Thursday, November 21, 2024
Homeलेखबालरंगभूमी : अनुकरणीय उपक्रम

बालरंगभूमी : अनुकरणीय उपक्रम

बालरंगभूमी परिषदने त्यांच्या जिल्हास्तरीय शाखांच्या वतीनं ऑक्टोबर महिन्यात १९ जिल्ह्यात विशेष बालकांसाठी महोत्सव आयोजित केले होते. या महोत्सवाचे स्वरूप व महत्व समजून घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात ठाणे येथील महोत्सवाचा अभिनेत्री, लेखिका मेघना साने यांनी लिहिलेला वृत्तांत पुढे देत आहे. हा वृत्तांत वाचून असे महोत्सव दरवर्षी, गावोगावी व्हावेत असे वाटते.
बालरंगभूमी परिषद, त्यांच्या जिल्हास्तरीय शाखा, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा चालक, शिक्षक, पालक, बालक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
– संपादक

बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेने बालरंगभूमीच्या विकासासाठी जिल्हानिहाय कार्यकारिणी मंडळे स्थापन केली आहेत. मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के व कार्यवाह बालनाट्य दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी मुलांच्या विकासासाठी या संस्थेचे विविध उपक्रम आखले आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने नुकतेच लोककला संमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन महाराष्ट्रातील अनेक शहरात ऑगस्ट महिन्यात पार पडले.

बाल रंगभूमीच्या सर्व शाखांनी आपापल्या शहरात ऑक्टोबर २०२४ महिन्यात “दिव्यांग महोत्सव” आयोजित करावा अशी संकल्पना नीलम शिर्के यांनी मांडली. संमेलनाला नाव दिले ‘यहाँ के हम सिकंदर’! त्यानुसार ठाणे येथे १३, बीड येथे ५, नंदुरबार येथे ८, जळगाव येथे ९, रत्नागिरी येथे १४, सोलापूर येथे १५, सांगली व कोल्हापूर येथे १६, पुणे येथे १७, कल्याण येथे १८, मुंबईला १९ , अकोला व परभणी येथे २०, नाशिक येथे २१, धुळे आणि संभाजीनगर येथे २२, लातूर येथे २३, नागपूर येथे २४ तर अहिल्यानगर येथे २५ रोजी ही संमेलने संपन्न झाली.

ठाणे येथील संमेलन आयोजनात माझा (मेघना साने) सक्रिय सहभाग होता. ठाणे शाखेचे अध्यक्ष तथा ‘ठाणे वैभव’चे संपादक, श्री मिलिंद बल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील कार्यकारिणीतील सदस्यांनी काम करणे सुरू केले. मिलिंद बल्लाळ आणि कार्यवाह अमोल आपटे यांनी प्रत्येकाला या संमेलनाची वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली. त्यानुसार मी, सुचेता रेगे आणि नूतन बांदेकर यांनी विशेष मुलांच्या शाळांना संपर्क करण्याचे काम स्वीकारले.

विशेष मुलांमध्ये, मतिमंद, विकलांग, दृष्टिहीन, कर्णबधिर, मूकबधिर, स्वमग्न, अशा सर्व प्रकारच्या मुलांच्या शाळा ठाणे आणि परिसरात होत्या अशी माहिती मिळाली. कधी नेटवरून, तर कधी ओळखीतून माहिती काढून ठाणे आणि परिसरातील २६ शाळांशी आम्ही संपर्क साधला. नीलम शिर्के स्वतः उपस्थित राहणार असल्यामुळे आम्ही हे संमेलन नीटनेटके होण्यासाठी विशेष काळजी घेत होतो. सहभागी झालेल्या सर्व शाळांतील शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला उत्तम सहकार्य केले.

या संमेलनात दिव्यांग मुलांना गायन, वादन, नृत्य इत्यादी कला रंगमंचावर सादर करता याव्यात यासाठी एक मोठा हॉल आम्ही घेतला होता. तसेच काही संस्थांतील मुले उत्तम वस्तू तयार करतात. त्या वस्तू स्टॉलवर मांडून त्यांची विक्री करण्याची परवानगी होती.

संमेलनात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही संस्थांशी संपर्क साधत होतो. पण या शाळांकडून आणि संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कार्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. यानिमित्ताने ती झाली.

प्रगती अंध विद्यालय, बदलापूर, जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची शाळा, पालघर, या शाळांमध्ये गायन वादन कलांचे शिक्षण दिले जाते. आज प्रगती अंध विद्यालयात पंच्याहत्तर विद्यार्थी पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एका विद्यार्थ्याने ‘टाय अँड डाय’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध ‘जिद्द’ शाळेत विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात. वैद्यकीय शिबिरे हा या शाळेचा अविभाज्य भाग आहे.

