जौनपूरच्या जिल्हाधिकारी
वाराणसी येथून बातमीदारी करत असताना १९८० च्या ऑगस्ट महिन्यात जौनपूर ला कुठल्याशा औद्योगिक समूहाच्या प्रेस कन्फरन्स साठी गेलो होतो.
या शहरात जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे माझ्या सवयीनुसार मी तेथील शाळांसाठी असलेल्या इतिहास, भूगोल या विषयांची पुस्तके विकत आणली. या सवयीचा फायदा पत्रकारितेमध्ये असताना मला नेहमी झाला. एक तर ही पुस्तके छोटीशी आणि स्वस्त असतात. कव्हरेज साठी आवश्यक तेवढी शहराची माहिती थोड्या वेळात चटकन मिळते.
त्या दिवशी जौनपूर विषयी तसेच झाले. त्या शहरामधून गोमती नदी वाहते. ती पुढे गंगा नदीला मिळते एव्हडे मला माहित झाले होते. जिल्ह्यात गोमती खेरीज साई, वरूण, बसूही, पिली, ममूर, आणि गंगी या छोट्या नद्या वाहतात हे प्राथमिक ज्ञान या दौऱ्यामध्ये होऊन गेले होते.
जौनपूर चा इतिहास फार जुना आहे. मुगल काळातील बांधकाम, नदीचे विस्तीर्ण पात्र, त्यावरचे लहान-मोठे जुन्या बांधणीचे पूल, अशी जुजबी माहिती भटकंती मध्ये मिळाली होती. जौनपूर ची ख्याती ‘इत्र’ म्हणजे अत्तरासाठी आहे हे मला आधी अजिबात माहीत नव्हतं.
अत्तराच्या खूप मोठ्या, जुन्या दुकानात आणि त्या गल्लीत फेर फटका मारला तेव्हा सुगंधाचा घमघमाट कितीतरी वेळ येत राहिला होता. तो नंतरदेखील खूप दिवस लक्षात राहिला होता.
मुगल बादशाह, राजेरजवाडे, सरदार, श्रीमंत, संगीताचे शौकीन या सगळ्यांनाच अत्तराचा नाद होता. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील अत्तराची महिती सर्वत्र होती. मनगटाला स्पर्श करून देत दुकानदार उर्दू मध्ये आपल्या अत्तराची विक्रीसाठीची तरफदारी करीत. हे सारे लक्षात होते. त्या छोट्याशा कुप्याच्या किमती ऐकून ‘अभी आते है‘ असं सांगून मी काढता पाय घेतला होता.
त्या दिवशीच्या संध्याकाळच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात तेथल्या जिल्हाधिकारी यांना भेटलो होतो. तेव्हा महिला आयएस अधिकाऱ्यांची संख्या भारतात सर्वत्रच कमी होती. या मॅडमचे व्यक्तिमत्व नजरेत भरणारे होते. फर्ड इंग्लिश आणि हिंदी चे मार्दव यामुळे त्या लक्षात राहिल्या. तासाभरात कार्यक्रम संपला आणि आम्ही वाराणसी हुन आलेले पत्रकार परतलो. आज त्यांचं नाव लक्षात नाही, पण त्यांची तडफ लक्षात आहे.
पंधरा दिवसातच दिल्लीहुन संपादकांनी जौनपूर ला जायला सांगितले. गोमती ला महापूर आला होता. जिल्हयातल्या सर्वच छोट्या मोठ्या नद्या, नदी नाले वेगाने दुथडी भरून वाहत होत्या. मी शहरात शिरलो तेव्हा फक्त होड्याच होड्या तरंगताना दिसत होत्या.
मागच्या वेळी आलो तेव्हा पाहिलेले रस्ते, दुकाने, आणि घरं पाण्याखाली होती. पोलीस, महसूल कर्मचारी आणि स्वयंसेवी कार्यकर्ते, सर्वच होड्यामधून मदत कार्य करीत होते. लांबून दिसल्या त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मॅडम. इतर सर्वांसारख्याच त्या देखील छोट्या होडीत उभ्या होत्या. पावसाची रिपरिप चालुच होती. पुराच्या पाण्यात हेलकावे घेत होडी पुढे सरकत होती. होडीत ऊभं राहूनच हाताखालच्या कर्मचाऱ्यांना भराभर निर्देश देत त्या पुढे जात होत्या. शहराच्या छोट्या मोठ्या गल्ल्यामधून त्यांची ‘वाट’चाल चालू होती तेव्हा त्यांच्या स्टाफ ची तारांबळ होत होती. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला नमस्कार करताना ‘जय हिंद ‘सर ‘ म्हटलं की जीभ चावल्या सारखं करीत ‘जय हिंद मॅडम ‘ अशी दुरुस्ती करण्याची तत्परता मी माझ्या होडीतून पाहात होतो.
