Wednesday, September 17, 2025
Homeलेखबातमीदारी करताना - भाग - १६

बातमीदारी करताना – भाग – १६

महान पत्रकार, के पी के कुट्टी
माझ्या आयुष्यात १० जानेवारी १९७१ हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी मी माझ्या पत्रकारितेच्या करिअर मधला एक महत्त्वाचा टप्पा सुरू केला. तोपर्यंत पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकलेला आणि पत्रकारितेचा थोडासा अनुभव पुण्याच्या दैनिक सकाळ मध्ये घेतला होता. तेथून दिल्लीला ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ मध्ये नऊ, रफी मार्ग च्या प्रांगणात या दिवशी प्रवेश केला.

जुन्या बंगल्या सारख्या कार्यालयाच्या दारातून आत गेलो तेव्हा पहिली ओळख झाली, ते होते के पी के कुट्टी. वृत्तसंस्थेची पत्रकारिता काय असते आणि कुट्टी कोण आहेत याचा मला काहीही गंध नव्हता. पण त्या दिवसापासून ते परवा दिनांक ८ डिसेम्बर पर्यंत कुट्टी यांनी मला अधून मधून, नेट वर, फोनवर किंवा इमेल वर दर्शन दिले होते.

एकोणनव्वद वर्षाची आपली जीवनयात्रा संपविणारे कुट्टी यांनी ‘यु एन आय’ चे मुख्य संपादक, त्यानंतर ‘इंडो एशियन न्यूज सर्व्हिस’ या नव्या वृत्तसंस्थेचे संस्थापक संचालक आणि चीफ मेंटर, स्वतः वीणावादक, आणि आपल्या जन्मगावच्या आसपासच्या पाच गावांच्या, शंभराच्यावर लहान मुलांना वीणावादन शिकवणारे, शास्त्रोक्त कर्नाटक संगीताचे गायक, एकाच कथेवरच्या ‘नवी दिल्ली’ या चित्रपटात हिंदी, मल्याळम, आणि हिंदी सिनेमात संपादकाची भूमिका नेटकेपणाने सादर करणारे, असे बहुपेडी बहुगुणी व्यक्तिमत्व ते होते.

हे सर्व मला अर्थातच नंतर कळलं. पण पहिल्याच दिवशी ओळख झाल्या झाल्या त्यांचा हसतमुख चेहरा आणि मोकळा वेळ असेल तेव्हा शास्त्रोक्त गाण्याची लकेर मारणारा माणूस, असं अतिशय लोभस व्यक्तिमत्व मी पाहिलं होतं. नंतर कळलं आणि अनुभवलं ते अगदी थक्क करणार होतं.

त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘इंडियन एक्सप्रेस’ मध्ये उपसंपादक म्हणून केली होती. ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेची सुरुवात १९६१ मध्ये झाली तेव्हा स्थापना वर्षातच, त्यांनी या नव्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि वयाची साठ वर्ष होईपर्यंत याच संस्थेशी आपलं नातं कायम ठेवलं.

‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ भारतातील सगळ्यात महत्त्वाची आणि जुनी वृत्तसंस्था. १९४६-४७ पासून देशातील आणि देशाबाहेरील वृत्तपत्रांना बातम्या पुरविणारी संस्था, अशी प्रतिष्ठा असलेली पण एकमेव वृत्तसंस्था असल्यामुळे तिच्या कामात मक्तेदारीतुन येणारी ढिलाई सर्वच वर्तमानपत्रांना जाणवत होती. सकाळचे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकर, इंडियन एक्सप्रेसचे रामनाथ गोयंका, स्टेट्समन, हिंदू , आणि ट्रिब्यून इत्यादी सर्व ग्राहक वर्तमानपत्रांना यात बदल हवा होता.

बराच काळ चर्चा झाल्यानंतर स्पर्धेसाठी आणखी एक इंग्रजी वृत्तसंस्था काढावी असा निर्णय झाला. त्यातूनच ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ ही वृत्त संस्था १९६१ मध्ये जन्माला आली.

व्यवस्थापनाने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. पण या संस्थेची प्रगती काही होईना. कुलदीप नायर यांना वर्ष-दीड वर्ष संपादक आणि सरव्यवस्थापक म्हणून नेमून पाहिलं . उपयोग झाला नाही. मग जी जी मीरचंदानी, बी आर पी भास्कर, आणि कुट्टी यांची नेमणूक झाल्यानंतर झपाट्याने चित्र पालटू लागले. कुट्टी यांच्याकडे डेप्युटी न्यूज एडिटर कशी जबाबदारी होती.

देशभरात महत्त्वाच्या शहरांमध्ये बातमीदारांच्या नेमणुका केल्या मुळे चांगल्या, निपक्षपाती बातम्या वेगाने ग्राहक वर्तमानपत्रांना मिळायला लागल्या.
‘यु एन आय’ ची कीर्ती माध्यम क्षेत्रात झपाट्याने वाढत गेली.

