ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा-कौसा भागात आरोग्य दिनी झालेल्या बालकांच्या मौखिक आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या ४०% बालकांचे दात
गोड पदार्थ, पेस्त्रिज, टॉफिज इत्यादींच्या सततच्या सेवनामुळे बिघडल्याचे दिसून आले.
प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ.उल्हास वाघ यांनी या शिबिरात चित्रफिती द्वारे, दिवसातून दोन वेळा ब्रशने दात साफ करणे, दातांची नियमित तपासणी करणे, काही खाल्ल्यानंतर दात पाण्यानें स्वच्छ करणे, इत्यादी बाबींवर रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.
यावेळी ६५ बालकांची तपासणी करण्यात येवून त्यावर उपचार आणि समुपदेशन करण्यात आले.
“प्रशासनातील लोकसेवक” असा लौकिक असलेले महाराष्ट्र शासनाचे माजी अपर मुख्य सचिव सतीश त्रिपाठी, अध्यक्ष असलेल्या, “सेतू चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई,” या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये अतिशय तळमळीने बालकांची दंत तपासणी, उपचार आणि समुपदेशन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी यांनी डॉ.उल्हास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
या शिबिरासाठी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा, यांच्या विशेष सहकार्याने आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची उपलब्धता कारण देण्यात आली होती. शिबिरात सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संपतराव शिंदे उपस्थित होते.
शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे स्थानिक कार्यकर्ते, अकील ताडे, समीर अली आणि नसरीन अन्सारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सेतू
सेतू चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या वतीने ठाणे, औरंगाबाद, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात वंचित कुटुंबातील मुले – मुली यांच्यासाठी बालवाड्या, व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग आणि लैंगिक कामगारांना शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठी स्थानिक शासकीय/निमशासकीय संस्थांच्या सहकार्याने आणि सहभागाने विविध उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून या मौखिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
– लेखन : अशोक लोखंडे.
निवृत्त कृषि संचालक तथा विश्वस्त,
सेतू चॅरिटेबल ट्रस्ट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800