‘चैतन्य’ मतिमंद मुलांची शाळा ही मुलांची उद्योगशाळा आहे. येथे पदाधिकारी व कर्मचारी सर्व स्त्रियाच आहेत. या शाळेत थालीपीठ भाजणी, बेसन पीठ ते अगदी शिकेकाई पावडरपर्यंत उत्पादने तयार करायला दिव्यांग मुले झटत असतात. त्यांना कुवतीप्रमाणे स्टायपेंड दिला जातो.

‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ ही वाडा येथे बहुविकलांग मुलांची शाळा आहे. त्यांचे वसतिगृह तीळगा गावी आहे. येथेही मुलांना व्यवसाय शिक्षण मिळते. तीव्र व्यंग असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी पालकांना मदत व्हावी या हेतूने ही संस्था काम करते.

‘रेनबो फाऊंडेशन, बदलापूर’ येथे मुलांच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली जाते. गेल्या वर्षी त्यांनी पस्तीस विद्यार्थ्यांना ‘मेनस्ट्रीम स्कुलिंग प्रोग्रॅम’ (मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश) साठी तयार केले. तसेच कागदी लिफाफा बनविण्यापासून ड्रोन बनविण्यापर्यंत अनेक गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. मुलांना अर्थपूर्ण अनुभवांद्वारे सक्षम केले जाते.

‘कमलिनी कर्णबधिर विद्यालय, ठाणे’ येथे कलाव्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थी विकास साधला जातो.

‘MBA Foundation’ ही संस्था शारीरिक किंवा बौद्धिकदृष्ट्या विशेष मुलांसाठी काम करते. अगदी २ वर्षाच्या मुलांची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवण्यापासून ते नोकरीक्षम वयाच्या मुलांना मुख्य प्रवाहात उभे होण्यासाठी ही संस्था मदत करते. ज्यूट, कागद व कापडापासून सुंदर व कलात्मक पिशव्या बनवायला येथील मुलांना शिकवले जाते.

‘आस्था आरोग्यसेवा’ या संस्थेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी दिली जाते. तसेच हे निवासी अभ्यासकेंद्रदेखील आहे.

‘विश्वास’ मतिमंद मुलांसाठी असलेल्या केंद्रात चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला यांचे प्रशिक्षण दिले जाते.

‘Child and You’ ही संस्था स्वमग्न तसेच विकलांग मुलांसाठी काम करते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा शोध घेऊन त्यांची प्रगती घडवून आणते.

‘संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज्ड’ या संस्थेची सुरूवात मुलांसाठी मैदानी खेळ आयोजित करून झाली. हळुहळू पालकांच्या गरजेनुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी त्यांनी शाखा निर्माण केल्या. सांताक्रूझ, कांदिवली, मीरारोड, डोंबिवली, सीवूड, गोरेगाव, बेलापूर इत्यादी ठिकाणी यांच्या शाखा आहेत.

या शाळांची माहिती घेताना मला मनीषा सिलम नावाची एक कवयित्री मैत्रीण भेटली. तिने ‘राजहंस’ ही संस्था स्थापन केली होती. तिची कहाणी अशी की तिचा स्वतःचाच मुलगा स्वमग्न आहे. तो जसा जसा मोठा होत गेला तेव्हा अशा मोठ्या झालेल्या मुलांना सांभाळताना आईवडिलांना कोणाच्यातरी मदतीची गरज भासते हे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अशा मुलांसाठी तिने ‘राजहंस’ फाउंडेशन स्थापन करून त्या मुलांना सांभाळणे व कलागुणांचे शिक्षण देणे सुरु केले. ऑटिझम विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे, पालकांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे या संस्थेतर्फे केली जातात. तसेच संस्थेचे वोकेशनल सेंटर ८ वर्षांपासून कार्यरत आहे.

‘आत्मन अकादमी’ ही एक अद्वितीय संस्था आहे जी विशेष सूचनांद्वारे मुलांच्या वैयक्तिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करते. ३ विद्यार्थ्यांसह ही संस्था सुरू झाली आणि आज त्यांच्या १४ व्या शैक्षणिक वर्षात त्यांच्याकडे एकूण ६५ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना २५ पेक्षा जास्त शिक्षण सुविधा देणारे, विशेष शिक्षक, थेरपिस्ट आणि प्रशिक्षित व्यावसायिकांचे मार्गदर्शन मिळते आहे.

कर्णबधिर मुले देखील किती प्रगती करू शकतात याचे उदाहरण म्हणजे ‘जव्हेरी ठाणावाला’ शाळा. नॉर्मल शाळेतील अभ्यासक्रम या शाळेत राबविला जातो. अबॅकस ही गणित सोडविण्याची जागतिक पद्धत आहे. विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांनी अबॅकसच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदके पटकावली आहेत.

‘जागृती’ ही बौद्धिक सक्षम नसलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी स्थापन झालेली व पालकांनी चालवलेली संस्था आहे. पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती तसेच क्षमताधिष्ठित कौशल्य विकास असे प्रेरक कार्यक्रम राबविले जातात. समाजामध्ये सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष व्यक्तींवरती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संस्कार केले जातात.

‘आस्था आरोग्य सेवा आणि शिक्षण केंद्र’ बदलापूर हे केंद्र दिव्यांग मुलांसाठी विशेष शिक्षण कार्यक्रम प्रदान करत आहे. या संस्थेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, ऑटिझम इंटरव्हेंशन आणि प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ६२ ही शाळा घोडबंदर रोडवर कासारवडवली येथे आहे. या शाळेत सामान्य मुलांच्या बरोबरीने दिव्यांग मुलांनाही प्रवेश दिला जातो. सामान्य मुलांबरोबर शिकल्यामुळे या मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

संमेलनाचा दिवस उजाडला. एकूण सव्वीस शाळा / संस्थांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. कार्यकारिणीतील राजेश जाधव यांनी कार्यक्रमासाठी हॉल सुसज्ज करून ठेवला होता. दिव्यांग मुलांसमवेत पालक आणि शिक्षकांनी हॉल भरून गेला होता. त्यांचा उत्साह ओसंडून जात होता. बालरंगभूमी परिषदेतर्फे १८ वर्षांखालील मुलांनाच व्यासपीठ दिले जाणार होते. वयाने मोठ्या अशा दिव्यांग मुलांनी बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री व्हावी म्हणून हॉल बाहेरील व्हरांड्यात स्टॉल्स मांडले होते. पणत्या, आकाशकंदील, फराळ, पिशव्या, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, भाजणीची पीठे, विविध प्रकारची अत्तरे, अशा अनेक वस्तू तेथे मांडल्या होत्या. उपस्थितांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. दोन अंध व्यक्ती वांगणी येथून आल्या होत्या. त्यांनी देखील दिवाळीच्या वस्तूंचा स्टॉल लावला होता. संमेलन संपल्यावर त्यांनी स्वतःच स्टॉल आवरला व सामान घेऊन रेल्वेने ते वांगणीला परत गेले. कोणाच्याही मदतीशिवाय या दोन अंध मुलांनी स्टॉल कसा चालवला ? याचे आम्हाला आश्चर्य वाटले.

व्यासपीठावरील सादरीकरणात ‘आत्मन अकॅडेमी’ने एक सुंदर नाटक सादर केले. मग गायन, वादन, नृत्य अशी सादरीकरणे होत गेली. एका विद्यार्थ्याने ‘लुंगी डान्स’ करताना गोविंदाला फेल केले ! तर एका अंध विद्यार्थिनीने ‘सांज ये गोकुळी’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. एका अंध विद्यार्थ्याने ट्रॅकवर गायलेले ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे तर वन्स मोअर घेऊन गेले. काही रसिक श्रोत्यांनी तिथल्या तिथे या मुलांना रोख बक्षिसे दिली. ‘जव्हेरी ठाणावाला’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पथनाट्य सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाचे पाहुण्यांनी खास कौतुक केले.

विशेष मुलांच्या प्रगतीसाठी काम करणे फार आव्हानात्मक असते. शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या मानसिक बळाची ती कसोटीच असते. म्हणून ‘यहाँ के हम सिकंदर’ या संमेलनात या सर्व शाळांमधील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. संमेलनात विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स या मुलांनी व त्यांच्या शिक्षकांनी दिवसभर सांभाळले होते. त्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कला सादरीकरण करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

संमेलनाचा आर्थिक भार बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेने उचलला होताच. पण काही गोष्टींसाठी ठाण्यातील दानशूर व्यक्तींनीही सढळ हस्ते मदत केली. सविता चौधरी आणि प्रेरणा कदम या दोन शिक्षिकांनी सूत्रसंचालन उत्तम रीतीने करून कार्यक्रमास रंगत आणली.

या कला महोत्सवाला नीलम शिर्के, राजू तुलालवार या मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहित केले. तसेच चित्रकार विजयराज बोधनकर, उद्योगपती चंद्रशेखरन, कुवेगा स्टुडिओचे सुरजित गवई, प्रा.प्रदीप ढवळ, शिक्षणतज्ज्ञ मीरा कोरडे हेही मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.

मेघना साने

— लेखन : मेघना साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments