मृत्यूचे ७२ शब्द
पत्रकारिता विषय शिकविताना आलेले अनुभव आणि केलेले प्रयोग याविषयी (भाग २७) मध्ये लिहिले. बातमीदारी करणे आणि शिकविणे या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आणि परस्परपूरक असल्यामुळे अधून मधून थोडी सरमिसळ होईल.
आज २९ व्या भागात मराठी वर्तमानपत्रात शब्दांची निवड याविषयी थोडेसे :-
दैनिक सकाळ मध्ये खुप सोपं लिहावं लागे. संस्कृत आणि मराठी बोजड शब्दांना फाटा द्यायचे प्रशिक्षण आम्हाला रोज मिळायचे. बातमी किंवा लेख लिहिताना, उपसंपादक म्हणून बातमीदारांचा मजकूर दुरुस्त करताना असं शिक्षण मिळायचं. माझे ज्येष्ठ सहकारी हसत खेळत कधी कान पिरगळत शिकवायचे. मी आणि माझे समवयस्क सहकारी वाद घालत असू. संपादक नानासाहेब परुळेकर यांना हे चालायचे नाही, आपला वाचक टांगेवाला आहे. त्याला समजेल असे साधे सोपे मराठी शब्दच वापरले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.
एखाद्यावेळी वरिष्ठांची नजर चुकून आमच्यासारख्या तरुण-तरुणींनी संस्कृत जड शब्द वापरला तर दुसऱ्या दिवशी मिटिंग मध्ये किंवा मेमो मधून खरडपट्टी व्हायची. एक उदाहरण: कुणी एक मोठी व्यक्ती स्वर्गवासी झाली. आमच्या वर्तमानपत्रात “प्राणोत्क्रमण झाले” असे छापून आले. त्यादिवशी सगळ्यांची चंपी झाली. निधन झाले हे सामान्य वाचकाला समजते. शिवाय तीन अक्षरी शब्द वापरला तर जागेचा सदुपयोग होतो. हे इतके ठासून त्यांनी मिटिंग मध्ये सांगितले की आयुष्यभर मी प्राणोत्क्रमण हा शब्द एकदाही वापरला नाही !
काही वर्षांनी पत्रकारितेचा शिक्षक म्हणून मला देखील विद्यार्थ्यांकडून याच पद्धतीची चर्चा ऐकायला मिळायची. मराठी भाषा या विषयात पारंगत असलेले आणि साहित्याची ओढ असलेले मराठी विद्यार्थी अधून मधून नेहमी वाद घालायचे. “मराठी अस्मिता” हा एक हमखास चलनी नाण्यासारखा विषय असायचा. शहरी आणि ग्रामीण भाषा, मुंबई पुण्यातील शुद्ध भाषा असे वादाचे आणि चर्चेचे विषय असायचे. खेड्यातल्या मुलांना त्यांच्या भाषेमुळे न्यूनगंड येऊ नये असा प्रयत्न मुद्दाम मी करीत असे. काहीवेळा मी हाच विषय माझ्या लेक्चर चा उस्फूर्तपणे ठेवत असे.
“देहावसान” झाले या शब्दावरून एकदा मी मुद्दाम चर्चा सुरू केली. मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपण आज बघू या, अशी सुरुवात करून मृत्यूशी संबंधित सर्व प्रकारचे शब्द सांगा आपण ते फळ्यावर लिहून बघू असे सांगून प्रत्येकाने एक तरी शब्द सांगितलाच पाहिजे असा आग्रह धरला. सुरुवात ठिकठाकच झाली, पण नंतर सुमारे दोन तास खेळ रंगत गेला. फलकावर एकामागून एक शब्द विद्यार्थी लिहायला लागले. अशी यादी तयार व्हायला लागली.
मृत्यू आला. निधन झाले. प्राणोत्क्रमण झाले. देहावसान झाले. पंचतत्वात/पंचत्वात विलीन झाले. प्राण ज्योत मालवली. अंतिम श्वास घेतला, खून झाला. जीव गेला, भोसकून, गुदमरून, आत्महत्या, प्रायोपवेशन, ठार झाला.पिंडाला कावळा शिवला. अर्ध (पोस्ट) कार्ड लिहिलं. जीव गेला, जीव घेतला, इच्छापत्र लिहिलं. काळ्या फ्रेम/बॉर्डर मधला फोटो लावला. कावळा शिवला, मेला, मारला. मरला. हत्या झाली. शिरच्छेद केला, शिरकाण झाले, राम बोलो, बोलो भाई राम, वीर मरण, हौतात्म्य, गारद करणे/ होणे, प्रेत यात्रा निघाली. देवाज्ञा झाली, अंतिम श्वास घेतला, मढे, अशी यादी लांबत गेली.
