Thursday, July 3, 2025
Homeलेखबालपणीची दिवाळी

बालपणीची दिवाळी

दिवाळी म्हणताच माझे मन अगदी अलवार माझ्या बालपणीत गेले. माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणतात ना रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी आणि या इतक्या आठवणींची आहे मनाच्या गाभाऱ्यात साठवणी.

माहेर माझे कोल्हापूर. कोल्हापूर हे सर्व धर्म समभाव असणारे आणि याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. माझ्या कोल्हापूरची महती अगदी वाखाणण्याजोगी आहे. सगळे सण आम्ही एकमेकांसोबत अगदी आनंदाने साजरे करतो. मग ती ईद असो किंवा दिवाळी.

दिवाळीची तयारी आमची दसऱ्याला सुरू व्हायची. कोल्हापूर मध्ये दसरा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. जिथे संध्याकाळी दसरा होतो म्हणजेच सिमोलंघन होते त्या ठिकाणाला दसरा चौक हे नाव दिले आहे. दसऱ्याच्या दिवशीची एक खास ओळख म्हणजे मातीची खेळणी. मातीची खेळणी दसरा चौकात मिळायची. अजूनही मिळतातच. त्या दिवशी शाहु महाराजांनी सोने लुटले की आमची खरेदी सुरू.

आम्ही सर्व जण म्हणजेच आम्ही सहा भावंडं हातात बास्केट घेऊन आमच्या आजी आजोबा बरोबर दसरा चौकात जाऊन खेळणी घ्यायचो. मग यामध्ये मावळे, शिवाजी महाराज, छोटे छोटे वाघ, सिंह, हत्ती, काखेत बाळ घेऊन डोक्यावर घागर घेऊन उभारलेली माई, नवरा नवरी, चुल, घागर, माकड  बापरे काय काय आणि किती तरी खेळणं.

ही खेळणी इतकी सुंदर असायची आणि त्यांचे रंग पण दिमाखदार. आमची स्वारी एकदम खुश. खेळणी घेवून घरी आल्यावर आम्ही भाऊ बहिण आपापली खेळणी कशी छान आहेत हे एकमेकांना पटवून द्यायचो. मग खेळणी बघता बघता कोणाचे तरी खेळणे पटकन हातातून निसटून खाली पडले की फाटकन फुटायचे. ज्याचे खेळणे तुटले तो अगदी रडकुंडीला येऊन तोंड इतकेसे करुन आपल्या फुटक्या खेळाची माती हाताने भरुन त्याला बघत बसायचा. मग आम्ही आमची खेळणी पटपट उचलून आपापल्या बास्केट मध्ये भरुन ठेवायचो.

बघता बघता सहामाही परीक्षा जवळ यायची. परीक्षेवेळी खेळाला अगदीच फुलस्टॉप. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी दिवाळीच्या सुट्टीची नोटीस यायची. मग वर्ग शिक्षिका आम्हाला आमच्या सुट्टीमध्ये करावयाचा अभ्यास लिहून द्यायच्या. अभ्यास तरी किती ओ बापरे ! जितके धडे शिकविले तितक्यांची प्रश्नोत्तरे, गणिताचे सगळे स्वाध्याय, इतिहास, भूगोल आणि सामान्य विज्ञान यांची सर्व प्रश्नोत्तरे, म्हणी, वाक्प्रचार, विरुद्ध अर्थी शब्द बापरे ! आणि रोजचे शुध्द लेखन. हे मला कधीच जमले नाही हा वेगळा मुद्दा.☺️

अभ्यास दिले की मग, ‘मुलांनो, दिवाळीच्या सुट्टीच्या शुभेच्छा आणि सुट्टीत भरपूर मजा करा, आनंद लुटा, फटाके फोडताना खबरदारी घ्या, एकदम जवळ जाऊन फटाका का फुटला नाही ? हे बघू नका, शक्यतो आपल्या पालकांसमोर फटाके फोडा, सांभाळून रहा हो’ असे आमच्या शिक्षिका सांगायच्या. आता इतका सुट्टीतील अभ्यास दिला आहे ते करायचा किती आणि आनंद लुटायचा किती हा आम्हाला पडलेला प्रश्न अगदी प्रत्येक दिवाळीच्या सुट्टीच्या वेळी पडलेला हा गहण प्रश्न आणि हा अभ्यास अगदी शप्पथ घेऊन सांगते, मी काय माझ्या संपूर्ण वर्ग मित्रमैत्रिणीने केला नव्हता. दिवाळीची सुट्टी पूर्ण झाली कि शाळेत पण आमच्या वर मोठमोठे फटाके फुटायचे.

दिवाळीची सुट्टी मिळाली म्हणून आम्ही आनंदाने उड्या मारत घरी यायचो. आता तयारी फराळाची. आमची आजी आणि आई एकदम सुगरण बरं का. बुंदीच्या लाडू साठी इतक्या सुंदर कळ्या पाडायची आजी. आणि मला ती कळ्या पाडताना बघायला खूप आवडायचे. मोठ्या स्टोव्हवर मोठी लोखंडी कढई आणि स्टोव्हसमोर मोठा पाटा ठेवून त्यावर एक मोठी पळी घेऊन पटपट असा आवाज करत तेलामध्ये कळ्या पाडायची आणि लगेच त्या तळून एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायची. ती कळ्या पाडेपर्यत आई दुसऱ्या चुलीवर साखरेचा पाक करायची. मग या दोघी मायलेकी बसून बुंदीचे लाडू वळून डब्यात भरून ठेवायच्या. अहाहा, काय तो खमंगपणा आणि वेलची जायफळाची पूड घालून केलेला सुंदर पाक ! खरंच तसे लाडू आता होतच नाहीत.

यानंतर आजी आमची पुडाच्या वड्या म्हणजेच बाकरवडी करायची. इतकी सुंदर आणि इतकी मोठी वडी कशी तिला जमायची हे एक कोडेच आहे मला. तिच्या वडीचे सारण कधीच बाहेर पडले नाही किंबहुना तिच्या वड्या कधीच तुटल्या नाही. एकसारख्या एकाच आकाराच्या बाकरवड्या.

अनारसे फक्त नाव घेतले की तोंडाला पाणी सुटले. चकली, चिवडा, रवा लाडू, बेसण लाडू, बारीक शेव, शंकरपाळी, करंजी हा सर्व फराळ अगदी दोन दिवसांत ते पण मोठं मोठे डबे भरून या दोघी मायलेकी बसून करायच्या.

आम्हा बाल चमूची तर मेजवानी असायची. शेजाऱ्यांच्या घरात करंज्या करायला जाणे. मग कोण सारण भरणार, कोण त्याची किनार अगदी नाजूकपणे कापणार हे कायम ठरलेले असायचे. जी करंजी तळणारी असायची तिला जरा मान जास्तच हो. म्हणजे तिला हे मोठ्ठे पद मिळालेले असते न. रोजचा एक दिवस सर्वांनी आधीच वाटून घेतलेला असायचा. म्हणजे आज तुझ्या घरी, तर उद्या माझ्या घरी करंजी करायची. करंज्या करतेवेळी छोटे मोठे विनोद. मग मध्येच गाण्याच्या भेंड्या. कधी कधी कोणाची तरी मस्करी. जशा करंज्या खुसखुशीत तसेच वातावरण पण खुसखुशीत.

आता खरी खरेदी फटाक्यांची. बाबा आमचे खुप हौशी. दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री आम्हा सर्व भावंडांना घेऊन फटाके आणायला जायचे. बाबांचा हात धरून चालायचा मान आमच्या छोटे बंधूंचा. जरा ते लाडकं होतं ना आईबाबांचे. आम्ही आपापल्या पसंतीचे फटाके घ्यायचो. ते पण कायमचे ठरलेलेच बरे का. म्हणजे आमची मोठी बहीण दिदी ही जरा घाबरटच आणि अजून ही ती फटाक्यांच्या आवाजाला घाबरते. मग ती नेहमी आपल्याला कुंडीच घ्यायची. ती सुद्धा अगदी लांब उभारुन एका मोठ्या चिमणीने लावून उभारुन बघायची.

सर्वांना ज्यांच्या त्यांच्या आवडीचे फटाके बाबा घेऊन द्यायचे. सर्व जण आपल्या हातात फटाके घेऊन आनंदाने घरी यायचो. फटाक्यांची आतषबाजी पण एकदम मस्त. आपापल्या आवडीनुसार जो तो फटाके फोडणार. मोठे फटाके फाट्टकन फुटला की दिदी आमची घाबरून कानावर हात ठेवून आजीजवळ पळत जायची.

बाबा आमचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बॅंकेत नोकरी करत होते. त्यांना दिवाळी साठी बॅंकेकडून भेट म्हणून मोती साबण आणि सुगंधी तेल मिळायचे.

दिवाळीमध्ये एक मोठी कामगिरी म्हणजे किल्ला बनवायचा. दसऱ्याच्या दिवशी आणलेली सगळी खेळणी घेवून किल्ल्याजवळ मांडला की झाले. किल्ल्याच्या समोर येईल तशी ठिपक्यांची रांगोळी. किल्ल्यावर छोटे छोटे पेपरचे पताके लावून त्याची सजावट करताना मन कसे प्रसन्न व्हायचे. ते छोटे छोटे मावळे अन् वाघ सिंह सजवताना खुप आनंद व्हायचा. दिवसभर किल्ला बनवायचा आणि रात्री फटाके वाजवून दिवाळीचा आनंद साजरा करायचा.

ना वेळेचे बंधन ना जबाबदारीचे डोंगर. होते ते फक्त न फक्त आईबाबांच्या कुशीत आणि आई बाबांच्या छत्रछायेखाली मिळालेले ते निरागस बालपण आणि आम्ही खरोखरच खूप नशीबवान आहोत जे आम्हाला असे आई-बाबा मिळाले, ते आमचे आई बाबा नव्हते तर ते आमचे मित्र होते.

आज पण दिवाळी आहे पण आजच्या दिवाळीत ती दिवाळी मी शोधत आहे जिथे माझे आई बाबा आमच्या बरोबर दिवाळी साजरी करत आहेत.

परवीन कौसर

– लेखन : परवीन कौसर, बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments