१. बालदिन…..
“बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा”
आज वाटतसे हेवा देशिल का फिरूनी देवा ?
नाही मिळत फिरून अनमोल आहे ठेवा
नाही मागावे लागत आपसुक मिळे प्रेम
बालपण बालपण सारे काही असे क्षेम….
बालदिन करा करा आज साजरा जन हो
किती वेचती कचरा वणवण फिरती हो
शौर्य पताका दिल्लीत भिक मागती गल्लीत
कबुतरे सोडून हो सोडा सोडा जनरीत…
“गुलाब” ती बालके हो झोपडीत महालात
किती फरक पहा ना काही राहती हालात
तूप रोटी खाती काही काही पडतात फाका
त्याने घातले जन्माला, होऊ या ना “पाठीराखा”…..
एक एक हो बालक हो आहे कलाम नि बोस
देशासाठी घडवू या करू निगराणी खास
घ्याना दत्तक एखादा उचलूया त्याचा भार
पुण्यकर्म हेच आहे देशासाठी आहे सार ….
करा करा प्रण आज भार उचलीन थोडा
दत्तक त्या बालकाचा भरू ज्ञानानेच घडा
एक एक बालक हा देश माझा घडविल
पाने सोनेरी होतील देश माझा मढविल…

– रचना : प्रा. सौ.सुमती पवार नाशिक.
२. बालपण
किती निरागस होते बालपण
अल्लड अन खेळकर बोलण
नव्हती कशाची चिंता काळजी
मौज धमाल मस्ती हर्ष बाळाजी
आकाश स्वप्नांचे ठेंगणे होई
स्वप्नांचे गाणे गात जाई
खेळण्याचा गंध होता अत्तरासम
गुलाबी क्षण भासत स्मृतीभ्रमरासम
खेळण्याचे होत असे जगणे
धमाल गोष्टी रम्य बागडणे
तारे,चांदण्या परी रोज भेटायच्या
झिम्मा, फुगडी, लंपडाव मांडायच्या
आई बाबांचा जिव्हाळा स्पर्श
मनी रोज गारवा, होत असे हर्ष
आज खूप वाटे व्हावे बाल
कोणीतरी ओढावे गुब्बरे गाल
फुलपाखरासम उडावे
फळाफुलासम खुलावे
मिळेल का हे पुन्हा वरदान ?
रोज शोधतो,निरागस बालपण ?

– रचना : पंकज काटकर. काटी, जि:उस्मानाबाद
३. रम्य ते बालपण
गतकाळात मन माझे धावे
रम्य ते बालपण पुन्हा अनुभवावे
बालसुलभ निरागसतेचे उद्यान फुलवावे
इत्ता इत्ता पाणी म्हणत मजेत नाचावे
कट्टीफू गट्टीफूच्या खेळात रमावे
फुलपाखरासारखे बिनधास्त बागडावे
कृत्रिम बेगडीपणाचा लवलेश नाही
खोटा टेंभा मिरवण्याचा मनी सोस नाही
बाग आनंदाची ख-या खु-या प्रेमाची
म्हणूनच ओढ आहे पुन्हा लहान होण्याची

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
४. हरवलेले बालपण
गाडगी, मडकी, चुल, बोळकी
परकर, पोलकी, शेणाची भाऊली ||
गुप्त झाली लुटूपुटूची भातुकली
आवडू लागली साऱ्यांना
डोळे फिरवणारी भाऊली ||
दप्तराच्या ओझ्याखाली
बालमने गुदमरली
शाळा, ब्याच, कोचींग क्लास
बालकांना घेता येईना श्वास ||
विटूदांडू, चाकी, सुरपाट्या, लगोरी, शिरापुरी पडद्याआड गेली सारी
चिमण्या पाखरांचा गोंगाट संपला
मोबाईलमध्ये टक लावून बसला ||
गुजगोष्टी, शुंभमकरोती, सांजवात
सारे अज्ञात झाले बालमनाला ||
आजी आजोबा झाले वृध्दाश्रमात सेट
दिसभर नाही आईबाबांची भेट ||
आभासी दुनियेत या कशी
व्हावी चिमणीपाखरं ही सेट ?

– रचना : आशा दळवी. दूधेबावी, जि: सातारा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800