दुसरा धडा
त्या ऐतिहासिक दिवशी म्हणजेच ३१ जानेवारी १९७१ ला मी दुसरा एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकलो, तेही कोणी न सांगता, न शिकवता !
काश्मिरी अतिरेक्यांनी भारतीय विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले होते, त्याविषयी आमच्या युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने बातम्या द्यायला सुरुवात कशी केली हे मागच्या प्रकरणात सांगितलं.
त्यादिवशी दुपारी नऊ रफी मार्ग, या आमच्या मुख्यालयातील संपादक विभागात, हा दुसरा धडा आपसूकच शिकलो. भारताच्या इतिहास बदलून टाकणारी एवढी महत्त्वाची घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडली, पण स्वतः श्री भास्कर आणि कार्यालयात नंतर पोहोचलेले सहाय्यक वृत्तसंपादक श्री के पी के कुट्टी, यांनी अत्यंत शांतपणे बातमीचा संपूर्ण फ्लो हाताळलेला हे मी पाहिले, अनुभवले होते.
इंडियन एअरलाइन्स फोकर 28 फ्रेंडशिप गंगा नावाचे फ्लाईट श्रीनगर ते जम्मू इतक्या छोट्या अंतरावर उडान घेतलेले असताना काश्मिरी अतिरेक्यांनी पळून लाहोरला नेले होते. नॅशनल लिबरेशन फ्रंट नावाची संघटना यामागे होती या गोष्टी अर्थात नंतर कळत गेल्या.
रात्री उशिरापर्यंत जगभरातून बातम्या येत होत्या. या घटनेचे जगात उमटलेले पडसाद बातमीच्या रूपानेच येऊन जणू आदळत होते. तेव्हा भारतात टेलिव्हिजन नव्हते. आकाशवाणीच्या आणि बी बी सी च्या बातम्या ऐकणे एवढाच पर्याय आम्हाला उपलब्ध होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तसे करीत आम्ही सगळेच थांबलो होतो.
दुसरा दिवस आणि खरं म्हणजे त्यानंतरचा प्रत्येक दिवस, हा रोजच नवीन मोठमोठ्या घटनांच्या बातम्या घेऊन आला. हा संपूर्ण कालखंड ऐतिहासिक होता.
युनायटेड न्यूज ऑफ इंडिया तेव्हा नवी वृत्तसंस्था होती. बलाढ्य प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेशी मुकाबला करत आम्ही नवनव्या कल्पना लढवित बातम्या आणि लेख यांची निर्मिती करीत होतो. आमचे जनरल मॅनेजर आणि प्रधान संपादक, जी जी मीरचंदानी होते. ते आधी आकाशवाणीच्या वार्ता विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनी आकाशवाणीशी संबंधित प्रयोग केले. त्याला भास्कर आणि कुट्टी सर यांची खूप समर्थ साथ होती.
त्यावेळी यु एन आय कडे साधन सामग्री खूप तोकडी होती. या उलट स्पर्धक पीटीआय कडे रॉयटर या वृत्तसंस्थेची भागीदारी होती. त्यामुळे जागतिक बातम्या त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने येत आणि त्यांच्या माध्यमातून भारतातल्या त्यांच्या ग्राहकांकडे म्हणजे वर्तमानपत्राकडे आणि रेडिओ कडे या एकाच माध्यमातून -एकाच सोर्स कडून- भरपूर बातम्यांचा ओघ असे. आमच्या या तिघा श्रेष्ठींनी यावर छोटा कमी खर्चातला पण नामी उपाय शोधून काढला होता.
त्याचं नाव ‘मॉनिटर’ असं होतं. प्रत्यक्षात तो एका छोट्या खोलीत ठेवलेला सामर्थ्यशाली रेडिओ. त्यावरच्या (पूर्व पाकिस्तान डाक्का, इस्लामाबाद , लाहोर, कराची च्या) रेडिओ पाकिस्तान, चीन, सिलोन, नेपाळ अशा शेजारच्या देशांच्या रेडिओ केंद्रांच्या महत्त्वाच्या बुलेटीनच्या बातम्या ऐकणारा एक ज्येष्ठ पत्रकार दिवसभर बसलेला असायचा. भारताला स्वारस्य असणाऱ्या अशा राजकीय बातम्या ऐकून त्यांच्या नोट्स काढून भास्कर किंवा कुट्टी यांच्याकडे टाईप करून त्या पोहोचायच्या. या दोघांचे शेजारच्या राष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे ज्ञान एवढे होते की या नोट्स वरून भारताच्या दृष्टिकोनातून बातम्या नव्याने ते लिहून यु एन आय वर ग्राहकांसाठी टेलीप्रिंटरवर वेगाने गेलेल्या असायच्या.
भास्कर यांच्या कौशल्याचा एक नमुना त्या वेळा पाहायला मिळाला. या मॉनिटरवर त्यादिवशी रेडिओ पाकिस्तान वर बातमी होती की झुल्फिकार अली भुट्टो आणि शेख मुजिबूर रहेमान यांना पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने डाक्क्याहुन लाहोर विमान तळावर आणले आहे. नंतरच्या बुलेटिन मध्ये अतिरेक्यांनी अपहृत विमान उडवून लावलं अशी बातमी ऐकायला मिळाली. भास्कर यांनी मॉनिटरच्या माध्यमातुन लिहिलेल्या बातमीत ‘त’ वरून ‘ताक भात’ ओळखून यु एन आय साठी बातमी लिहिली :
‘भुट्टो आणि शेख मुजिबुर रहमान यांच्या डोळ्या देखत अतिरेक्यांनी अपहृत विमान उडवून लावलं.’
त्यानंतर बी बी सी च्या बुलेटिन मध्ये तंतोतंत याच मजकूराची बातमी प्रसारित झाली. याचा अर्थ ती बातमी आमची होती. दूरचित्रवाणी नसतांनाच्या काळात आमच्या दृष्टीने हा आमच्या वृत्तसंस्थेचा मोठा गौरव होता.
अशा प्रसंगाच्या मालिकेनंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं, पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, बांगला देशाची निर्मिती झाली, आशियाचा नकाशा बदलला, इतिहास अन भूगोल बदलाला. त्याची सुरुवात झाली त्याच दिवशी माझ्या इंग्रजी वृत्तसंस्थेच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
कितीही मोठी घटना घडली तरी आपण विचलित न होता बातमी लिहिली पाहिजे, संपादन शांतपणे केले पाहिजे हा दुसरा धडा त्याच दिवशी मी शिकलो, हे कसे विसरू ?

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर, विश्वकर्मा विद्यापीठ सेन्टर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800