Thursday, July 3, 2025
Homeलेखबालपणीचा बाप्पा

बालपणीचा बाप्पा

“आले- आले, आले- माझे, गणराज आले.” गणरायांची कर्णमुग्ध गीते ऐकली की, मन बालपणातील माझ्या गणरायाकडे धाव घेऊ लागते.

विघ्नहर्ता साऱ्यांसाठी सारखाच असतो. फक्त आपण त्यांच्या आगमनाचे स्वागत व त्यांचे अनंतचतुर्थीपर्यंतचे, मनोभावे केलेले सोवळे, आपल्यात सामावलेल्या दैवताची करत असलेली आरस, यात फक्त वेगळेपणा असतो. बाप्पाच्या येण्याने घर कसे आनंदून आलेले असते. स्वच्छतेबरोबरच सजावटीलाही महत्त्व दिले जाते. अकरा दिवस अनेक कार्यक्रमांनी बाप्पांचे मनोरंजन केले जाते.

अकरा दिवस बाप्पांचा आवडता मेनू “मोदक” व “नेवरे” (ओले खोबरे व गूळ, एकत्रित सारणाची करंजी) घरात बनविला जातो. लहानथोर आनंदाने वेडे झालेले दिसतात. असा हा “उंदीर मामा की जय, खाण्या पिण्याची सोय” घेवून आलेला, हा माझा बाप्पा !

माझ्या लहानपणात बाप्पाचे केलेले कोड कौतुक, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली गावरान आरस, तुमच्या समोर मांडण्याची बुद्धी, जणू आज मला माझ्या बाप्पानेच जागी केली असावी.

पूर्वापार चालत आलेली माझ्या माहेरची प्रथा ! गणपतीची मूर्ती स्व:हस्ते लिंपलेली असावी.
बाजारातील मूर्ती विकत आणू नये. मग काय ! माझे कलाकुसर करणारे काका, दीड- दोन महिन्यांची कामावर सुट्टी टाकून, गावी येत असत. नदी पल्याड डोंगरातून शाडू माती आणत असत. प्रथम येणारा नागपंचमी सण ! त्यासाठी ते हातानेच, नागोबाची सुंदर नागमोडी वेटोळाकार मातीची आकृती तयार करत असत. ओट्यावरील डाव्या बाजूच्या भिंतीला लाल मातीने सारवण करून, त्यावर चुन्याने, नागोबाचे चित्र रेखाटले जात असे. अळूच्या पानात नागोबाला बसवून दूध व टोपपोळीचा नैवेद्य दाखवला जात असे. संध्याकाळी अळूच्या मूळातच नागोबाचे विसर्जन केले जात असे.

दुसऱ्या दिवसापासून गणपती लिंपण्याचे काम सुरू होत असे. अतिशय अणकुचीदार साहित्यांचा वापर करत, काकांच्या हस्ते मूर्ती महिन्याभरात तयार होत असे. रोज शाळेतून घरी पोहचेपर्यंत, मनात उत्सुकता लागून राहत असे, “आज गणपतीची मूर्ती कुठपर्यंत तयार झाली असेल ?” हीच असते बालमनातील बाप्पा विषयीची श्रद्धा व त्यांच्या आगमनाची उत्सुकता !

रंगकाम करताना, सुट्टीच्या दिवशी मीही हाती ब्रश घेऊन, बाप्पांना शोभित करण्याची संधी मिळवत असे. तेव्हा मिळणारा आनंद, म्हणजे सर्व आनंदापेक्षा खूप मोठा आनंद वाटत असे.

घरात मधल्या पडवीत(वळय)जातं मांडले जात असे. घरभर, भाजलेल्या चण्याचा वास मस्त दरवळत असे. आई सोबत बसून आईच्या जात्यावरील ओव्या ऐकत, चणे भरडून, त्याची टरफले वेगळी केली जायची. डाळीचे पीठ करून गूळ घातलेले सारण तयार होत असे. हेच सारण भरून, मस्त खुसखुशीत करंज्या तयार होत असत. थोडेफार पीठाचे लाडूही वळले जात असत. देवाचा  नैवेद्य म्हणून आम्हा मुलांना मात्र खाण्यास दिला जात असे.

बाप्पांची दरसाल ठरलेली भिंत, रंगीबिरंगी चित्रे काढून रंगवली जात असे. बाप्पाच्या बरोबर बसण्याच्या वर चौरस- मध्यम आकाराचा चौरंग बांधला जात असे. त्यामधे माळरानात उगवलेली रंगीबेरंगी फुले, गुच्छ बनवून, व त्यात तेरड्याची फुले अशी चौरंगाला पूर्ण भरून बांधली जात असत. मध्यभागी आंब्याची डहाळी न चुकता बांधली जात असे. बाप्पाच्या चेहऱ्यावर सुंदर स्वच्छ कापड ठेवलेले असे. “गणपती बाप्पा मोरया !” असे म्हणत, पाटासहित बाप्पांना चौरंगा खाली त्यांची स्थापना केली जात असे.

