच नावे आहेत. सूर्यनारायण गुडी, चक्र गुडी, बडीगर गुडी, अंबिगर गुडी, हच्ची मल्ली गुडी..आता म्हणे हच्ची म्हणजे भांबावलेली स्त्री , ती तेथे राहत होती .. म्हणून तसे नाव…
अंबिगर म्हणजे नावाडी ते तेथे राहत होते ..अर्थात मंदिरात विष्णूचा सूर्य अशी एक अप्रतिम कलाकृती आहे..आत मध्ये इतके सुंदर कोरीव काम, शिल्प असून , नावं ? कशी विचित्र नावे पडतात.
एका मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गरुड आहे त्याच्यासोबत गजलक्ष्मी चार हत्तींबरोबर दिसते. बहुधा हे भगवती मंदिर असावे असे कळते. दुसऱ्या एका मंदिरात उषा आणि प्रत्युषा यांच्यामध्ये सूर्य देव आहेत.
मंदिरांच्या बाहेर छतावर कोरीव नक्षी बघण्यासारखी आहे.

बाजूला एक रावण खाडी नावाची ही गुफा आहे. तेथे आम्ही जाऊ शकलो नाही.ती जरा आडवळणावर होती. भूक तहान विसरून जे आम्ही भटकत होतो त्याची हळुहळू जाणीव होऊ लागली. इतर ज्येष्ठ तर वाटच बघत होते आमची.

शेवटी दिन सार्थकी लागल्याचे समाधान बाळगून आम्ही हॉटेल कडे निघालो. छान मस्त झाली होती ट्रिप. आनंद वाटला. हॉटेल मध्ये जेवणाची खोली खालीच असल्याने आणि तेथे गरमागरम मसाल्याचे वास, वाफाळलेले चहाचे कप दिसल्याने आम्हाला वर आपल्या कॉटेज मध्ये जायची गरज नाही. ठरले.
तेवढ्यात “इलकल” हे गाव जवळच असल्याने हॉटेल मालकाने सूज्ञ पणे “इलकली साड्यांचे दुकान” ही तेथेच जवळ सजवले होते. तेथे स्त्रियांनी न जाणे म्हणजे जणू घोर पाप. मोठा गुन्हा.
ते बघणे, साडी विकत घेणे आद्य कर्तव्य. भरपूर पर्यटक होते. पुण्या मुंबईच्या मुलींचा चिवचिवाट चालू होता.
तुझ्या साडीचा कोणता रंग. अय्या माझाही हाच गं.. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.बीगप्पांसोबत चार घास जास्तच जात होते.

प्रसन्न मनाने आपापल्या कॉटेज मध्ये रात्री सारे निद्राधीन झाले व मुंबईला परत जाण्याची स्वप्ने रंगवू लागले होते. ” सकाळी उठून छान पोटभर नाश्ता करायचा हं.. मी मध्ये गाडी थांबवणार नाही आता एकदम जेवण विठ्ठलाच्या नगरीत पंढरपूरला ” असा ऋतुराज चा आदेश आला होता.

सकाळी आम्हाला जरा बागेत हिंडायचे होते , झोपाळ्यावर बसायचे होते पण इतके दंव होते की सारे गारीगार झाले होते ओलसरपणा भरून होता आसमंतात. तेथून बदामीचे बदामी रंगांचे उभे ओलसर कडे नेत्र सुखद वाटत होते पण थोड्याच वेळात आपण यांचा निरोप घेणार ही भावना ही नयन कडा ओलसर ओलसर करून गेली.

स्वाती वर्तक

— लेखन : सौ स्वाती वर्तक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments