Wednesday, July 2, 2025
Homeलेखबाय

बाय

ठकूबाय तशी साऱ्या गावाचीच बाय! शिकली, सवरली नाही अन्यथा सहजपणे बाजारात कोणालाही विकून येईल अशी शहाणी !

एकदा मी आणि ती आमच्या मागील दारी बसलो होतो. पटकन म्हणाली, “असे का बोले, बटाटे सोले, पैशाला पावशेर पेढे !” मला काही अर्थबोध होईना. पण ती शीघ्र कवयित्री होती. गोरीपान, सुंदर, नितळ त्वचा, कपाळावर गोल कुंकवाचा टिळा, स्वच्छ नऊवारी साडी, उंच, गळ्यात भरभक्कम मंगळसूत्र आणि मनानेही तेवढीच नितळ असणारी आमची बाय अतिशय प्रेमळ पण व्यवहारी !

सुरुवातीला तिच्या कवितेत बोलतानाचा व शब्दांचाही अर्थ लागत नसल्याने आजी काहीतरीच बोलतेय असंच वाटायचं पण तिच्या सुखी-समाधानी आयुष्याची जणू ती खूण होती. मनही तसेच अथांग. डहाणूमधील नरपडच्या त्या अथांग समुद्रा सारखेच !
गरिबीतही तिने अतिशय नेकीने आणि नेटाने संसार केला.

रात्री ती आम्हा मुलांना छान -छान गोष्टी सांगत असे, त्यात काहीतरी तात्पर्य असे, बोध असे. मला भुताच्या गोष्टी ऐकायच्या असत, पण ती रात्री फक्त देवाच्या गोष्टी सांगायची. सकाळी भुताच्या गोष्टीही सांगे पण मुलं घाबरणार नाहीत याची काळजी घेई.

मामाकडे नरपडला गेल्यावर आजी-आजोबांकडे  (बाय -दादांकडे) पितळी कपबशीत चहा पिण्याचे जे सुख अनुभवले ते आमच्या घरच्या कोणत्याही श्रीमंत भांड्यात नव्हते. गावात जर कोणाचा भांडण-तंटा झाला की, लोक तिचा सल्ला घेत. माझ्या बालमनाला प्रश्न पडे, लोक बाय कडेच का येतात ? दादांचा सल्ला का घेत नाहीत ? पण तिचा सल्ला हा तिच्या चंदेरी केसांएवढाच निरागस, सुंदर आणि अनुभवी असायचा ! शिवाय सल्ला दिल्यासारखा अभिनिवेशही नसे, त्यात अभिमान नसे उलट प्रत्येकाबद्दल काळजी असे.

माझे बबन मामा मुंबईला टी. सी. होते, ते जेव्हा गावी येत तेव्हा त्यांना जवळ बसवून कानमंत्र देताना मी पाहिले आहे. तेव्हा समज नसल्यामुळे कळलं नाही पण तो मोलाचा उपदेश असे. उमेशमामा, रामू मामा प्रमाणेच भालचंद्र मामा, मोरेश्वर मामा सर्वांमध्ये ती लाडकी आपल्या आई पेक्षाही. हे मामा आमच्या बायवर जास्त प्रेम करत.

एकदा ती आमच्या घरी आली होती, आप्पाच्या लग्नाचे पापड लाटले जात होते. त्यासाठी उडदाचे पीठ मळले गेले होते, ते मुसळाने कुटले जात होते. मी पण शहाणपणा करून कुटायला गेले, बायने माझी हौस पुरवायची म्हणून मला कुटायला दिले आणि मी मुसळ जोरात चुकून तिच्या हातावरच मारले. तिचा अंगठा फुटून प्रचंड रक्त वाहू लागले, माझ्या बालमनाला प्रचंड वेदना झाल्या. तिला किती यातना झाल्या असतील ? पण मला ओरडा पडू नये म्हणून जराही न कळवळता ती म्हणाली, “काय नय जरासंस लागलंय, नुसतं रगत निंगालंय अवडस” तिची सोशिकता आठवली की, आजही डोळे पाणावतात ! मला कोणी रागवू नये म्हणून तिच्या वेदना तिने लपवल्या होत्या. कारण खूप रक्ताचं थारोळं पसरलं होतं.

तिचे उपासतापास, व्रतवैकल्य, ऋषीपंचमीचे व्रत आणि ऋषीची ती भाजी, ऋषी पंचमीची गोष्ट सारे काही अगम्य आणि अतर्क्य वाटे मला. पण त्या कौलारू घरातला शांतपणा आणि थंडपणा आजच्या ए.सी. लाही नाही.

माझ्या मोठ्या मामानी घर बांधावे अशी तिची प्रबळ इच्छा होती. पण अवघ्या 50 व्या वर्षी मामा हार्ट अटॅकने गेले आणि बायचे ते शुभ्र केस आणखीच पांढरे झाले, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढत गेल्या. रात्री-अपरात्री उठून मामा येऊन बोलतील म्हणून ती उठून वाट बघत असे. दादाही मितभाषी पण त्यांच्या लहान-लहान डोळ्यात उदासी दिसे. तिने सांगितलेल्या गोष्टीतील श्रावण बाळाचे आई-वडील हेच असतील का ? असे मला नेहमी वाटे.

उमेश मामा रागीट, पण बाय दादा हे त्यांचे निवा-या चे ठिकाण! देवधर्म व्रतवैकल्य आणि निव्वळ खरेपणा ही तिची संपत्ती. अतिशय बुद्धिमान असणाऱ्या बायला बघून मला जुन्या काळातल्या चित्रपटातील आजी बनणाऱ्या अभिनेत्री आठवत. तिच्या ओठांचा गुलाबी रंग मी हात लावून बघितला आहे. आंबे, कै-या, करवंद, बोरं-सणबोरं, आवळे, हा सारा रानमेवा मी बाय, दादांकडेच खाल्ला.

नरपडची पहाट मला खूप आवडायची. त्या पहाटे वर जणू बायच्या प्रेमाचा मुलामा पसरलेला असायचा.
मी मोठ्याने मग गाणी म्हणायचे, त्याचेही कौतुक व्हायचे मग तिथे !

म्हणता-म्हणता वर्ष सरली पण बायचा शोक तसाच होता, मामांना ती विसरली नाही. नंतर तिला कॅन्सर झाल्याचे कळले. काही काळ माझी आई तिला आमच्या घरी घेऊन आली, तिला खायला होत नसे, गिळत नसे, आई ज्यूस द्यायची तो तिला गिळता येत नसे. तेव्हा ती म्हणायची  “नको मला, आवडे नय मला” हे सर्व आईला वाईट वाटू नये म्हणून. नंतर उमेश मामा पुन्हा तिला तिच्या घरी घेऊन गेले.

तिच्या अखेरच्या दिवसात आम्ही सारे तिला भेटत असू, सतत कार्यमग्न असणारी प्रभावान बाय, निपचित झोपून होती. मी तिच्या बेडवर बसले, अगदी जवळ, तिला खूप बरं वाटलं. जेमतेम एवढंच बोलली, “सर्व भेटतात पण दुरून, तू जवळ बसलीस बरं वाटलं”. मी आवंढा गिळला. माझं सारं आजोळ तिच्यात सामावलं होतं. आई तिला तिच्या ओढीने सतत भेटायला जाई पण शेवटच्या क्षणी मात्र आई तिच्याजवळ नव्हती याचे आईला खूप दुःख झाले.

बाय गेल्याने सारी पाटील आळी पोरकी झाली. दादा पोरके झाले, त्यांनी पुन्हा जमिनीवर पाय ठेवला नाही आणि तेही तिला भेटायला लवकरच निघून गेले. माझ्या जवळचे हे दोन्ही तारे निखळले आणि ते तिचे आगळे-वेगळे काव्यही जणू निस्तेज झाले, आभाहीन झाले…

नंतर सर्वजण होते पण त्यांच्या त्या खोलीत आजही अनंत आठवणींचा दरवळ मात्र कायम आहे आणि बायच्या सहवासाचा आभासही !!

डॉ सुचिता पाटील

– लेखन : डाॕ. सुचिता पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४