यु एन आय वृत्तसंस्थेचे काम ग्वालियर येथे १९८२ मध्ये करीत असताना मध्यप्रदेशच्या दोन पोलीस विभागांशी संबंध आला. महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात असतात तसे नेहमीचे पोलीस आणि मध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यामध्ये असलेल्या दरोडखोराना काबूत आणण्यासाठी स्थापन केलेला दुसरा विभाग. अँटी डकॉईटी डिपार्टमेंट असे त्याचे नाव. ग्वालियरच्या बातमीदारांना या दोन्ही बीटशी संपर्क ठेवायला लागायचा.
चंबळचे खोरे आणि दरोडेखोर ही समस्या काय होती हे समजण्यासाठी फूलन देवी, मानसिंग, आणि पानसिंग तोमर (१९३२ – १ ऑक्टोबर, १९८२) यांचा उल्लेख केला तर कदाचित थोडी कल्पना येऊ शकेल. जिस देश मे गंगा बहती है या चित्रपटात प्राण ने दरोडेखोराच्या म्होरक्याची भूमिका केली होती ती आठविली तर थोडा अंदाज येऊ शकेल.
युनायटेड न्यूज ऑफ इंडिया च्या बातमीदाराचे रोजचे एक काम या पोलीस विभागाशी संपर्क ठेवणे असे होऊन बसले होते. माझ्या आधीच्या बातमीदाराने या दोन्ही विभागांशी चांगले संबंध ठेवले होते. त्यामुळे माझे काम सोपे होते.
यु एन आय शाखा प्रमुख (मॅनेजर) याला तेथील पत्रकारितेत आणि एकूणच राजकारण, समाजकारण, या क्षेत्रात आणि शासकीय अधिकारी वर्गात मोठे वजन त्यावेळी होते. याचे कारण इंग्रजी वृत्तपत्र आणि वृत्तसंस्था यांच्यामध्ये पूर्णवेळ काम करणारा असा तो एकमेव पत्रकार त्यावेळी असायचा. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि दिल्ली येथील वर्तमानपत्रात आमच्या बातम्या ठळकपणे प्रसिद्ध होत असल्यामुळे आम्हाला तो मान होता.
या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, आणि समाज यांची ओळख होण्यासाठी मी येथील एखाद्या जुन्या-जाणत्या पत्रकाराला वेळ मिळेल तेव्हा सोबत घेऊन हिंडत असे. तसे एकदा भिंड या जिल्ह्याच्या गावी सकाळी साडेआठ वाजताच पोहोचलो. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातील कार्यालयात गेलो. त्यांनी चहापानाचा आग्रह केला आणि मी जरा अंघोळ वगैरे उरकून येतो, कृपया थोडा वेळ बसाल का अशी विनंती केली. त्यांच्या ऑफिस मध्ये भव्य टेबलावर आम्हाला बसवत त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रं वाचायला दिली. ते आत गेले तेव्हा फॅन चालू करून गेले. फॅन च्या वाऱ्यामुळे टेबलावरची वर्तमानपत्रं आणि कागद पत्रं वरून खाली उडाली. आम्ही दोघांनी ती उचलून परत टेबलवर ठेवली.
एका कागदावर मी नजर टाकली. शेजारच्या उत्तर प्रदेशच्या सीमेलगतच्या जिल्हा मुख्यालयातुन आलेले ते पत्र होते. लेटरहेड, तेथील ऊस विकास विभागाचे मंत्री (शुगर केन डेव्हलपमेंट मिनिस्टर) यांच्या नावाचे होते. पत्र हिंदीत टाईप केलेले होते. तीन चार ओळीचेच होते त्यामुळे चटकन वाचून घेता आले.
एका शिक्षा झालेल्या दरोडेखोराच्या नावाचा उल्लेख करून त्याला भिंड क्षेत्रांमध्ये नोकरी द्यावी असे अगदी स्पष्ट शब्दात, काहीशा दटावणीच्या सुरात मंत्रीमहोदयांनी लिहिले होते.
त्याकाळी स्मार्टफोन नव्हता. चटकन कागदाचा फोटो काढून घेता येणार नव्हता. त्यामुळे पत्रातील आवश्यक त्या सगळ्या तपशीलाच्या नोट्स मी भरकन काढून घेतल्या.
आंघोळीनंतर पोलीस अधीक्षक परतले. आमच्या इतर अवांतर गप्पा झाल्या. पुन्हा चहापान झाले आणि मग आम्ही ग्वालियर ला परतलो.
त्या दिवशी मी तीनचार परिच्छेदांची बातमी लिहिली. एका राज्याचा मंत्री दुसऱ्या राज्यातील पोलिस अधिकाऱ्याला दमदाटीच्या भाषेत पत्र लिहितो आणि गुन्हेगाराला नोकरी द्या असे फर्मान सोडतो अशा आशयाची ती बातमी होती. दुसऱ्या दिवशी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील इंग्लिश आणि हिंदी वर्तमानपत्रांमध्ये ती ठळकपणे प्रसिद्ध झाली.
दोनही राज्यांची सरकारे काँग्रेसची होती. बातमीमुळे दोन्ही प्रशासनांमध्ये खळबळ माजली. दिवसभर सतत मला येणाऱ्या फोनवरून हे मला कळत होते. या जिल्ह्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांचे आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे हे फोन होते. काही मला भेटायला येऊन देखील गेले. ‘तुम्हाला ही बातमी कोणी दिली’ ते सांगा असा आग्रह ते धरत होते. बातमीचा सोर्स मी सांगणे शक्य नव्हतं. नंतरच्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्याकडे भोपाळ, ग्वालियर, भिंड, गुना आणि मोरेना या जिल्ह्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येणे सुरू झाले. राजकीय नेत्यांचे ही फोन झाले.
गंमत अशी की बातमी चुकीची, खोटी आहे असे कोणीही म्हणत नव्हता. सगळ्यांचा रोख फक्त एवढाच होता की ही बातमी कोणी दिली ते सांगा. मंत्री गुन्हेगाराची भलावण करतो, नोकरीसाठी शिफारस करतो ते गैर आहे याविषयी कुणाचे अक्षर देखील म्हणणे नव्हते. तर त्यांना बातमीचा सोर्स हवा होता. नीतिमत्ता आणि साधनसुचिता या गोष्टींशी कोणालाही देणेघेणे नव्हते. माझ्याकडून सोर्स मिळाला तर संबधीतांवर प्रशासकीय कारवाई करून मोकळे होता येईल एवढाच त्यांचा इंटरेस्ट होता.
तीन-चार दिवस झाल्यावर मी तशी एक बातमी पुन्हा लिहिली. ती देखील अशीच ठळकपणे प्रसिद्ध झाली. मग माझ्याकडे फोन येण्याचे किंवा अधिकाऱ्यांनी येण्याचे थांबले. त्या मंत्री महोदयांचा खुलासा किंवा इन्कार आला नाही. त्या पक्षाने मंत्र्यावर कारवाई करणे राहिले दूरच. या प्रकरणामुळे माझा दबदबा मात्र वाढला !

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800