महामानवाच्या महानिर्वाणाची बातमी
मागच्या भागात (क्रमांक 11 मध्ये) माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र प्रवीण बर्दापूरकर यांनी विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाच्या बातमीचे सविस्तर वर्णन केले होते. नागपूरच्या सर्व पत्रकारांना या दहा- अकरा दिवसात काय अनुभव आला, त्याचे त्यांनी फार छान तटस्थपणे वर्णन केले होते. शेवटी बातमीचे श्रेय मात्र मला (किरण ठाकूरला) कसे मिळाले हे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले होते. त्या ऐतिहासिक दिवसाची कहाणी आज सांगतो.
त्यावेळी मी पुण्यात युनायटेड न्यूज ऑफ इंडिया चा बातमीदार म्हणून कार्यरत होतो. सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ होता. संपूर्ण पावसाळ्यात थोडा देखील पाऊस झालेला नव्हता. त्या विषयीच्या बातम्यांचे संकलन करायची माझी असाइनमेंट होती.
कोल्हापूर वरून मी सांगलीत पोहोचलो. भरपूर पाऊस झाला होता. त्याविषयीच्या बातम्या मी फोनवरून आमच्या मुंबई कार्यालयाला दिल्या. तेव्हा आमचे मुंबईचे मॅनेजर चंदू मेढेकर यांनी अचानक मला नागपूरला जायला सांगितले.
आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशन च्या कव्हरेजसाठी, माझे नागपूरचे सहकारी टी बी गोल्हर एकटे पडले होते. पाच-सहा नोव्हेंबर पासून रोज सकाळी घरून निघून रात्री उशिरापर्यंत पवनार च्या आश्रमात थांबायचे आणि रात्री उशिरा नागपूरला परत यायचे असा त्यांचा दिनक्रम झाला होता. यामुळे त्यांना घरच्या गोष्टींसाठी वेळ मिळत नव्हता. घरी कौटुंबिक समस्या होत्या. आजारपण होते. त्यामुळे गोल्हर यांच्या मदतीला मी जाणे आवश्यक होते. नागपूर स्टेशनवर ते घ्यायला आले होते आणि तिथूनच सत्तरेक कि मी अंतरावर च्या आश्रमात जायला आम्ही निघालो.
कामाचे स्वरूप आणि तिथल्या अडचणी या सगळ्या गोष्टी त्यांनी बारीकसारीक तपशिलासकट प्रवासामध्ये टॅक्सीतच सांगितला. मला एकूण कव्हरेजचे स्वरूप सांगितले. आश्रमात पोहोचायला मध्यरात्र होत आली होती. सकाळपासून तेथे पोहोचलेले इतर बातमीदार शेवटची बातमी लिहून नागपूरला घरी निघालेच होते. तेथे सगळ्यांच्या औपचारिक ओळखी झाल्या आणि ते परतले.
पूर्ण आश्रमात मीच एकटा पत्रकार उरलो. मिणमिणत्या प्रकाशात मी आश्रमाचा फेरफटका मारत राहिलो. स्वेच्छामरणाचा निर्धार करीत अन्नत्याग केलेले स्वतः बाबा म्हणजे आचार्य विनोबा भावे एका काचेच्या खोलीत शांतपणे विश्रांती घेत असताना दिसले. बाहेर ओट्यावर मोठ्या फलकावर बाबांच्या प्रकृती विषयक तोपर्यंतचे शेवटचे बुलेटीन खडूनी लिहिलेले होते. मुंबई-नागपूर ट्रेन प्रवासात माझी गाढ झोप झालेली होती. त्यामुळे आता ओट्यावर पाठ टेकवत डोळे मिटून शांतपणे बसून राहिलो.
जाग आली साधारण पहाटे पाचच्या सुमाराला. आश्रमवासियांनी झाडलोट करत दिवसाच्या कामाला सुरुवात केली होती. प्रार्थना सुरू झाल्या होत्या. माझे आवरत बाहेर टपरीवर चहा घेतला आणि पुन्हा आश्रमात हिंडत राहिलो. आज नरक चतुर्थीची (पंधरा नोव्हेंबर ची) पहाट होती. बाहेर लांब गावातल्या फटाक्यांचे आवाज येत होते. आश्रमातले आणि पवनारचे वातावरण कसे होते आणि रात्रीपासून सकाळपर्यंतचा बातमीचा तपशील हाताने इंग्रजीत लिहून तयार ठेवला. (तेव्हा लॅपटॉप आणि इंटरनेट नव्हते).
