वनहरिणी
(८+८+८+८)
बरीच वळणे वळून आलो थोडे जगणे बाकी आहे
शेवटचे ते एकदा तरी तुला भेटणे बाकी आहे
वर्गा मध्ये दिली अक्षरे जशीच्या तशी गिरवत आलो
माणुसकीने कसे जगावे धडा गिरवणे बाकी आहे
छिनी आणली हातोडाही तयार आहे, पण कठिण किती
असत्य सारे ओबडधोबड, सत्य घडवणे बाकी आहे
निधडा होतो लढत राहिलो अन्यायाशी खंबीरपणे
खादी खाली लपलेल्यांशी समोर लढणे बाकी आहे
विसरुन गेलो कुठून आलो दगड खुणेचा मला दिसेना
बघ जगण्याच्या मोहा पायी मागे वळणे बाकी आहे
लपंडाव तू खेळत आली सदासर्वदा सोबत माझ्या
जाता जाता जरा एकदा तुला पकडणे बाकी आहे
श्रावण होता तू पण होती अडले घोडे कुठे कळेना
पुन्हा एकदा भेटशील का ते सळसळणे बाकी आहे

– रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800