गणपतीच्या तिन्ही बाजूने नक्षीदार चित्रांनी भरलेले कापडी मखर बांधले जात असे. यासाठी खास त्या मखरास दरवाजा ठेवून, बाप्पा भोवती उभारले जात असे. उद्देश एवढाच, दर्शन घेणाऱ्या भक्तांनी मखराच्या बाहेरून बाप्पाचे दर्शन घ्यावे. असे विशिष्ट पावित्र्य पाळले जात असे.

वाडवडिलांच्या पारंपारिक प्रथेनुसार, प्रत्येक घराला एक देवघर असे. त्याच्या उंबरठ्याच्या आत फक्त छोट्या मुलांना व पुरुष मंडळीला प्रवेश दिला जात असे. देवघराच्या उंबरठ्या बाहेरून देवांना नमस्कार करण्याची प्रथा होती. ती परंपरा बाप्पांच्या मखरातही वापरली जात असे. स्त्रियांना आरती हातात घेण्याचा मानही दिला जात नसे. हे थोडसं मनाला खटकत असे ! पण काय करणार ! पूर्वापार चालत आलेली प्रथा तोडणे अशक्यच !

प्रथेचे पालन करत आम्ही लहान मुले भजनांचा कार्यक्रम आयोजित करत असू. त्यावेळी भजनातील “बुवा” ही पदवी भूषवत, मी गायलेली गाणी, “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा” दुसरे गीत, “देहातीची जोडी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता” आणि तिसरे गाणे “बाई मी पतंग उडवीत होते”, टाळ- मृदंगाच्या तालावर रंगत असत. ते बाप्पाचे सुंदर दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते.

शेजारील बायका व मुली एकत्र जमून फुगडया खेळ रंगवत असू. कधी “बस फुगडी” घालताना तोंडाने फू- फू असा पका (तोंडातून काढला जाणारा आवाज) घालत, “बस फुगडी,पाय लंगडी”, असे गीतही म्हटले जात असे. “झिम्मा” खेळताना “झिम पोरी झिम, कपाळाला भिंग”,  हे गीत गायले जात असे. पायावर पाय टाकून “कोंबडा” फुगडी खेळली जात असे. कंबरेवर दोन्ही हात ठेवून “पिंगा” खेळला जात असे. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पावलाला पाऊल टेकवत “कांडण” फुगडी खेळली जात असे.

मोठे वर्तुळाकार फिरत प्रौढ बायका, महाभारतातील कथा, ओव्या गाऊन, कमरेत वाकून, हाताची टाळी वाजवून, एकत्रित लांब सुरात म्हणत असत. अशा अनेक फुगड्या खेळताना, सकाळच्या प्रहारी कोंबडा आरवण्याचा आवाज, कानी पडायचा. रात्र कधी संपली ? ते कळतच नसे.

बाप्पांचे मनोरंजन पुरुष मंडळींच्या भजनाने, रात्रभर होत असे. बरेचदा “डबल बारी” म्हणजेच समोरासमोर दोन भजनी मंडळ, स्पर्धक होवून, प्रश्न उत्तरांच्या झुंजीत, ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत असत.

त्यावेळी बाप्पाचा प्रसाद म्हणून “पिठाच्या करंज्या” व “कडक बुंदीचे लाडू”, “पीठाचे लाडू” सोबत “गुळाचा काळा चहा” मिळत असे. सोबत घेतलेली पिशवी प्रसादाने भरून जात असे. अशी ही बाप्पानी केलेली खाण्या- पिण्याची सोय असे.

माझ्या बालपणातल्या बाप्पाच्या गोड गोड आठवणी, त्याच्यासाठी केलेली भजने, अनेक प्रकारच्या फुगडयानी रंगलेल्या त्या रात्री, बाप्पाचा प्रसाद रुपी खाण्यास मिळालेला तो, चविष्ट गावचा मेवा, मी कशी विसरेन बाप्पा !

विसर्जनाच्या दिवशी तुझ्या प्रसादात घातलेले गाव जेवण, मखरातून तुला बाहेर ठेवून, तुझा उतरवलेला साज, हे सारे दृश्य पाहून, स्त्रियांनी डोळ्याला लावलेला पदर आणि मुलांनी दिलेला तो भावनिक आक्रोश, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला.” सारेच चित्र काळजाला चटका लावून जाणारे असे. काठावर उभं राहून, तुला डोळे भरून पहात असताना, निरोप देत, क्षणाक्षणाने तू नजरे आड होतोस. तुझ्या अस्तित्वाने भरलेले घर रिकामे होवून जाते.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments