Thursday, November 21, 2024
Homeसंस्कृतीबालपणीची दिवाळी…

बालपणीची दिवाळी…

दिवाळी म्हणजे आनंद, चैतन्य, उत्साह..मी आज माझ्या लहानपणी अनुभवलेल्या दिवाळीबद्दल लिहिणार आहे..

मी मूळची डोंबिवलीकर. तेव्हाची डोंबिवली निराळीच होती. आमच्या चाळीसमोर मोठं अंगण होत. ते रोज झाडत असूच. पण दिवाळीच्या आधी सर्व मिळून शेणाने सारवत असू. प्रत्येकीच्या दारासमोर गेरू पसरवून जागा केलेली असायची, रांगोळी घालण्यासाठी. तिथे रोज छान छान रांगोळ्या घालायच्या. पायऱ्यांवर ही रांगोळी आणि तेलाचा दिवा.. सगळी चाळ रंगीबेरंगी कंदील, दिवे ह्यांनी सजून जायची. अजून ही ते रूप डोळ्यासमोर येत.

दिवाळीचा फराळ म्हणजे खाद्यपदार्थांचा सोहळा असायचा. शेजारी रहात असलेल्या मामी, काकू, आत्या, मावशी अशी सगळी मानलेली, जिव्हाळ्याची नाती आसपास असायची.

एकत्र दिवाळीचा फराळ बनवणे म्हणजे तर नुसती धमाल असायची.. खास करून मदतीची लुडबुड करत मस्त खायला मिळणाऱ्या आमच्या सारख्या बालगोपलांची !
जिच्याकडे आज फराळ करणार तिथे प्रत्येकाने काहीतरी पदार्थ बनवून आणायचा. मस्त अंगत, पंगत असायची.

जेवण करायचा कंटाळा आला कधी, तर हक्काची घरं असायचं. आज बाहेरून मागवणे हाच पर्याय आहे.
इतकी एकी आणि प्रेम. वादही होत असत, तरी “मनात एक, ओठात एक” अस काही नाही आणि दिवाळीची काम एकत्र करत असल्याने कामाचा ताण नाही वाटायचा.

दिवाळीच्या आधी दोन दिवस वडील, “चला खरेदीला जाऊ या” अस म्हणायचे. किती आनंद व्हायचा. कमी पैशात तरी आपल्या आवडीची खरेदी करायची, खूप मजा यायची.
दिवाळी सुरू झाली की धम्माल सुरू. थंडीत उठवत नसे. पण आईने हाक मारली की उठायचं, हे अगदी ठरलेलं.
मागच्या ओट्यावर गरम पाण्याचा बंब.. त्याच्या समोर न्हाणीघर.. त्या गरम पाण्याचा सुवास.. अजून ही आठवतो.

आम्ही सगळे चहाबाज.. तोंड धुवून झालं की दोन कप चहा पिणार..लहान असो की मोठे.. लहान मुलांनी चहा प्यायचा नाही हा नियम आमच्या घरी कधीच नव्हता आणि चहा पिऊन बुद्धू काही आम्ही झालो नाहीत हा !☺️

अभ्यंग स्नानाच्या वेळी दोन भाऊ, वडील ह्याच्या बरोबर आई मलाही तेल, उटणे लावायची. मग गरम गरम पाणी अंगावर घेत रहावं असच वाटायचं. थंडी जाण्यासाठी टॉवेलने अंग खसाखसा पुसायच. नवीन कपडे घालायचे. प्रत्येकाच्या अंघोळीच्या वेळी फटाके वाजवायचे.

आमच्या शेजारच्या काकू फार प्रेमळ होत्या. आई वडील लहानपणी गेले. मायेची माणसं कमी होती त्यांच्याकडे. एका दिवाळीत त्यांनी घरी येऊन आईला तेल, उटणे लावले. त्यांची ही पद्धत सर्वांना आवडली.. मग आई ही त्यांना तेल, उटणे लावत असे. सखी शेजारणी अस सुंदर नातं निर्माण झालं होतं.

आजी म्हणजे आईची आई, तिला आम्ही आक्का म्हणायचो. ती जर दिवाळीत आली असली तर ती लावायची आईला तेल, उटणे.. आक्का प्रेमाने माझ्या सर्व मामींना, म्हणजे सुनांना ही तेल, उटणे लावत असे. मग सूना ही त्यांना लावत.
तिची एक आठवण सांगते. तिचा गुरुवारी उपास असायचा. पोटभरीच व्हाव म्हणून मामी तिच्यासाठी साबुदाण्याचे थालीपीठ करत असे.. ते ही अगदी एकच कर असे म्हणायची.. तिला कोणालाही कुठल्याही तिच्या कामाचा त्रास द्यायला आवडत नसे. एक थालीपीठ ते ही नातवंडं, मामी सर्वांना देऊन एक चतकोर ती खात असे.. नको म्हंटल तर रागावत असे. एकटीने खाऊन काय सोन होणार आहे ? असे म्हणत असे. किती मनाचा मोठेपणा होता. आज ही ते सगळं आठवतं.

माझ्या आईचं आणि तिच्या सर्व बहिणी भावंड, वहिनी ह्यांच्यात असलेलं प्रेम हा आमच्या आयुष्यातील फार मोठा आदर्श आहे आणि अजूनही ते प्रेम पुढच्या पिढीने असंच जोपासलं आहे. आजही आम्ही सर्व बहिणी भावंडं काही कारणांनी जमतो, तेव्हा हे दिवस आठवतात.
पहाटे उठून पहिला फटाका कोण लावणार, म्हणून स्पर्धा असायची मुलांच्यामधे..
जास्त करून ही स्पर्धा माझ्यात आणि पद्मनाभ म्हणून शेजारी रहायचा, आमच्या दोघात असायची..
आई अंघोळीला गेली की तेव्हाही फटाके वाजवत असू.. सगळ आवरून एकमेकांना फराळाचं ताट जात असे.. खर तर ते ताट अंगणात सगळे घेऊन येत आणि एकत्र फराळ करत असत. कोणीतरी फक्कड चहा बनवत असे. खूप मजा यायची. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. सगळ्यांचे सगळे नातेवाईक एकमेकांना माहिती असत.

दिवाळीचा प्रत्येक दिवस म्हणजे आनंद, उत्साह.. खूप श्रीमंत कोणीच नव्हत. पण मनाची श्रीमंती खूप होती. तीन भावंडात मिळून फटाके वाटले जायचे. ते पुरवून पुरवून वापरायचे. मी तर बिनधास्त एका हातात उदबत्ती, दुसऱ्या हातात बॉम्ब पेटवून, मग तो जमिनीवर टाकायची, इतर मुलांचं बघून.. आईच्या नजरेला आलं, की मार आपसुक मिळायचा.
“भीती कशी वाटत नाही ह्या कार्टीला ?” अस म्हणायची. पण मोठा भाऊ, त्याचे मित्र करतात ते बघून खूप भारी वाटायचं. काय डेरींग आहे अस म्हणत..
बाण ही हातातून सोडायचे. सगळी भावांची कॉपी करायची सवय. सुदैवाने कधी काही झालं. म्हणतात ना देवाक काळजी म्हणतात ना तसच…

तसंच रांगोळी कोणी छान काढली आहे ते ही बघायचे. मनापासून कौतुक होत होतं.
आतबाहेर अस काही नाही. आमचं चुकल तर शेजारच्या आजी, काकू, आत्या कोणीही ओरडायच आणि प्रसंगी धपाटा ही मिळत असे.
आईवडलांना तर माहीत ही नसायचं. कोणी सांगायचं ही नाही.

भाऊबीज म्हणजे तर मजाच मजा. मी पूर्ण घरात एकुलती एक. काकांचं लग्न झालं नव्हत आणि मावशी ला मुल बाळ नव्हती..खूप प्रयत्न करून ही मुल झालं नाही तिला. मला जास्त भाऊबीज मिळायची. आम्ही भावंडं बाहेर खायला जायचो तेव्हा मी पैसे देत असे, ह्या साठवलेल्या पैशातून.. आपल्याकडे आहे जास्त, तर द्यावे अशी माझी वृत्ती तेव्हापासून आहे. हा मोठेपणा वडलांच्याकडून आलेला आहे. भाऊबीजेला सगळे मामा यायचे. लांब राहणारा मामा सोडून..पण तो जेव्हा भेटेल तेव्हा आई त्याला आठवणीने ओवळायची..
भावंडं आईला भाऊबीज घालायचे तेव्हा आई म्हणायची,” काही आणू नका..तुम्ही सुखात रहा.एवढंच मागणे आहे देवाकडे..”पण ते प्रेमाने काही ना काही भेटवस्तू आणायचेच. दोन तीन दिवस सगळे मजेत, जुन्या आठवणींना उजाळा देत राहायचे. भाऊ निघाले की ही सगळी बहिणी, भावंडं एकमेकांची गळा भेट घेऊन रडायचे.. मग मामी लटक्या रागाने, पदराने डोळे पुसत बोलायची “झालं बाई ह्यांच सुरू” ह्या सर्व भावंडांच्या प्रेमाच त्यांना खूप कौतुक..

माझ्या सर्व मामींनी हे प्रेम जपलं आणि वाढवलं. खर तर दोन्ही मामा कर्जतला म्हणजे जवळच रहायचे. एक मामा नागपूर मध्ये रहायचा. दिवाळी, मे महिना आम्ही सर्व एकत्र असायचो.. तरी त्यांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. आमच्यासाठी हा फार मोठा आदर्श होता.

माझ्या वडीलांनी ही स्वतः सर्वांचं खूप केलं. अगदी त्यांच्या मामीचा भाऊ, नोकरी गेली म्हणून दोन वर्ष, त्यांच्या तीन मुलांच्यासह आमच्याकडे रहात होता. आता अशी उदाहरण दुर्मिळच..

खरं तर आज आर्थिक समृद्धी खूप आहे. पण नात्यांमधली निर्मळता राहिली नाही, ह्याच वाईट वाटते..खूप काही आहे, पण देण्याची इच्छा फार कमी आहे. आजही ती नाती, त्या प्रेमाची तृप्तता आत खोल रुजली आहे. अजूनही त्या नात्याचा गोडवा जागत, आवर्जून दिवाळीत फोन येतो आणि आपणही करतो, तेव्हा वाटत खरच आपण भाग्यवान होतो..जमेल तेवढा हा वारसा पुढच्या पिढीला देत रहायला हवा.. बोलण्यातून नाही, वागण्यातून.. खरं ना ?
आपल्या सर्वांच्या नात्यात असाच गोडवा लाभू दे आणि वाढू दे, अश्या शुभेच्छा दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देते आणि थांबते..

प्रतिभा चांदूरकर

— लेखन : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments