कोव्हीड 19 पँडेमिकचे वाईट परिणाम समाजातील प्रत्येक घटकास भोगावे लागत आहेत, हि मागील दिडेक वर्षाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. पँडेमिकचा एकंदरीतच लहानग्यांच्या लसीकरणावरही काहीसा परिणाम झालाय व त्यामुळे त्यांच्या कोव्हीडेतर लसीकरणाविषयी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
मला आठवतंय…. पँडेमिकच्या अगदी सुरुवातीच्या काळात मुलांना जर लसीकरणासाठी दवाखान्यात नेले तर त्यांना कोव्हीड होईलच परंतु आपल्यालाहि होईल हि भिती पालकांच्या मनात असायची आणि त्यात वावगे असे काहीच नव्हते. अर्थात कोव्हीड संसर्ग पसरू नये म्हणुन संबंधित सर्व काळजी आम्ही स्वतः व इस्पितळात घेत होतो.
सामाजिक अंतर, मास्कचा वापर, वैयक्तिक संरक्षण, सॅनिटायझरचा वापर, हॉस्पिटल प्रीमायसेसचं सॅनिटेशन इत्यादी इत्यादी…..तसेच त्यावेळी इस्पितळात गेल्यावर कोव्हीड होईल, या भीतीने कित्येक चिमुकले रुग्ण उशिरा दवाखान्यात आणले जायचे व नॉन-कोव्हीड असूनदेखील केवळ उशिरा डॉक्टरांना कन्सल्ट करण्यासाठी दवाखान्यात आणल्यामुळे त्यावेळी आम्हीही सिरीयस रुग्णांसाठी खुप काही ऑफर करु शकत नसायचो.
या सर्व पार्श्वभूमीवर आजही खुपशी वेगळी परिस्थिती नाही. वाढत जाणारे कोव्हीडचे रुग्ण, आटोक्यात न येणारी पँडेमिक, वेळोवेळी येणारे कोरोनाचे जनुकीय बदल झालेले नवनवीन म्यूटन्ट स्ट्रेन्स व कोव्हीड 19 व्हॅक्सीनची वानवा या सर्व विचित्र परिस्थितीमुळे लहान मुलांच्या कोव्हीडेतर लसीकरणावर खूपच विपरीत परिणाम झाला आहे व त्या अनुषंगाने पालकांच्या मनात कोव्हीड व कोव्हीडेतर लसीकरणाविषयी एकच सम्भ्रम निर्माण झालाय व अनेक शंका, कुशंका व प्रश्न त्यांना भेडसावताहेत. या सर्व परिस्थितीचा प्रात्यक्षित अनुभवावरून प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात घेतलेला हा मागोवा….
कोरोना मोठ्यांपासून अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांच्याच पाठी हात धुऊन लागलाय. नवजात बालकांपासून ते सिनिअर सिटीझनपर्यंत … कोणाला, अगदी कोणालाच त्याने संसर्गीत करण्यापासून सोडलेलं नाही.
**ईथे पहिला आणि अगदी महत्वाचा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे लहान मुलांना कोव्हीड झाला असेल तर त्यांच्या कोव्हीडेतर नियमित लसीकरणाचं काय ??…….
*मुलांना सौम्य प्रमाणात कोव्हीडचा संसर्ग झाला असेल तर अथवा त्यांना काहीच त्रास नसुन केवळ कोव्हीड रुग्णच्या संपर्कात आल्यामुळे कोव्हीड झाला असेल तर साधारणतः दोन आठवड्यानंतर अथवा लक्षणे कमी झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर नियमित लसीकरण चालु करावे, परंतु बालकांना जर का अतिप्रमाणात
संसर्ग झाला असेल किंवा मुल क्रिटिकल/सिरिअस असेल व स्टिरॉईड्स अथवा टॉसीलुझुमॅब सारखी प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं दिली गेली असतील तर मात्र नियमित लसीकरण रुग्ण बरा झाल्याच्या तीन महिन्यांनंतर चालु करावे.
**आता एखाद्या घरात कोव्हीड 19 चा संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण असेल, तसेच घरात नियमित लसीकरणाची तारीख असलेली मुलं असतील तर त्यांच्या लसीकरणाचं काय करावं ??….
*तर घरातील कोव्हीड संशयित अथवा टेस्ट पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास घरातील मुलांचे नियमित लसीकरण मात्र क्वारंटाईन पिरिअड संपल्यावरच चालु करावे लागेल. कारण जरी क्वचित मुलांना काही लक्षणं नसली तरी मुलं घरातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असतात हि वस्तुस्थिती विसरून चालणार नाही.
**सध्या जोरदार चर्चेत असलेल्या “फ्लू च्या लसीचं ” काय?? कोरोनाची तिसरी लाट खुप चर्चेत आहे व अनवधानाने लहान मुलांना या लाटेचा खुप फटका सहन करावा लागेल असं जगभारतील तज्ञांचं मत आहे. *योगायोगाने सध्या पावसाळ्याचाहि सिझन चालु आहे. या काळात सिझनल फ्लू/ कॉमन फ्लू/स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार सुद्धा खुप फोफावतात आणि महत्वाचे म्हणजे “फ्लू” व “कोव्हीड 19” या दोन्ही संसर्गमय आजारांची लक्षणं मात्र सारखीच असतात. त्यामुळे फ्लू च्या लसीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतंय.
फ्लू ची लस निश्चितच सर्व लहान मुलांना द्यावी जेणेकरून त्यांना नजीकच्या काळात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसली तर कोव्हीड 19 निदनाचा मार्गही मोकळा होईल. फ्लूजन्य आजार जरी सौम्य असले तरिही आजाराचं एखादं कॉम्प्लिकेशन जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कोव्हीड विरोधी प्रतिकारशक्ती जरी नाही मिळाली तरी फ्लू विरोधी प्रतिकारशक्ती मिळण्यासाठी सर्व पालकांनी फ्लू ची लस त्यांच्या लहानग्यांना जरूर द्यावी.
सध्या पँडेमिक मध्ये रुग्णालयात गेलो तर आपल्याला किंवा आपल्या लहानग्यांना कोरोना संसर्ग होऊ शकतो हा पालकांचा व नातेवाईकांचा समज निश्चितच खुपसा चुकीचा म्हणता येणार नाही. अर्थात सरकारनं जाहीर केलेली संपूर्ण कोव्हीड विरोधी नियमावली सर्वच रुग्णालयांमध्ये पाळली जाते तरिही मग येथे पालकांच्या दृष्टीने दोन मुद्दे उपस्थित होतात……
**मार्च – एप्रिल मध्ये कोरोना पँडेमिक पिक वर असताना काही मुलांच्या नियमित लसीकरणातील काही लसी घ्यायच्या राहिल्या असतील (उदा. ट्रिपल/पोलिओ) तर काय करावं ?…….नियमित लसीकरण शेड्युल मध्ये 2 – 3 महिन्यांच्या अंतराचा फरक पडला असेल तर पुढील कोर्स एक-एक महिन्याच्या अंतराने पूर्ण करावा. शेड्युल नव्याने चालु करण्याची गरज नाही. परंतु सद्यपरिस्थितीत जेव्हा कोव्हीड रुग्णासंख्या कमी होण्याचं नाव घेत नसताना कोणकोणत्या लसींना प्राधान्य द्यावं हि एक समस्या पुढे येत चाललीये. तर अशा परिस्थितीत बी सी जी /ट्रिपल, पोलिओ, कावीळ रोटा, मेंदूज्वर यांजबरोबर एम एम आर, फ्लू व निमोनिया सारख्या लसींना प्राधान्य द्यावे.
*कोव्हीड होईल या भीतीने जर नियमित लसीकरणच खुप उशिरा चालु झाले असल्यास……मात्र संपूर्ण शेड्युल आय ए पी च्या निर्देशांकानुसार पुढे चालु ठेवावा. ईथे मात्र एक गोष्ट मला नमुद करायची आहे आणि ती म्हणजे बऱ्याचशा लसी हल्ली विविध कॉम्बिनेशन मध्ये येतात आणि या एकत्रित लसी घेतल्याने दवाखान्यातील/क्लिनिक मधील व्हिजिट्सहि कमी करता येतील जेणेकरून मुलांचे व पालकांचे दवाखान्यातील एक्स्पोजर कमी होईल.
**कोव्हीड पँडेमिक मध्ये लसीकरण केल्यास निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीवर काही परिणाम होईल काय ?…. हा पालकांच्या मनात येणारा सर्वसामान्य प्रश्न !!… आता सध्याच्या कोव्हीडमय वातावरणामुळे नियमित लसीकरणाने नियंत्रणामध्ये येणाऱ्या आजारांच्या प्रतिकारशक्तिमध्ये काहीही फरक पडणार नाही. उलट काही नियमित लसीकरणाने कोव्हीड विरोधी प्रतिकारशक्ती येते का ? याविषयीही जगभरात संशोधन चालु आहे.
*हि वेळ (कोव्हीड पँडेमिक)…. नियमित लसीकरणासाठी अयोग्य नाही ना?…. कधी कधी असाही फोन कॉल येतो.
आपणा सर्वांना….विशेष करून पालकांना येथे मला हे सूचित करायचे आहे कि लहान मुलांना विनाकारण छोट्या छोटया कारणासाठी घराबाहेर काढु नका. त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणं टाळा परंतु नियमित लसीकरणासाठी निश्चित घेऊन जा. कारण तो त्यांचा हक्क आहे.
लसीकरणाचे फायदे अनेक आहेत व विज्ञानाने ते केव्हाच सिद्ध केले आहेत. त्यासाठी बिच्चारे लहान मुल स्वतः डॉक्टरकडे जाऊ शकत नाही आणि म्हणुन प्रत्येक पालकाने हि आपली नैतिक जबाबदारी समजून, सरकारच्या कोव्हीड विरोधी नियमावलिचे पालन करून मुलांना लसीकरणासाठी बालरोगतज्ञांच्या क्लिनिक/दवाखान्यात जायला पाहिजे….अर्थात सरकारने जाहीर केलेली कोव्हीड विरोधी नियमावली अवलंबून इंडियन ऍकॅडमी ऑफ पीडियाट्रीक्स च्या निर्देशनुसार सर्वच लसी घेतलेल्या केव्हाही चांगल्या !!
*मग काय आहे हि सरकारची नियमित लसीकरणाच्या वेळी अवलंबिण्याची कोव्हीड विरोधी नियमावली ? .. लसीकरणासाठी मुलां/मुलीं बरोबर एक किंवा दोन व्यक्तींनी जावं, डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये गर्दी करु नये, अपॉइंटमेंट घेऊनच लसीकरणासाठी जावे, सांगितलेल्या वेळेतच बहुदा पोहचण्याचा प्रयत्न करावा, दोन वर्षांच्या आतील बालकांव्यतिरिक्त सर्वांनी मास्कचा वापर करावा, मुलांना अंगभर कपडे घालावे… मौजेही असावेत, बालकांना टेबलावर झोपवण्यासाठी सोबत एक एक्सट्रा शाल अथवा स्वछ कापड घ्यावे. वेटिंग रूम व कन्सल्टिंग रूम मध्ये सामाजिक अंतर पाळावे तसेच शक्य झाल्यास डिजिटल पेमेंट केल्यास ऊत्तम.
मित्रहो….संसर्गरहित व निरोगी राहण्याची लसीकरण हि गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच लहान मुलांच्या लसीकरणाविषयी आपल्या देशातील आय.ए. पी ची जी ऍडव्हायजरी कमिटी आहे ती पँडेमिक मध्ये देखिल नियमित लसीकरणास दुजोरा देते.
– लेखन : डॉ राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800