चौथे मराठी विश्व शब्द साहित्य संमेलन मलेशियात चार वर्षांपूर्वी झाले होते. त्याची आठवण फेसबुकने करून दिली.
त्या संमेलनाचा उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. त्यावेळचा वृत्तान्त पुढे देत आहे.
– संपादक
भाषेतून संवाद होतो. संवादातून भावना कळतात. भावनेतून माणूस जोडल्या जातो, त्याचे साधन केवळ भाषा असते. म्हणून मराठी भाषेच्या अभिमानाबरोबरच झपाट्याने सुरू असलेल्या जागतिकीकरणामुळे प्रत्येकाने बहुभाषिक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी मलेशियातल्या चौथ्या मराठी विश्व शब्द साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात केले.
मलेशियातील क्वालंलपूर येथे शब्द परिवाराच्यावतीने आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्री. भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी संपादक, लेखक संजय आवटे होते.
श्री. भुजबळ पुढे म्हणाले, मातृभाषेतून आपला इतिहास, लोकपरंपरा, लोकजीवन, संस्कृती कळते. ती जतन, संवर्धन होण्यास मदत होते. म्हणून मातृभाषेला विसरता कामा नये. पण बहुभाषक असल्याने भाषेच्या माध्यमातून लोकांना जोडणे अत्यंत सोपे होते, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी महामंडळाची साहित्य संमेलने होत असतात. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, कोकण, विद्रोही, आदिवासी, दलित अशी चाळीसहून अधिक संमेलने भरतात.
इतर राज्यात अशाप्रकारची संमेलने होत नाहीत, ती महाराष्ट्रात होतात, ही गौरवशाली परंपरा आहे. अशा संमेलनातून परस्पर संवाद होऊन साहित्य विचारांची आदान प्रदान होते, ही अभिमानाची बाब आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, शासनाने देखील अशा विविध संमेलनांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे मतही श्री. भुजबळ यांनी मांडले.
शब्द परिवाराने कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान, प्रायोजकत्व न घेता विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे, ही आनंदाची आणि कौतुकाची बाब असल्याचे गौरवोद्गार श्री. भुजबळ यांनी काढले.
संमेलनात “प्राध्यापकांचे विश्व”, “यंगीस्तान: नव्या पिढीची भाषा” यावर परिसंवाद संपन्न झाले. याशिवाय कवी संमेलन, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शब्द परिवाराने यापूर्वी थायलंड, दुबई, इंडोनेशियात अशा संमेलनांचे आयोजन केलेले आहे.
या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी सर्वश्री संजय सिंगलवार, प्रभाकर वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संमेलनासाठी महाराष्ट्रासह परदेशातून कवी, साहित्यिक, लेखक अशा जवळपास १०० जणांची उपस्थिती होती.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
शब्द संमेलनातील देवेंद्र भुजबळ सरांचे भाषण अतिशय सुंदर आहे.मातृभाषेतून होणारी व्यक्तिमत्वाची जडणघडण आयुष्यात मोलाची ठरते.