बाल्यावस्थेतील पोषण, वाढ व विकास या विषयावर राज्यस्तरीय सल्लामसलत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच मुंबईत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.
या परिषदेचे उद्घाटन भारतीय बाळरोग संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. नीलम मोहन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. सिमिन इराणी, प्रा. मृदुला फडके, डॉ. पल्लवी सापळे (संयुक्त निदेशक, वैद्यकीय शिक्षण व अनुसंधान निदेशालय, डॉ. उदय बोधनकर (कार्यकारी संचालक, COMHAD), डॉ. यशवंत पाटील (MMC निरीक्षक) आणि श्रीमती युनिसेफच्या राजलक्ष्मी नायर यांची उपस्थिती लाभली.

या परिषदेत तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी बाल पोषण, वाढ आणि विकास या संदर्भात सखोल चर्चा केली. त्यातून “महाराष्ट्र जाहीरनामा” आणि १० मुद्द्यांचा कृती आराखडा सादर करण्यात आला.
हा कृती आराखडा पुढील प्रमाणे आहे : –
१) पहिले आणि पुढील १००० दिवसांचा समावेश :
बाल आरोग्य धोरणात “पहिले १००० दिवस” आणि “पुढील १००० दिवस” यांचा समावेश करून २ ते ५ वर्षे वयोगटाला प्राधान्य द्यावे.
२) पूर्वशालेय पोषण कार्यक्रम बळकट करणे :
कुपोषण, सूक्ष्मपोषक तुटवडा आणि बाल लठ्ठपणा टाळण्यासाठी अंगणवाडी व समुदाय स्तरावर संतुलित आहार आणि आहारातील विविधता वाढवावी.
३) बालविकास व शाळा तयारी सुनिश्चित करणे :
खेळावर आधारित शिक्षण, लवकर उत्तेजन, भाषिक विकास आणि पूर्वशालेय शिक्षण यांना प्रोत्साहन द्यावे.
४) निरोगी जीवनशैली व शारीरिक क्रिया प्रोत्साहित करणे :
२ ते ५ वर्षांच्या मुलांमध्ये रोजचा व्यायाम, बाहेरील खेळ, पुरेशी झोप आणि कमी बसून राहण्याची सवय वाढवावी.
५) स्क्रीन वापरावर नियंत्रण :
लहान मुलांमधील स्क्रीन वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून पालकांमध्ये डिजिटल जागरूकता वाढवावी.
६) वाढ व विकास निरीक्षण मजबूत करणे :
अंगणवाडी केंद्रे, बालरोग तज्ञ व समुदाय आरोग्य कार्यक्रमांद्वारे नियमित वाढ व विकास तपासणी करावी.
७) लवकर ओळख व हस्तक्षेप :
विकासातील उशीर, ऑटिझम, भाषिक अडचणी आणि वर्तनात्मक समस्या यांची लवकर तपासणी व उपचार व्यवस्था बळकट करावी.
८) पालक व संगोपनकर्त्यांचे सक्षमीकरण :
पोषण, संवेदनशील संगोपन, लवकर शिक्षण आणि निरोगी सवयींबाबत पालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबवावेत.
९) किशोरवयीन मुलींचे पोषण सुधारणा :
ॲनिमिया नियंत्रण, पोषण आणि आरोग्य शिक्षण यावर भर देऊन पुढील पिढीचे आरोग्य सुधारावे.
१०) बहुउद्देशीय समन्वय वाढवणे :
आरोग्य, पोषण, शिक्षण आणि महिला व बाल विकास विभाग तसेच सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधावा.
“पुढील १००० दिवसांमध्ये गुंतवणूक” ही समाजाच्या बुद्धिमत्ता, उत्पादकता आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामूहिक प्रयत्नांद्वारे प्रत्येक बालक केवळ जिवंत राहणार नाही, तर सक्षमपणे विकसित होऊन आपली पूर्ण क्षमता साध्य करेल, अशी या जाहीरनाम्याची भूमिका आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
