मस्करीची कुस्करी
बहुदा ऑक्टोबर- नोव्हेंबर मधील रात्र असावी. कडाक्याची थंडी होती. भारत-पाकिस्तानचे बांगलादेश
निर्मितीसाठीचे १९७१ चे युद्ध होण्यापूर्वी दोनेक महिने आधीचीही घटना.
यु एन आय च्या आमच्या कार्यालयातील पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी काम करीत होते. अंधार असल्यामुळे कॉफी किंवा चहा, सिगरेटचा धूर असं एकूण दृष्य होतं. मी उपसंपादकांच्या न्यूज डेस्क वर मान खाली घालून टेलिप्रिंटर वर आलेल्या बातम्यांचं संपादन करून पुढे पाठवत होतो. अधून मधून इंटरकॉम वर कोणीतरी काहीतरी सांगायचा, निरोप द्यायचा, घ्यायचा असं रुटीन काम चालू होतं. आठ वाजत आले होते. अर्ध्या तासात वाइंड-अप करून नऊ वाजता सुरू होणाऱ्या शिफ्ट साठी तयारी करीत आपलं काम आवरणाच्या मूडमध्ये आम्ही सर्वच होतो. नऊच्या शिफ्ट साठी माझे नंतरचे सहकारी कार्यालयात हळू हळू यायला लागले होते.
माझ्या टेबलवरचा इंटरकॉम फोन वाजला. आवाज आला. “आय अँम व्ही पी आर, दिस साईड. हू इस इट? मी माझं इनिशिअल, केकेटी, सब-एडिटर, असं सांगत ओळख दिली.
व्ही पी आर म्हणजे, आमचे बातमीदारी विभागाचे प्रमुख. व्ही पी रामचंद्रन. यांच्या नावाचा म्हणजे इनिशिअल्स चा मोठा दबदबा होता. माझी अद्याप ओळख झालेली नव्हती. कारण मी खूप नवखा होतो. पण दिल्लीतील बातमीदारा मधील अग्रगण्य असं ते नाव होतं, हे मला माहीत होतं. यापूर्वी कधी फोनवर सुद्धा भेट झाली नव्हती. प्रत्यक्षात तर संबंधच आलेला नव्हता. सरसावून बसलो.
पेन, कागदाचे पॅड पकडत “yess सर” म्हणून त्यांचीं वाट पाहायला सुरुवात केली. “टेक डाउन. इट इज ए फ्लॅश” असे त्यांचे गंभीर आवाजातील शब्द ऐकले. आमच्या वृत्तसंस्थेच्या त्यावेळच्या प्रथेनुसार “फ्लॅश ची बातमी” याचा अर्थ की इतर सर्व बातम्या, लेख, सर्व काम बाजूला ठेवून फ्लॅश च्या बातमीचा मजकूर हाताने लिहून तो टेलीप्रिंटर सेक्शन कडे विना विलंब – लगेच- दिलाच पाहिजे.
अशी बातमी आणि तिचा मजकूर माझ्या करिअर मध्ये फ्लॅश लिहून घेऊन टेलिप्रिंटर ऑपरेटर कडे पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. श्वास रोखून मी आमच्या व्ही पी आर सरांचे शब्द ऐकायला उत्सुक झालो. अत्यंत शांत धीरगंभीर आवाज आला “India Declares War”. कागदावर हे तीन शब्द अतिशय वेगाने लिहून तो कागद मी आमच्या शिफ्ट चे प्रमुख सहसंपादक कस्तुरी (खरं नाव नाही) म्हणून होते यांच्याकडे दिला.
तशा गडबडीत देखील आमच्या पद्धतीप्रमाणे मजकूराशेवटी UNI असं लिहून बातमीदाराचे इनिशिअल्स त्याला लागून उपसंपादकाचे म्हणजे माझे इनिशिअल्स लिहिले kkt आणि कस्तुरी यांच्याकडे दिला. ते तीन शब्द “ India Declares War” वाचून त्यांची प्रतिक्रिया देखील तशीच झाली. हातातली सिगारेट चटकन ash tray मध्ये त्यांनी विझवली. सहायक संपादकाचे म्हणजे त्यांचं इनिशिअल्स KA लिहिले. त्यांची सही केली आणि तो कागद घेऊन ते पळतच टेलिप्रिंटर ऑपरेटर कडे धावत गेले. “फ्लॅश” असं ओरडले आणि परत येऊन माझ्या जवळच्या आपल्या खुर्चीकडे येऊन उभे राहिले. पुढचा मजकूर कुठे आहे असे जोरात दरडावून मला विचारू लागले. मी इंटरकॉम मधून “हॅलो, हॅलो’ करून फोन टॅप करून पुढच्या मजकूरासाठी व्ही पी आर सरांचे शब्द येण्याची वाट पाहत होतो. पण फोन कट झाला होता.
एव्हड्या थोड्या वेळात आमचा फ्लॅश चा मजकूर टाईप करून टेलिप्रिंटरच्या माध्यमातून दिल्लीच्या आमच्या ग्राहक वर्तमानप्रत्रांच्या ऑफिस मध्ये त्यांच्याकडील टेलिप्रिंटर वर पोहोचला होता. कस्तुरी आणि मी, आम्ही दोघे गोंधळून गेलो. व्ही पी आर सरांची केबिन शेजारच्याच रूममध्ये होती तेथे मी धावत गेलो. ते तेथे नव्हतेच. त्यामुळे त्यांचा फोन ऑफिस बाहेरून कुठून तरी आला असेल असे आता वाटू लागले. पण कुठून ते न कळल्यामुळे आमची तारांबळ उडाली होती.
“भारताने युद्ध पुकारले” अशी खूपच महत्त्वाची ‘अर्थ शेकिंग’ म्हणतात तशी बातमी होती. पण या तीन शब्दाखेरीज पुढे काहीच नाही ! त्यामुळे ऑफिसमध्ये सगळेच गोंधळेले, एकमेकांना विचारू लागलो. तेव्हढ्यात स्वपन (खरं नाव नाही) नावाचा आमचा क्राईम रिपोर्टर जोरात माझ्या रूम पर्यंत पोहोचला. अत्यंत कर्तबगार क्राईम रिपोर्टर म्हणून त्याचं या क्षेत्रात नाव होतं. यावेळी तोही भेदरून गेलेला वाटला. पंजाबी होता . “भ” बाराखडीचा सढळ वापर करण्याची त्याची सवय होती. तशी “भ” ची बाराखडी उच्चारत तो “किसने उठाया था फोन” असे जवळपास किंचाळत माझ्यावर धावून आला. “गाढवा, माझा आवाज ओळखता नाही आला का तुला ?” असं माझ्यावरच डाफरला.
त्याने आपल्या कुणा सहकारी मित्राची मस्करी केली होती. ते दोघे आता गर्भगळीत झालेले दिसत होते. आमच्या सगळ्यांच्याच लक्षात हळूहळू काय घडले आहे हे कळायला लागलं होतं.
व्ही पी आर सरांचा तो फोन नव्हताच. आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याची टांग खेचण्यासाठी, थट्टा मस्करी करण्यासाठी, व्ही पी आर सरांच्या आवाजात फोनवरून फ्लॅशचा मजकूर दिला. आपलं चुकलंच, हे लक्षात येताच फोन खाली ठेवून दिला. सॉरी सॉरी म्हणत तोही माझ्या रूम कडे धावत आला. या सात-आठ दहा मिनिटात खूप गडबड उडाली होती.
बाहेरची आपली असाइनमेंट करून व्ही पी आर ऑफिस कडे पोहोचायला लागले तेव्हा त्यांना कोणीतरी हा सगळा प्रकार सांगितला. स्वपन तिथून अदृश्य झाला होता. मी आणि कस्तुरी मात्र सापडलो. दुर्दैव असं की आमचे मुख्य संपादक जी जी मीरचंदानी त्यावेळी योगायोगाने दिल्लीत केंद्र सरकारच्या आकाशवाणीच्या महासंचालकांच्या घरी जेवायला गेलेले होते. जेवायला सुरुवात झाली न झाली तोच या घटनेसंबंधी त्यांना फोनवर व्ही पी आर सरांनी सगळा तपशील सांगितला.
या प्रकरणाने आम्ही सर्वच हबकलो होतो. याचं कारण ते दिवस असे होते की कोणत्याही क्षणी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता होतीच. पण त्याची घोषणा इतक्या किरकोळ पद्धतीने भारत सरकार करेल हे शक्य नव्हतं. पण अशा प्रकारे चुकीची बातमी बेजबाबदारपणे देणे हे यु एन आय ला खचितच भूषणावह नव्हतं. आमच्या विश्वासार्हतेला हा मोठा तडा बसणार होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात देश विदेशात बदनामी होणार होती.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः रामचंद्रन यांनी या घटनेचा खुलासा केला. आमच्यातील कोणीतरी मित्र मित्रांमध्ये थट्टा मस्करी करताना हा मजकूर दिला असे सांगत टेलीप्रिंटर वरून वर्तमानपत्रांची म्हणजेच यु एन आय च्या ग्राहकांची माफी मागितली. हा फ्लॅश “kill” करा म्हणजे तो फ्लॅश रद्द समजा अशी विनंती केली. हा खुलासा साडेनऊ पर्यंत टाईप करून टेलिप्रिंटर वरून ग्राहकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. 
दिल्लीतील आमचे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी केंद्र हे ग्राहक या सगळ्यांना फोनवरून हा खुलासा पुन्हा एकदा तोंडी सांगावा अशा सूचना आम्हाला करून रामचंद्रन आपल्या घरी गेले.
सर्वांना फोन वर निरोप देण्याचे काम मला सांगितले. खूप भूक लागली होती. इलाज नव्हता म्हणून सर्व वृत्तपत्रांना फोन करून निरोप देई पर्यंत थांबणे आवश्यक होते. ते करेपर्यंत रात्रीचे बारा वाजत आले होते. रात्री घरी पोहोचलो तेव्हा खायची इच्छा राहिली नव्हती. रात्रभर झोप देखील आली नाही.
सकाळी आम्ही कार्यालयात पोहोचलो तेव्हा मोठी मीटिंग सुरु झाली होती. अशा प्रकारची थट्टा मस्करी (प्रॅन्क) पुन्हा होऊ नये यासाठी कशी खबरदारी घेतली पाहिजे त्याची कवायत (drill) तयार झाली होती. फ्लॅश देण्याआधी फोन करणाऱ्याला उलटा फोन संपादक विभागातील पत्रकाराने कन्फर्म करण्यासाठी केलाच पाहिजे असा दंडक तयार झाला. तो नंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यानी कसोशीने पाळला. पण आम्ही सगळे चांगलाच धडा शिकलो होते.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

It was an extremely serious matter.
But, because of quick action by UNI
staff, possible havoc did not take
place !! The event was narrated
in a very proper way in this article.