मुक्तिवाहिनीशी दोस्ती
पत्रकारितेचा माझा एक वर्षाचा अभ्यासक्रम जेमतेम पूर्ण होत आला तेव्हा त्या वेळचे ‘सकाळ’ चे वृत्तसंपादक श्री ग मुणगेकर आमचे शिक्षक होते त्यांनी मदत केल्यामुळे मी सकाळचा बातमीदार-उपसंपादक या पदावर काम करू लागलो.
पी टी आय आणि यु एन आय या वृत्तसंस्थाच्या टेलीप्रिंटरवर दिवसभर येत असणाऱ्या इंग्रजी बातम्या निवडून माझ्या वरिष्ठ संपादकाकडे द्यायच्या आणि त्यांनी सांगितलेल्या मोजक्या बातम्यांचं मराठीत भाषांतर करणे हे माझ्या कामाचे आरंभीचे स्वरूप होते. मराठी बातम्या परत सहसंपादकाना तपासाला देऊन त्यांना शीर्षक देणे असे ढोबळ मानाने काम होते.
सुरुवातीला म्हणजे १९६९-७० या काळात या दोन्ही वृत्तसंस्थावरून तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तान मधून येणाऱ्या बातम्यांचा ओघ सतत चालू असायचा. पूर्व बंगाल मधील गरीब लोकांवर अत्याचार होत होते. शेख मुजीब यांच्या नेतृत्वाखाली पूर्व बंगालचे लोक जमेल
तसा प्रतिकार करत होते. पण त्यांचे लोंढेच्या लोंढे पश्चिम बंगाल मार्गे भारतात येत होते.
त्यांच्या वरील अत्याचाराच्या छोट्या-मोठ्या घटना भारतीय पत्रकार वृत्तसंस्थांच्या माध्यमातून देत असत. त्याचे भाषांतर करत असल्यामुळे या विषयाचा माझा थोडा बहुत अभ्यास सुरु झाला होता.
माझे ज्येष्ठ सहकारी प्रोत्साहन देत माझ्याकडून मराठीत भाषान्तर करून घ्यायचे. त्यामुळे नंतर यु एन आय मध्ये दिल्लीला प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून काम करू लागलो तेव्हा स्वाभाविकपणे पूर्व-पश्चिम पाकिस्तान यांच्या संबंधीच्या बातम्या मी जरा जास्तच आस्थेने करू लागलो होतो.
पहिले सहा महिने संपत आले तेव्हा यु एन आय मध्ये कायमची पूर्ण पगाराची नोकरी मिळणार आहे हे मला खात्रीलायक सांगितले होते. दोन आठवड्याची सुटी मिळणार होती म्हणून मला पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर जाऊ द्या अशी विनंती वृत्तसंपादकाना करून पाहिली. पण मी इतका नवखा होतो की स्वतंत्रपणे मला यु एन आय च्या कव्हरेज साठी परवानगी मिळणे अगदी अशक्य होते हे लक्षात आल्यानंतर मी स्वतः स्वखर्चाने कलकत्ता आणि पलीकडे पूर्व पाकिस्तान मध्ये निर्वासितांवरील अत्याचाराच्या बातम्या कव्हर करायला निघालो.
पैसे नव्हतेच. पण माझा वर्गमित्र श्रीकर याचे वडील मनोहर महादेव केळकर वाङ्मयशोभा मासिकाचे मालक – संपादक होते. त्यांनी खर्चाला पॆसे दिले आणि एक्सप्रेस ट्रेनने कलकत्त्याला निघालो.
पूर्व पाकिस्तानातील युवक युवतीनी छुप्या पद्धतीने तुटपुंज्या साधनांनी मुक्तीवाहिनी उभारत युद्धाच्या तयारीच्या बातम्या देखील येत होत्या. विशेषतः स्टेट्समन, अमृतबझारपत्रिका, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस मध्ये त्या त्या दैनिकांचे कलकत्ता चे बातमीदार सविस्तर भरपूर बातम्या देत असत. तशाच पण वेगळ्या, स्वतः पाहिलेल्या बातम्या कव्हर करण्याच्या इराद्याने मी कलकत्त्याला पोहोचलो. पण पूर्व पाकिस्तानच्या हद्दीत शिरणे सोपे नव्हते. कडेकोट बंदोबस्त होता. बंगाल मधून भारताच्या हद्दीतून त्या दिशेने प्रवास करणे देखील सोपे नव्हते.
बस आणि ट्रेन यांच्या सुविधा नव्हत्या. कलकत्या मध्ये राजकीय वातावरण सहानुभूतीचे, सोयीचे होते. थोड्या लटपटी खटपटी करून कलकत्यावरुन ट्रक, बस मधून निघालो.
बंगाली भाषा बोलणारा एक ग्रामीण पत्रकार, स्वपन कलकत्त्याहून सोबतीला होता. पण त्याला हिंदी आणि इंग्रजीचा अजिबात गंध नव्हता. पश्चिम बंगालचे पोलीस आणि भारतीय लष्कराच्या सीमेवर तैनात केलेले जवान माझ्यासारख्याला मदत करायला फारसे उत्सुक नव्हते. पश्चिम पाकिस्तानचे सैन्य पूर्व पाकिस्तानच्या हद्दीत तैनात होते. लष्कराच्या छुप्या हल्ल्यात माझे काही बरेवाईट झाले तर आम्ही अडचणीत येऊ. तुमचे काही बरे वाईट झाले तर केंद्र सरकार आम्हाला सोडणार नाही अशी त्यांची भूमिका होती. ते त्यांचे बरोबर होते हे खरेच.
तरीदेखील मजल-दरमजल करत भारतीय हद्दीतून मी दहा एक मैल पाकिस्तान च्या हद्दीत जाऊन आलो. परतलो तेव्हा आपण आता फॉरिन-रिटर्न म्हणवून घ्यायला हरकत नाही असं मी स्वतःला सांगितलं !
नवा मित्र, स्वपन, एका ट्रक मधून मला एका वाडीत घेऊन गेला. कोठेही चौकशी न करता आम्ही एका टुमदार वाडीत पोहोचलो तेव्हा त्याने मी न मागता स्पष्टीकरण दिलं. हे घर त्याच्या दूरच्या नात्यातील बहिणीचं सासर होतं.
मेव्हणा सुदिप्तो अर्धवेळ पोस्ट मास्टर, अर्धवेळ प्राथमिक शिक्षक आणि भारतीय सेनेच्या तुकडीला मदतनीस म्हणून स्वयंसेवक अशा कामात व्यग्र असायचा. नुकतंच बहिणीला बाळ झालं होतं. त्यामुळे माझ्या सोबत सीमेपर्यंत जायला मिळत होतं (माझ्या खर्चाने !) म्हणून आनंदाने माझा साथीदार बनला होता. बहीणीचं माहेर कलकत्त्यातल्या चाळीत. लग्नापर्यंत बी ए शिकली होती. हिंदी तिला बऱ्या पैकी समजत होत. माझ्या तीन चार दिवसांच्या मुक्कामात भावापेक्षा आणि नवऱ्या पेक्षा तीच जास्त माहिती देत होती. “‘बॉम्बे” चा बडा पत्रकार आपल्या भावाचा मित्र आहे याचे तिला फार अप्रूप वाटत होतं.
मी दिल्ली हुन आलेला पुण्याचा पत्रकार आहे याचं तिला आणि तिच्या नवऱ्याला काही विशेष महत्त्व वाटलं नव्हतं. पण आम्हाला पाहिजे ती माहिती तिच्या कुवतीनुसार देत होती.
आम्ही पोहोचलो तेव्हा पासूनच तिनं माहिती द्यायला सुरुवात केली. त्यांच्या त्या टुमदार घरामागे रहाट गाडगं होतं. भरपूर पाणी होतं. त्या विहिरीची हद्द एका बाजूने भारतात तर दुसरी कडून पूर्व पाकिस्तानात होती. स्वपन ची अंघोळ होईपर्यंत मी बाळाला घेऊन पाय मोकळे करायला जंगलाच्या बाजूने पायवाटेने जायला लागलो. तशी धावतच आली. परत फिरा अंधार होईल, ‘ते’ म्हणजे पाकिस्तानी सैनिक आले तर धोका होईल असं ती घाई घाईने सांगत होती. रात्री ते दोघे आणि आम्ही दोघे जेवलो तेव्हा गोळीबाराचे आवाज यायला लागले, गप्प बसण्याची खूण करून ते आवाज बंद व्हायची वाट पाहात बसलो.
पाकिस्तानच्या हद्दीतही घनदाट जंगल होते. छुप्या पायवाटेने बंगाली बाया बापड्या भारताच्या हद्दीत येण्यासाठी प्रयत्न करीत. पाकिस्तानी पठाण सैनिक त्यांना अडविण्यासाठी गोळीबार करीत. गोळी लागली तर मृत्यू किंवा जखम तरी व्हायची शक्यता.