कालांतराने कुट्टी सरांकडे मुख्य संपादक आणि सरव्यवस्थापक अशी मानाची महत्त्वाची जबाबदारी आली ती साठाव्या वर्षी निवृत्त होईपर्यंत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या इतक्या प्रदीर्घ यशस्वी अनुभवाचा फायदा घेण्यासाठी या क्षेत्रातील अनेकांनी त्यांना आमंत्रण दिलं. पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार या अतिशय महत्त्वाच्या पदासाठी त्यांना विचारणा करण्यात आली. पण त्यांनी पत्रकारितेशी आपले इमान कायम ठेवले आणि पुढची सत्तावीस वर्षे पुन्हा वृत्तसंस्था पत्रकारितेला आपले योगदान देत राहिले.

केरळ मधील, पलक्कड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी कवास्सेरी ला दिल्लीहून परतले. आपली संगीताची आराधना चालू ठेवली. छोट्या मुलांना वीणा शिकवायचं काम हाती घेतलं आणि तेथील मंदिरात शास्त्रोक्त गायनाच्या माध्यमातून परमेश्वराची पूजा करीत राहिले.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, किंवा कलकत्ता अशा शहरात पत्रकारितेच्या क्षेत्रात सेवानिवृत्तीनंतर काम करत राहणे यात विशेष काही नाही. पण केरळमधल्या या छोट्याशा गावी त्यांनी आपले वृत्तसंस्थेचे काम रोज चालू ठेवणे ही खूपच अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांनी सत्तावीस वर्ष लीलया करून दाखवली.

टेलिफोन, कम्प्युटर आणि इंटरनेट यांचा वापर करताना मोठ्या शहरात देखील किती तांत्रिक अडचणी येतात याचा अनुभव आपल्या सर्वांना नेहमीच येत असतो. पण या छोट्या खेड्यात राहुन कुट्टी नी आपले रोजचे काम तर केलेच, पण देशात अन्यत्र वृत्तसंस्था पत्रकारिता रुजवण्याचे, नवीन पिढीला शिकवण्याचे काम देखील हसत खेळत चालूच ठेवले.

मी स्वतः ‘यु एन आय’ मध्ये १९७१ ते १९८७ एवढाच काळ होतो. या संस्थेशी आणि वृत्तसंस्था पत्रकारितेशी संबंध शेवटपर्यंत कायम राहिले. नंतर मी वर्तमानपत्रात बातमीदारी केली, पण साधं- सोपं इंग्रजी भाषा आणि वस्तुनिष्ठ लिहिण्याचा, आपली मतं वाचकांवर न लादण्याचं शिक्षण हे शेवटपर्यंत, अगदी आजपर्यंत, कायम राहिलं. त्याचं एकमेव कारण कुट्टी सरांसारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या शिकवणीमुळे.

अलीकडे इंग्रजी भाषेतील माझ्या बातमीदारीच्या अनुभवावर आधारित “Newspaper English” हे पुस्तक लिहिले. त्याची अर्पणपत्रिका लिहायच्या वेळी अगदी स्वाभाविकपणे कुट्टी आणि भास्कर यांचीच नावे सहजच निश्चित झाली.

त्या अर्पणपत्रिकेत मी म्हटलं आहे “My News editors in UNI: They taught me the basics of news writing”.

अधुन मधून ब्लॉगवर आठवणी लिहिताना या दोघांचा उल्लेख तर येतोच.

परवा दिनांक ९ डिसेंबर ला आलेला अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. ‘पी टी आय’ चे निवृत्त सहाय्यक संपादक आणि माझे हितचिंतक स्नेही विजय सातोकर एक मोठा प्रकल्प हाती घेत आहेत. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ ने आता ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने “वृत्तसंस्थेची पत्रकारिता” या विषयावर एका ग्रंथाचे नियोजन ते करीत आहेत. ‘पी टी आय’ च्या ७५ पत्रकारांच्या लेखांचे संकलन आणि संपादन करून ते पुस्तक प्रकाशित करणार आहेत. मित्र म्हणून फोनवर त्यांनी सहजच विषय आणि लेखक यांच्या विषयी मला सल्ला विचारला. सकाळी नऊची वेळ असावी. मी कम्प्युटर वर तीन- चार विषय आणि त्यांचे लेखक यांची नावे टाईप केली. ईमेल चा मजकूर टाईप करण्यापूर्वी व्हाट्सअप वर आलेला संदेश वाचला. त्यात कुट्टी यांच्या निधनाची बातमी सविस्तर लिहिलेली पाहिली. केव्हढा विचित्र योगायोग ! मन विषण्ण करून गेला … के पी के कुट्टी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. बहुगुणी अशा के पी के कुट्टी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
    लेखाद्वारे त्यांची सर्व माहिती मिळाली.

  2. अप्रतीम!!फार सुंदर लेख..
    केपीके कुट्टीं सारखी पत्रकारीता अभावानेच ..
    डॉ. किरण ठाकूर किती भाग्यवान..!!त्यांना पत्रकारितेच्या वाटेवर
    असे मार्गदर्शक लाभले!!
    केपीके कुट्टी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं