ना. भि. परुळेकर
वर्ष अठराशे बत्तीस मध्ये “दर्पण” ने सुरुवात झालेली मराठी पत्रकारिता स्वातंत्र्यपूर्व काळात विकसित होत गेली. केसरी, सुधारक, काळ, मन्वंतर अशा नियतकालिकांनी संपादकांचा राजकीय आणि सामाजिक विचार वाचकांपर्यंत पोहोचविणारी ती सर्व “मत” पत्रे होती. “बातमी” देणारी वृत्तपत्रे दैनिक सकाळ पासून मुंबई-पुण्यात सुरू झाली. एक जानेवारी १९३२ ला डॉ ना. भि. परुळेकर यांनी सुरू केलेल्या या दैनिकाने मराठी पत्रकारितेत एक नवे पर्व सुरू केले. माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना दैनिक सकाळ ने आणि संपादक परुळेकर यांनी घडवले त्याविषयी आठवणी दोन भागात : ….
पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात असताना आम्ही होस्टेलमेट दैनिक सकाळ नेमाने वाचत असू ते मॅटिनी सिनेमा कोणता लागला आहे हे पाहण्यासाठी ! होस्टेलच्या मेस मधून जेऊन बाहेर पडताना बडीशेप चघळत कॉमन रूम मध्ये जायचो ते सकाळचे शेवटचे पान चाळायला. त्या काळी सिनेमाच्या जाहिराती सकाळमध्ये शेवटच्या पानावर यायच्या. कॉलेजच्या लेक्चरला जाण्याऐवजी कोणता पिक्चर “अटेंड” करायचा याचा निर्णय आम्ही सकाळचे ते पान वाचत घेत असू.
पुण्याला बाहेर गावावरून आलेल्या माझ्यासारख्या अनेकांना अग्रलेखाच्या वर छापलेल्या डॉ. ना. भि. परुळेकर, पी एचडी (कोलंबिया) या संपादकाच्या नावाशी किंवा पदवीशी काही घेणे नव्हते. बातम्या किंवा लेख वाचायचे असले तर इतर वर्तमानपत्रांकडे मोर्चा वळायचा. पत्रकार व्हायचे वेड डोक्यात भरून १९६९ मध्ये पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागात नाव दाखल केले तेव्हा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि त्याहीपेक्षा खर्च भागवण्याची सोय करणे आवश्यक होते. आमच्या विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ल ना गोखले यांना पैशाची अडचण सांगितली तेव्हा त्यांनी पटकन नाव सुचवले ते डॉ ना भि परुळेकरांचे.
विद्यार्थी पत्रकारांना प्रोत्साहन तोपर्यंत आणि त्यानंतर देखील अनेक महिने मी त्या पत्र महर्षीला पाहिलेले नव्हते. गोखले सर म्हणाले, “नानासाहेबांना व्यक्तिगत पत्र लिही. काम नक्की होईल. पुण्यात अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सक्रिय मदत केली आहे. तुझं नशीब जोरावर असेल तर तुझा हा कोर्स पूर्ण होईपर्यंत आणि पुढेही तेथेच नोकरी करू शकशील.”
कॉलेज विद्यार्थ्यांना अर्धवेळ बातमीदारी देऊन त्यांच्याकडून नानासाहेब काम करून घेत. तसे पैसे थोडे असत पण महिनाभराचा खर्च भागे.
माझं पत्र गेलं तेव्हा नानासाहेब आग्नेय आशियाच्या दौऱ्यावर गेले होते. पण माझे काम झाले होते. अर्धवेळ उपसंपादक म्हणून चार तास काम करू लागलो होतो. नानासाहेबांची भेट झाली नव्हती. नंतर ते परत आले तेव्हा सुद्धा खूप दिवस योगच आला नव्हता. माझी कामाची वेळ संध्याकाळची होती. तेव्हा ते सहसा येत नसत. आलेच तर अलगद पावले टाकीत टाकीत येत. काम आटोपले की निघून जात. आपल्या संपादक विभागात कोणी नवीन युवक कामाला येतो आहे याची त्यांना जाणीव देखील नसेल.
पण ही गोष्ट अपवादात्मक नसावी. ज्येष्ठ सहकारी नंतर एक किस्सा नेहमी सांगत. असाच एक कॉलेज रिपोर्टर कुठल्याशा समारंभाला गेला होता. सभास्थानी असलेल्या इतरांची नावे हे त्याला परिचित होती. सूट परिधान केलेली ही कृश मूर्ती मात्र त्याला परिचित नव्हती. शेजारी बसलेल्या दुसऱ्या पत्रकाराला त्याने विचारलं. हा म्हातारा कोण हो ? त्याने आश्चर्य व्यक्त करत प्रश्नार्थक चेहरा केला आणि उपरोधाने म्हणाला :
”तो तुझा बाप !” ज्यांच्याकडचा पगार आपण मिळवतो ते परुळेकर आपल्याला माहीत नाही, याची त्याला नव्याने जाणीव झाली असावी !
माझ्या या एक दीड वर्षांच्या वास्तव्यात नानासाहेब सकाळ कचेरीत फारसे नसायचे. म्हणजे शरीराने. त्यांची छाया मात्र छपाई खात्यापासून संपादक विभागापर्यंत सतत पडलेली असायची. सगळी कामं सुरळीत शिस्तबद्ध आणि वेळच्या वेळी व्हायची. “नानासाहेबांना आवडायचं नाही, ते रागवतील किंवा ते सकाळच्या धोरणाविरुद्ध आहे” असा अदृश्य वचक असायचा. नानासाहेब बाहेरगावी आहेत म्हणून बातम्या चुकायच्या नाहीत. मशीन वेळेवर सुरू होऊन छपाईची सुरुवात गाड्यांच्या वेळेवर चालू होत असे. अंकांचे गठ्ठे गाड्यांच्या वेळेवर हजर होणे टळले नाही. त्या इवल्याशा मूर्तीचे आकर्षण, तिच्याविषयीचा आदर, दबदबा, काहीशी भीती अशी सतत वाटत राहायची. त्यांच्या केबिन मधली प्रशस्त खुर्ची म्हणजे मला मोठे आकर्षण वाटायचे.
पत्रकारितेचा कोर्स पूर्ण करून त्यात विशेष प्राविण्य वगैरे मिळवले ते दिमाखाने नानासाहेबांना दाखवून आता पूर्णवेळ कायम नोकरी मिळण्याचे ठरवले. प्रत्यक्षात मुलाखतीला बोलावले तेव्हा हाताला सूक्ष्म कंप सुटला होता. मी आधीपासूनच तुमच्याकडे काम करतो आहे. अशी त्यांना आठवण करून दिली. तेव्हा आज काय काम केलं बरं, दाखवा जरा म्हणून त्यांनी सावकाश पण वजनदार आवाजात विचारलं. चटकन उठून मी माझ्या टेबलवरून कॉप्या आणून दाखवल्या. मी आदल्या रात्री लिहिलेल्या दोन तीन बातम्यांमधील प्रत्येक शब्द सावकाश काळजीपूर्वक वाचून त्यांनी चाचणी घेतली. मग पुन्हा माझ्या अर्जात डोकावून पाहिले.
“हे पाहा. पत्रकारिता म्हणजे सोपी गोष्ट नाही. कष्ट उपसावे लागतात. वेळ-काळ पाहता येत नाही. रोज नवीन गोष्ट शिकावी लागते. तुम्हा पोरांना आधी खूप हौस असते. पण भ्रमनिरास होतो. तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट आहात. अजूनही विचार करा दुसरीकडे जास्त पगाराची नोकरी सहज मिळेल.”
मनात म्हटलं, “गुरुदेव. तुम्ही ग्रेटच आहात. पत्रकार होण्याची नशा चढली आहे. तुमच्याकडे आलो ते हे ऐकायला नाही. कष्टाचं काय घेऊन बसलात ? कोल्हापूर जिल्ह्यातील गोडची गावाहून पुण्यापर्यंत चालत आल्याचा पराक्रम तुम्ही केल्याचे मी ऐकले आहे. कष्ट करून “सकाळ” ची उभारणी कशी केली हे वाचून मला पाठ झाले आहे. कष्टाची भीती कशाला दाखविता ? ”
प्रत्यक्षात काही बोललो नाही. कामाला लागलो. दीड- दोन वर्षात शिकलो ते कष्ट. पण तसं करणारा मी एकटा नव्हतो. सकाळ मध्ये सर्वांना कष्टाची सवय आहे. संपादक विभागात लोक कमीच असतात. वृत्तसंपादक श्री ग मुणगेकर यांच्याखेरीज आम्ही फक्त पाच जण होतो.
नानासाहेबांची कामाची पद्धत
दिवसातील पहिली डाक एडिशन पुरी करता करता नाकी नऊ यायचे. मशीन वेळेवर सुरू व्हायला पाहिजे म्हणून मान खाली घालून टेलीप्रिंटर वरच्या तारांची भाषांतरे करून कॉलमच्या कॉलम मजकूर भरून काढावा लागे. त्यात पुन्हा महत्त्वाच्या बातम्या आल्याच पाहिजेत. नाहीतर दुसर्या दिवशी बोटभर चिठ्ठी वर निरोप यायचा. ही बातमी का वापरली नाही ?
संपादक विभागासाठी एक आणि नानासाहेबासाठी खास वेगळा असे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे दोन टेलीप्रिंटर असायचे. रात्री उशिरापर्यंत च्या तारांचे भेंडोळे घेऊन गडी नानासाहेबांच्या घरी जात असे. त्या महत्त्वाच्या तारांवर खुणा करून दुसऱ्या दिवशी त्या इंग्रजी बातम्यांचे मराठी भाषांतर सकाळमध्ये आले की नाही ते नानासाहेब पाहात असत.
“मला भेटावे, ना. भि. प” असा मजकूर असलेले छोटे आयताकृती मेमोचे चिटोरे आले की भलेभले मान खाली घालूनच बोलायचे. चष्म्याच्या आतून रोखून बघणारे डोळे टाळून “हो” किंवा ”नाही” अशी एकाक्षरी उत्तरे द्यायचे.
अलिप्तता आणि गुणग्राहकता या अशा वातारणामुळे ते आणि त्यांचे सहकारी यांच्यात एक दूरी निर्माण झाली होती. त्यांच्या पोटात असह्य कळा येतात, आतडी ओरबाडून फेकून द्यावीत असे वाटण्याइतपत वेदना असतात याची कल्पना अगदी जवळच्या मंडळींना देखील नव्हती. ते स्वतः सांगत नसत. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन कसे होते याची कल्पना दोन वर्ष दैनिकाच्या परिवारात राहून सुद्धा मला आली नाही.
एकदा १९६५-६६ मध्ये दैनिक मराठा कार आचार्य अत्रे यांनी मादाम शांताबाई यांच्याविषयी अग्रलेख लिहिल्याचे आठवत होते. या फ्रेंच महिलेशी प्रेमविवाह करून पुण्यात पत्रकार झालेल्या परुळेकर यांच्या विषयी त्या काळात खूप कुतूहल असले पाहिजे. पण त्याविषयी उल्लेख करूनही ज्येष्ठ सहकारी काहीच सांगत नसत. कन्या लीला ताईंचे आणि नानासाहेबांचे पटत नाही, तिचे वागणे नानासाहेबांना आवडत नाही वगैरे सकाळच्या बाहेर कुणी सांगत. पण ते गॉसिप असे. खात्रीलायक काही नसायचे. आयुष्यात सर्व काही मिळालेला हा माणूस स्वतःला असे कोंडून का घेत असेल ? हे आणखी एक गूढ मला वाटत असे. मी त्यांच्यापुढे कोणीच नव्हतो. त्यामुळे माझ्याशी काही हितगुज करणे हे अपेक्षित नव्हतेच. पण इतर वरिष्ठ मंडळींना तरी ते सांगत नसत का ?
सकाळ वर आणि नानासाहेबांवर मनापासून प्रेम आणि भक्ती करणारे अनेक होते. तरी त्यांच्यात मैत्रीची बरोबरीची भावना येऊ शकली नाही. अंतर कायम ठेवत असले पाहिजेत, असेच माझ्या सारख्याला वाटत राहायचे.
हाताखालच्या लोकांचे चांगले गुण लक्षात आले की नानासाहेब तसे सांगत. पत्र लिहित. असे प्रसंग कदाचित कमी असतील. कदाचित कमी असतील म्हणूनच या कौतुकाचे मोल जास्त असे. कोल्हापूर चे सकाळचे बातमीदार बाळासाहेब पाटील यांनी “हत्ती पिसाळल्याची आणि नंतर त्याला ठार करण्यात आल्याची” बातमी मोठ्या नाट्यमय भाषेत तपशिलासह दिली. तेव्हा त्याचे नानासाहेबानी खूप कौतुक केले होते. पाटील पुण्यात भेटायला आले तेव्हा नानासाहेबांनी त्याच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्याचा इतरांना केव्हढा हेवा वाटला होता !
वर्तमान पत्राचा बातमीदार म्हणून मी कामाला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना ही आताच्या काळातील दैनिके अजून प्रकाशित व्हायला सुरुवात व्हायची होती. गोविंदराव तळवलकर, विद्याधर गोखले, जयंतराव टिळक यांची पत्रकारिता आम्ही नंतर पाहिली. आम्हाला फक्त परुळेकरच माहित होते !
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
सकाळ हे नानासाहेबांनी मराठी वृत्तपत्रासाठी दिलेली अमोल देणगी आहे.ठाकूर सरांचा त्यासंदर्भातील लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.
नानासाहेबांविषयीचा लेख पाहून आनंद झाला.त्यांच्या काम करवून घेण्यातूल कौशल्याची माहिती बहुधा पुढूल भागात वीचीयला मिळेल.वाचकांना जास्तित जास्त मीहिती देण्याचाप्रयत्न व सकाळची तत्कालीन भाषा याविषयीही वाचायला नक्की आवडेल.खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
(घेण्यातूल नव्ह तर घेण्यातील ; तसेचपुढूल नाही पुढच्याअसे दुरुस्त करून घेऊन वाचावे.तसदीबद्दल क्षमस्व. पुढच्या भागाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
काम लरवून घेण्यातील कौशल्य
नानासाहेबांविषयीचा लेख पाहून आनंद झाला.त्यांच्या काम करवून घेण्यातूल कौशल्याची माहिती बहुधा पुढूल भागात वीचीयला मिळेल.वाचकांना जास्तित जास्त मीहिती देण्याचाप्रयत्न व सकाळची तत्कालीन भाषा याविषयीही वाचायला नक्की आवडेल.खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.