Friday, November 22, 2024
Homeलेखबालसंगोपन:पालकांची कर्तव्ये

बालसंगोपन:पालकांची कर्तव्ये

“लालयेत् पंच वर्षाणि, दश वर्षाणि ताडयेत्
प्राप्ते तु षोडसे वर्षे, पुत्र मित्रं समाचरेत् ।।”

हा श्लोक पालकांच्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवला आहे. ह्यात थोडक्यात सगळंच संगितलेलं आहे.

मूल जन्माला येतं आणि आई वडिलांना त्या चिमुकल्याला जगातील सर्वात परफेक्ट व्यक्ती बनवायची मानसिकता उफाळुन येते, आणि सुरू होते आपली अरेरावी. इतक्याच अंतराने दूध पाजायचे, इतक्या दिवसाने इतके वजन वाढले पाहिजे वगैरे वगैरे…

खरं तर पालक त्या बाळावर आपलं आधिपत्य गाजवत असतात. ते बाळ एक स्वतंत्र व्यक्तीत्व आहे हे त्यांना समजायला अनेक वर्षे लागतात. लहान बाळाची देखरेख करणे, काळजी घेणे वेगळे आणि त्यावर राज्य करणे वेगळे.
त्याच्या भुकेच्या वेळा आपण ठरवतो पण एखाद्याला जास्त भूक लागू शकते अथवा दोन तीनदा सू झाली की भूक लागू शकते हे कोण ठरवणार ?

बाळाला काही कळत नाही म्हणत आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण असं नसतं आपण त्याच्याशी जे बोलतो ते त्याला कळत असतं. जोरात बोलून पहा. बाळ लगेच रडायला लागतं. भूक लागली की, काही होत असेल तर, झोप चाळवली असेल तर किंवा आनंद झाला असेल तर हे सगळं ते अजाण (?) बाळ आपल्या पर्यंत पोहोचवत असतं. अर्थात ह्या काळात त्याची काळजी पालनपोषण, देखभाल ही व्हायलाच हवी. त्यात वादच नाही‌

थोडं मोठं झालं की त्याला जर एका बाईंकडे सोपवून आई कामाला जात असेल तर चिमुकला / चिमुकली त्याला विरोध करते. लक्ष पूर्वक बघितलं तर अनेक नवीन बदल घडलेले दिसतात. उदा. कमी जेवणे, जास्त झोपणे, रागाने वस्तू फेकणे, सतत चिडचिड करणे तर अनेकदा आपल्या पाल्यांकडे न जाणे हे त्या पोरांचे मानसिक उतार चढाव असतात. मग पालक त्यांना चॉकलेट आणून दे, एखादा चेंडू किंवा इतर खेळ देऊन त्याला मनवतात. ते पोर तात्पुरतं खुश ही होतं पण तरी कुठेतरी ती गाठ अनेकदा नेहमी घर करून राहते.

मग काय बाईने नोकरी सोडावी ? नाही तसं मुळीच नाही. पोराला मिळेल तितका वेळ द्यावा. त्याला कळत नाही ह्या नावाखाली काही समजावून न सांगणे हे चुकीचे. जाताना पालक जर सांगून गेले की किती महत्त्वाचं आहे त्यांचं जाणं तर ते खूप नाही पण थोडं कळतं त्याला. जाताना पापी घेऊन, “टा टा” करून गेलं की त्याला बरं वाटतं. घरी आल्यावर लगेच पोराजवळ गेलं त्यांच्याशी बोललं की ते आनंदित होतं.

आता ते मूल शाळेत जाऊ लागतं‌. बहुतांशी पालकांची शाळेसंबंधी बोलताना त्यांचा अभ्यास, होमवर्क इथपर्यंतच मजल असते‌. लहान मुलांनाही काही स्ट्रेस असू शकतात हे पालक लक्षात घेत नाहीत. मित्रांची भांडणं, टीचरचं बोलणं, एखादा विषय न समजणं, तर कधी त्याला येत असून ही त्याकडे शाळेत दुर्लक्ष करणं ही आणि इतर अनेक अडचणी त्याला येऊ शकतात. साधं ऐन वेळी पेन्सिल तुटणं, खोडरबर हरवणं हे ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची समस्या असू शकते. त्यांच्या त्या अडचणी ऐकून त्यावर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणं पालकांच कर्तव्य आहे.