मुलं /मुली ना आता मजा येऊ लागली. एका ला मोजायला ठेवले होते. सत्तर शब्द झाले, तेव्हा आता थांबू या असे मी सांगायला लागलो.
तेव्हा, एकाने चुळबूळ करत हात वर केला. सर. मी खूप ग्रामीण भागातला एक शब्द सांगू इच्छितो. चालेल का म्हणून विचारले. सांग म्हटल्यावर त्याने बिचकत सांगून टाकलं. “सर, आमच्या गावाकडे “म्हातारी खपली” असं सर्रास म्हणतात.” मला देखील हा शब्द नवीन होता. बोर्डावर लिहायला सांगितलं. इतर शहरी विद्यार्थ्यांना तर गंमत वाटली.
मग दुसरा एकाला त्यामुळे स्फूर्ती आली. त्याने आणखी एका शब्दाची भर घातली. “म्हातारा गचकला” एव्हाना बहात्तर शब्द झाले होते. त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ते लिहून घेतले !
मध्ये इतका काळ लोटला. गेल्या काही वर्षात मोल्सवर्थ च्या मराठी- इंग्रजी शब्ब्दकोशाच्या निर्मितीचा अभ्यास करून एक छोटी पुस्तिका लिहिली. (http://vuccd.com/james-thomas-molesworth-marathi-english-dictionary-project/) मूळ इंग्लंड मध्ये जन्मलेल्या या सोल्जरने १८१८ ते १८७१ या काळात सात आठ शास्त्रींच्या मदतीने साठ हजार मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत भाषांतरीत केलेला शब्दकोश मोल्सवर्थ ने संकलित, संपादित केला. केवढे मोठे काम त्याने केले असे कौतुक अधून मधून मी करत असतो.
आता मृत्यू विषय शब्दा बद्दल हे लिहीत असताना शब्दकोशाच्या डिजिटल आवृत्ती बाबत देखील उल्लेख मी केला होता. ते आठवून मी ‘मरण ’ शब्दाला सर्च दिला. https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?page=633
तेव्हा – दीडशे वर्षांपूर्वी- प्रचारात असलेले, आता विस्मरणात गेलेले, त्यातले अनेक शब्द समोर आले. त्याचे इंग्रजी भाषान्तर पाहायला मिळाले. त्यातले काही मराठी शब्द पोर्टलच्या या लेखात नमुन्या दाखल द्यावेसे वाटले ते पहा, पण या लिंकवर देखील नजर टाकून पाहा :
आजचें मरण उद्यावर लोटणें, आपल्या मरणानें मरणें/ आणणें, मरणाच्या दारीं बसणें, मरणाला रात्र अडवी करणें, मरणीं. मरणें, मरणकळा, मरणतरण, मरणदशा, मरणपंथ. मरणसोंग, मरण्या जिण्यास उपयोगीं पडणें, झाडणें, मरमरून जाणें/पडणें, मरस मरे, मरूं घालणें, मरूं मरूं करणें, मरणेच्छा, मरणोन्मुख, मरतडणें. मरतमडें, मरतमढें (मरणें आणि मडें ) तवड मरतवडा’ (मरणें) मरतवांझ, मरतसंभाळ, (जेवण्याचा-झोपेचा -बसण्याचा -कष्टाचा -लिहिण्याचा -कामाचा—मरतसंभाळ); मरता आहार, मरतीक (मृतक ) मरती, भावना, मरती मरतुकडा, मरतुंगडा, मरतंगडा, मरण तुकडा, मरदगाजी, मरदमाणूस, मरदा मरदाना मरदाई, मरमर मर मरणें, मरमरा, मरवडा
(तुला काय मरवडा आला) मरवड.
ह्या लेखात समाविष्ट केलेले सर्व शब्द कमी पडतील याची जाणीव अर्थातच आहे. यात भर टाकायची असेल तर स्वागतच आहे.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
श्री.किरण ठाकूर यांनी शाब्दकथांचाही विषय प्रय त्न करून नव्याने करता येऊ शकेलसे वाटते. वाटते.त्यांना मित्रवर्य श्री.अशोक श्री.रानडे आनंदाने विषयात भरघालण्यास मदत करू शकतील असे वाटते.आजही शब्दांच्या उत्पत्तीची माहिती देणार् या कोशाचा प्रकल्प श्री.राजा दीक्षित यांच्यामार्फत प्रयत्न करूनकरता येईलसे वाटते.
Uttam lekh
Aajchya tarun batmidarana margdarshak.
किरण ठाकूर यांनी मृत्यु या शब्दाचे अनेक समानार्थी माहित असलेले, विस्मरणात गेलेले,बोली भाषेतले, ग्रामीण असे अनेक
शब्दांची जंत्री देउन लेख फारच माहितीपूर्ण,मनोरंजक केलाय.
मराठी भाषेची समृद्धी थक्क करणारी.