ठरल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता लाईटनिंग कॉल करून या तपशीलाच्या बातमीचे मी माझे पहिले बुलेटीन गोल्हर यांना फोनवर सावकाश देत होतो. अचानक बाबाचे व्यक्तिगत सहायक बाळ विजय लाऊडस्पीकर चालू करून धीर गंभीर आवाजात बोलू लागले. “महावीर का अवतार समाप्त होकार ब्रम्हनिर्वाण को प्राप्त हो गये है. इस मंगल समारोह के लिये शांती और प्रसन्नता बनाये रखे“.
योगायोगाने माझा फोन नुकताच चालू झालेला होता. मी गोल्हरला सांगायला सुरुवात केली. ‘ Now Take Flash. Acharya Vinoba Bhave is dead” आचार्य विनोबा भावे इज डेड (आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले) (नोव्हेबर १५, १९८२). फोनवरून बोलणे चालूच असल्यामुळे गोल्हर ला सगळे माईक वरचे बोलणे ऐकू येत होतेच. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही वेळ न गमवता आधी तयार करून ठेवलेला फ्लॅश चा मजकूर टेलिप्रिंटर वरून द्यायला सुरुवात केली. या निवेदनाचे नेमके शब्द आमच्या माध्यमातून जगभर प्रसारित व्हायचे नशिबात होते.
मुंबईच्या आमच्या उपसंपादकाने लगेच ही बातमी देशभरातील यु एन आय च्या नेटवर्क वरून सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, आणि बाहेरच्या देशांची वृत्तसंस्थांची कार्यालये यांच्या पर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. माझ्या प्रतिस्पर्धी वृत्तसंस्थेचे म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे बातमीदार अद्याप पवनार च्या आपल्या हॉटेल मधल्या रूमवर म्हणजे बरेच लांबवर होते. जगाला बातमी देणारा मी (आणि गोल्हर) एकमेव आणि पहिला बातमीदार होतो. त्या अर्थाने हे एक मोठे स्कूप होते.
मी अद्याप आश्रमात टेलिफोन असलेल्या रूममध्येच होतो. मी बाहेर पडण्याच्या आत फोन वाजला. “सीएम (चीफ मिनिस्टर) बाबासाहेब भोसले बोलतोय. आपण कोण ?” अशी सुरुवात ऐकली. मी माझी ओळख सांगितली. बाबासाहेबांनी त्यांचा पुढचा प्रश्न आपल्या खास स्टाईल मध्ये विचारला : “खपला का रे म्हतारा ?” मी अवघडून “हो” म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुंबईला आमच्या आणि पी टी आयच्या टेलीप्रिंटरचे मशीन चालू असते. यु एन आयच्या मशीन वर माझी बातमी पोचली होती. मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्याने प्रिंटरच्या भेंडोळ्यातून बातमीचा तो तुकडा बाबासाहेबांपर्यंत पोहोचवला असणार. तो वाचून त्यांनी केलेला फोन मी घेतला होता.
आता या ठिकाणी थोडी पार्श्वभूमी माहिती सांगणे आवश्यक आहे. महात्मा गांधीजींचे अनुयायी भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना देशात मोठे स्थान होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृती संबंधीची माहिती दर मिनिटाला पोचवण्यासाठी प्रशासनाने तातडीची सर्व व्यवस्था केली होती.
त्या व्यवस्थेच्या भाग म्हणून मुख्यमंत्री यांच्या साठी टेलिफोन उपलब्ध झालेला होता. स्वतः इंदिरा गांधी यांनी ‘मला तातडीने बातमी कळली पाहिजे’ अशा सूचना करून ठेवल्या आणि त्या पूर्व नियोजित परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. बातमी कळताच प्रवास दौरा टाकून त्या भारतात परत येणार होत्या. त्यामुळे देशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती. त्यातला एकमेव महत्त्वाचा दुवा (खरे म्हणजे सोर्स, स्त्रोत) मी होतो. माझ्याकडून तोंडी खात्री करून घेतल्या घेतल्या लगेच बाबासाहेबानी फोन कट केला. त्या नंतर निरोप इंदिराजी ना केला असणार.
नागपूर ऑफिस मधून गोल्हर यांनी अत्यंत शिताफीने पुढचे काम सुरू केले होते. अशा प्रसंगी ओबिट (obituary) म्हणजे त्या त्या महान व्यक्तींचा जीवनपट तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे पहिले दोनशे-तीनशे शब्द गोल्हर यांनी टाईप करून दिल्यानंतर पुढचा सलग पाच-सातशे शब्दांचा जीवनपट धडधडत वर्तमानपत्र, आकाशवाणी, आणि बाहेर देशातील वृत्तसंस्था यांच्याकडे पोहोचायला केव्हाच सुरुवात झाली होती. रात्रीपासून पहाटेपर्यंत पवनार आश्रमात असलेले वातावरण लिहित मी माझे काम चालू ठेवले होते.
आणखी एक स्पष्टीकरण या निमित्ताने करतो. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातमीसाठी डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देणे आणि तो औपचारिकपणे जाहीर करणे आवश्यक असते. त्यामुळे आकाशवाणीच्या बातमीदारांनी तशी खबरदारी घेण्याचे ठरवले ते योग्यच होते.
मृत्यू झाला आहे असे डॉक्टरांनी सांगेपर्यंत थांबणे आवश्यक होते. मी मात्र डॉक्टरांच्या हवाल्याने मृत्यूची बातमी न देता बाबांच्या सचिवाच्या उद्घोषणेच्या (अनाउन्समेंट च्या) हवाल्याने देत बातमी फोनवरून देणे चालू ठेवले. पवनारचे स्थानिक सरकारी डॉक्टर जरा वेळाने आले. त्यांनी प्रकृती तपासली आणि मृत्यूचे सर्टिफिकेट कागदावर लिहून आश्रमातील अधिकाऱ्यांना दिले.
हे आवश्यक सोपस्कार होईपर्यंत बराच उशीर झाला होता. हळूहळू इतर पत्रकार आणि अधिकारी पोहोचले. तोपर्यंत माझ्या आणि गोल्हर यांच्या बातमीचा बराच मजकूर प्रसारित झाला देखील होता. आकाशवाणीवरून अशा प्रसंगी वाजवतात ती शोक संदेश संगीताची धून सुरू झाली होती. प्रवीण बर्दापूरकर यांनी खूप नंतर आपल्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘मी म्हणजे यु एन आय ने बाजी मारली होती’ असे प्रसंग वृत्तसंस्थेच्या बातमीदाराच्या आयुष्यात काही रोज येत नाहीत. त्या मुळे मी देखील कृतकृत्य झाल्याच्या आविर्भावात होतो हे खरेच. ते लपवून ठेवणे यात काही हंशील नाही.
आणखी एक खुलासा. बाबासाहेब भोसले खरोखरच असे काही बोलले असतील का ? म्हणजे “खपला का रे म्हतारा ?” असे त्यांनी मला खरंच विचारले असेल का ? एखादे मुख्यमंत्री एवढ्या महान विभूती विषयी असे शब्द खरंच वापरतील का ? अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मी स्वतःदेखील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतु बाबासाहेबांना ओळखणारा कोणीही “होय, ते नक्कीच असे बोलले असतील” हे छातीठोकपणे सांगू शकेल. याचे कारण बाबासाहेब हे अस्सल सातारी रांगडा माणूस होते. ते असे शब्द नक्कीच वापरतील अशी ग्वाही देतील.
त्या रात्री आणि पहाटे, सकाळी नऊपर्यंत काढलेल्या नोट्स मध्ये इतर काही किस्से मी नंतर लिहिण्यासाठी खरडून ठेवले होते. त्यातला बातमीदारांच्या कामाच्या पद्धतीमधील माहिती इतरांना व्हावी म्हणून नोंदवतो.
नवी दिल्लीच्या आकाशवाणी भवनात हिंदी बुलेटीन साठी काम करणारे निवेदक श्री अनादि मिश्र स्वतः आग्रह धरून या कवरेज साठी पवनारला आले होते म्हणे. देशातल्या हिंदी आकाशवाणीच्या श्रोत्यांमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा होता. ते मोठे साहित्यिक होते. त्यामुळे आपण उत्तम बातमीदारी देखील करू शकू असे त्यांनी आपल्या वरिष्ठांना पटवले असावे. परंतु बातमीदारी करणे हा एक वेगळ्या कौशल्याचा भाग असतो. तो त्यांच्यात नव्हता, हे नंतर आमच्यासारख्यांच्या लक्षात आले.
उदाहरणार्थ, त्यांनी सोबत एक टू वन रेकॉर्डर आणला होता. आश्रमात तेव्हा खूप मोठे गांधीवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते, अशा मोठ्या लोकांची रीघ लागली होती. असा कोणीही आला की मिश्रा त्यांना ‘बाबा के बारे मे आपकी क्या राय है’ असा प्रश्न करून उत्तराचे रेकॉर्डिंग सुरु करायचे. अशा प्रसंगी “बाबा गेले” असे गृहीत धरून तसे हे पाहुणे बोलायला सुरुवात करीत आणि नॉन-स्टॉप, अखंड बाबांच्या विषयी सांगायला सुरुवात करीत. कोणताही बातमीदार इतकं आणि असं रेकॉर्डिंग करीत नसेल. कारण त्याची गरज नसते. इतके अनेक दिवस केलेल्या रेकाँडींग चे अनादी मिश्रा नंतर काय करणार होते हा प्रश्नच होता.
हे गृहस्थ बातमीदार म्हणून कधीही नव्हते. ते खूप चांगले लेखक, साहित्यिक असतील कदाचित. पण थोड्या वेळात बातमीचा तपशील कसा मिळवायचा आणि तो सांगायचा कसा याचं तंत्र त्यांना माहीत नव्हतं हे निश्चित. याची कल्पना मी टॅक्सीतुन प्रवास करतांनाच आली होती. त्या रात्रीच्या मुख्य हिंदी बुलेटिन मध्ये त्यांच्या आवाजातील बातमी मी आणि गोल्हर यांनी ऐकली होती. आचार्य विनोबा यांच्या प्रकुतीचा तपशील सांगून झाल्यानंतर त्यांनी बाबांच्या चेहऱ्या भोवती ‘आभा दिखाई दे रही है’ असं बेधडक विधान केलं होतं. आश्रमात पोहोचल्यावर बाबांचं दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक होतो याचं एक कारण त्यांच्या मुख कमलाभवतीचं ही आभा पाहाणं हे देखील होतं !
दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे आश्रमाने ठरवले होते. बाबांच्या आश्रमातील मानसकन्या हे अंत्यसंस्कार करणार हे आधीच ठरलं होतं. देशभर शासकीय दुखवटा जाहीर झाला होता. इंदिरा गांधी उपस्थित राहाणार हे शासनाने जाहीर केलं. पण त्याना अग्निसंस्कारात भाग घेता येणार नाही, चिता
पवनार नदीच्या पात्रात रचली होती. त्यात इंदिरा जी कोठे उभ्या राहातील हे आश्रमाने निश्चित केले होते. त्या आल्या तेव्हा आश्रमाने त्यांची दखल देखील घेतली नाही. अग्नी दिला तेव्हा चितेपासून बऱ्याच दूर उन्हात छत्रीच्या सावलीत त्या उभ्या राहिल्या. आम्ही बातमीदार देखील मिळेल त्या जागेवर दूरवर उभे राहून वार्तांकन करीत होतो. गर्दी खूप होती.
आकाशवाणी च्या नागपूर केंद्राने नदीच्या पात्रात उंच टॉवर उभा करून धावते समालोचन करण्याचे नियोजन केले होते. समालोचक होते अनादी मिश्र. आम्हाला समालोचन ऐकायला मिळाले नव्हते कारण कोणाकडेच पॉकेट ट्रान्सिस्टर नव्हता. समालोचनाचे देशभर सहप्रसारण झाले होते.
आम्ही म्हणजे मी आणि इतर पत्रकार नागपूरला आपापल्या कार्यालयात संध्याकाळी पोहोचलो तेव्हा माझ्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख चंदू मेढेकर यांचा एक संदेश टेलिप्रिंटर वरून माझ्या साठी आला होता. ”इंदिरा गांधीं यांच्या डोळ्यातून दुःखावेगाचे अश्रू वाहत होते” असे त्यांनी मुंबईला समालोचनात ऐकले होते. “तुझ्या बातमी मध्ये त्याचा उल्लेख नाही, तो कर”, असा संदेश होता.
त्याला टेलिप्रिंटरवर उत्तर देण्या ऐवजी मी मेढेकरांना फोन केला. “मी इंदिरा गांधी यांचे अश्रू पाहिले नाहीत. कोणीही पाहणे शक्य नाही एव्हढे अंतर होते. दोनच वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या, संजय गांधी, यांच्या अपघाती मृत्यूनंतर देखील त्यांनी आपल्या शोकाचे जाहीर प्रदर्शन केले नव्हते. अश्रू ढाळले नाहीत (२३ जुन १९८०)” याचे मेढेकर यांना स्मरण करून दिले. “तेव्हा आकाशवाणीवर च्या बातमीवर विश्वास ठेवू नका“, असे मी निक्षून सांगितले.
याबरोबरच माझी कव्हरेज ची कहाणी संपली.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800