हेन्री किसिंजर मुळे मिळाली एक शिकवण
युनायटेड न्यूज ऑफ इंडिया मध्ये अगदी नवखा असताना जुलै १९७१ आणखी एक प्रसंग घडला. त्याने मला वृत्तसंस्थेमधले आणखी काही बारकावे शिकवले.
या वृत्तसंस्थेमध्ये सहा- सहा तासांच्या चार शिफ्ट असायच्या. सकाळी नऊ ते दुपारी तीन, दुपारी दोन ते रात्री आठ, संध्याकाळी सहा ते रात्री बारा, रात्री नऊ ते पहाटे तीन आणि पहाटे तीन ते सकाळी नऊ असे काम चालत असे.
पहाटे तीन ते सकाळी नऊ या पाळी मध्ये दोघेच असू. त्यातला एक सीनियर चीफ सब एडिटर आणि त्याच्या हाताखाली अगदी नवखा माझ्यासारखा उपसंपादक म्हणजे सब एडिटर असायचा.
त्यादिवशी हर्षवर्धन हा माझा सीनियर सब एडिटर आणि मी असे दोघे होतो. तीन वाजता चहा आणि एक टोस्ट कॅन्टीनमध्ये मिळायचं. ते घेऊन हर्षवर्धन टॉयलेटला जातो असं सांगून गेला आणि बराच वेळ झाला तरी आला नाही म्हणून डोकावले तर तो मागच्या बाजूला खाटेवर झोपला होता हे मी पाहिले. दहा पंधरा मिनिटांनी त्याला उठवले आणि टेलिप्रिंटर वर आलेल्या परदेशी बातम्याचं भेंडोळं त्याला वाचायला दिल. अमेरिका आणि युरोप या भागातून येणाऱ्या बातम्यांचा ओघ त्यावेळी येत असतो.
हर्षवर्धन ने दिलेल्या भेंडोळ्याच्या निम्म्या बातम्या संपादनासाठी मी वाचायच्या होत्या. तसे मी वाचायला सुरुवात केली. पण थोड्याच वेळात हर्षवर्धन ‘ओ माय गॉड’ असे म्हणत उठला आणि बातम्याचे संपादन करायला त्याने मोठ्या गतीने सुरुवात केली, मी विचारले, काय झालं ? पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून नंतरचे दोन अडीच तास कामात तो पूर्णपणे गुंतून गेला होता. काहीतरी फार महत्त्वाचे घडले होते. काय ते त्याने नंतर शिफ्ट संपताना मला सांगितलं.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री हेंनरी किसिंजर त्या दिवशी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. ते दुसऱ्या दिवशी अमेरिकेला परत जातील असे गृहीत होते पण टेलिप्रिंटर च्या भेंडोळ्या मध्ये किसिंजर चीनमध्ये पोहोचले अशा बातम्या येत होत्या. त्याचे सर्व तपशील आणि त्याच्या अन्वयार्थ येत होता. भारताच्या दृष्टीनेच केवळ नाही तर सबंध आशियाच्या, जगाच्या राजकारणाच्या दृष्टी ने ही मोठी घडामोड होती.
ऑफिसमधून बाहेर पडताना हर्षवर्धनने मला थोडी कल्पना देऊन ठेवली होती की, कदाचित आम्हा दोघांना अकरा बाराच्या दरम्यान परत बोलवणं येईल, तेव्हा तयारीत राहा.
त्याप्रमाणे मी वेळेत पोहोचलो. तेव्हा मुख्य संपादक जी जी मीरचंदानी आणि वृत्तसंपादक बी आर पी भास्कर यांच्यासमोर हर्षवर्धन आपली बाजू मांडत होता असे चित्र मला दिसले. सगळे वातावरण गंभीर आहे हे मला तेव्हा स्पष्ट झालं. हर्षवर्धन ला फायरींग होतं. असोसिएटेड प्रेस या आमच्या सहयोगी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ही बातमी प्रतिस्पर्धी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या सहयोगी संस्थेने दहा ते पंधरा मिनिट उशीरा दिली होती आणि आमच्या यु एन आय च्या टेलिप्रिंटरवर वर आणखी दहा-पंधरा मिनिटांनी उशिरा गेली होती. याला जबाबदार हर्षवर्धन होता. उशीर अक्षम्य झाला होता आणि त्याबद्दल हर्षवर्धन ला खुलासा मागणं हे काम तेव्हा चालू होतं. तो गाफील होता आणि झोपला असावा असा अंदाज हे दोघे ज्येष्ठ संपादक बोलून दाखवत होते. त्याला कारणे दाखवा नोटीस टाईप झाली होती.
पण हर्षवर्धन ने नंतर केलेले संपादन खूप चांगले होते. विश्लेषणात्मक लिहिले होते ते भारतातल्या प्रमुख दैनिकांनी प्रसिद्ध केले होते, हे लक्षात घेऊन हर्षवर्धनची सुटका झाली.
हे सगळे माझ्या समोर घडले. माझा रोल त्यात काहीच नव्हता. परंतु वृत्तसंस्थेमध्ये रात्रंदिवस किती जागरूक राहावे लागते, डोळ्यात तेल घालून, न झोपता संपादन करावे लागते हा वस्तू पाठ मला तेव्हा मिळाला होता.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800