“गंगा पवित्र है, प्रदूषित हो ही नही सकती”
राज्यसभेत मंत्र्याचा दुराग्रह
मागच्या आठ ऑक्टोबर २०२१ च्या लेखात गंगा नदी चे प्रदूषण याविषयी मी लिहायला सुरुवात केली होती. त्याचा थोडा पुढचा भाग आज -:
या विषयाशी माझा संबंध १९८० मध्ये प्रथम आला. पुण्याहून वाराणसीच्या यु एन आय कार्यालयाचा बातमीदार आणि शाखा प्रबंधक (मॅनेजर) म्हणून माझी बदली झाली होती.
वाराणसी स्टेशनला गाडी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. ऑफिसच्या सहकाऱ्यांनी माझं स्वागत करून यु एन आय ऑफिस ने रिसिडेन्स-कम -ऑफिस अशी राहण्याची तिसऱ्या मजल्यावर व्यवस्था केली होती, तेथे नेलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच जाग आली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की गंगामैया पासून आमचं कार्यालय फक्त पाचशे मीटर अंतरावर होतं. तिसऱ्या मजल्या वरून नदीचं खूप छान दर्शन होत होतं.
दशाश्वमेध घाटावर आमचं कार्यालय होतं. पाच वाजताच भाविकांची मोठी वर्दळ सुरू झाली होती. चहाची अनेक दुकानं सुरू झाली होती. त्या हॉटेल मधून हिंदी सिनेमाची गाणी आणि भजनं लाऊडस्पीकर मधून कर्कशपणे ऐकू येत होती. झोप येणं अशक्यच होतं.
नदीवर जायची ओढही होती. लगेच आवरून निघालो. घाटावरच्या पायऱ्या वरून उतरून अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात शिरलो. डुबकी मारून वर आलो. ओंजळीत पाणी घेतलं. अगदी अनपेक्षित असा मांसाचा गोळा ओंजळीत आला. काय आहे ते क्षणभर कळलंच नाही. नंतर लक्षात आलं की कुणा बिचारीच्या गर्भपाताचा हा गोळा असावा. अंगावर शिरशिरी आली. शिसारी आणि किळस आली. आणि झपाट्याने तो गोळा लांब फेकून दिला.
उलट दिशेने घराकडे म्हणजे कार्यालयाकडे निघालो. दहाव्या मिनिटाला पोहोचलो आणि बाथरूम मधल्या नळा खाली आंघोळ केली.
दशाश्वमेध घाट
दशाश्वमेध घाटाची महती मला आदल्या दिवशीच सहकाऱ्याने सांगितली होती. येथे स्नान केले तर मोक्षप्राप्ती होते. पहिलाच किळसवाणा अनुभव लक्षात घेऊन मी मोक्ष मिळवण्याचा विचार टाकूनच दिला. परत कधीही गंगेच्या पाण्यात उतरलो नाही.
काही दिवसांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी च्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ बी डी त्रिपाठी यांच्याशी मैत्री झाली. पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी धारणा असलेले ते प्राध्यापक होते.
एक दिवशी संध्याकाळी ते चहा घ्यायला म्हणून आले. खूप नाराज दिसले. स्वाभाविकपणे ‘काय झालं ’ म्हणून चौकशी केली. तीन दिवसाच्या कॉन्फरन्स चे निमंत्रक म्हणून विद्यापीठाने त्यांच्याकडे आयोजनाची पूर्ण जबाबदारी सोपवली होती. आज दुसरा दिवस होता. वीस- पंचवीस अमेरिकन आणि युरोपियन स्त्री-पुरुष संशोधकांना साईट सीइंग म्हणून गंगा दर्शन करण्याचं नियोजन त्यांनी केलं होतं. भोजनानंतर दुपारी बोटीत बसून गंगा नदीचा मोठा फेरफटका मारायचा त्यांचा प्लॅन होता.
एका किनाऱ्यावरून समोरच्या दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत गेल्यानंतर वाहणारी घाण दिसू लागली. तरंगणारी एक-दोन प्रेतं, छोटे-मोठे प्राणी दिसले. अनपेक्षितपणे हे दृष्य पाहिल्यानंतर या परदेशी पाहुण्यांना किळस आली. दोघी महिला उलट्या झाल्यामुळे बेजार झाल्या. सगळा हल्लकल्लोळ उडाला.