परिस्थितीचे गांभीर्य दुसऱ्या दिवशी उजाडलं तेव्हा कळलं. दोघे बंगाली म्हातारा म्हातारी जखमी होऊन जंगलात पडले होते. सुदिप्तो खबऱ्या म्हणून स्वयंसेवकांचे काम करीत होता. त्याने निरोप दिल्यामुळे सैनिकांच्या छावणी पर्यंत त्यांना पोहोचवून जखमा वर औषधोपचार झाले. दोघा आजोबा आजींना खायची व्यवस्था झाली.
गावकरी आणि भारतीय सैनिक यांच्यात दुवा असं सुदिप्तो चं काम होतं. त्याच्या कुटुंबाला राशन, औषध, या गोष्टींचा पुरवठा सैनिक करत होते. बंगाली लोक निर्वासीत म्हणून कलकात्याच्या दिशेने वाटचाल करीत दिवसभर येताना दिसत होते. त्यावेळी अर्थातच या परिस्थितीत या लोंढयांचे परिणाम भारतावर काय होतील याची जाणीव मला तरी झालेली नव्हती. पण काही दिवसांनी भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले निर्वासितांचे लोंढे भारतात येत राहिले. नव्वद हजारापर्यंत त्यांची संख्या गेली आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर या निर्वासितांच्या लोंढ्यामुळे पडलेला ताण असह्य होईल इतका पडत गेला. हे वास्तव माझ्यासारख्या तरुण नवख्या पत्रकाराला फार उशिरा उमगले हे खरे.
पण त्यावेळी पूर्व पाकिस्तान च्या बाबतीत भारतभर फार सहानुभूती होती. त्यामुळे आर्थिक ताणाचे विचार देखील माझ्या डोक्यात आले नाही. फक्त सुदिप्तो आणि त्याच्या कुटुंबाला त्यावेळी दारिद्र्याच्या यातना भोगताना मी पाहिले होते. पण त्याच वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे गीत “आमार शोनार बांगला” गाताना, बंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जयजयकाराच्या घोषणा देखील पूर्व बंगालच्या रस्त्यावर ऐकल्या होत्या.

बातमी कव्हर करण्यासाठी हिंडलो तेव्हा त्या भागात मुक्ती वाहिनीच्या सैन्याला सारखा भेटत होतो. भारतीय सैन्याचा पाठिंबा असल्यामुळे बांगलादेशी तरुणांना स्फुरण आले होते. कव्हर करण्यासाठी मी हिंडलो तेव्हा एक पूर्ण दिवस मुक्तिवाहिनी कमांडर च्या जीप मध्ये त्यांच्या ब्रिगेडियर शी गप्पा मारत प्रश्न विचारत गेलो. तुमच्याकडे शस्र सामग्री नाही, वाहनं नाहीत. मग कशाच्या जोरावर तुम्ही पाकिस्तान ला नामवणार आहात ? असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा त्यांनी “छत्रपती शिवाजींच्या गनिमी काव्याने” असं उत्तर दिलं.
छत्रपतींचं नाव काढल्यामुळे मी स्वाभाविक पणे भारावून गेलो. सह्याद्री पासून इतक्या दूर तुम्हाला शिवाजीचा गनिमी कावा कसा माहीत असं विचारलं. तेव्हा जगभरातील युद्ध शास्त्राच्या सर्व पुस्तकात त्याबद्दल आम्हाला शिकविलं जातं असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा तर माझी छाती अभिमानाने भरून गेली.
आता कमांडर ने अतिशय आस्थेने मला सल्ला द्यायला सुरवात केली. भारताच्या सैन्याचा आणि सरकारचा पाठिम्बा आणि परवानगी नसताना तुम्ही या भागात असे फिरू नका. आता युद्ध कोणत्याही क्षणी सुरु होईल. पत्रकार म्हणून तुम्हाला कोणतेही संरक्षण मिळणार नाही. तसे ते मिळेल तेव्हा या. तोपर्यंत आमचा बांगला देश स्वतंत्र झालेला असेल. आपण तेव्हा नक्की भेटू असं त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितलं. मला ते पटलं. त्यांच्या जीपने त्यांनी मला कलकत्त्याजवळ सोडलं. ‘बंगबंधू शेख मुजीबूर रहमान’ आणि शोनार बांगला च्या घोषणा देत आम्ही एकमेकांना निरोप दिला.

यानंतर चार पाच महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तान वर विजय मिळविला. तो तर आशिया खंडातील मोठाच इतिहास घडला. त्याला सर्व देशच साक्षी होता.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
परिस्थिती चे वर्णन आणि लेखांकन अप्रतिम !!