त्या मला ओळखणं अपेक्षित नव्हतंच, पण मी नमस्कार केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला. माझ्या एकूण आविर्भावरुन मी बाहेर गावचा पत्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं असेल. दिवसभरात शहरातील गल्ल्यात आमच्या होड्या अनेकवेळा क्रॉस झाल्या, मध्ये एका ठिकाणी थोडं थांबता आलं तेव्हा आम्ही माहितीची देवाण घेवाण केली. पुरग्रस्तांची संख्या, त्यांच्या हालअपेष्टा, शासनाच्या वतीने
मॅडमने घेतलेले निर्णय या गोष्टी मला बातमी साठी आवश्यक होत्याच. त्या त्यांनी दिल्या आणि मी पाहिलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्या.
संध्याकाळी शहराचा शेवटचा राऊंड -उप घेण्यासाठी भेट झाली तेव्हा एक गोष्ट त्यांना मी सांगितली. पुग्रस्तांसाठी एक कॅम्प धान्याच्या गोडाउन मधील पोती हलवून तेथे अंथरूण पांघरूणाची सोय केली होती. त्या चाळीस स्त्री-पुरुषांच्या संख्येत एका बाळंतिणीची आणि सकाळीच जन्मलेल्या बाळाची भर पडली होती. त्यांना जास्त अंथरूण हवे होते अशी मागणी मला कळली होते. जिल्हाधिकारी मॅडमची भेट झाली तेव्हा मी याबाबत विचारलं. त्यांनी कॅम्प च्या अधिकाऱ्याला विचारलं तेव्हा त्याचं वागणं अगदी टिपिकल सरकारी
कर्मचाऱ्यासारखं होतं. धावत जाऊन त्याने त्याच्या टेबलावरून नोंदवही आणली. काल रात्री चाळीस युनिट्स (व्यक्ती) नोंदविल्याची नोंद होती, आज सकाळी अर्ध युनिट वाढले होते म्हणजे नवे बाळ दाखल झाले होते असे रेकॉर्ड पाहून त्याने आम्हाला सांगितले !
मॅडम स्वाभाविक पणे संतापल्या. बाळाच्या ट्याहां ट्याहांचा आवाज कॅम्प भर येत होता, तरी या गृहस्थाला रेकॉर्ड पाहाणं आवश्यक वाटत होतं. संवेदनशील कोणीही प्रथम त्या बाळाची आणि त्याच्या आईची व्यवस्था करायला धावला असता. बाळ बाळंतिणीची आपल्या समोरच व्यवस्था करायला मॅडमने खडसावलं आणि मगच आम्ही बाहेर पडलो.
त्या कव्हरेज साठी मी जौनपूरला आणखी दोन दिवस होतो. नैसर्गिक आपत्तीचे प्रसंग मी या आधी देखील कव्हर केले होते. बातमीदाराच्या दृष्टीने ते ”रुटीन” होते. तसे येथे देखील बातम्यां तशा “रुटीन” च म्हणाव्या लागतील. माझा एक वृत्तलेख (न्यूज फीचर) मात्र अनेक दैनिकांनी छापला. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्या मथळ्याला दाद दिली. होती. इंग्रजीमध्ये काहीसे असे असलेले ते शीर्षक होते
“अत्तराच्या गावात दुर्गंधाचे आणि घाणीचे साम्राज्य !” हे असे शीर्षक मला सुचले याचे एकमेव कारण होते, मी जौनपूर मध्ये विकत घेऊन वाचून ठेवलेली ती छोटी प्राथमिक शाळेची इतिहास-भूगोलाची पुस्तके !
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210808-WA0020-150x150.jpg)
– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800