‘आपण आता परत फिरू, बस, झालं’ असा त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे बोट परत फिरवून सगळे हॉटेल वर परतले. पूर्ण फियास्को झाला होता. आयोजक प्राध्यापक आता पाहुण्यांना कसे तोंड दाखवायचे, उद्याची कॉन्फरन्स कशी पार पाडायची या काळजीत होते. या दोन महिला संशोधकांना हॉस्पिटल मध्ये घेऊन त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागली होती. माझ्या मित्राची कशीबशी समजूत काढून त्याची बोळवण केली आणि मी तडक हॉस्पिटलमध्ये त्या दोघींना जाऊन भेटलो.
भारताविषयी भ्रमनिरास झाला, इतके प्रदूषण आणि इतका किळसवाणा प्रकार या आधी कधीही अनुभवला नाही असं त्या दोघी सारख्या म्हणत होत्या. त्यांचा निरोप घेऊन मी परतलो. टाईपराईटर वर बसून सविस्तर मोठे फीचर लिहिले. रात्रीतून लगेच दिल्लीच्या संपादकांकडे टेलिप्रिंटर वर पाठवून दिले. सकाळी आमच्या वर्तमानपत्र-ग्राहकांना लवकर मिळण्यासाठी रिलीज व्हावे म्हणून ही धडपड होती.
तिसऱ्या दिवशी दिल्ली मुंबई, मद्रास, कलकत्ता, लखनऊ, भोपाळ अशा सर्व महत्त्वाच्या शहरातील मोठ्या दैनिकात ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली. ती तशी होणार याचा अंदाज होताच. पण अंदाज नव्हता अशी एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे त्यादिवशी राज्यसभेचे अधिवेशन चालू होते. विरोधी पक्षाच्या सभासदांनी गंगेचे प्रदूषण हा बातमीचा विषय लावून धरला. गदारोळ झाला. मंत्री अनंत प्रसाद शर्मा यांनी या चर्चेला उत्तर दिले. ‘गंगा प्रदूषित हो ही नही सकती,’ कारण ‘ती पवित्र नदी आहे’ अशा अर्थाचे उत्तर ते देत राहिले. ते हास्यास्पद तर होतेच पण भारताची प्रतिमा जगामध्ये किती मलीन करू शकेल याचे त्यांना भान नव्हते हे दर्शविणारे होते.
राज्यसभा सभापती जस्टीस हमीद हिदायतुल्ला यांनी त्यांना अडवून सांगितले देखील कि गंगा पवित्र असेल पण बाहेरचा कचरा आणि घाण नदीला प्रदूषित करतो. नदीच्या प्रदूषणाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. राज्यसभा सदस्य रामेश्वर सिंग यांनी नदीच्या प्रदूषणामुळे रोगराई पसरते याकडे लक्ष वेधले. पण मंत्री हेका सोडेनात. उलट गंगेची ही खासियत आहे हे तुम्ही समजून घेत नाही या बद्दल त्यांनी पुनः निवेदन केले.
दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख दैनिकात पीटीआय आणि यूएनआय यांच्या बातम्या झळकल्या त्यातली एक अशी होती :
Nothing Can Pollute Ganga, Minister Avers
New Delhi, July 1, 1980 (PTI, UNI) Mr A P Sharma, Minister for Shipping and Transport said in the Rajya Sabha today that nothing can pollute Ganga.
Replying to a supplementary by Mr Rameshwar Singh(Lokdal) Mr Sharma said the quality of the Ganga was such that it always remained pure despite various things getting mixed into it.
The Minister argued that there was a philosophy behind the purity of Ganga waters and Mr Singh must understand that philosophy.
‘Nothing can pollute the Ganga. It purifies everything which mingles into it,’ the minister said. Mr Hindayutalla, who was in the chair, said that even though Ganga was sacred, a lot of filth had been going into it.
Mr Sharma, however, insisted that the river was never polluted. (Published on page 6, of the Hindu, July 2, 1980.)
राज्यसभेतल्या या चर्चेवर वर आधारित थोडी टिंगल-टवाळी करणारी बातमी दिल्लीच्या आणि लखनऊ च्या पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाली. पुन्हा एकदा गंगेची बातमी आली होती. माझा संबंध आणखी एका बातमी च्या निमित्ताने यायचा होता. इंदिरा गांधी या विषयात हस्तक्षेप करणार होत्या. त्याविषयी पुढल्या आठवड्यात.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800