समारोप
सेवानिवृत्त होताना जुन 1969 ते मार्च 2007 इतका प्रदीर्घ काळ पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाशी माझा संबंध राहिला. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रानडे इन्स्टिट्यूट या नावाने विख्यात असलेल्या इमारतीत माझं जाणं-येणं चालू राहीलं.
सुरुवात पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून. नंतर विविध अभ्यासक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम संशोधक या नात्याने आणि वर्तमानपत्र, वृत्तसंस्था यामध्ये कार्यरत असणारा पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचा क्रियाशील कार्यकर्ता अशा विविध नात्यांनी या वास्तूमध्ये जाणे-येणे कायम राहिले. तांत्रिक कारणाने पी एचडी चे रजिस्ट्रेशन पुणे विद्यापीठाच्याच कम्युनिकेशन स्टडीज विभागात मला करावे लागले. पण या पदवीसाठीचा पूर्ण अभ्यास आणि संशोधन रानडे मध्येच केले होते.
नियमाप्रमाणे वयाचे साठ सुरू होताच सेवानिवृत्त व्हायचे होते, त्याचे पत्र योग्य वेळी आले.
तेरा मार्च ला साठावे वर्ष लागले. त्या दिवशी सकाळी प्राणायाम- शवासन करताना या मातृसंस्थेचे ऋण कसे फेडायचे याचा विचार डोक्यात आला. पत्रकारितेत थोडे फार काही करू शकलो याचे श्रेय पूर्णतः दैनिक सकाळचे संस्थापक संपादक डॉ नारायण भिकाजी परुळेकर यांचे. त्यांना गुरू-दक्षिणा दिली नाही याची जाणीव झाली. नानासाहेब यांच्यावर अद्याप इंग्रजी भाषेत पुस्तक नाही. ते आपण लिहावे का असं डोक्यात आलं. उलट्या दिशेने विचार करण्याची तयारी सुरू केली. चिनार प्रकाशनचे संचालक श्री संजय नहार हे माझ्या सारखेच परुळेकर भक्त होते हे मला आधीपासून माहित होतं. ते माझ्यासारखेच रानडे चे विद्यार्थी. 13 मार्च ते 23 मार्च अशा दहा दिवसात डेस्कटॉप वर टाईप केलेला इंग्रजी मजकूर दिला तर 31 तारखेला माझ्यातर्फे विभागाला हे पुस्तक भेट म्हणून देऊ शकू का असं त्यांना फोन वर विचारलं. माझा मजकूर एक पानाचा देखील तयार नव्हता. माझ्या साहित्याची जुळवाजुळव करणे आणि पुस्तक संगणकावर लिहून पूर्ण करणे हे मला देखील वेळेशी शर्यत ठरणार होती. नानासाहेबांचे चरित्र एवढाच मुद्दा डोक्यात होता. संदर्भ सगळे गोळा करायचे होते. टाईप सेटिंग करून, कव्हर डिझाईन निश्चित करून, अंतिमतः प्रूफ रीडिंग छपाई, बाइंडिंग पर्यंतचे सर्व काम 31 मार्चला दुपारी चार पर्यंत पूर्ण करून देतो असं आव्हान स्वीकारल्यागत त्यांनी आश्वासन दिलं.
वृत्तविद्या क्षेत्रातील माझे गुरु प्रा. ल ना गोखले आणि विभागातील माझ्या उत्तराधिकारी प्रा डॉ उज्ज्वला बर्वे, आधी विद्यार्थी असलेला नंतर इंडियन पोस्ट दैनिकात सहकारी आणि नंतर प्रथितयश दैनिकात संपादक झालेला अभय वैद्य यांना खास आग्रह करून निरोपाला बोलवले होते. मुकुंद संगोराम, आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी यासारखे माझे पत्रकारितेतील आणि पुणे श्रमिक पत्रकार संघातील सहकारी आवर्जून उपस्थित होते. श्रमिक पत्रकार चळवळीत ज्यांचे बोट धरून मी काम सुरू केले ते श्री गोपाळराव पटवर्धन हे देखील उपस्थित होते.
डॉ एन बी परुळेकर, ‘A Pioneer in Modern Journalism in Indian Languages’ असं शीर्षक असलेल्या या पुस्तकाच्या पुरेशा प्रति घेऊन श्री नहार कार्यक्रमाला वेळेत आले. निमंत्रितांना एकेक प्रत सप्रेम भेट देऊन मी कृतकृत्य झालो. सेवानिवृत्त होताना इतकी छान संध्याकाळ कोणाच्या भाग्यात असेल ?
समारोप या सदराचा निरोप घेताना “बातमीदारी करताना” या शीर्षकाच्या आठवणी लिहिणे हे पूर्वनियोजित नव्हते. बातमीदार म्हणून नोकरी केली त्याला काही वर्षे उलटली होती. लेख लिहिणे तसेच पत्रकारितेचा विषय शिकवणे हे फ्री लांस चालू होते. या कामात देखील तसे थ्रील असतेच. निवृत्ती घेतली असली वेगवेगळ्या विषयावर छोटेमोठे लेख लिहिणे, पुस्तके लिहिणे हे हळूहळू चालू होते. आतापर्यंत मुख्यत: इंग्रजीतच लिहित गेलो. पुण्याच्या फ्लेम विद्यापीठात आणि नंतर विश्वकर्मा विद्यापीठात जमेल तसे शिकवणे चालू होते. नेहमीच्या लेखन प्रकारापेक्षा “ओकेजनल पेपर” हा संशोधन पत्रिकेचा नवा प्रकार म्हणून भावला. एका विषयावर सखोल अभ्यास करून रिसर्च पेपरच्या अंगाने लिहावे, ते विशिष्ट वाचक वर्गालाच आवडेल ही मर्यादा लक्षात घेऊन देखील ते लिखाण करावे असे मनाने घेतले. “गाजर गवत” या विषयावर एकदा आणि नंतर “मोल्सवर्थ चा मराठी इंग्रजी शब्दकोश” या विषयावर सविस्तर लिखाण करण्याचा संकल्प सोडला. खूप अभ्यास केला. दोन पुस्तिका सिद्ध झाल्या. विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने त्या प्रसिद्ध केल्या. कोरोनाची दोन अडीच वर्ष या कामासाठी सत्कारणी लागली.
माझ्या आयुष्यात यापेक्षा अगदी अनपेक्षित गोष्ट मोल्सवर्थ वरच्या इंग्रजी लिखाणामुळे घडली. मोल्सवर्थ शब्दकोशाच्या निर्मिती विषयक पुस्तकाच्या निर्मितीमुळे मुंबई, पुणे, सोलापूर आदी ठिकाणच्या दैनिकांनी सविस्तर बातम्या प्रकाशित केल्या. त्या वाचून आपल्या न्यूज टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपर्क साधला. त्यांच्याशी आधी थोडी जुजबी ओळख झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाचे संचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर इतर काहीही न करता आपल्या मनाप्रमाणे पत्रकारितेचा नवा प्रयोग त्यांनी सुरू केला होता.
सेवानिवृत्तीनंतर पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून एखादे नियतकालिक प्रसिद्ध करणे हे काम इतर अनेकांनी केले आहे. पण देवेंद्र यांनी मात्र स्वान्त सुखाय एवढेच ध्येय ठेवून आपले पोर्टल प्रसिद्ध करणे सुरू केले होते. त्यांच्या पत्नी अलका यांनी आपल्या एम टी एन एल च्या नोकरीनंतर या पोर्टल चे डीटीपी आणि अनुषंगिक कामाची जबाबदारी घेतली आहे. त्यातून हे पोर्टल सुरू झाले. बातमीदारी तील अनुभव मी लिहावे असा आग्रह त्यांनी धरला.
हे लिखाण मराठीत करायचे होते. त्यामुळे मी नकार दिला. याचे कारण आयुष्यभर मी इंग्रजीतच बातमीदारी केली. मराठी लिहिण्याची गरजच नव्हती त्यामुळे हाताने पेन चा वापर करून लिखाण कधी केलेच नव्हते. आता तर वयामुळे पेनने लिहिले जमत नाही. हाताला कंप येतो. त्यामुळे कधी प्रयत्नच केला नव्हता. माझी नात देवयानी हिने गुगल व्हॉइस टायपिंग या ॲप्स चा वापर करून मराठी सहजपणे लिहिता येते हे शिकविले. अडचण आली तेव्हा तिने मदत केली. म्हणून “बातमीदारी करताना” या शीर्षकाच्या आठवणी लिहायला सुरुवात केली.
दर शुक्रवारी हे सदर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी भुजबळ दांपत्याने पार पडल्यामुळे. गेले 32 शुक्रवार मी अनुभव लिहीत गेलो. वाचकांचा प्रतिसाद मिळाला म्हणून वयाच्या 76 व्या वर्षी हे धाडस केले. आत्ता थांबायची वेळ आली आहे म्हणून निरोपाचा हा लेख लिहीत आहे. भुजबळ पती पत्नी यांचा स्नेह या निमित्ताने लाभला हे माझे भाग्य. त्यांचे आणि वाचकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आता थांबतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार .
– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
अरेरे !कधीतरी थांबायचे असतेच.योग्य म्हणजे यशस्वितेच्या ऐन भरात असताना थांबतो;तोचतुर.पण हे चातुर्य माझ्यासारख्या भुकेल्यांच्या मानसिक समाधानावरहीआघात करते.असो.निर्णय स्वीकारून आजवर जे आपल्यामुळे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मीही हे लांबलेले पुराण लांबलेच असे वाटेल या भयापोटी इथेच थांबतो.
वाह, सर…! फक्त दहा दिवसांमध्ये एवढं महत्त्वाचं पुस्तक लिहिणं, आणि केवळ एका आठवड्यात त्याची छपाई करणं… दोन्ही चमत्कारच आहेत… तेसुद्धा आपापत: घडलेले नसून अंतिम तारीख डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक आणलेले आहेत. तुमचं आणि संजय नहार यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे…!
तुमचं ‘बातमीदारी करताना’ हे सदर गेले 32 आठवडे चालू होतं, ते आता बंद होणार , हे कळाल्याने रुखरुख लागली आहे . मनापासून धन्यवाद..!
.. प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007