Wednesday, July 2, 2025
Homeलेखबालपण हिरावू नका !

बालपण हिरावू नका !

“अरे मनीष, बाळ उठ लवकर, उशीर होतोय…” “थांब जरा, झोपु दे ना आई थोडावेळ, झोप येतेय खुप…” “अरे, ब्रश तोंडात धरून काय बसलास नुसता, दात घास पटापट…” “आई, तू घालून दे ना मला आंघोळ…”

“मला नाही वेळ, डबा करायचा आहे तुझा…तुझी तुच कर पटापट…” “आई, सफरचंद नको मला…बिस्किटं दे…” “आई, माझे सॉक्स कुठे आहेत ?”

“अरे देवा, धुवायचे राहिलेत वाटतं…घाल तसेच आजच्या दिवस…चल, आटप लवकर…स्कुल बस ची वेळ झाली तुझ्या…” “आई, मला दोन नंबरला…”
“अरे, वेळ नाही आता…ती बघ बस आली…चल, पळ लवकर…”

दररोज सकाळी अनेक घरांमध्ये होणारा हा संवाद… ओळखीचा वाटतोय नं…अगदी आपल्याच घरात घडल्यासारखा…

सिनियर के.जी. मधुन पहिलीत गेल्यानंतर अचानकपणे वाढलेली शाळेची वेळ आणि ती वेळ सांभाळतांना होणारी बालक- पालकांची धांदल कित्येक घरांमध्ये अशीच पहायला मिळते.

सिनियर के.जी.त असणाऱ्या मुलांची शाळा साधारण दोन-अडीच तास एवढीच असते. पण तीच मुलं पहिलीत गेल्यावर शाळेची वेळ सकाळी.. चार ते पाच, कधीकधी सहा तास एवढी लांबलचक होते. स्कुल बस किंवा रिक्षाने जाणाऱ्या मुलांची वेळ अंतरानुसार एक ते दीड तासाने वाढु शकते. त्यामुळे सकाळी साडेसात वाजता किंवा त्याही आधी तयार राहावं लागतं.

सिनियर के.जी. तील साडे पाच-सहा वर्षांची मुलं पहिलीत गेली की केवळ एका वर्षाने मोठी होतात. पण शाळा मात्र मुलं एकदम मोठ्ठी झाली असे गृहीत धरून शाळेची वेळ जवळपास चार तासांनी वाढवतात.

अपुरी झोप, गडबडीत आवरणं, घाईघाईने तोंडात कोंबावा लागणारा ब्रेकफास्ट या सर्वांचा दुष्परिणाम लहानग्यांच्या शरीरावर होत नसेल का ? ‘आम्ही मोठ्या टिफिन मध्ये फक्त भाजी पोळीच आणु देतो आणि छोट्या टिफिन मध्ये फळे, बिस्किटं इत्यादी… जंक फुड एकदम बंद’ असं अनेक शाळा अभिमानाने सांगतात.

उपक्रम चांगलाच आहे पण एवढ्या सकाळी फळे चिरून देण्यासाठी पालकांना वेळ असतो का ? मग मैद्याच्या बिस्किटांचा सोपा पर्याय…कारण दुसरं काही करून देण्यासाठी सवडच नसते. शिवाय दुपारचे जेवण दररोज फक्त भाजी पोळी असे कोरडेच केले तर मुलांनी वरण-भात, चटण्या, कोशिंबिरी, असा चौरस आहार कधी घ्यायचा ? फक्त सुट्टीच्या दिवशी ? कारण पुष्कळ ठिकाणी रात्रीच्या वेळी असा चौरस स्वयंपाक केल्या जात नाही.

आम्ही फक्त पुस्तकी शिक्षण देत नाही तर इतर अनेक अनुभव देणारे उपक्रम, कला, क्रीडा, संगीत हे सुद्धा घेत असतो. असे शाळेचे तास वाढवण्यामागचे कारण अनेक वेळा सांगतात. ते योग्यच आहे. पण हे सर्व एकाच वर्षात लगेच न करता साधारण चौथी पर्यंत दरवर्षी टप्प्याटप्प्याने एक ते दीड तास शाळेची वेळ वाढवणे करता येऊ शकते.

पण शाळांना फक्त मुलांचा विचार करूनच चालत नाही. त्यांना शिक्षकांचा, स्कूल बस वाल्यांचा, आणि इतरही अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असेल. धावपळ आणि स्पर्धेच्या युगात तरुण वयातच तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. याबद्दल सातत्याने चर्चा होत असतात. पण याचाI पाया बालपणातच घातला जातोय असं नाही का वाटत ?

भावी पिढी बौद्धिक दृष्ट्या खूपच प्रगत आहे. त्यांच्या बुद्धीला पैलू पाडावे, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी सर्वच शाळा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतील. पण हे सर्व करतांना मुलांच्या आरोग्याचा दूरगामी विचार फारसा होतांना दिसत नाही.

सध्याची तरुण पिढी पैशाने तर समृद्ध दिसते, पण शारीरिक व्याधींनी मात्र त्रस्त आहे. त्यामुळे याचा शाळांनी आणि पालकांनीही बारकाईने विचार करायला हवा. पण मुलांचे पालक जर दिवसभर घराबाहेर राहत असतील आणि घरी सांभाळण्यासाठी कोणीच नसेल तर त्यांचाही नाईलाज असतो. मग मुलांच्या बौद्धिक आणि स्पर्धात्मक प्रगतीच्या नादात आपण त्यांचे आरोग्य आणि बालपण हिरावुन घेतोय हे कळत असलं तरीही त्यात योग्य तो बदल कसा होणार.

अशा या दुष्टचक्रात अडकल्यामुळे बालदिनाच्या दिवशी आमचं बालपण किती रम्य आणि आताच्या मुलांचं बालपण कसं हरवल्या जातंय यावर गणवेश घालुन, स्कुलबॅग घेऊन शाळेत जाणारी मुलं कितीही गोजिरवाणी दिसली तरी नुसतं भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही. प्रवाहपतितासारखं त्यात वाहत जाऊन आपणही त्यांचं बालपण हरवण्यासाठी कारणीभुत व्हायचं का हे आपणच ठरवायला हवं.

भारती महाजन-रायबागकर

– लेखन : सौ.भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४