Friday, March 14, 2025
Homeसाहित्य'बातमीदारी करताना' ( २६ )

‘बातमीदारी करताना’ ( २६ )

चक्रव्यूहात शरद जोशी
शेतकरी संघटनेच्या अभुतपूर्व आंदोलनात शरद जोशी यांचे जीवावर बेतले होते. तो प्रसंग प्रत्यक्ष कव्हर करणारे किरण ठाकूर या भागात सांगत आहेत…

त्या 12 नोव्हेंबर १९८० रोजी आम्ही उपस्थित असलेले सगळेच बातमीदार काळजीत होतो. रास्ता रोको आंदोलनामुळे ट्रक ड्रायव्हर संतप्त झालेले होते. शरद जोशींना शिवीगाळ करत होते. “कहा है वो शरद जोशी” अशा पद्धतीने चौकशी करत होते. वातावरण खूप तापले होते. या प्रसंगाचा मी साक्षीदार होतो. संध्याकाळपर्यंत माझ्या मुंबई कार्यालयाला एसटीडी कॉल करून बातमी देऊन झाली होती. त्या दिवशीचे माझे काम तसे चोख झाले होते. तथापि वृत्तसंस्थेच्या बातमीदारी मध्ये अंगभूत असलेल्या मर्यादेमुळे थोडक्यात आणि वेगाने बातमी द्यावयाची असल्यामुळे मला अपेक्षित असलेल्या मजकुरात ते पूर्णपणे व्यक्त होत नव्हते.

शेतकरी संघटनेच्या अभूतपूर्व आंदोलना चे वार्तांकन कॅमेऱ च्या माध्यमातून करत असणाऱ्या विजय परूळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा यांनी रिपोर्ताज पद्धतीने लेखमाला लिहिली ती पुण्याच्या साप्ताहिक माणूस ने क्रमश: प्रसिद्ध केली. त्या आधारावर “योद्धा शेतकरी” या शीर्षकाचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले.

आज इतका अवधी उलटल्यानंतर हा मजकूर लिहीत असताना परूळकर यांच्या रिपोर्ताज मधील थोडा अंश आहे तसाच सादर करणे योग्य होईल असे वाटते. (योद्धा शेतकरी, १० जून १९८१, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक १२६ ते १३०)

बारा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता शरद जोशी आंदोलकांना सांगत होते :-
“गेले तीन दिवस रस्ता बंद असल्यामुळे अनेक ट्रक्स अडकून पडले आहेत. ड्रायव्हर मंडळींचा धीर सुटत चालला आहे. काही ठिकाणी एस आर पी नी, त्यांना भडकविल्यामुळे काल रात्री काही खेड्यामध्ये लोकांना मारहाण केली आहे. काही ठिकाणी ट्रक ड्रायव्हर च्या मदतीने शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे आपले ट्रक ड्रायव्हरांशी भांडण नाही. पोलीस त्यांच्यात आणि आपल्यात भांडण लावून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण त्यांना तशी संधी देता कामा नये. आज माझं कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे. तुंबलेला ट्राफिक सोडून देण्याचा आम्ही वादा केला आहे. पण रस्ता आंदोलन मागे घेतलेले नाही हे ध्यानात ठेवा..
आज जर पोलीस आणि एस आर पी रस्त्यावरचे अडथळे दूर करून ट्रक्स सोडू लागले तर त्यांना प्रतिबंध करू नका.’ हा तुंबलेला ट्राफिक सुटला की खुशाल पुन्हा रस्ता आडवा.. अधिकाऱ्यांनी मला हमी दिली आहे की रस्ता अडवून त्यांना आम्ही शांततेने अटक करू. लाठीहल्ला करणार नाही हा तुंबलेला ट्रॅफिक एकदा सुटला कि पुन्हा तुम्ही रस्ता आडवा. पोलीस आले तर शांतपणे अटक करून घ्या.”

आंदोलक शरद जोशींचा आदेश ऐकत होते आणि पोलिसांना सहाय्य करून रस्ता मोकळा करून देत होते. आंदोलनांचा हा प्रकार मला तरी सर्वस्वी नवीन होता.

रस्त्यावरील अडथळे दूर करत आंदोलकांना सूचना देत शरद जोशी पुढे चालले होते वडाळीभोई च्या आसपास दीड-दोनशे ट्रक अडकून पडले होते. ट्रक च्या डबल- ट्रिपल लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. दोन ट्रक्स यू-टर्न करण्याच्या प्रयत्नात आडवे अडकले होते. इथे आंदोलकांनी रस्ता रोको करण्याएवजी ट्रक ड्रायव्हर्सनीच संगनमत करून रस्ता अडकल्याचे चित्र दिसत होते. हा गोंधळ सोडवल्या या खेरीज गाड्या पुढे जाणं शक्य नव्हतं. शरद जोशी आणि माधवराव बोरस्ते गाडी घेऊन पोहोचले. त्यांच्या ड्रायव्हरने रस्त्यावरून उतरून गाडी शेतात पार्क केली. शरद जोशी खाली उतरून ड्रायव्हरशी बातचीत करीत होते. त्यांची समजूत करीत ट्राफिक जाम सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. पहाऱ्यावर असलेले एस आर पी इकडे तिकडे फिरत होते. ट्रक ड्रायव्हरशी हास्यविनोद करीत होते. अधिकाऱ्यांची कार आणि एसआरपीच्या बसेस येऊन दाखल झाल्या. डीएसपी वर्मा आणि कलेक्टर मागो हेल्मेट घालून खाली उतरले. “शरद जोशी कौन है, कहा गया है” हा प्रश्न चिडलेले ड्राइव्हवर विचारत होते. काही जण म्हणत होते “एस आर पी वाले तो उस को गाली देते है .. उसकी वजह से तकलीफ हम लोगो को हुई है”.

काही सरदारजी आरडाओरडा करत सांगत होते “वो उदर देखो धुवा निकल रहा है की जरूर हमारे ट्रक जला दिए है .”

आसपास च्या ड्रायव्हर्सना ही मोठी चिथावणी होती ती. लांबवर धुराचा प्रचंड लोळ आकाशात उठलेला स्पष्ट दिसत होता. सर्वच जण आपापल्या भाषेत अर्वाच्य शिव्या देत होते. ‘कहा है शरद जोशी ? उसकी बोटी बोटी उडा देंगे..” असा कोलाहल माजला होता.

विजय परुळकर आपल्या गाडीत शिरले. शंकर वाघ यांना जवळपास ओढत निघाले. त्या पाठोपाठ आम्ही बातमीदार, शरद जोशींचे काय झाले या काळजीने बातमीसाठी त्यांच्या दिशेने निघालो. सर्वच भरधाव वेगाने शेतातून मिळेल तसे पुढे सरकत गेलो. कारण हायवेवर रास्ता रोकोमुळे छोटी सायकल देखील चालणे अशक्य होते. एका अर्थाने शरद जोशी आपल्याच चक्रव्यूहात अडकले होते.

जरा वेळाने आम्ही शरद जोशी यांच्या मोटारसायकल जवळ पोहोचलो. आम्ही पाहिलेल्या हल्लकल्लोळाची काही खबरबात त्यांना नव्हती. आंदोलकांनी पेटवून दिलेल्या वाहनांच्या जवळ थांबून ते ट्रक ड्रायव्हर ची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. परुळकर आणि शंकर वाघ यांनी जोशींना आपल्या गाडीत खेचून भरधाव वेगाने नाशिक कडे जायला सुरुवात केली.

एकंदरीत आंदोलकां सारखीच आमची पत्रकार पत्रकारांची देखील काही धडगत नव्हती अशी परिस्थिती होती. शरद जोशी परुळेकरांच्या गाडीतून निघून गेले, परंतु आम्ही पत्रकार संतापलेल्या ट्रक ड्रायव्हर चे म्हणणे ऐकत नोट्स काढत तेथेच उभे राहिलो. आमचे काम संपवत नाशिक ला पोहोचून घाईघाईने कॉल वर या बातम्या दिल्या. तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेले होते.

शरद जोशी आणि त्यांची शेतकरी संघटना यांच्या प्रारंभीच्या काळात, वृत्तसंस्थेचा बातमीदार म्हणून मी केलेल्या कव्हरेज मधला थोडासा भाग याप्रमाणे आठवणीने मराठीत प्रथमच लिहिलेला आहे.

शरद जोशी यांचे झंझावाती जीवन, त्यांचे तत्त्वज्ञान “राजकारणात प्रवेश करणार नाही” असे आश्वासन अनेक वेळा जाहीरपणे देणारे, पण प्रत्यक्षात नंतर “स्वतंत्र भारत पक्ष” स्थापन करणारे, आणि संसदेत जाऊन शेतकऱ्यां ना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा यासाठी शेवटपर्यंत धडपडणारे शरद जोशी मी पाहिले.

नाशिकच्या आंदोलनात तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्या संध्याकाळी पुण्याला निघताना माझ्या आईच्या हातची पिठलं भाकरी माझ्याबरोबर खाऊन मला त्यांच्या जीप मधून सोडून देणारे शरद जोशी मी पाहिले. अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर आयुष्याच्या सायंकाळी प्रकृतीसाथ देत नसताना देखील माझ्या आग्रहाखातर फ्लेम युनिव्हर्सिटी येऊन आमच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला आलेले शरद जोशी हे देखील मी पाहिले आहेत. आता त्यांचे आयुष्य, राजकारण यश-अपयश यावर प्रचंड लिखाण झाले आहे, होत राहील. मी तसे काही विस्तृत लिखाण करतो आहे असा माझा दावा नाही. फक्त वृत्तसंस्थेचा बातमीदार या नात्याने त्या आंदोलनाचा छोटा हिस्सा शब्दबद्ध केला आहे.

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा. डॉ. किरण ठाकूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित