महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उस्फूर्तपणे पाठविण्यात आलेल्या कविता पुढे देत आहे.
या महामानवास आपल्या पोर्टलतर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
१. प्रिय बाबासाहेब
बाबा, तुम्ही ज्ञानाचे समुद्र होवून
कानेकोपरे धुतले भारताचे
गावकुसाबाहेरचे सोशल डिस्टन्सिंग
क्वारंटाइन केलेल्या दलितांचे |१|
लाॅकडाउन तोडले दीक्षाभूमिवर
कोरोनाने केले लॉकडाऊन जगाचे
तेव्हा डसले दुःख शूद्रांचे
धम्मक्रांतीला शस्त्र केले लेखणीचे |१|
पेटवले चवदार तळ्याचे पाणी
हिंदू कोडबिलाचे गोंदण देऊन
स्री पुरुष समानतेचा दिला पाठ
अधिकाराची ओटी भरून |३|
दाविली घटस्फोटाची वाट
कामगाराला दिला अधिकार संपाचा
जलनीतीचे उद्गगाते बनून
केला विकास देशाचा |४|
शूद्राचे क्षत्रियत्व केले सिध्द
राज्यघटनेने मानव अधिकार दिला
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देवून
भारताचा क्रांतीसूर्य जगभर प्रकाशला ||५||

– रचना : डाॅ.अंजली आर. मस्करेन्हस,
न्यूयाॅर्क, अमेरिका
२. अखेर तुलाच दैवत्व बहाल केलं…
एक जमाव
एषोआरामाच्या गाडयातून
उंच पताका फडकावीत आला
आणि फुलांची उधळण करीत
‘अमर रहे’च्या घोषणांमध्ये
तुझ्या समोर मेणबत्त्या पेटवत निघून गेला.
दुसरा जथ्था
तुझेच नाव ओठात घेत
परिवर्तन एल्गाराच्या घोषणा देताना
मिळेल त्या प्रवाहाबरोबर वाहत गेला
तिसरा घोळका तर
तुझं मंदिर बांधण्याची भाषा बोलू लागला
तुझ्या नावाची घोषणा देताना
मी पण तेव्हा यातलाच होऊन गेलो होतो
पण अशावेळी तुझ्या पायावर माथा टेकवताना
तुझ्या भारदस्त बुटांनी
का लाथाडले नाहीस मला भरचौकात
तुला ‘देव’ बनवून टाकले म्हणून ?
तुला तर मान्यच नव्हतं
पूजाआर्चा करणं
धर्माचं पारपरिक आचरण करणं
तरीही माझ्या घरात
बुद्धांसोबत तुला हारतुरे घालताना
अगरबत्ती, मेणबत्त्या पेटवून
तुला ओवाळूनही घेतल.
तू नाकरलास ईश्वर
तू नाकारलास कुणालाही दैवत्व बहाल करणे
तू नाकारलीस व्यक्ती पूजा
तू माणसाला माणूस म्हणायला शिकवलं
आणि एखाद्याच्या अफाट गुणवत्तेच्या बुद्धीचा आदर बाळगायलाही
तरी तुला आम्ही
मखरात बसवलं
तुझ्याच प्रतिमेची पूजा करून
ईश्वराचीही उपासना केली
माफ कर, खरच माफ कर
जय भीम म्हणता म्हणता
अखेर तुलाच दैवत्व बहाल केलं !
– रचना : प्रकाश जाधव. विरार
३. दीनांचा सागर….
दुबळ्यांचा, या दीनांचा तू सागर आहे
तहानलेल्या वस्तीमधली घागर आहे
अजून नाही विझलेली धगधगती ज्वाला
अजून त्या ठिणग्यांचा येथे वावर आहे
चार बुके वाचली, म्हणे ‘मी हुशार झालो’
बाबा, तू तर ज्ञानाचा महासागर आहे !
तूच गायिले होते ना ऐक्याचे गाणे ? …..
आता बेसुरी नेत्यांचा हा वावर आहे
कुणी झोडतो सत्तेची ती शाही पंगत
प्यार मला या झोपडीतली भाकर आहे
विश्वामध्ये तुझाच वाजे तुझाच डंका
स्वार्थासाठी इथे तुझा पण वापर आहे
अन्यायाचा, जखमांचा ना हिशेब केला
न्यायासाठी तुझ्यापुढे मी सादर आहे !
धर्माच्या आधारे केले देश वेगळे…
तरी कुणाच्या मनात का ‘पेशावर’ आहे ?
आभाळाच्या निळाईतली निळीच थंडी
निळ्या उबेची निळी ओढली चादर आहे
जरी भोवती गर्द चांदणे, गर्द घोषणा
रोज मनाच्या मनात होतो जागर आहे !
युद्धाने ना मिळते कोणा अपूर्व शांती
बुद्धच अवघ्या शांतीचा क्षिरसागर आहे
– रचना : माधव डोळे. ठाणे
४. प्रकाश सूर्य
कभिन्न काळोख, विषारी काटे
अवघड वाटा
जातियतेची कुंपणं इथंतिथं
अमानवी अत्याचारांचा धुमाकूळ
श्वास घेतानाही भयग्रस्त असलेला
एक समाज दयनीय
अशा अंधारात दूर कुठेतरी
आशावादी काजवा चमकावा तसा
एक प्रकाश जन्माला आलेला
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
काजवा सूर्य होताना
ख-या सूर्यालाही आनंद होत होता
कारण काही झालं तरी
सूर्य देवू शकत नव्हता
प्रकाश रात्रीचा
एका प्रखर क्रांतीकारी सूर्याने
त्याचे प्रज्ञारुपी उर्जास्रोत
पसरवले अंधारल्या वस्त्यांतून
उध्वस्त केल्या जातीपातींच्या भिंती सम्यक विचारांनी
आणि लोकशाहीचं वादळ
सर्व काळी क्षितिजं पार करत स्थिरावलं
स्वातंत्र्य समता बंधुतेच्या किना-यावर–ताठ मानेनं
पण वादळालाही असतं वय
येण्याचं, लढण्याचं व जाण्याचंही
दिवसरात्रीच्या घोंघावण्यानं
येत असेल का थकवा
वादळालाही
६ डिसेंबर १९५६
एक जीवघेणा, क्लेशदायक दिवस आसवांचा सागर
मानवतेचा जागर मांडणारा महाप्रवास थांबलेला
आकाश कोसळलेले
रस्ते हुंदके देत अस्वस्थ
पण असे वादळ थांबत नसते
त्याचे अंश वंचितांच्या मनामनात
असतात रुजलेले
असा प्रकाश अस्ताला जात नसतो
गल्लीबोळात प्रकाश पुंजके
पेरून ठेवलेले असतात
उद्याच्या प्रकाशासाठी
ह्या उद्याच्या पुंजक्यांना
दाखवायला हवीत
बाबांनी जपून ठेवलेली पुस्तकं
तरच होईल उद्याचा भारत
विश्वगुरू !

– रचना : यशवंत पगारे. बदलापूर
५. संदेश भीमाचा
इथे गीत तुझं
एकदाच गावं
मायभूच्या लेकरांनो
तुम्ही एक व्हावं !
आपापसातले वैर
तुम्ही मिटवावं
समतेच्या दिव्यांना
तुम्ही पेटवावं !
वैऱ्याची ही रात्र
घडत या आज
माऊलीची लाज
जातीया रोज
हक्क मागाया आपले
आता सज्ज व्हावं !
हा संदेश भीमाचा
आता जाणून घ्यावं !
राजकारण जातीचं
तुम्ही संपवावं
समतेच्या दिव्यांना
तुम्ही पेटवावं !

– रचना : सुचिता गायकवाड कदम. कणकवली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800