गोमांतकांचे भूषण कविवर्य पद्मश्री
बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब
यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यात झाला. सुमारे १९३० ते १९८० असा अर्धशतकाचा काल त्यांनी गद्य आणि पद्य लेखन केले आणि मराठी साहित्य सृष्टी अधिक संपन्न केली.
निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्मिक चिंतनपर असणारे त्यांचे काव्य विशेष प्रसिद्ध आहे. शृंगार आणि शांत असे दोन्ही रस त्यांच्या कवितांमधून तितक्याच सौंदर्य पूर्ण पद्धतीने व्यक्त होतात.
त्यांचे, ‘प्रतिभा’, ‘जीवनसंगीत’, ‘दूधसागर’, ‘आनंदभैरवी’, ‘चित्रवीणा’, ‘गितार’, ‘चैत्रपुनव’, ‘कांचनसंध्या’, ‘अनुरागिणी’, ‘चिन्मयी’ हे काव्यसंग्रह आणि ‘कागदी होड्या’, ‘मावळता चंद्र ‘, ‘अंधारातील वाट’, ‘जळते रहस्य’, ‘भावीण’, ‘प्रियदर्शनी’, ‘माझी जीवनयात्रा’, ‘चांदण्यांचे कवडसे’, ‘समुद्रकाठची रात्र’ असे लघुनिबंध संग्रह, कादंबरी इत्यादी गद्य लेखन प्रकाशित झाले आहे.
याशिवाय ‘महात्मायन’ नावाचे अपूर्ण दीर्घ काव्य, तसेच महात्मा गांधी यांचे वरील इतर लेखन, भाषांतरित साहित्य, कोंकणी भाषेतील काव्य संग्रह, इत्यादी प्रचंड कार्य आहे.
बोरकरांची मूळ भूमी गोवा. त्यांनी गोव्याचे वर्णन करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या.
केवळ साहित्य निर्मिती पुरते हे प्रेम मर्यादित न ठेवता गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी भाग घेतला.
स्वतंत्रता सेनानी, कवी, लेखक आणि जीवन सौंदर्याकडे उदात्त दृष्टीने पहाणाऱ्या ह्या अध्यात्मिक कविवर्यांचा मृत्यू 8 जुलै 1984 रोजी पुणे येथे झाला. आज त्यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने ही त्यांना आदरांजली.
माझ्या आणि ज्येष्ठ कवी-कवयित्री यांच्या ‘भेटी’ ह्या मुख्यत्वे शालेय जीवनात प्रथम झाल्या. इथे ‘भेटी’ म्हणजे, मी त्यांना भेटले आहे, पाहिले आहे किंवा त्यांचा चरणस्पर्श केला आहे असं मला म्हणायचं नाही.
‘खऱ्या भेटी’ कवितांद्वारे होतात असं माझं नक्की मत आहे. आपण रूढार्थाने ज्याला भेट म्हणतो ती दोन बाह्यरूपांची भौतिक जगाच्या पातळीवर होणारी असते. त्यात शंभर शिष्टाचार आणि सोपस्कार असतात, परंतु कवितेद्वारे होणारी भेट ही ह्या साऱ्याच्या पलीकडे असते…आरपार… थेट मनच स्वच्छ दिसू शकेल; निदान त्या-त्यावेळी उमटलेले तरंग तरी दिसू शकतील इतकी जवळून होणारी. म्हणजे कवीने त्याचा जीव, त्याचे आवेग ज्या शब्दांत रिते केलेले असतात, रसिक वाचक ते समजून घेण्यासाठी त्यात आपला जीव ओततात. ही अशी जीवांची होणारी भेट विलक्षण सुंदर असते.
बाकी इतर लेखन म्हणजे कथा, कादंबऱ्या, लेख, माहितीपत्र, किंबहुना अगदी गीते देखील, हे लिखाण अतिशय अप्रतिम, दर्जेदार, मान्यताप्राप्त आणि अनन्यसाधारण महत्त्वाचं आहेच परंतु त्यात अशा जीवांच्या भेटी घडत नाहीत. हा मान केवळ कवितेचा!
माझ्या आणि प्रतिभावान कवी कवयित्रींच्या अश्या ‘भेटी’ ह्या अगदी थेट होत्या. म्हणजे एखादी कविता वाचनात यायची, ती इतकी मग्न करायची की त्या कवीच्या साऱ्या कविता वाचाव्यात असं वाटू लागायचं. म्हणजे एका कवितेच्या मुहूर्ताने सुरु होणारे हे सगळे सोहोळे असायचे. परंतु असे एकमेव ‘कवी व्यक्तिमत्व’ आहे जे मला ‘व्यक्तिमत्व’ म्हणून आधी वाचायला मिळाले आणि त्यानंतर त्या कविवर्यांबद्दल आणि त्यांच्या अभिव्यक्ती बद्दल इतके कुतूहल वाटायला लागले की, मी वळले ती ह्या वाटेवरल्या ‘आनंदयात्री बाकीबाब’ नावाच्या वळणावर !
बाळकृष्ण भगवंत बोरकर यांची कविता म्हणजे साज शृंगाराने नटलेली, भाषेचे अलंकार धारण केलेली, वृत्तांच्या नागमोडी वळणावरुनही झुलत झुलत जाणारी, चैतन्याने सळसळणारी आणि इतरांसही आनंदाची पायसदाने देणारी. मनुष्य जीवनाचे चार आश्रम. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. कवीवर्य बोरकर यांची कविता या चारही आश्रमांचे गीत आहे.
ती एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे हलकेच हिंदोळे घेत राहते. त्या मुलीचे मन त्या झोक्या बरोबर ज्या उंचीला जाईल, क्षणभर ती जिथे रेंगाळेल, ते रंग रूप घेऊन मग ती ईहलोकी परत येते. त्यांच्या सार्या कवितांचे रंग वेगळे आणि तरीही प्रत्येक रचनेत रचनाकाराचा चेहरा लख्ख आरशात दिसावा तसा दिसतो. प्रत्येक रचना प्रांजळाची रचना असल्याने आलेले अलौकिक देखणेपण ते !
‘देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे’
ह्या त्यांच्या ओळी वाचताना मला ह्या कवीच्या आत लपून राहिलेल्या एका संताचे, किंवा जगदुद्धाराचे कार्य करणाऱ्या, अज्ञ जनांच्या मूढ मतीस जागृत करून ज्ञानाचे वारसे पेरणाऱ्या अध्यात्म गुरुचे दर्शन होते.
‘देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा’
केवढा मोठा सिद्धांत !
‘लावण्य रेखा’ ही कविता कर्मयोगाचे श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय सौंदर्यपूर्ण शब्दात समजावणारी अशी वाटते मला. ‘अनंता तुला कोण पाहू शके’ ही अशीच आणखी एक आध्यात्मिक बैठक लाभलेली कविता.
‘जे न देखे रवि ते देखे कवि’ ही उक्ती मुळातच बा. भ. बोरकर यांना भेटल्यानंतर बनवली असणार. कल्पनाशक्तीच्या ठाई ठाई फुललेल्या लाख कळ्या कवितेबरोबर हळूहळू उमलत जातात आणि त्याचा गंध आपल्याही नकळत आपल्या आसपासच्या वातावरणात दरवळू लागतो. अशीच एक कल्पनाशक्तीचा अद्भुत आविष्कार असलेली कविता म्हणजे
‘समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे , चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली कार्तिक नौमीची रैना’
बोरकरांच्या, मला अतिशय प्रिय असणाऱ्या तीन कवितांपैकी ‘लावण्यरेखा’ चा उल्लेख मी आधीच केला. दुसरी म्हणजे ‘दिसली नसतीस तर’.
या कवितेत एक कडवे आहे…
‘तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडतांना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजूनही विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी असा डवरलाच नसता.’
ह्यात किती रस एका वेळी व्यक्त झालेले आहेत !
‘दिसली नसतीस तर’ ही कविता, त्यातली प्रत्येक ओळ एका प्रियकराचे, विरहीचे आणि जे प्रिय ते अप्राप्य असल्याने होणाऱ्या वेदनेच्या ज्वालेतून तावून-सुलाखून सिद्ध झालेल्या योग्याचे दर्शन देते.
‘तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो’
या अंतिम ओळी अचानक एक साक्षात्कार करून देतात आणि ह्याच कवीच्या ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ याचा प्रत्यय येऊन आपले हात आपोआप जोडले जातात. ह्या दिव्यत्वासमोर आपण नतमस्तक होत असतो तेवढ्यात अचानक
‘मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
करुणा भरल्या मुकाटपणे अन तुला धरावे जरा उराशी’
असं म्हणून अगदी आपल्यातलं वाटावं असं कुणीतरी दिसतं.
‘दूर घुमावा तमात पावा जवळच व्याकूळ व्हावे पाणी
तू ही कथावि रुसून अकारण सासु नणंदाची गाऱ्हाणी’
हे वाचताना हे अध्यात्मिक गुरुवर्य असणारे कविश्रेष्ठ बोरकर अचानक प्रापंचिक सुख दुःखाची गणितं सोडवताना दिसतात.
ही व्यक्ती अगदी आपल्यातली, तीच साधीभोळी स्वप्नं पाहणारी आणि प्रिय व्यक्तीला उराशी कवटाळण्यात आयुष्याचं सार्थक मानणारी वाटते.
कविवर्य बोरकर यांची कविता सर्वस्पर्शी, सर्वव्यापी आहे. सुंदर सुंदर चिरतरुण शब्दांचे लखलखणारे अलंकार घालून आलेली आहे. तरीही तितकीच मनातून उमटलेली आहे.
‘ध्वनी कंपित तनुच्या शततंत्री, बंदी मन रतीमोह मंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या
फुलल्या लाख कळ्या’
किंवा
‘धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळीक ते खिळवी गगनी डोळे
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले’
प्रत्येक कवितेत असणारी प्रत्येक शब्दाची योजना ह्या कवीच्या दिव्य प्रतिभेची साक्ष करून देणारी आहे. ते उत्कट आहे, उस्फूर्त आहे, उनाड आहे, उन्मनी आहे.
बा. भ. बोरकर मूळचे गोव्याचे असल्याने त्यांना समुद्र, चांदणे, मासे, आणि फेणी यांची नैसर्गिक ओढ होती. बोरकरांची कविता म्हणजे मनोहर शब्दांचा समुद्र, चैतन्याचे चांदणे, मत्स्याप्रमाणे अवखळ आणि फेणीप्रमाणे येणारी धुंदी !
कविता बोलतात! स्वतःबद्दल आणि त्यांच्या सर्जनकाराबद्दलही. त्याच आपल्याला त्यांची ओळख करून देतात म्हणून ‘संवेदनशीलता’ ह्याच स्थायीभावातून प्रसवलेल्या सार्याच कविता असूनही प्रत्येकीचा रंग वेगळा असतो. काही सुंदर असतात, काही चलाख असतात, काही विद्वान असतात, काही हळव्या असतात. मला स्वतःला नेहमीच हुशारीतून जन्मलेल्या कलाकृती पेक्षा हळवेपणातून जन्मलेल्या कलाकृतींनी अधिक मोहात पाडले आहे,अधिक आकर्षित केले आहे, अधिक प्रेमात पाडले आहे. परंतु बाकीबाब यांची कविता, माझी ही सारी समीकरणे चुकीची ठरवते. ती त्यांच्या सारखीच आहे. ती एकाच वेळी सगळंच असते आणि तरीही माझ्या सारख्या सर्वसामान्य आकलनशक्ती असणारीलाही सुलभ आणि स्नेही वाटते. ही कविता त्रिकालाबाधित अशी कविता आहे. उनाड आणि परिपक्व अशी एकाच वेळी असते.
आता सरतेशेवटी मला आवडणारी त्यांची तिसरी कविता…ती म्हणजे ‘ कवि कोण ?’
त्यातल्या काही ओळी अशा…
‘सौंदर्याचा भोगी जीवनी विरागी
निद्रेत ही जागी जगासाठी
कर्तव्याची चाड कुडीच्यापरीस
दगडा परीस करू शके
मतीने कृतीने युक्तीने निर्मळ
तेजाने उजळ करी जना
हाच खरा कवी प्रीत पाझरवी
तेजे दिपे रवि ईश्वर हा’
ही अशी कविता लिहिता येत नाही ती पाझरावी लागते.
ज्या हृदयातून ती अशी पाझरली त्या, बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब ह्या ऋषितुल्य, प्रपंची, भूमीभक्त आणि तारुण्य स्त्रोत असणाऱ्या कवीला माझा प्रणाम 🙏🏻
बाकीबाब, आपण म्हटले आहे ‘मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो’. हे वेदांताच्या तत्वज्ञानाचं दर्शन. हे अध्यात्मिक आहे. भव्य दिव्य आहे. परंतु त्याच निरहंकारत्वाचा एक कवडसा माझ्या भाव विश्वात पडला आहे. निदर्पी पणाचे चित्र रेखाटताना मी भरलेला एक वेगळा रंग, आजचे माझे ‘आर्जव’ आपल्या चरणी अर्पण.
आर्जव
जाणते मी; ‘तू’ नाराज जरासा
तरीही आर्जवे करेन भाबडी,
नकळत दुखावले मी तुजला,
विवश मी रे एक वेडी.
कधीतरी हे ग्रहण सुटेल,
निष्पाप मी; हे तुला पटेल.
तोवर तप हे माझे अखंडित,
मान्य मज; जरी करिशी दंडित.
प्रसन्न तुजला करण्या किंचित,
अर्पिन माझे सारे संचित,
शब्दास तुझ्या; मज करू नकोस वंचित,
ठेवती ते जीवंत मजला; प्राण सिंचित.
उपासना तुझी;
मजला शतदा मान्य आहे.
तुझ्यासमोर;
मी ‘अहंशून्य ‘ आहे.
– लेखन : डॉ. गौरी जोशी कंसारा, न्यु जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800.
बोरकरांच्या कवितांचा सखोल केलेला अभ्यास व कवितांवरचे प्रेम जाणवते. खुप सुंदर शब्दांत कवितांचा घेतलेला आढावा मनाला भावाला. धन्यवाद.
मनापासून आभार 🙏🏻
अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे मॅडम…. खूप छान लेख लिहून बा भ बोरकरांच्या कवितांचे सर्व रंग तुम्ही उलगडून दाखवले…. धन्यवाद 🙏
मनापासून आभार 🙏🏻