पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठात सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंटचे, संस्थापक संचालक म्हणून प्रा डॉ किरण ठाकूर सध्या कार्यरत आहेत.
वर्ष १९६९-७० पासून आतापर्यंत पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या क्षेत्रात सन्मान्य प्राध्यापक म्हणून ते काम करीत आहेत.
आपल्या विषयावर इंग्रजीत त्यांनी अर्धा डझन पुस्तके लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी अनेक शोध निबंध सादर केले आहेत.
अध्यापनात पूर्णवेळ येण्यापूर्वी प्रा डॉ किरण ठाकूर यांनी दैनिक सकाळ, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द इंडियन पोस्ट आणि ऑबझर्व्हर ऑफ बिझिनेस अँड पॉलिटिक्स या संस्थांमध्ये १९६९ ते २००१ या काळात पत्रकार म्हणून पुणे, दिल्ली, मुंबई, वाराणसी, ग्वालियर, आणि नाशिक या ठिकाणी अनुभवलेले जग ते आपल्या साठी उलगडत आहेत. आपल्या बातमीदारीमुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेले आहेत.
आपल्या पोर्टलवर आजपासून सुरू होणारे त्यांचे ‘बातमीदारी करताना’ हे सदर पत्रकार, पत्रकारितेचे विद्यार्थी याबरोबरच आपल्या सर्वांना आवडेल असा विश्वास आहे.
– संपादक
माजी सरसेनानींची हत्या आणि माझी बातमीदारी
नागपंचंमीला माझ्या जीवनात एक महत्त्व आहे. माझी आई इंदुमती महादेवाची परम भक्त. मी अगदी लहान होतो तेव्हापासूनचं मला आठवतं. ती महाशिवरात्रीला, श्रावणी सोमवारी, आणि नागपंचमीला विशेष पूजा करायची.
माझे वडील कन्हैयालाल श्रीपत ठाकूर यांचं १९८० च्या नागपंचमीला निधन झालं. त्यावर्षी मी युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्त संस्थेच्या वाराणसीचा ब्युरो मॅनेजर होतो. पंधरा ऑगस्ट च्या बातम्या कव्हर करून रात्री झोपलो तेव्हा मध्यरात्री केव्हातरी कार्यालयातील सहकाऱ्याने नाशिक हुन माझ्या घरचा फोन दिला. तो वडील गेल्याचा निरोप होता.
सकाळी आम्ही कुटुंबीय ट्रेन ची तिकिटं काढून नाशिक ला निघालो. नातेवाईक आमच्या साठी थांबले होते. अंत्यसंस्कार केले. अण्णा पुर्णतः अश्रद्ध होते. आईची पूजा-अर्चा, व्रतवैकल्य याची ते यथेच्छ टिंगल करीत. पण काशीला माझ्या बरोबर पाहुणे म्हणून ते आले, तेव्हा मात्र त्यांच्या सर्व पितरांचं श्राद्ध साग्रसंगीत जवळपास दिवसभर पुजेला बसून मोठ्या भक्ती भावानं केलं.
मला खूप आश्चर्य वाटलं. नंतर कारण विचारलं तेव्हा आणखी आश्चर्य वाटलं. ज्यांच्या घरात श्राद्ध होत नाही तेथे अशांती असते. पितरांना पुजणारे घर शांती समाधानात नांदते असे मनापासून म्हणाले. यावर आम्ही कुटुंबीय काही बोललो नाही, वाद नाही, चर्चा नाही. नाशिकला ते आणि आई परतले. काही आठवड्यातच ते देवाघरी गेले. त्या दिवशी नागपंचमी होती. त्यांनी श्राद्धाविषयी सांगितलं होतं ती आठवण ताजी होती. मग आम्ही प्रत्येक नागपंचमीला आम्ही श्राद्ध करीत आलो.
प्रथे प्रमाणे दहा ऑगस्ट १९८६ च्या नागपंचमीला दोघा नातेवाईकांना आम्ही पितर म्हणून बोलावले होते . यु एन आय च्या पुण्याच्या कार्यालयातच आम्ही राहात होतो. जेवणानंतर पाच -दहा मिनिटे बसत नाही तोच फोन आला. सेवानिवृत्त लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची शीख आतंकवाद्यानी हत्या केल्याची बातमी होती. पुणे कॅंटोन्मेंट मधील सदर्न कमांडच्या मुख्यालयातून जनसंपर्क अधिकारी, कर्नल विनायक तांबेकर यांनी थोडक्यात कळवलं आणि इतर संस्थांचे बातमीदार देखील येतील. तपशील तेव्हा सांगतो असं सांगत त्यांनी फोन बंद केला. वेळ थोडा देखील न दवडता, मी दुचाकीवरून निघालॊ..
इतर बातमीदार पोहोचताच तांबेकरांनी ब्रिफींगला सुरवात केली. हत्येचा तपशील आणि जनरल वैद्य यांच्या करिअरचे ठळक मुद्दे त्यांनी सांगितले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया(पी टी आय) चे कुमार जोशी आणि यू एन आय चा मी अशा दोघांना बातमी देण्याची घाई म्हणून त्यांनी एस टी डी ची सोय असलेले फोन आम्हाला त्यांच्याच केबिन मध्ये दिले. (तेव्हा मोबाईल, इंटरनेट नव्हते).
माझ्या मुंबई मधील उपसंपादकला (सब एडिटर) एक मिनटात बातम्यांचे गांभीर्य सांगितलं. आणि सावकाश एकेक शब्दात डिक्टेशन द्यायला सुरुवात केली …
Pune, Aug 10- General Arun Kumar Vaidya was assassinated here today.
The former chief of Army Staff died within seconds after he was hit by bullets at around 11.45 am in the Pune Cantonment.
He had led the Operation Blue Star at the Golden Temple in Amritsar.
असा मजकूर देऊ लागलो.
मुंबई आणि देशभर टेलिप्रिंटर वर काही मिनिटातच बातम्यांची टिक टिक सुरु झाली. पुण्याहून मिळेल तेव्हढा मजकूर फोन वर मी देत होतो. पण आमच्या यु एन आय च्या दिल्ली च्या बातमीदारानी तेथून देखील मजकूर द्यायला सुरुवात केली. संपादक विभागात थोरामोठयांच्या हयातीतच, पण मृत्यू नंतर देण्यासाठी चा मजकुर तयार ठेवलेला असतो. अशा मजकुराला ऑबिट्युअरि (obit) म्हणतात. जनरल वैद्य यांचे ऑबिट तयार होतेच. शंभर- शंभर शब्दांच्या भागात (टेक take) हा असा मजकूर पाठवायला लगेचच सुरवात झाली .
याच केबिन मध्ये माझे बातमीदारीतील स्पर्धक, कुमार जोशी त्यांच्या मुंबई कार्यालयाला फोन वर बातमी देत होते. माझे फोनवरचे काम संपवून मी माडीवाले कॉलनीतल्या आमच्या कार्यालयात पोहोचलो. टाइपरायटर वर उरलेले लिखाण संपविण्याच्या मागे लागलो. ते अजून चालूच होते. तो एक फोन आला. हिंदी मध्ये कोणी बोलत होते. ‘जनरल वैद्यको हमने खतम किया अब बारी है महाराष्ट्र हेरल्ड के वाघ की ..’ आता बंद पडलेल्या या दैनिकाच्या संपादकाचा हा उल्लेख होता.
मी आणखी बोलण्याचा आणि विचारण्याचा प्रयत्न केला. पण फोन बंद झाला. थोडा विचार करून मी लगेच पोलीस आयुक्तांना फोन केला. त्या वेळी पोलीस आयुक्त प्रेस कॉन्फरन्स संबोधित करीत होते. ती चालू असतानाच त्यांनी हाता खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माझा आणि महाराष्ट्र हेरल्डचा पत्ता दिला आणि तासाभरातच हेरल्डचे संपादक एस डी वाघ यांच्या कार्यालयात आणि घरी चोवीस तासाची पोलीस सुरक्षा झाली.
ही देखील स्थानिक दैनिकात दुसऱ्या दिवशी बातमी झाली. अतिरेक्यांनी वाघ यांना का लक्ष्य केले होते हे आम्हा कोणालाच तेव्हा आणि नंतर कळले नाही. त्यांचं संपादकीय लिखाण खूप सारासार विचार करून दोन्ही बाजू चा सारखे माप दिलेले असे असायचे.
अतिरेक्यांच्या विरोधात ते असायचे असं आम्हा पत्रकार सहकाऱ्याना आणि पोलीस अधिकाऱ्याना कधी वाटले नाही. पोलिसांच्या सुरक्षेचा जाच, वाघ यांना आणि त्यांच्या घरच्यांना नंतर कित्येक महिने भोगावा लागला. त्याला कारण अप्रत्यक्षपणे अशाप्रकारे मी होतो.
दुसऱ्या दिवशी च्या देशभरच्या वृत्तपत्रात आमच्या यु एन आय च्या बातम्या झळकल्या. स्पर्धक पी टी आय च्या तुलनेत आम्ही बारा मिनिटे आघाडी वर होतो. आमच्या मुख्य संपादक जी जी मिरचंदानी यांनी प्रथेप्रमाणे माझे टेलिप्रिंटर वर कौतुक केलं. कौतुकाचे असे क्षण नेहमी येत नसत. त्यामुळे नागपंचमीचा तो दिवस मला अविस्मरणीय ठरला.
आणखी एका नागपंचमीला पित्तर जाण्याची वेळ आली. माझे खूप घनिष्ठ मित्र आणि पत्रकारितेतले सहकारी अनिल टाकळकर यांचे पिताजी श्री मोहन यांचे निधन देखील नागपंचमीला झाले. ते ही माझ्या वडिलांप्रमाणेच महसूल खात्यात अधिकारी होते. आम्ही मित्र पत्रकार झालो याचा त्यांनाही अभिमान वाटायचा.
आज नागपंचमीला या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. म्हणून हे जागर.

– लेखन : प्रा. किरण ठाकूर
– संपादन। : देवेंद्र भुजबळ, 9869484800
Informative and important article by
Prof. ( Dr.) Kiran Thakur. Thanks to him
for this article, useful to all people as well as students of Journalism/Communication.