Wednesday, July 2, 2025
Homeलेखबातमीदारी करताना भाग - २

बातमीदारी करताना भाग – २

पहिला धडा
भारताच्या आणि माझ्याही आ युष्यातील ऐतिहासिक दिवस म्हणजे ३१ जानेवारी १९७१ हा होय. युनायटेड न्यूज ऑफ या वृत्त संस्थेमध्ये दाखल होऊन मला फक्त वीस दिवस झाले होते. शिकाऊ उपसंपादक (ट्रेनी सब-एडिटर) हे माझ्या तेव्हाचं कामाचं स्वरूप. अजून माझी सहकाऱ्यांपैकी कोणाशी धड ओळख सुद्धा झाली नव्हती. यु एन आय च्या प्रथेप्रमाणे मला सकाळी नऊ ते तीन या वेळेत ड्युटी होती.

माझ्या खेरीज आमचे वृत्त संपादक बी आर पी भास्कर उपस्थित होते. अन्य कोणीही वरिष्ठ सहकारी वृत्त विभागात सकाळी आलेला नव्हता. संपादक विभागाच्या लंब गोला कार टेबलाच्या भोवती एका टोकाला मी आणि त्याच्या विरुद्ध बाजूला स्वतंत्र टेबलवर भास्कर काही लिखाण करत होते. त्यांचा स्वतःचा ‘बेबी‘ ब्रँड टाईपराईटर समोर घेऊन, तो संथ गतीने बडवत त्यांचे लिखाण चालले होते.

वृत्त संपादक, बी आर पी भास्कर

साधारण एक वाजला असावा. त्यांनी टेबल वरचे समोरचे बाकीचे साहित्य बाजूला करून टाईप रायटर आणखी जवळ ओढून पुन्हा टाईप करायला सुरुवात केली. त्या आधी फोन उचलून त्यावर काही नोट्स काढल्या असाव्यात, पण मला तेव्हा त्यातलं काहीही जाणवलं नाही.

मी इतका लिंबू-टिंबू होतो. माझं काम एकदम नगण्य असंच होतं. भास्कर सरांनी टाईप केलेला कागद त्यांच्याकडून घ्यायचा आणि तो विरुद्ध बाजूच्या टोकाला असलेल्या टेलिप्रिन्टर ऑपरेटरच्या कप्प्यात टाकायचा. तो ते उचलून ऑपरेट करायला सुरुवात करायचा. टेलिप्रिन्टर ऑपरेटरच्या प्रिंटर जवळच एक रिसिवर-प्रिंटर मशीन टिक टिक करीत बातम्यांची भेंडोळी बाहेर काढायचा.

ऑफिसच्या इतर खोल्यांमध्ये आणखीही रिसीवर्स आणि प्रिंटर्स शांतपणे थांबलेले -टिक टिक न करता- उभे असायचे. टेलिप्रिन्टर ऑपरेटर च्या रूम वरून मी माझ्या खुर्चीवर येऊन बसत नाही तोच टेलिप्रिन्टर मशीनची आणि रिसिव्हरची टिक टिक अगदी हातघाईला आली असल्या सारखी सुरू झाली. काय झाले हे बघायला मी वेगाने माझ्या जवळच्या पहिल्या मशीन जवळ गेलो आणि प्रिंटर वाचायला सुरुवात केली. फक्त तीन शब्दाचा फ्लॅश धडधडत होता. Indian Airliner Hijacked (भारतीय विमानाचे अपहरण).

क्षणार्धात मला हे जाणवलं की जो कागद मी सरांकडून घेऊन ऑपरेटरला दिला होता त्यावर हेच तीन शब्द सरांनी टाईप केलेले होते. एवढा महत्त्वाचा मजकूर आपल्या हातून गेला आणि आपल्याला कळलंच नाही, हे जाणवले तेव्हा कंपच सुटला. हे सगळं आता सांगायला- लिहायला इतका वेळ लागतो आहे, पण प्रत्यक्षात हे घडलं फार तर अर्ध्या मिनिटात. पाठोपाठ एक एक छोटे वाक्य असलेला फ्लॅश चा कागद सरांकडून माझ्या कडे, तेथून ऑपरेटरकडे जायचे आता सुरु झाले होते. पूर्ण देशाला हादरवून टाकणारी ती बातमी बाहेर पडत होती आणि मी ती सरकवायला जबाबदार होतो.

नंतर संध्याकाळी उशिरा हळूहळू तपशील कळत गेला. आमचे श्रीनगर यु एन आय चे ज्येष्ठ पत्रकार सहकारी मलिक यांनी तो फ्लॅशचा मजकूर फोनवर भास्कर यांना दिला होता आणि पूर्ण बातमी ही त्यांनी अतिशय झपाट्याने समर्थपणे आणि शांतपणे परंतु भराभर दिली होती.

भारतीय हद्दीतून उड्डाण केलेले भारताचे पहिले विमान हायजॅक झाले होते. भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. हळूहळू इतर बातमीदार उपसंपादक टेक्निकल स्टाफ कार्यालयात येऊ लागले. ऑफिस गजबजू लागले दिल्लीतील बातमीदार आणि इतर ठिकाणाहून फोनवर या अपहरणा संबंधित इतर तपशील, बातम्या, बाहेरच्या बातमीदारांकडूनही बातम्या येणे सुरू झाले.

भास्कर सरांनी स्वतःसाठी जेवण मागवले,  माझ्यासाठीही मागवले आणि आम्ही जेवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘किरण, तू माझ्या, मी टाईप केलेल्या ’बातम्या वाचल्या होत्या ?‘ मी अर्थातच वाचलेले नव्हते. म्हणून मी म्हणालो’ सर, हाऊ कॅन आय एडिट युवर स्टोरी ?’

‘तुमच्या, न्यूज एडिटर च्या बातम्या, मी संपादित कसा करीन ?’ असे मला म्हणायचे होते. माझ्या करिअर मधला पहिला-समोरासमोर, फेस टू फेस- धडा मी नकळत तेव्हा शिकत होतो. ‘प्रत्येक बातमी, कॉपी – वाचलीच पाहिजे. वृत्त संपादकाचीच नाही तर अगदी मुख्य संपादक यांची कॉपी जरी असली तरी ती वाचायला पाहिजे, दुरुस्त करायला पाहिजे, संपादन करायला पाहिजे आणि मगच पुढची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे.’

हा धडा नंतर मी माझ्या समकालीन किंवा हाताखालच्या सहकाऱ्याना गेली पन्नास-पंचावन्न वर्षे वर्षं देत आलो आहे.

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४