प्रिय रोहित,
रोहित, जिंकलस भावा, कमाल केली !!!
कप्तान म्हणून तुझे आभार कसे आणि किती मानावे तेच कळत नाही. त्या दिवशी जसा शेवटचा बॉल पडला ना, त्याच क्षणाला आमच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडले. काय सांगू भावा तुला तो आनंद !!!
उर भरून आलं होत, अटीतटीच्या तुंबळ युद्धात तू आणि तुझे शिलेदार जिंकले होते.
रोहित, आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर तुझ्या गळ्यात त्याच क्षणी त्यांनी रुद्राक्षाची माळ टाकली असती, गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर असत्या तर त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यासाठी गायलं असत….
ऐ मेरे वतन के लोगो
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सबका
लहरालो तिरंगा प्यारा…..
जरा ऑख मे भरलो पाणी….
पण हया वेळच पाणी हे त्यांनी तुमच्या विजयासाठी भरायला सांगितले असते.
वेडात मराठे वीर दौडले सात !!
रोहित, पण तू मात्र जिंकण्याच्या वेडात अकरा वीर दौडविले आणि अटकेपार पार झेंडा गाडला. तुझा तो झेंडा रोवण्याचा क्षण आमचा शेवटचा श्वास चालू असेपर्यंत आम्ही विसरू शकणार नाही.
अरे, कुठे मुंबई आणि कुठे बारबाडोस, पण म्हणतात ना, हिंमत है मर्दा, तो मदत करेगा खुदा !!
रोहित, हे युद्ध साधं नव्हत…. शत्रु पक्ष सुद्धा काही मेलेल्या वाघिणीचे दूध पिलेला नव्हता, पण अशा भल्या मोठ्या दिग्गज संघाला चारी मुंड्या चीत करायला सुध्दा एखाद वाघाचंच काळीज लागत.
सिंहाच्या जबड्यात हात घालून दोन्ही हाताने जबडा फाडावा तशी अवस्था तू दक्षिण आफ्रिका संघाची करून टाकली रे…..
सुरुवातीलाच आपल्या संघाची अवस्था पावन खिंडीत घेरलेल्या शत्रूसारखी झाली होती. जसं एकीकडे पन्हाळगड आणि दुसरीकडे विशाळगड, मात्र त्या बारबाडोसच्या खिंडीत घेरलेल्या दक्षिण आफ्रिकी खेळाडूंना तुझ्याकडे असलेल्या मातब्बर सरदार आणि त्यांनी चालवलेल्या फलंदाजीच्या तलवारीनी कमाल करून दाखवली.
अरे, युद्धाच्या क्षणी तुझ्यासारखा सेनापती घायाळ झाला म्हणून काय होतं, विराट, अक्षर आणि शिवम दुबे यांच्या तलवारीची धार खिंडीमध्ये शत्रू पक्षाची मुंडके उडवत होती, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत.
तुझ्यासारख्या सेनापतीने तर ठरवलं होतं आज इकडची दुनिया तिकडे करेल पण यांना हरवल्याशिवाय राहणार नाही.
प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं.
बाजू पलटायला काही वेळ लागत नाही.
शत्रु पक्षाकडे असलेल्या सरदारां बरोबर लढणं सोपं नव्हतं, दहा हत्तींचे बळ असलेले डीकॉक, स्टब आणि क्लासेन यांनी जेव्हा म्यानातून तलवारी काढल्या तेव्हा एका क्षणाला असं वाटलं होतं की संपलं सगळं, पराभवाची अंधकार छाया संपूर्ण भारत देशावर पसरली होती, हाती आलेला विजय निसटतो की काय असं वाटलं होतं.
शौर्य, जिद्द, पराक्रम हे शब्द आसमनतात गिरट्या घालू लागली होती. पण तू हरणाऱ्यांपैकी नव्हता, तुझ्याकडे काही कच्चे सरदार नव्हते.
अरे, ज्याच्या बाजूने साक्षात सूर्यदेवच आहे, त्याचा पराभव होईल कसा ?
सूर्यकुमार यादव साक्षात सूर्य देवाच्या अवतारात तुझ्या रणांगणात उभा होता. तूझ्याकडे बूम बूम हातागोळ्याचा भक्कम मारा होता.
आणि आणखी एक गोष्ट सांगू…
तुझ्यासोबत रणांगणावर साक्षात सावळा कृष्ण पण होता, अरे हार्दिक पांड्या सारख्या कृष्णाने मृत्यूवरही विजय मिळवलेल्या क्लासेन आणि मिलरला ऋषभ आणि सूर्या च्या मदतीने धारातीर्थी पाडले…
अरे, एवढं सगळं चालू असताना अर्शदीपने एका बाजूने खिंड लढवून अर्धी लढाई जिंकली होती.
डी कॉक आणि मार्करमला यमसदनी पाठवण्याची कामगिरी अर्शदीप फत्ते केली होती ती याच बारबाडोसच्या खिंडीत !!
त्या वेळी दक्षिण आफ्रिका संघाला जो धक्का बसला त्यातूनही जे वाचले होते, ते पुढे हार्दिकच्या चक्रव्यूहात बरोबर अडकले. थरार नाट्याचा शेवटी अंत झाला.
कुशल आणि पराक्रमी योध्यांनी या विराट अशा युद्धावर विजय मिळवला. पण रोहित म्हणतात ना,
गड आला पण सिंह गेला…
भारताला विश्वचषक मिळाला, पण आम्ही एक नाही तर दोन सिंह गमावले ते तुझ्या आणि विराटच्या रूपात !!! तुम्ही निवृत्ती घ्यायला नको होती.
विजयाच्या अहंकाराने भरून जाणारा तू काही अलेक्झांडर नव्हता, ज्या कर्मभूमीवर तू विजय मिळवला त्या कर्मभूमीला आपल्यात सामावून घेऊन तिला आदराने नमन करून तू तुझी संस्कृती जिवंत ठेवली.
तू मातृभूमीलाही विसरला नाहीस आणि कर्मभूमीलाही !!
आणि म्हणून तू महान आहेस…..
— लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
रोमहर्षक प्रसंगाबद्दल खुप छान लिहिलंय सर..