ज्ञानदाता संपादक
मुख्यतः वृत्तसंस्था आणि वृत्तपत्र पत्रकारितेत मी रमलो. मराठी मासिकाचं जग वेगळं. येथल्या मालक संपादकाच्या व्यथा वेदना, आणि आनंद या विषयीचा हा तिसावा भाग…..
मासिकाचा वाचक मी खूप आधीपासून होतो. पण त्याच्या संपादक प्रकाशकांची ओळख झाली ती 1969- 70 मध्ये. वाङ्मयशोभेचा रौप्य महोत्सव होऊन चार-पाच वर्षे होऊन गेली होती. मनोहर महादेव केळकर यांचा मुलगा श्रीकर वृत्तविद्या अभ्यासक्रमातला माझा सहाध्यायी. त्यामुळे पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या त्यांच्या घरी व त्या समोरच्या वाङ्ममय शोभेच्या कार्यालयात मी नेहेमी जाऊ येऊ लागलो. त्या परिवारातला एक सदस्य होऊन गेलो.
पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला आम्ही वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके यांच्या विविध अंगांचा अभ्यास केला. पण कोणत्याही उद्योगसमूहाचा पाठबळ नसलेल्या, मराठी भाषेत निघत असल्यामुळे खपाची आणि जाहिरात मिळण्याची मर्यादा असलेल्या एखाद्या वाङ्ममयीन मासिकाचा इतिहास शिकायला मिळालेला नव्हता. अशा मासिकाचं संपादन कसं करतात हे उमगलं नव्हतं. त्याचं अर्थशास्त्र उमजलं नव्हतं. मनोहर महादेव केळकर- आमचे नाना- यांना भेटत राहिलो आणि या गोष्टीचे ज्ञान मिळत गेलं.
नाना पाच नोव्हेंबर 1994 रोजी गेले हे कळलं तेव्हा सर्वप्रथम मनांत आली ती या ज्ञानदा संपादकाविषयीची कृतज्ञतेची भावना.
वृत्तपत्र व संज्ञापन शास्त्राचा विद्यार्थी मी आजही आहे. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नोकरी केल्यामुळे नियतकालिके कशी निघतात आणि कशी बंद पडतात याची माहिती अगदी जवळून मिळवलेली आहे. त्यामुळे नानांनी वाङ्ममयीन विषयाला लिहिलेलं मासिक पाच दशकांहून अधिक काळ चालवीलं या एकाच मुद्द्यावरून मला त्यांच्या विषयीचा आदर वाढत गेला.
एकाच व्यक्तीने अर्धशतकाहून जास्त काळ अखंडितपणे स्वतःच्याच मालकीची मासिक प्रसिद्ध करणे हा जागतिक विक्रम असावा असं मला वाटतं. माझ्याकडे त्याचा पुरावा नाही. असा विक्रम इतर भाषात, अन्य देशात कोणाचा असला तरी नानांच्या वाङ्ममयीन सेवेचे आणि तिच्या विषयीच्या निष्ठेचे मोल कमी होत नाही.
कागद टंचाईच्या काळात 1939 मध्ये सुरु झालेलं हे मासिक कोणाच्याही आर्थिक पाठिंबा विना 600 पेक्षा जास्त वेळा सातत्याने प्रसिद्ध करणं ही कामगिरी मराठी पत्र सृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घ्यावी नोंदवावी अशीच आहे, हे नक्की.
मराठी मासिकांची आणि साप्ताहिकांची गेल्या चार-सहा दशकांत कशी परवड झाली आणि एकामागून एक ती कशी बंद पडली याची मराठी वाचकांना आठवण करून द्यायला नको. पण टाइम्स ऑफ इंडिया ची भावंडं असलेली इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, इव्हनिंग न्यूज ऑफ इंडिया, अलीकडचे इंडिपेंडंट आणि सिंघानिया उद्योग समूहाच्या इंडियन पोस्ट, त्यापाठोपाठ अंबानींच्या ऑब्झर्वर ऑफ बिजनेस अँड पॉलिटिक्स समुहाच्या नियतकालिकाची नोंद घेतली पाहिजे. कारण या इंग्रजी प्रकाशकांकडे कशाची वानवा होती ? उत्तम तंत्रज्ञान, छापखाने, प्रशिक्षित पत्रकार, देशातील इंग्रजी वाचक मिळण्याची आणि त्यामुळे भरपूर जाहिरातीचे उत्पन्न मिळण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. तरीही त्यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागला. वाङ्ममय शोभेचे आणि नानांचे यश मोजायचे ते या पार्श्वभूमीवर.
नाना केळकर यांनी या पन्नास वर्षात अगणित साहित्यिक, कवी, चित्रकार एवढेच नव्हे तर व्यंगचित्रकार यांना मराठी साहित्याच्या दरबारात बोट धरून आणलं आणि त्यांना मनसबदार, सुभेदार होताना पाहिलं. गंगाधर गाडगीळ, जी ए कुलकर्णी, मधू मंगेश कर्णिक, वसंत सरवटे आणि बंडमंत्री अशा त्याच्या काळातील नवागतांना त्यांनी प्रकाशात आणलं. ना सी फडके, श्री म माटे, वि स खांडेकर, पु भा भावे किंवा ग दि माडगूळकर यांचं सकसं साहित्य वाचकांना दिल. मनमोहन नातु यांची “राधे तुझा सैल अंबाडा” ही त्यावेळी धमाल माजवणारी कविता तर नानांच्या संपादकीय नजरे ने अक्षरशः कचऱ्याच्या पेटीतून हेरली होती !
साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर हे नानांचे काका. त्यांनी किंवा मातोश्री गिरिजाबाई यांनी वाङ्ममय शोभेला किंवा नानांच्या मनोहर ग्रंथ मालेला प्रारंभी मदत करणं अगदी स्वाभाविक होतं. पण त्यांनी केवळ केळकर कुटुंबाचे मासिक असं स्वरूप न ठेवता त्यात मृणालिनी देसाई, भानू शिरधनकर, शांताराम आठवले, अशोक मोरे, उषा परांडे, वि वा बोकील, नारायण धारप अशा कितीतरी साहित्यिकांना आपले कुटुंबीय करून घेतले होते. बीभत्स रस सोडला तर इतर सर्व रसांना आपल्या मासिकात आणि ग्रंथ मालेत त्यांनी स्थान दिलं होतं. नानांनी त्यावेळच्या कुठल्याही साहित्यिक कंपू शी जवळीक केली नाही. तसंच सवंगतेकडे वळून पैसा कमविला नाही. त्यामुळेच कदाचित त्यांच्या वाटेला जाहीर मानमरातब अन कोड कौतुक आलं नाही.
आपल्या आयुष्याच्या सायंकाळी नानांना अनेक व्याध्यांनी घेरलं होतं. पत्नी स्नेहलता बाई देवाघरी गेल्या. वाङ्ममयशोभेचं अर्थकारण बिकट झालं. त्यांच्या बोलण्यातून विषादाची छटा अधुनमधून डोकावयाला लागली होती. ”स्वभावाला औषध नाही आणि दैवा पुढे गती नाही” ही आपली आत्मकथा त्यांनी प्रकाशित केली. त्यात बऱ्याच ठिकाणी हा विषाद खुणावतो. त्यांच्याशी बोलताना सुद्धा ते अधून मधून बोलून दाखवायचे. “संपादक -मालका पेक्षा कागद विक्रेत्याने आणि रद्दी दुकानदाराने कशी माया गोळा केली बघा” असे गमतीने म्हणत.
आचार्य अत्रे, ना सी फडके, किंवा ग वा बेहरे यांच्यासारख्या दिग्गजांना आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने धडा शिकवणाऱ्या पण अन्यथा सतत निर्व्याज खोडकर पणाने आपल्या विशाल परिवाराला सुख देणाऱ्या नानांच्या स्वभावात हा विशाद मूळचा मुळीच नव्हता. त्यामुळे अशी छटा दिसली तरी ती तात्पुरती असायची. लेखक, कवी, नवागतांचे मान्यवर झाले आणि आपल्या वाङ्मयशोभेला विसरले याची खंत त्यांना वाटे. मात्र रौप्य महोत्सवाला सन्मानपूर्वक आग्रही आमंत्रण देऊन सुद्धा हे मान्यवर आले नाहीत, याबद्दल ते कष्टी झाले. पण त्यांचा राग राग करीत बसले नाहीत. अंगात शक्ती असेपर्यंत “गवसले ते दावावें, सुचले ते सांगावे, सुगंधीत ते आदरावे, बकुळ वा प्राजक्त” या वृत्तीने त्यांनी वाङ्ममयशोभा आपल्याच पद्धतीने आणि शैलीने प्रसिद्ध केला.
केळकरांना व्यवहार जमला नाही, काळाप्रमाणे त्यांना बदलता आले नाही अशी अनेकांनी टीका केली पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. असंख्य वाचक आणि असंख्य वर्गणीदार यांना पत्ररूपाने भेटत राहिले. तोच त्यांचा ठेवा होता.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे संपादक डॉ हे वि इनामदार यांनी “वाङ्मयशोभेची कामगिरी मोलाची आहे. वाङ्ममय इतिहासात या कार्याचे महत्त्व असाधारण आहे” असे पत्र त्यांना 1977 मध्ये लिहिले. तेव्हा नानांना अतिशय आनंद झाला होता. धारवाडच्या एका गृहिणीने असं त्यांना लिहिलं होतं : “काही घरात शिरतांना भीती वाटते. उलट काही ठिकाणी जाताना मोकळं वाटतं. काहीतरी नवं ऐकायला शिकायला मिळेल आणि हो, भीड, कशाला काही तरी खायला मिळेल असे वाटते मला. हे मासिक त्या दुसरा घरा सारखे वाटते.”
नानांच्या अखेरच्या काळात त्यांनी आपल्या पन्नास साठ वर्षाच्या कारकिर्दीचा स्वतःच्या मनाशी काही हिशोब केला असेल का ? कळायला मार्ग नाही. पण त्या वेदनामय काळात मला वाटतं या अशा पत्रांच्या मजकुरामुळे त्यांच्या वेदना कमी केल्या असतील. ही पुंजी घेऊनच ते निजधामाला गेले असावेत असं मला सारखं वाटतं”.
(नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १३. १. ११९४ रोजी सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख)
नाना च्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अविनाश, स्नुषा वसुंधरा, आणि कन्येवत असणाऱ्या सुषमा देशपांडे यांनी ९० पानी देखणी स्मरणिका २१ मार्च २०१३ रोजी प्रकाशित केली. विशेष म्हणजे अतिशय मेहेनतीने डिजिटल संग्रह विनामूल्य सर्वांना उपलब्ध करून दिला:
मनोहर महादेव केळकर संपादित ‘वाङ्यमशोभा’ या मासिकाने मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा सहभाग असलेले हे मासिक सलग ५५ वर्षे प्रकाशित झाले. मराठी साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘वाङ्मयशोभा’ मासिकाच्या ४८ हजार पानांना ‘ई-बुक’ चे कोंदण लाभले आहे. १९३९ ते १९९२ पर्यंतचे ५७३ अंक आता माहितीच्या महाजालात आणण्यात आले असून ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबद्दल कृतज्ञता
https://www.loksatta.com/mumbai/online-issue-on-vangmay-shobha-magazine-1592735/

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नानांना श्रध्दांजली वाहण्याच्या निमित्ताने ठाकूर सरांनी पुर्वी लिहिलेला लेख नानांचे सविस्तर कार्य डोळ्यासमोर उभे करतो.
नाना केळकर आणि वाङमयशोभा हे एक घट्ट समीकरण.
डॉ.किरण ठाकूर यांनी त्यांच्या छान आठवणी लिहील्या आहेत.
साहित्य क्षेत्रातील ही माणसे अनमोल आहेत.