इथे एक खबरदारी घ्यायला हवी ती म्हणजे, पालकांनी स्वतःच त्यांच्या अडचणी सोडवण्या पेक्षा मार्ग दाखवून त्यांच्या त्यांना सोडवू द्याव्या. जेणे करून ते आलेल्या संकटांवर स्वतः मात करायला शिकतात. पुढे भविष्यात न घाबरता आपले निर्णय घेण्यास सक्षम होतात.

हळूहळू मुलं किशोरावस्थेने वाटचाल करू लागतात. ही अवस्था जीवनातली सगळ्यात बिकट तरी ही महत्त्वपूर्ण अवस्था असते. ह्या काळात मूल धड मोठ्यात ही येत नाही तर धड लहान ही नसतं. ते स्वतःच विभ्रम अवस्थेत असते. विपरीत सेक्सकडे आकृष्ट होणं स्वाभाविक असतं. सेक्सच्या बाबतीत अनेक प्रश्न ही पडतात. ते कोणाकडे विचारायचे ? त्याचं समाधान कोण करणार ? हे काम ही जर पालकांनी समजूतदारपणे केलं तर मुलं फालतू साहित्याकडे वळत नाहीत आणि वळलीच तर परत ही फिरतात.

ह्या काळात, पालकांनी, मुलांच्या मित्र परिवारावर, त्यांच्या वागणुकीवर, त्यांच्या खोलीवर एक बारीक डोळा ठेवणं आवश्यक असतं. जर काही वेगळं वाटलंच तर धाक दपटशा न दाखवता त्यांच्या कलाने घेत प्रश्न सोडवावे.

ह्या काळात मुलांची प्रवृत्ती थोडी बंडखोर होते. त्यांना सारं जग आपल्या विरोधात आहे असं वाटतं असतं, पण तसं नाही, ते चूक विचार करत आहेत हे पटवणं खूप महत्त्वाचं असतं. ह्यात पालकांना अतिशय संयम पाळला पाहिजे. अनेकदा मुलं पालकांना उलट उत्तरं देतात. अशा वेळेस पालकांना राग येणं स्वाभाविक आहे पण मूल असं कां करतं ह्याचा शोध लावणे गरजेचे असते. तरी ही कधीतरी त्यांना रागवावे लागते पण ते रागवणे त्यांना सुधारण्यासाठी असावे.
” असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली ?”
” तू समजतोस काय स्वतःला” ही भाषा वापरणे टाळावं.

काही गोष्टी पालकांसाठी..

मुलांना प्रेझेंट पेक्षा प्रेझेंस द्या… तुमचा वेळ त्यांना जास्त महत्त्वाचा असतो. मुलाला हे कळू द्या की तो तुमच्यासाठी खूप खास आहे, मौल्यवान आहे.

तुम्ही जसं वागाल तसंच मूल वागतं. तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसे व्यक्त होता हे घरातील मूल सतत बघत असतं आणि त्याचच अनुकरण/ अनुसरण करतं.

आपल्या मुलांवर विश्वास दाखवा. त्याचा स्वाभिमान चार लोकांत “ह्याला काय कळतं ?” म्हणत डिवचू नका. त्याला ही मत आहे ते चूक असलं तर ते कसं हे समजावून सांगा आणि तरीही जर ऐकलं नाही तर त्याचं चुकलं की तो समजेल म्हणून शांत रहा पण वाऱ्यावर सोडू नका.

संस्कार वर्ग मुलांना घरीच भेटतात. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. पालकांना जर वाटत असेल की त्यांच्या मुलांनी संस्कारी, संयमी, कष्टाळू वगैरे वगैरे असावं तर हे गुण त्यांना स्वतःमध्ये आधी बाणाने लागतील.

शेवटी संस्काराची पहिली शाळा घरचं असते ना ?
मुलांना जन्म देणं सोपं असतं पण त्यांचे चांगले पालक होणं हे फार कठीण आणि वर्षानुवर्ष चालणारा प्रवास असतो.

राधा गर्दे

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments