Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यबाबासाहेब : काही कविता

बाबासाहेब : काही कविता

बाबासाहेब : काही कविता

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उस्फूर्तपणे पाठविण्यात आलेल्या काही कविता आपण काल प्रसिध्द केल्या आहेत. त्या नंतर प्राप्त झालेल्या काही कविता आज प्रसिध्द करीत आहे.
या महा मानवास आपल्या पोर्टलतर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक

१. तूच मला शिकविले.

मन माझे तूच बदलले
वृत्ती तूच फुलवल्या
मनावरची धूळ झटकूनी
ग्रहदशा तू खरवडल्या ………1

जीवनात तू नसता तर
खचित असतो पडलेला
विचार प्रक्रिया बदलण्यास
कारणीभूत तू ठरला…………2

वैचारिक भूमिका ही माझी
तूच सुसंगत केली
झंझावात बनून माझ्या
जीवनाची दिशा बदलली………..3

बुद्धी माझी स्वतंत्र झाली
गुंता तूच सोडवला
नैतिकतेच्या परिभाषा ही
तूच मला समजाविल्या………….4

अन्यायाचे परिमार्जन करण्या
बळ तुझ्याचमुळे मिळाले
संघटनेचे महत्व जीवनी
तूच मला शिकविले………………5

अचपळ मनास आवरण्याही
तूच हात मज दिधले
तुझेच शब्द, ज्ञान यांनी
भ्रमनिरास माझे केले…………….6

पुस्तके, पोथ्या, लेखांचा हा
खजिनाच मज गवसला
जगात ज्याला तोड नाही
तो अर्थ मला उमगला…………….7

स्वाती वर्तक

– रचना : सौ.स्वाती वर्तक. मुंबई

२. महान मंत्रदाता

जातियतेच्या विषवल्लीवर केला
ज्ञानसूर्याने भीम गदेने प्रहार
भारतमातेच्या गळ्यात घातला
न्याय स्वातंत्र्य समतेचा हार

शिका,संघटीत व्हा
करा बंधूंनो संघर्ष
शिक्षणाशिवाय दारिद्र्य जाणे नाही
होणे नाही उत्कर्ष

हा महान मंत्र देऊन प्रेरीत केले
त्यांनी दीन दलित समाजाला
चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून
वाचा फोडली अन्यायाला

प्रचंड संघर्षातून मिळवून दिला न्याय
तळागाळातील जनतेला त्यांनी
अन्यायाविरुद्ध तळपू लागली
अहोरात्र त्यांची लेखणी व वाणी

ज्ञानाच्या तेजाने नष्ट केले
अज्ञान अंधश्रद्धा अन् दारिद्र्याचे दशावतार
माणुसकीवरचा कलंक धुण्यासाठी
शब्दांना दिली तलवारीची धार

राज्यघटनेच्या शिल्पकारासारखा
ज्ञानसूर्य पुन्हा होणे नाही
क्रांतीची मशाल पेटवून दिली
माणसाला माणूस म्हणून जगण्याची ग्वाही

आचंद्रसूर्य करीत राहील कोटी कोटी जनता
भीमाई माऊलीचे स्मरण
महापरिनिर्वाण दिनानिमित्त करतो
या महामानवास कोटी कोटी वंदन🙏

राजेंद्र वाणी

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई

३. ऐतिहासिक वास्तू

परळ बी आय टी- १ नं. चाळीत
२ रा मजला ५०,५१ च्या खोलीत
दोघांचा संसार चालला प्रेमाच्या बोलीत

इथे दोघांचा २२ वर्षांचा संसार
५० मध्ये बनवे माता आहार
५१ मध्ये होता बाबांचा अभ्यासाचा आधार

इथे चहाला आले छत्रपती शाहू महाराज
बाबांच्या कर्तृत्वावर माता नसे नाराज
काटकसरीने वेळेस देई मदतीचा राज

३ पुत्र व एक कन्या दगावले
पण एकट्या रमाईने संसार सावरले
वरळीला शेणांच्या गोवऱ्या बनवून विकवले

इथे बाबांना रमाईच्या त्यागातून घडविताना
बाबांना शेजाऱ्यांनी पाहिले घडताना
आहे हे पावन चंदन स्पर्श घर पाहताना

येतात हि वास्तू पाहायला
देशी आणि विदेशी
नमन करुया ह्या वास्तूला

जय भीम,
जय रमामाता !

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर. मुंबई

४. भिमराया

किती धन्यवाद देऊ भिमराया
माणुस बनवले तू दीनदलिताला
खितपत पडलो होतो गावाबाहेर
सन्मान दिलास तू
दीनदलिताला

तुझीच लेकरे आम्ही भिमराया
तुझीच रे शक्ती भक्ती भिमराया
उध्दरली कोटी कुळे भिमराया
जगण्या श्वास दिला तू भिमराया

माणसास बळ तू दिले भिमराया
देशास संविधान दिले भिमराया
अफाट बुध्दीचा तु रे भिमराया
ताकत दिलिस तु रे भिमराया

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
मंत्र आम्हास दिला तू भिमराया
जगण्यासाठी संविधान निर्मिले तू
वेदनेचा कर्दनकाळ तू भिमराया

श्वास तू विश्वास तू
मानवतेचा राजा तू भिमराया
संविधान तू कायदा तू
लोकशाही घटनाकार तू भिमराया

पंकज काटकर

– रचना : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments